विश्वोत्पत्तीचे मूळ, नादचतन्य ओम् म्हणजेच ओम्कार आहे, तोच जिवात्मा व परमात्मास्वरूप आहे. ब्रह्म व परब्रह्मस्वरूप आहे, असे भारतीय तत्त्वज्ञान सांगते. मग प्रश्न पडतो की, ओम् नादचतन्य हेच विश्वनिर्मितीचे मूळ का? दुसरा कोणता शब्द का नाही? त्याचे मुख्य वैज्ञानिक कारण असे की, ओम् उच्चारणात जीभ अजिबात हलत नाही. अकार, उकार, मकार मिळून ओम् हा वर्ण तयार होतो. ते मूळ स्वरव्यंजनाचे प्रतीक आहे. त्यांच्या उच्चारणात व्याकरणातील विभक्ती प्रत्यय शब्दयोगी अव्यय हे काही लागत नाही. यामुळे ओम् हे विश्वातील एकमेव जिभेचा अडथळा नसलेले सर्वार्थाने परमशुद्ध नादचतन्य आहे. बाकी सर्व कोणत्याही भाषेतील सर्व वर्णोच्चार हे जिभेच्या हालचालीने किंवा जिभेचा अडथळा निर्माण होऊनच साकारतात. ओम्काराचा परमशुद्ध उच्चार केला म्हणजेच खुल्या कंठातून व नाभीस्थित परावाणीतून, तर जिभेची हालचाल व अडथळा अजिबात होत नाही व तशी ती होताही कामा नये. ओ नंतर होणाऱ्या मकार उच्चारणात ओठांचा आतला भाग एकमेकांच्या जवळ येऊन मिटतो. त्यामुळे ओम् नादचतन्याची स्पंदने साधक व्यक्तीच्या मुखातून बाहेर न पडता उलटय़ा दिशेने देहमनाअंतर्गतच्या सूक्ष्म पेशीपेशींपर्यंत पोहोचतात आणि आवाज, वाणी, देह, मन व आत्मशुद्धीची प्रक्रिया खऱ्या अर्थाने साकारतात.
सारांश- ओम् नामोच्चार हा साधक व्यक्तीच्या बाह्य़नादाकडून अंतर्नादाकडचा प्रवास आहे, जो त्याचा त्यालाच करायचा आहे. त्याच्या आवाज व वाणीतून उमटलेल्या, स्वसंवेद्य (स्वत:ने स्वत:ला जाणण्यास योग्य) आत्मस्वरूप नादचतन्य ओम्काराच्या शास्त्रशुद्ध उच्चार साधनेतून आणि त्याचा त्यालाच आवाज, वाणी, देह, मन आणि आत्मशुद्धीचा अनुभव व प्रत्यय घ्यायचा आहे.
पुढील लेखात नादचतन्याचे उगमस्थान असलेल्या चत्वारवाणीविषयी माहिती घेऊ.
डॉ. जयंत करंदीकर-omomkarom@rediffmail.com