बऱ्याच वेळेला लहानग्यांची कडाडून भांडणं होतात पण दोन तासांनंतर ते परत एकत्र खेळताना दिसतात. तिथे भावनांची तीव्रता पटकन विसरली जाते. याउलट ‘जिंदगीभर नही भुलूंगा!’ अशी मोठय़ा माणसांची धारणा असते. आयुष्यामध्ये प्रगती करत असताना आणि प्रौढ होताना काही तरी सोडून देण्याची कला आपण विसरून गेलो आहोत. जितकी ही कला अवगत होईल तितकी आपली झोप सुधारू लागेल. ही कला अवगत करता येणाऱ्या एका तंत्रज्ञानाचे नाव आहे ‘हार्ट मॅथस्’ अर्थात ‘हृदयाचे गणित’!
अनेक लोकांचा एक गरसमज असतो की झोपेत मेंदू काहीच काम करीत नाही. गाढ झोप म्हणजे मेंदूचे काम अगदी ठप्प पाहिजे. दारू पिऊन ‘आऊट’ झाले म्हणजे झोप मिळेल असेदेखील कित्येक लोकांना वाटते. वस्तुत: झोपेत आपला मेंदू काम करत असतोच. किंबहुना ‘रेम’ झोपेत तर आपण जागे असताना जितके मेंदूचे काम चालते त्याच्या दीडपट अधिक काम चालते. सर्वसाधारणपणे आपण गाढ झोप झाली असे कधी म्हणतो? जेव्हा उठल्यावर ताजेतवाने वाटले तरच हे विधान आपण करतो. ही गाढ झोप फार कमी वेळात झाली असाही एक अनुभव आपल्याला येतो. खरे तर वेळ तितकाच असतो पण अवस्था लवकर संपली असे आपल्याला वाटते. नक्की काय बरे चाललेले असते आपल्या मेंदूत? खरे तर मेंदूचे कार्य तितक्याच जोरात चालू असते, पण गाढ झोपेत ज्या घटनांचे चर्वितचर्वण चालते त्या आनंददायी अथवा फारशा दु:खदायी नसतात.
बऱ्याच वेळेला लहानग्यांची कडाडून भांडणं होतात पण दोन तासांनंतर ती परत एकत्र खेळताना दिसतात. ‘अरे आत्ता तर तुझे वाजले होते ना? मग काय झाले’ असे जर तुम्ही विचारले तर काही नाही, ‘इटस् ओके’ असे उत्तर मिळते. म्हणजे भावनांची तीव्रता पटकन विसरली जाते. याउलट ‘जिंदगीभर नही भुलूंगा!’ अशी मोठय़ा माणसांची धारणा असते. आयुष्यामध्ये प्रगती करत असताना आणि प्रौढ होताना काही तरी सोडून देण्याची कला आपण विसरून गेलो आहोत. जितकी ही कला अवगत होईल तितकी आपली झोप सुधारू लागेल. आधुनिक तंत्रज्ञानाने ही कला अवगत करता येते. त्यातील एका तंत्रज्ञानाचे नाव आहे ‘हार्ट मॅथस्’ अर्थात ‘हृदयाचे गणित’!
या तंत्रज्ञानाच्या जन्माची कथादेखील तशीच औत्स्युक्यपूर्ण आहे. १९९३ साली रोलॅड मॅक्राटी हा संशोधक यू.सी.एल.आर (UCLR) या कॅलिफोर्नियातील ख्यातनाम विद्यापीठात उंदराच्या हृदयावर काम करत होता. आपल्या मेंदूमध्ये सगळ्यात पुढे असलेल्या भागाला ‘प्रिफ्रंटल लोब’ असे म्हणतात. सर्वसाधारणत: ‘मी, माझे, मला असे वाटले’ अशा प्रकारचे विचार या भागातून येतात. जेव्हा आपण आरशामध्ये स्वत:चे प्रतिबिंब पाहतो तेव्हा हा ‘मी’ आहे याचे आत्मभान प्रिफ्रंटल लोब करून देतो. गंमत म्हणजे जगात फक्त चारच प्राणी असे आहेत, ज्यांना आरशात पाहिले असता ते स्वत:कडे पाहत आहेत हे कळते. माणसाखेरीज, चिम्पांझी, डॉल्फीन आणि हत्ती हे ते प्राणी आहेत. मांजर अथवा कुत्र्यासमोर आरसा ठेवला तर ते ताबडतोब गुरगुरायला लागतील अथवा आरशाला बोचकारतील. माणसांमध्ये हा भाग फारच प्रगत झाला आहे. किंबहुना एखाद्या कंपनीचा सीईओ जसे प्रत्यक्ष श्रमिक (फिजिकल लेबर) काम करत नाही तर मार्गदर्शन करत समन्वय घडवून आणतो. त्याप्रमाणे पाहणे/ऐकणे/बोलणे इत्यादी क्रिया मेंदूचे दुसरे भाग करतात आणि हा भाग मात्र विचार करणे आणि कुठली कृती कधी करायची हे ठरवतो. थोडक्यात याला आपण वैचारिक मेंदू असे म्हणू यात. याउलट मोठय़ा मेंदूच्या अगदी आतील भागात एक अर्धचंद्राकृती वेलांटीसारखा भाग असतो. या भागात आपल्या अनेक भावनिक आठवणी असतात. या वेलांटीच्या एका बाजूला बदामाच्या आकाराचा एक भाग असतो. याला अ‍ॅमीग्डीला (लॅटीनमध्ये = बदाम) म्हणतात. हा भाग अतिशय महत्त्वाचा मानला जातो. तुमच्या अ‍ॅमीग्डीलाला जर एक सूक्ष्म तार टाकून मी उद्दीपित केले तर क्षणार्धात तुम्हाला प्रचंड घाबरल्यासारखे वाटेल, काही तरी चुकते आहे अशी चुटपुट लागले. छातीत धडधडल्यागत होईल, दडपण ठेवल्यागत वाटेल. मुख्य म्हणजे कुठचाही विचार अथवा परिस्थिती नसताना ह्या सगळ्या गोष्टी भासू लागतील. यालाच ‘पॅनिक अ‍ॅटॅक’ असे म्हणतात. तुम्हाला जेव्हा जेव्हा संकटाची अथवा धोक्याची जाणीव होते, तेव्हा सर्वप्रथम मेंदूचा हा भाग कार्यरत होतो. एखाद वेळेला दु:खाची अथवा रागाची तीव्र भावना झाली असतानादेखील हा भाग उद्दीपित होतो. एकदा का हा भाग कामाला लागला की आपले भोवतालच्या परिस्थितीचे अवलोकन (परसेप्शन) देखील बदलते. उदा. ज्या लोकांना कीटकांची भीती वाटते त्यांना जेव्हा छोटा किडा दाखवून त्याचा आकार किती होता? असे विचारले. तेव्हा आकाराच्या तिप्पट आकडा सांगितला, कारण भीतीमुळे अ‍ॅमीग्डीला उद्दीपित झाला होता.
तुलसी रामायणात भावनांमुळे आपले परसेप्शन कसे बदलते यावर भाष्य करणारी एक सुंदर गोष्ट आहे. तुलसीदास रामायणाचे निरूपण करत. त्या वेळी इतके सुंदर काव्य ऐकायला स्वत: हनुमान एका म्हाताऱ्या माणसाचे रूप घेऊन हजर असत. एका संध्याकाळी सीतेला रावण आणि राक्षसी कशा त्रास देत आणि हनुमान तिला शोधायला लंकेत गेला असताना त्याने झाडावर लपून सीतेला त्या राक्षसी कशा छळत होत्या वगरे याचे तुलसीदास वर्णन करत होते. त्यात त्यांनी ज्या झाडाखाली सीता बसली होती ते कसे शुभ्र फुलांनी बहरले होते याचा उल्लेख केला. संध्याकाळी सर्व लोक निघून गेल्यानंतर हनुमंत तुलसीदासांकडे आले आणि म्हणाले की कथा फार सुंदर होते आहे पण एक चूक आहे. आश्चर्यचकित तुलसीदासांनी कोणती चूक असे विचारल्यावर हनुमान म्हणाले की ती फुले शुभ्र नसून लाल रंगाची होती. तुलसीदासांचे मत प्रत्यक्ष रामचंद्रांनी त्यांना दिव्य दृष्टी दिल्याने आपल्याला पांढरी फुलेच दिसली यावर ठाम होते. हनुमंतांनी आपले स्वरूप प्रगट केले आणि म्हणाले मी स्वत: तिथे होतो आणि ती फुले लाल होती. शेवटी प्रकरणाचा निकाल लावण्याकरिता खुद्द सीतेची साक्ष काढली. तेव्हा तीदेखील फुले पांढरीशुभ्रच होती असे म्हणाली. सीतेला त्रास होताना बघून हनुमंतांना इतका संताप चढला होता की सगळ्या गोष्टी त्यांना लाल दिसू लागल्या होत्या! असो. अशा रीतीने या अ‍ॅमीग्डीला आणि भावनिक मेंदूचे महत्त्व रोजच्या जीवनाशी, विशेषत: भावनांशी निगडित आहे.
या भावनिक मेंदूचा आणि आपल्या हृदयाचा संबंध आपल्या सगळ्यांच्याच परिचयाचा आहे. भीती वाटली की छाती धडधडू लागते. आपण परत रोलँड मॅक्रेटीकडे वळू या. हा संशोधक उंदरांमध्ये भावनिक मेंदू आणि हृदय यांच्यात संदेश कसे पाठवले जातात याचा अभ्यास करत होता. नि अधिकाधीक बुचकळ्यात पडत होता. भावनिक मेंदूपासून जितके संदेश हृदयाला जात होते. त्याच्या दुपटीने संदेश हृदयाकडून भावनिक मेंदूला जात होते. जर मालक आणि नोकर काम करत असतील तर स्वाभाविकपणे मालकाकडून जास्त संदेश जातील! नेमकी हीच बाब मॅक्रेटीला गोंधळात टाकत होती. आत्तापर्यंत आधुनिक वैद्यकशास्त्राप्रमाणे मेंदू हा मालक असून बाकी शरीर हे नोकराप्रमाणे आहे. हृदय हे रक्ताभिसरण करणारा केवळ एक ‘पंप’ आहे. सुदैवाने मॅक्रेटीने ही बाब एक न सुटलेले कोडे म्हणून दृष्टिआड केली नाही. संशोधक होण्याआधी त्याने आपली बॅचलरच्या डिग्रीमध्ये जागतिक साहित्य हा मुख्य विषय घेतला होता. अमेरिकी शिक्षण पद्धतीमध्ये, विशेषत: त्यांच्या दहावीनंतरच्या शिक्षणामध्ये कमालीचा मोकळेपणा आढळतो. घोकंपट्टीवर भर न देता ज्ञानाचा वापर प्रत्यक्ष आयुष्यामध्ये कसा करता येईल आणि एका दिवसाच्या परीक्षेच्या मार्कावर केवळ भर न देता, विद्यार्थ्यांने सबंध वर्षभर कशी प्रगती केली यावर पुष्कळ अवलंबून असते. त्यामुळेच भारतामध्ये जो विषय केवळ ‘कला’ शाखेत घेतला जातो, तोच विषय मॅक्रेटीने डिग्रीला घेतला तरी विज्ञान शाखेत त्याला प्रवेश मिळाला. त्याचा फायदा जगाला मिळाला.
ज्ञानेश्वरांसारखा महाकवी, जो एक एक शब्द अत्यंत जपून वापरतो, ज्याच्या एका एका ओळीवर लोक डॉक्टरेट करतात, तो महान संतदेखील ‘हे हृदयीचे ते हृदयीला’ असेच शब्द वापरतो. इंग्रजीतदेखील ‘माय हार्ट वॉज हेवी विथ सॉरोज’ असेच म्हणतात. मॅक्रेटीला हीच बाब ध्यानात आली. हृदयापासून जाणारे संदेश कसे पाठवले जातात? त्यांच्या आपल्या विचारांवर, तसेच भावनांवर काय परिणाम होतात? ही हृदयाची भाषा आपल्याला अवगत झाली तर त्याचे काय फायदे होऊ शकतील? याकरिता आधुनिक तंत्रज्ञान आपल्याला कसे मदत करू शकते?  या प्रश्नांची उत्तरे २७ सप्टेंबरच्या लेखात.