01 March 2021

News Flash

निरामय घरटं : नि:शंक ऐकणं

नि:शंक ऐकणारे पालक, शिक्षक असतील तर मुलांच्या व्यथा, आंतरिक अशांततेला वाचा फुटू शकते.

(संग्रहित छायाचित्र)

उमा बापट

umaajitbapat@gmail.com

मुलांचं म्हणणं नि:शंक मनानं ऐकण्यातली ताकद पालकांना आणि शिक्षकांना स्वानुभवाने मिळवता येऊ शकते. आपल्या मुलांची भाषा ज्यांना उमगते त्या पालकांना आणि शिक्षकांना मुलांच्या भावविश्वात डोकावण्याची संधी असते. मुलांचे ऐकणं म्हणजे ते म्हणतील तसंच करणं नव्हे तर मुलांची भूमिका समजून घेणं, त्यांच्यावर अविश्वास न दाखवता त्यांना मतं  मांडू देणं, एक व्यक्ती म्हणून मुलांच्या व्यक्त होण्याचा आदर बाळगणं.

नि:शंक ऐकणारे पालक, शिक्षक असतील तर मुलांच्या व्यथा, आंतरिक अशांततेला वाचा फुटू शकते.

‘तोत्तोचान’ या मूळ जपानी पुस्तकाच्या मराठी अनुवादित पुस्तकातला एक प्रसंग आठवतो. तोत्तोचान या एका चुणचुणीत पण खटय़ाळ मुलीला ती शाळेतील मुलांना त्रास देते म्हणून शाळेतून काढून टाकण्याची शिक्षा मिळालेली असते. तिच्या आईने तिच्यासाठी नवीन शाळा शोधलेली असते. या नव्या शाळेच्या मुख्याध्यापकांशी ही मुलगी कसं बोलेल, कशी वागेल या काळजीत तिची आई होती. नव्या शाळेच्या मुख्याध्यापकांना तोत्तोचान भेटायला गेली. मात्र तिच्या आधीच्या शाळेसारखा तो ‘ इंटरव्ह्य़ू’ नव्हता. तर होत्या गप्पा! मुख्याध्यापक कोंबायाशी तिला म्हणाले, ‘‘तू तुला काय हवं ते मला सांग, विचार.’’ हवं ते या शब्दाचंच तिला फारच अप्रूप वाटलं. साधारण इयत्ता पहिलीच्या वयाची ही मुलगी तासभर तिच्या मनातलं उत्स्फूर्तपणे सांगत राहिली. वयाने ज्येष्ठ आणि श्रेष्ठ पदावर असलेल्या व्यक्तीनं एका लहान मुलीसाठी इतका वेळ देणं ही अतिशय दुर्मीळ गोष्ट. गेल्या लेखात मांडलेला ‘निवांतपणा’ही त्या मुख्याध्यापकांकडे होता. शिवाय ते नव्या प्रवेशासाठी आलेल्या एका छोटय़ा मुलीच्या बोलण्यात रमूही शकत होते. हा साधा वाटला तरी मोठे शैक्षणिक मूल्य देणारा प्रसंग आहे.

मुलांचं नि:शंक ऐकणं म्हणजे नुसतं त्यांचं बोलणं ऐकणं असं नाही. मुलांचा अबोला, मुलांचं खेळणं, न खेळणं, मुलांच्या इतरांशी चालू असणाऱ्या गप्पांचा कानोसा घेणं, मुलांचा स्वत:शी चाललेला मौन-संवाद हे सारं ‘ऐकता’ यायला हवं. एका पूर्व प्राथमिक शाळेत जाणीवपूर्वक एक प्रयोग करून बघण्यात आला. ज्यात शाळेतले शिक्षक पालकांसाठी जो निरोप देतात तो मुलं घरी जाऊन सांगतात का? हे त्यांना पाहायचं होतं. त्यानुसार बालवाडीतल्या एका मुलाने शाळेतून घरी आल्यावर आईला सांगितलं, ‘‘उद्या शाळेत चमचा, लिंबू आणायला सांगितलं आहे.’’ तेवढय़ात त्याच्याच वर्गातल्या दुसऱ्या एका मुलीच्या आईचा फोन आला. ‘‘अगं, ही म्हणते आहे, उद्या शाळेत चमचा, लिंबू मागितलं आहे, खरंच असं सांगितलं आहे का?’’ पालकांनी आपल्या मुलांच्या सांगण्यावर विश्वास ठेवणं महत्त्वाचं असतं. मुलांनी जे सांगितलं त्याची खात्री जेव्हा बाहेरून करावी लागते तेव्हा परस्पर नात्यातल्या विश्वासाचा पाया कसा तयार होणार?

मानसशास्त्रज्ञ एरिक एरिकसन यांनी माणसाच्या वाढीच्या अवस्थांनुसार प्रत्येक टप्प्यावर महत्त्वाचं कार्य सांगितलेलं आहे. विश्वास ही अशी बाब आहे की जिचा अर्थ लहानपणीच मुलांच्या मनात प्रस्थापित झाला नाही तर ती दूरवर परिणाम करणाऱ्या अविश्वासू, शंकेखोर असुरक्षिततेच्या वृत्तीला जन्माला घालू शकते. शाळेत काय घडलं आहे ते काही वेळेला मुलं घरी सांगणं टाळतात. यात कोणत्याही वयोगटाची मुले असू शकतात. परीक्षेचे गुण घरी न सांगणं, उत्तरपत्रिका लपवणं, शिक्षकांनी दिलेले शेरे घरी न दाखवणं अशी समान उदाहरणं दिसतील. पालकांची भीती, धाक यामुळे बहुतेक वेळा मुलांना दडपण येतं. ज्या घरात ‘असं का झालं?’ त्याबद्दल मुलाचं काय म्हणणं आहे याची विचारपूस कमी, नि थेट ओरडणं, शिक्षा देणं असा मार्ग असतो तिथे मुलं पूर्वानभवावरून बोलणं टाळू लागतात.

घरच्यांशी न बोलणं हे फक्त परीक्षेतल्या गुणांपुरतं थांबत नाही. घरी आपलं म्हणणं कोणालाच मान्य नाही, असं  मुलांना वाटायला सुरुवात होते. जिथे मुलांशी ‘डबा संपला का? अभ्यास झाला का? दप्तर भरलंस का? थोडय़ा मोठय़ा मुलांना, घरी कधी परत येणारेस? जेवायला घरी आहेस का? नीट गाडी चालव, पोहोचलीस की मेसेज टाकणारेस ना? अशी प्रश्नांची सरबत्ती चालू रहाते. त्यापुढे मात्र संवाद रंगत नाही, तिथे घरातल्या नात्यात ऐकणं-बोलणं यात यांत्रिकता येऊ शकते. घरच्यांशी संवाद काय साधायचा? हे कळेनासे व्हायला फारसा वेळ लागत नाही. मोठय़ांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्याला मुलांनी बांधील असावं, अशी साधारणपणे अपेक्षा असते. मात्र मुले बोलत असताना चूक, बरोबर अशा प्रकारच्या प्रतिक्रिया देणं, मुलांचं बोलणं चालू असतानाच आपलं उपदेशपर बोलणं सुरू करणं यात मोठय़ांना काही वावगं वाटत नाही.

त्याच्या विरुद्ध ‘स्वीकारशील श्रोते’ म्हणून मुलांचं म्हणणं ऐकून घ्यायची आपली मानसिक कुवत वाढवता येऊ शकते. मुलांना जे आणि जेवढं मांडायचं आहे तिथपर्यंत स्वस्थपणे थांबायची तयारी ठेवता येऊ शकते. मुलांना तोंडदेखलं ‘हं’ म्हणणं, जेवढय़ास तेवढं उत्तर देणं, नुसतं मान डोलावून ऐकल्यासारखं करणं असलं वरवरचं ऐकणं अजिबात आवडत नाही. कधी कधी तर काही मुलांना ती त्यांची अवहेलना वाटते. यात गांभीर्यानं ऐकणं किती असतं? कोणत्याही वक्त्याला श्रोत्याकडून लक्षपूर्वक, गांभीर्यानं ऐकण्याची अपेक्षा असते. वयाचा मापदंड इथे आड येण्याचं कारण नसावं. बोलणारा आणि ऐकणारा या परस्पर नात्याची ती मूलभूत समज असायला हवी. मग वयानं कोण मोठा आहे यापेक्षा बोलणाऱ्याचं म्हणणं ऐकून घेणं याला प्राधान्य हवं. हा संस्कार घरातल्या प्रत्येकाने स्वत:वर करून घ्यायला काय हरकत आहे? एकमेकांशी वागताना ही समंजस पद्धत नातं बळकट करण्यासाठी उपयोगी होऊ शकते.

मुलांना देखील दुसऱ्याचे म्हणणे ऐकून घ्यायची सवय लहानपणापासून लावता येते. काही वेळेला मुलेही पालकांचे, शिक्षकांचे नि:शंकपणे ऐकू शकली नाहीत तर त्यांचे नुकसान होऊ शकते. दरवेळी आई रागावलेली नसते, कधी ती दुखावलेली देखीलही असू शकते. दुसऱ्याचा अंत:स्वर कळायलासुद्धा कान तयार व्हावा लागतो, तो या मुलांचा झाला की दुसऱ्यांना समजून घेणं सोपं होऊ शकतं.

दरवेळी शिक्षकांच्या सूचना या केवळ मुलांना काहीच येत नाही असे समजून दिलेल्या आज्ञा नसतात. शिक्षक तळमळीने, कळकळीने विद्यार्थ्यांच्या हिताचे सांगण्याचा जीवतोड प्रयत्नही करत असतात. गुरुकुल परंपरेनुसार जे विद्यार्थी श्रवणातून ज्ञान-कण वेचू शकतात ते उत्तम शिकण्याचे उदाहरण होते. या शिकण्याच्या क्षमतेवर, ‘लन्रेबिलिटी’ या संकल्पनेवर विद्यार्थ्यांचे शिक्षण व यश कसे निगडित आहे हे मानसशास्त्रातील सध्याचे संशोधन शास्त्रीय प्रयोगातून मांडते आहे. बुद्धिमत्तेबरोबरच स्वत:ची प्रगती स्वत: करून घेण्याची, शिकण्याची वृत्ती महत्त्वाची असते.

कोणी कोणाचे नि:शंक ऐकणे आणि एकमेकांवर अधिकार गाजवणे, अहं मिरवणे किंवा दुखावणे हे पूर्णपणे भिन्न आहे. ऐकण्यामध्ये श्रेष्ठ-कनिष्ठ अशी श्रेणी जोडली की गल्लत होऊ शकते. कोणाचे ऐकणे म्हणजे कमीपणा अशी छटा जोडायचे कारण असते का? आम्हाला कोणी शिकवायचे नाही अशी वृत्ती विद्यार्थ्यांच्या मनावर साम्राज्य करणार नाही याची दक्षता शाळेने व घराने जरूर घ्यायला हवी. यासाठी एकमेकांचे आधी ऐकून घेणे ही शैक्षणिक ठिकाणी किंवा कुटुंबात वागण्याची रीतच बनू शकते. मतभिन्नता असू शकते. बोलणाऱ्याच्या म्हणण्याखेरीज वेगळी बाजू असू शकते, पर्याय असू शकतात. यावरही खुलेपणाने चर्चा व्हायची मुभा असू शकते.

मुलांच्या समस्या समजून घेत, त्यांना त्यांच्या समस्या सोडवायला मदत करत असतानाचे मुलांचे आवाज मला हा लेख लिहिताना पुन:पुन्हा ऐकू येतात.. कित्येकदा मुले नाराज होऊन, चिडून, कधी संतापाने, तावातावाने बोलतानाचे त्रस्त आवाज. शाळेत काही वेळा मुलांना वर्गात यायला का उशीर झाला हे समजून न घेता शिक्षकांनी केलेली शिक्षा भोगलेल्या मुलांचे हतबल आवाज, ‘मला खो-खो खूप आवडतो आणि मी आमच्या संघातली पक्की खेळाडू आहे. स्पर्धेच्या सरावासाठी जाऊ का विचारायचे आहे, पण बाबा ऐकणारच नाहीत,’ असे असहाय्य आवाज, ‘आईला यायला उशीर होतो. कधी तिचे संध्याकाळीही कामाचे कॅाल असतात. नाही तर बुडलेल्या टीव्हीवरच्या मालिका ती रेकॅार्ड करून ठेवते. त्या बघायच्या असतात तिला. मग मी नाही जात बोलायला..’ असे केविलवाणे आवाज.. कधी शब्दच न फुटलेल्या, विरलेल्या आवाजांना हवा असतो नि:शंक ऐकणारा श्रोता! तसा तो कुटुंबातच हवा. आजी-आजोबांमध्ये मिळाला, काका-मावशीत सापडला, शेजाऱ्यांमध्ये जाणवला. सुसंगतीत भेटला तर चिंताग्रस्तता, नराश्य, भीती, एकटेपणा अशा किती तरी समस्यांचा आक्रोश आपण टाळू शकू. नाही मिळाला तर आपला प्रतिध्वनी कुठे सापडतो का याची सरभर शोधाशोध सुरू होऊ शकते!

मनातले बोलायची हक्काची व्यक्ती नसल्याने जर पोकळी वाटायला लागली तर मुलांच्याही नकळत ती भरून येऊ शकते. गेमिंग, चॅटिंग, याकडे बघता बघता पावले वळू शकतात आणि सुरू होऊ शकतो आभासी जगातला काहीसा मूक संवाद.. म्हणूनच वेळीच ऐकू या एकमेकांचा अंतरनाद. निरामय घरटय़ामध्ये उमटावा मन मोकळा किलबिलाट..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 29, 2020 1:05 am

Web Title: hear the noise niramay gharte chaturang abn 97
Next Stories
1 व्वाऽऽ हेल्पलाइन : लाजतो मराठी लपवतो मराठी
2 यत्र तत्र सर्वत्र : स्त्रिया, कामगार क्षेत्र आणि सन्मान
3 गद्धेपंचविशी : मी नशीबवान!
Just Now!
X