08 July 2020

News Flash

कृष्णाकाठची कृष्णाई सावरते आहे..

उणिवांची जाणीव पदोपदी होते आहे.. पण या संकटावर मात करायचं धैर्य याच कृष्णामाईनं तिच्या लेकींना दिलंय..

(संग्रहित छायाचित्र)

|| डॉ. स्वाती शिंदे-पवार

पूर परिस्थिती हळूहळू बदलू लागली.. ‘कृष्णे’नं घर सोडल्याच्या बाहेर पडल्याच्या बातम्या कळू लागल्या तसं स्त्रियांनी घरांकडे धाव घेतली. पुरानं माखलेले कपडे आता त्या पुराच्याच पाण्यात धुऊन काढत आहेत. मातीत घुसलेली भांडीकुंडी नदीच्या पाण्यात विसळून घेत आहेत. लक्तरं झालेलं, रेंदा झालेलं, कुजलेलं सारं घराबाहेर काढत आहेत. पुरातून सावरताना बरंच काही अर्धमुर्ध आहे. उणिवांची जाणीव पदोपदी होते आहे.. पण या संकटावर मात करायचं धैर्य याच कृष्णामाईनं तिच्या लेकींना दिलंय..

बाईच्या दु:खाचा पोतच निराळा असतो. तिच्या वेदनेचं वस्त्र अनेक धाग्यांची वीण गुंफून तयार होतं. सुतांचे विविध स्पर्श जसे तिने देहावर खेळविलेले असतात तशा दु:खांच्या किती तरी किनारी तिच्या अंगाखांद्यावर झळाळत असतात. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आलेल्या गाडीतून हातात येणारं ब्लँकेट, पाण्याच्या बाटल्या, मेणबत्त्या, काडेपेटय़ा, याच्यासोबत स्त्रियांना देण्यासाठीच्या साडय़ा घ्यायला मी हात पुढे केला आणि आतून गलबलून यायला लागलं..

सांगली जिल्ह्य़ाचं ऐश्वर्य.. सुपीक सधन भाग म्हणजे माझा कृष्णाकाठ! कोणत्याही कार्यक्रमात कृष्णाकाठची स्त्री लगेच ओळखू येते, ती तिच्या अंगभर दागिन्यांनी अन् अंगावरच्या साडीनं. या सुजलाम-सुफलाम भागाला कृष्णेच्या महापुरानंच आज दैनावस्थेत ढकललंय. त्यात असाहाय्य झालेल्या तिला उभं राहायचं आहे.. अनेक कृष्णाई भोवताली आहेत. साडय़ावाटप सुरू झालंय. एक साडी दिल्यानंतर आपसूकच दुसरा हात पुढे येतो आहे. एका साडीने एका दिवसाचा प्रश्न सुटणार आहे; पण दुसऱ्या दिवसाचं काय? हाताला लागणारा हात आणि पायाला होणारा पायांचा स्पर्श गारगुट्ट लागत होता. मग लक्षात आलं.. अरे, आपण साडी तर देतोय; पण या प्रत्येकीचा परकर तर ओलाचिंबच आहे. देणारे हात तोकडे आहेत याची जाणीव होत होती आणि बाईच्या दु:खाची कहाणी माझ्या डोळ्यांतून अश्रूद्वारे वाहत होती. आतल्या आत रोजच पुराचा सामना करणारी कृष्णाकाठची प्रत्येक बाई आज बाहेरचा पूर सावरत होती. हातात सॅनिटरी नॅपकिन घेऊन ते वाटणाऱ्या माझ्या बहिणींचं मला किती कौतुक वाटलं होतं; पण ते वापरण्यासाठीच्या अंतर्वस्त्राचं काय? या कल्पनेनंही काळीज फाटत होतं..

कृष्णेनं केलेल्या थयथयाटानं उद्ध्वस्त झालेलं प्राणप्रिय घर मला प्रत्येक बाईच्या डोळ्यात दिसत होतं. दु:खाची गहिरी भाषा प्रत्येकीचा चेहरा बोलत होता. भिजलेल्या साऱ्या जणींचे देह थिजलेली व्यथा व्यक्त करीत होते.. पुराचं पाणी गावात शिरलं. बघता-बघता घरात शिरलं. तरीही घर प्रिय असणारी बाई घरासाठी बाहेर पडू पाहात नव्हती. जिवापेक्षा प्रिय होता तो तिला तिचा संसार. काडी-काडी गोळा करून तिनं बांधलेलं कष्टाचं घरकुल. रुपयाला रुपया जोडून खरेदी केलेल्या तिच्या साऱ्या लाडक्या वस्तू, आवडेल ती भांडीकुंडी, गरजेबरोबरच प्रेमाने घेतलेले कपडे, झुळझुळत्या साडय़ा.. बाई गं.. वर्षभराची जुळणी म्हणून कष्टानं करून ठेवलेली चटणी, उन्हाळ्यात राबून-राबून बनवलेल्या कुरडया, भातवडय़ा, पापड, शेवया, तीन-तीन र्वष टिकणारं आंब्याचं लोणचं, वेळ मिळेल तेव्हा निवडून ठेवलेले गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ.. काय लागत नाही घर चालवायला? सगळं, सगळं लागतं.

थैमान घातलेल्या महापुरानं संपूर्ण घर पाण्याखाली घेतलं होतं. घरातली भांडीकुंडी पाण्यावर तरंगत होती. कपाटं, पलंग, फर्निचर कुजून तुटून गेलं होतं. आतल्या छोटय़ा भिंतीही ढासळलेल्या. कुणाच्या घराच्या, तर कुणाच्या गोठय़ाच्या भिंती ढासळल्या होत्या. घरातल्या चुलींनी त्यांची जागा सोडावी इतका मोठा धक्का कृष्णेच्या पाण्यानं खात्यापित्या माणसांना दिला होता. ज्या हातांनी आजवर सडासंमार्जन केलं, रांगोळ्या घातल्या, तेच हात आज माखला हात घेऊन चिखलालाच सावडताना दिसत होते. चुलीला पोत्यारा देणारे आणि ऊबंकडी सारवून काढणारे कोमल हात भिंतीवर चढून बसलेले जाडजूड मातीचे पापुद्रे उकलण्यात व्यग्र होते. फरक किती होता या दोहोत.. ऊबंकडी सारवून घेताना मातीचा घमघमाट असायचा.. किती छान तो नाकात घुसायचा, मनभर आनंद दरवळायचा. आज मात्र सारवायचं नव्हतं. पुढं होऊन घर सावरायचं होतं.

किती जीव लावते ना बाईची जात घरादाराला, प्राणिमात्रांना, झाडावेलींना, कुटुंबातील नात्यागोत्यांना, घरादारातल्या प्रत्येक वस्तूला.. ज्याला – त्याला तिनं आपलंसं केलेलं असतं. किती मेहनतीनं हे सारं उभं राहिलेलं असतं. आयुष्यातला किती अनमोल वेळ या साऱ्यात खर्ची घातलेला असतो. मोहाचे अनंत क्षण किती चाणाक्षपणे तिनं परतवलेले असतात. तिच्या, त्याच्या त्यागाच्या जिवावरच घराच्या भक्कम भिंती उभ्या असतात. पण घर सजतं ते घरातल्या स्त्रीमुळेच. डौलानं उभं राहतं, हसतं-खेळतं, बागडतं, धैर्यानं पुढं जातं.. या साऱ्यांच्या पाठी तीच तर असते. ती कोलमडली तर अख्खं घरच कोलमडतं, कोसळतं, विस्कटतं. आजची परिस्थिती मात्र औरच आहे. घराघरांतली ‘ती’ भक्कमपणानं उभी आहे;  पण संकटांनी तिला चोहोबाजूंनी घेरलं आहे. नजर जाईल तिथं तिला तिचाच मुका आक्रोश ऐकू येतो आहे.. घरातल्या पुरुषाच्या डोळ्यांतही अश्रू आहेत.. त्या नजरेलाही तिला आश्वस्त करायचंय..

सारं शरीर बधिर झाल्यासारखं वाटू लागलंय. दोन हातांनी काय-काय, कसं-कसं सावरायचं.. अगदी पहिल्यासारखं आवरलेलं? नीटनेटकं घर आज मांडता येईना झालंय. कुठं काय मांडावं तेही कळेना झालंय. त्याच त्या एवढय़ाशा घरात चालायचं तरी किती? अरे, कोण मोजणार तिच्या चालण्याचं अं.. त.. र! ज्या दोन डोळ्यांनी पुढची सुंदर स्वप्नं बघितली त्या उद्ध्वस्त स्वप्नांचा हिशोब नेमका कुणी मांडायचा? काय काय पडतंय कानांवर.. मुलांचं रडणं, माणसांचं ओरडणं, गाईचं हंबरणं, जनावरांचं जीव तोडून ओरडणं, कुत्र्या-मांजरांचे आवाज.. आणि हा कसला शिरतोय वास दोन नाकपुडय़ांतून आत आत? हेच ते वर्षभराची बेगमी म्हणून वाळवून, पावडर लावून, लिंबाची पानं घालून ठेवलेलं धान्यधुन्य. कशाचा करशील स्वयंपाक आता.. आणि काय घालशील भुकेलेल्यांना? नवऱ्याला, मुलांना, सासू-सासऱ्यांना? साठवून ठेवलेल्या सगळ्या धान्यांतून कोंब बाहेर येऊ लागलेत. सृष्टीला सर्जनाचा जिव्हाळा भारीच. आता मात्र वर्षभराची उपासमारी, कुजलेल्या धान्याचा, भिजलेल्या लगदा झालेल्या कपडय़ांचा, भरलेल्या सामानाचा, काठावरच्या घाणीचा उग्र दर्प घरभर भरून राहिलेला.. तोच आता नाकातोंडात शिरतो आहे..

अंगणात पाणी आलं तरी घर सोडायची तयारी नसणाऱ्या बाईनं महत्त्वाच्या किती तरी वस्तू उंचावर ठेवल्या होत्या.. पोरांची अभ्यासाची दप्तरं, घरातली महत्त्वाची कागदपत्रं, किती जोखमीनं कपाटबंद केली होती; पण त्याच कपाटांनी स्वत:ची जागा सोडली होती. पाण्यानं आतल्या सामानासहित कपाटाला पोटाशी घेतलं होतं. घरातला फ्रिज, वॉशिंग मशीन पाण्यावर तरंगत होते. इतर वेळी आपल्याला न उचलता येणारा सिलेंडर कुठल्या कुठे जाऊन पडला होता.

घरात शिरलेल्या प्रत्येक बाईचे डोळे विस्फारले होते. बुद्धी कुंठित झाली होती. तिच्या वेदनेचा टाहो फक्त तिलाच ऐकू येत होता. एक मात्र खरं, अंगावर असलेलं अन् घरात जपून ठेवलेलं सोनं-नाणं अनेकींनी बाहेर पडताना सोबत घेतलं होतं. नाही तरी त्यांची अवस्था सांगलीत दुसऱ्या माळ्यावर अडकून राहिलेल्या आजी-आजोबांसारखीच झाली असती. पंचवीस तोळे सोनं आणि दोन लाख रुपयांची रोकड घरात आहे म्हणून आजीबाई घरच सोडायला तयार नव्हत्या. सुरक्षारक्षकांनी विनवूनही त्यांनी बाहेर पडायला नकार दिला. पाण्याची पातळी वाढली आणि मग आरडाओरडा सुरू झाला. आजीबाईंनी सगळं सोनं आणि पैसे एका गाठोडय़ात बांधलं. सामान सोबत घेतलं आणि बोटीत बसल्या. हरिपूरला पाण्याची पातळी आणि वेगही जास्त होता. नेमकी त्या तडाख्यानं बोट हिंदकळली आणि आजीबाईंचं ते गाठोडं पुराच्या पाण्यात पडलं. ज्याचा मोह बाळगून त्या मृत्यूला सामोरं जायला तयार झाल्या होत्या ते धन कृष्णेच्या पाण्यानं आपल्या पोटात घेतलं.. आता यापुढे त्या थकलेल्या आजी-आजोबांचं काय होणार? त्यांना मुलंबाळं असतील का? ती आजी कशी सांभाळेल तिच्या वृद्ध नवऱ्याला? किती जीव मारून बायका खरेदी करतात हे सारं.. प्रपंच, वैभव, डामडौल हा प्रत्येक बाईच्या तीळतीळ तुटण्यातून उभा राहत असतो; पण तो विस्कटला की तिच्या खांद्यावर हात ठेवणारं, तिला धीर देणारं, भक्कमपणानं तिच्या पाठीशी उभं राहणारं आपलं माणूस तिला हवं असतं.

दुसरीतली एक मुलगी माझं दप्तर, पेन्सिल, कंपास, सगळं पाण्यात गेलं म्हणून हमसून-हमसून रडत होती. ब्रह्मनाळला उलटलेल्या बोटीतून जे मृतदेह काठावर आणले जात होते त्यातलं एक दृश्य पाहून मी पुरती कोलमडून गेले होते. बाळानं आजीला मारलेली घट्ट मिठी.. त्याच्या हाताचं तर्जनीचं बोट पुराचं पाणी दाखवणारं.. तिनं किती आवळून पकडलेलं त्याला, तो निसटू नये म्हणून.. पण काळाचा तडाखा किती महाभयंकर. महापूर दोघांनाही घेऊन गेला. बघणाऱ्या साऱ्या आयांनी हंबरडा फोडला.

या साऱ्या पूरग्रस्तांसाठी मदतीचे ट्रक घेऊन गावात जाताना काय पाहिलं नाही म्हणून सांगू? रावाचे रंक होताना पाहिले. टुमदार घरांचे उद्ध्वस्तपण पाहिलं. कायम हसत राहणाऱ्या बाईचे हुंदके ऐकले. ढासळलेल्या भिंती, खचलेली जमीन, होतं नव्हतं ते घालून पेरलेल्या जमिनी पाण्याखाली गेलेल्या पाहिल्या. अरे, कधी नव्हे ते जीव वाचवण्यासाठी तिसऱ्या माळ्यावरच्या टेरेसवर सगळ्या गावातली एकत्र आणलेली जनावरं पाहिली. पशुधन वाचवण्याची तगमग पाहिली. त्याच्या विरुद्ध एक वेगळाच अनुभवही आला. माणसांना गिळणारी मगर चक्क पाण्याच्या तडाख्यानं दुसऱ्या माळ्यावर आली आणि दोन दिवस अडकून पडली. लाकडी ओंडका समजून घरातल्या आजोबांनी तिच्याकडे दुर्लक्ष केलं; पण पोरांनी जेव्हा ती मगर असल्याचं सांगितलं तेव्हा घरातल्यांची पळता भुई थोडी झाली. बायांनी घरातली पोरं आपल्या पदराखाली घेतली. कुठं धावायला जागा नाही आणि दिसायला डोळ्यापुढे उजेड नाही. अंधाराचं साम्राज्य असणाऱ्या त्या दोन रात्री जागून काढणाऱ्या त्या जीवांचा किती थरकाप झाला असेल? भीतीनं गाळण उडवणाऱ्या या महापुरानं घराघरांत ‘कर्तृत्ववान’ स्त्रिया निर्माण केल्या हे ही तितकंच खरं आमणापूरचा भाग असणाऱ्या अनुगडेवाडीत आत शिरताना पुराच्या पाण्यात व्यायलेली म्हैस मरून पडलेली दिसली. तिनं किती वेदना आणि आक्रोशातून नवा जीव जन्माला घातला असेल.. आपल्यासोबत तो मरताना त्याला वाचवण्याची किती धडपड केली असेल.. जन्मलेल्या त्या बाळानं आईचा पहिला पान्हाही चोखला नसेल. निसर्गापुढे हतबल झालेलं तिचं आईपण आक्रोश मांडून काठाला निपचित पडलं होतं..

पण हळूहळू परिस्थिती बदलू लागली.. वरुणराजाला दया आली आणि थांबला तो. मग कृष्णेनं घर सोडल्याच्या, बाहेर पडल्याच्या बातम्या कळू लागल्या तसं स्त्रियांनी घराकडे धाव घेतली. पुरानं माखलेले कपडे आता त्या पुराच्याच पाण्यात धुऊन काढत आहेत. मातीत घुसलेली भांडीकुंडी नदीच्या पाण्यात विसळून घेत आहेत. लक्तरं झालेलं, रेंदा झालेलं, कुजलेलं सारं घराबाहेर काढत आहेत. भिंतीवरून मायेचा हात फिरवत आहेत. वाचलेली जनावरं, उरलं-सुरलेलं काहीबाही नीटनेटकं लावत आहेत. भिजलेल्या घराला आणि मनाला थोडं उन्हात वाळवत आहेत. पुरातून सावरताना बरंच काही अर्धमुर्ध आहे. उणिवांची जाणीव पदोपदी होते आहे, गेलेल्या गोष्टींची आठवण येते आहे, नुकसानाची पोकळी उरात घर करते आहे. भवताली सारं, सारं घडताना बाई डोळस होते आहे. एकमेकींना आधाराचा हात देते आहे. दुसरीचा क्वचित हेवा करणारी तिची नजर आता स्नेहाद्र्र होते आहे, मदतीला धावते आहे. आम्ही नदीला ‘माय’ म्हणत आलो. तिच्या पुरानं आमच्या डोळ्यांतला महापूर आता ओसरून गेला. दु:खानं त्याची परिसीमा गाठली. येईल त्या संकटावर मात करायचं धैर्य याच कृष्णामाईनं तिच्या लेकींना दिलंय.

पुरातून उभं राहताना कपाळावरचं लालभडक कुंकू उद्याचा सूर्य आशादायी उगवणार असल्याची साक्ष देतं आहे. त्याचा उबदार हात हाती घेऊन, चिमण्या-पाखरांचा चिवचिवाट ऐकत, वृद्धांच्या नजरेत चमक भरावी असा नेटका संसार घराघरांतली बाई पुन्हा थाटणार आहे.. चारचौघात मानानं मिरवताना छानसं नटणार आहे.. होय, झाडावर नवी पालवी दिसणार आहे.. या भूमीतून हळूहळू चैतन्याचा नवा कोंब फुटतो आहे!

सांगलीत दुसऱ्या माळ्यावर अडकून राहिलेले आजी-आजोबा. पंचवीस तोळे सोनं आणि दोन लाख रुपयांची रोकड घरात आहे म्हणून आजीबाई घरच सोडायला तयार नव्हत्या. सुरक्षारक्षकांनी विनवूनही त्यांनी बाहेर पडायला नकार दिला. पाण्याची पातळी वाढली आणि मग आरडाओरडा सुरू झाला. आजीबाईंनी सगळं सोनं आणि पैसे एका गाठोडय़ात बांधलं. सामान सोबत घेतलं आणि बोटीत बसल्या. हरिपूरला पाण्याची पातळी आणि वेगही जास्त होता. नेमकी त्या तडाख्यानं बोट  हिंदकळली आणि आजीबाईंचं ते गाठोडं पुराच्या पाण्यात पडलं. ज्याचा मोह बाळगून त्या मृत्यूला सामोरं जायला तयार झाल्या होत्या ते धन कृष्णेच्या पाण्यानं आपल्या पोटात घेतलं..

swatipawarshinde@gmail.com

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 24, 2019 12:11 am

Web Title: heavy rainfall krishna river flood 2019 mpg 94
Next Stories
1 पर्यावरणाचं वाढतं संकट
2 लोकप्रिय नसला तरी, महत्त्वाचा!
3 लळा
Just Now!
X