08 August 2020

News Flash

मायेची सेवा

मध्यरात्री एअरपोर्टवरून वा रेल्वे स्टेशनवरून आणायला जाणं असो की वृद्धांना लग्नासाठी तयार करण्यापासून त्यांना तिथे घेऊन जाणं असो किंवा अगदी योग्य वेळी त्यांना औषधं देणं,

| November 15, 2014 01:07 am

19-ajiajobaमध्यरात्री एअरपोर्टवरून वा रेल्वे स्टेशनवरून आणायला जाणं असो की वृद्धांना लग्नासाठी तयार करण्यापासून त्यांना तिथे घेऊन जाणं असो किंवा अगदी योग्य वेळी त्यांना औषधं देणं, पुस्तकं वाचून दाखवणं, गप्पा मारणं असो, अशासारख्या सोयी विनामूल्य देणाऱ्या ‘माया केअर सर्व्हिसेस’ आणि संस्थेची मुख्य प्रवर्तक मंजिरी गोखले जोशी यांच्याविषयी.
ch11

सेवादलाच्या संस्कारात वाढलेल्या आईवडिलांची लेक मंजिरी. तिच्यावरही तेच संस्कार झाले, समाजसेवेचे, समाजातील प्रत्येकाशी मनाने जोडले जाण्याचे! एकदा मंजिरीला कळलं तिचे ch12एक परिचित राहत असलेल्या इमारतीची लिफ्ट खूप दिवस बंद आहे. त्यामुळे ते आजोबा घरातच अडकून पडले आहेत. मंजिरीचा जीव कळवळला. ऑफिस सुटताच ती थेट त्यांच्या घरी पोहोचली. ते वृद्ध एकटेच राहत होते. त्यांनी दार उघडलं. मंजिरीला ठसका लागला. संपूर्ण खोली धुराने, सिगरेटच्या वासाने कोंदटलेली होती. आजोबा कमालीचे चिडलेले होते. लिफ्ट बंद पडल्याने कितीतरी दिवसात ते मोकळय़ा हवेत फिरले नव्हते. मंजिरीने त्यांना समजून घेतलं. शांत केलं. त्यांना हवं ते सामानसुमान आणून दिलं. तिथली लिफ्ट सुरू होईपर्यंत तिचा हा नित्यक्रम ठरून गेला. मंजिरी गोखले जोशी हिच्या ‘माया केअर सव्र्हिसेस’ या सेवाकार्याचा आरंभ या घटनेतून झाला. 

ज्येष्ठांना सेवा पुरवायचा हा विचार पक्का झाला. पण नेमकी दिशा मिळेना. मंजिरी पुण्यात एका बहुद्देशीय कंपनीत मनुष्यबळ अधिकारी म्हणून काम करत होती. या कंपनीतर्फे ज्येष्ठांसाठी ‘चॅट सव्र्हिस’ सुरू करण्याचं ठरलं. एकटय़ा, विकलांग वृद्धांना मनमोकळं बोलता यावे यासाठी ही सेवा! मात्र कंपनीची ही योजना कागदावरच राहिली. पण मंजिरीच्या मनात मात्र या कल्पनेने मूळ धरलं आणि तिने ताबडतोब मुंबई व पुण्यासाठी हेल्पलाइन्स घेतल्या.

मंजिरीचा आप्तांचा परिवार दांडगा. प्रत्येकाची भेट घेऊन तिने ही संकल्पना मांडली. तिचा हेतू दुहेरी होता. ज्येष्ठांपर्यंत ही कल्पना पोहोचावी व त्यांना मदत करण्यासाठी स्वयंसेवकही मिळावे त्यासाठी तिथे आय.टी. कंपन्यांमध्ये स्टॉल्स लावले. ज्येष्ठ नागरिक संघ व शाळा-कॉलेजेसमधून बैठका घेतल्या. वर्तमानपत्रांतून लेख लिहिले. त्यांना ज्येष्ठ व स्वयंसेवकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. पण समाजसेवेचं कंकण आधी स्वत:च्या हाती बांधावं म्हणून ‘माया केअर’कडे आलेल्या अनुराधा भाटवडेकर या आजींकडे ती स्वत: जाऊ लागली. त्या तुकारामाच्या गाथेवर अभ्यास करत होत्या. ती त्यांच्यासाठी लिखाण करायची. त्यांना भगवद्गीता वाचून दाखवायची. त्यावर चर्चा करायची. एकदा त्यांच्या नातवाचं लग्न होतं. आपल्यामुळे इतरांना त्रास नको म्हणून आजी लग्नाला जायला तयार नव्हत्या. मंजिरीने त्यांच्यासोबत ‘माया केअर’च्या दोन सेविका पाठवल्या. त्यांनी साडी नेसवण्यापासून कुडी घालण्यापर्यंत सर्व प्रकारची मदत केली. आजी समाधानाने लग्नाहून परतल्या. नातवावर अक्षता टाकण्याचं त्यांचं स्वप्न पूर्ण झालं होतं. लाला या ७९ वर्षे वयाच्या वृद्धा! त्या त्यांच्या सासऱ्यांवर पुस्तक लिहीत होत्या. पण मोतीबिंदूच्या ऑपरेशनमुळे ते काम खोळंबलं होतं. मंजिरीने आपल्या शाळकरी मुलीला त्यांच्याकडे पाठवायला सुरुवात केली. ती संगणकावर त्यांच्या पुस्तकाचं काम करून देत असे. त्याचं पुस्तक वेळेवर पूर्ण झालं. या अशा कामांतून मंजिरीला उमेद लाभली. तिला तिची आई डॉ. विद्या गोखले यांचा सुरुवातीपासून भक्कम आधार होता. संपूर्ण कुटुंबाची साथ होती. डॉ. विद्या गोखले सांगतात, ‘पुण्यात एकटय़ा राहणाऱ्या वृद्धांची संख्या खूप मोठी आहे. त्यांची मुलं परदेशी, परगावी आहेत, ती जर जवळ असती तर त्यांनी या वृद्धांसाठी जे जे केलं असतं ते सर्व काही आम्ही त्यांच्यासाठी ‘माया केअर सव्र्हिसेस’तर्फे करतो. त्यांना पुस्तकं वाचून दाखवणं, फिरायला नेणं, डॉक्टरकडे नेणं, त्यासाठी डॉक्टरांची अपॉइन्टमेंट घेणं, त्यांचे रिपोर्टस् आणणं, ज्येष्ठांना नाटक- सिनेमाला नेणं, लग्नसमारंभाला नेणं. एकूण काय, ज्येष्ठांसाठी ‘कमी तिथे आम्ही’ हेच धोरण आम्ही निश्चत केलंय आणि त्यानुसार आम्ही काम करतो.
एकदा एका आजोबांना ‘नटरंग’ सिनेमाला जायचं होतं. ते पूर्णपणे अंध. पण त्यांना त्यातली गाणी ऐकायची होती. मी आमच्या एका सेवकाबरोबर त्यांना सिनेमाला पाठवलं. मंजिरी सांगते, ‘प्रत्येक माणसाची धडपड असते ती आनंदाने जगण्याची! त्यासाठी तो आयुष्यभर कष्ट करतो. पैसा जमवतो आणि स्वत:ची एक जीवनशैली बनवतो. पण शरीर जर्जर होऊ लागलं की हळूहळू तो एकटा-एकाकी पडतो. शरीर व्याधिग्रस्त होतं. त्याचा जगण्याचा स्तर खालावतो. मला हाच प्रश्न पडतो की केवळ वय झालं म्हणून, परावलंबी झाला म्हणून त्याला आनंदाने जगण्याचा हक्क नाही का? त्याला चांगलं काही वाचावंसं वाटलं, ऐकावंसं वाटलं तर ते सुख त्याला का बरं नाकारलं जावं? त्याच्या सुरकुतलेल्या शरीराला साधा प्रेमाचा मायेचा स्पर्शसुद्धा लाभू नये का? त्यांनाही प्रेमाची, भावनिक, मानसिक, बौद्धिक भूक भागवण्याची गरज आहे ना? १२ तासांची त्यांना सांभाळणारी बाई त्यांच्या शरीराची काळजी घेईल. मनाचं काय? राजाभाऊ खेर धुळय़ाच्या कॉलेजचे माजी प्राचार्य. वय ८५ वर्षे. खूप कार्यमग्न! सतत वेगवेगळे कार्यक्रम, व्याख्यानांना जाणं, लिखाण करणं यात व्यस्त. वयपरत्वे घरात अडकल्यावर त्यांची घुसमट होऊ लागली. आमचे सेवक गेली चार वर्षे त्यांच्याकडे वाचायला, लिहायला जातात. काही सुशिक्षित ज्येष्ठ मंडळी स्वयंसेवक म्हणून आमच्या कार्यात स्वेच्छेने सहभागी झाली आहेत. अशांची आम्ही अशा ठिकाणी योजना करतो, जेणेकरून उच्चशिक्षित, प्रोफेसर, शास्त्रज्ञ अशा बुद्धिवंतांची बौद्धिक भूक भागेल! ‘माया केअर’चं हेसुद्धा एक उद्दिष्ट आहे.’
‘माया केअर’तर्फे दहा ठिकाणी हेल्पलाइन्स सुरू झाल्या. ठाणे, पुणे, मुंबई, चेन्नई, हैद्राबाद, बंगळूरू येथे ही केंद्रे स्थापन झाली. सुरुवातीला सेवामूल्य २०० रुपये ठरवण्यात आलं. त्यानुसार काम सुरू झालं. दरम्यान, मंजिरीचा मुक्काम पुण्याहून लंडनला हलला. पण सेवा योजना खंडित झाली नाही. पुण्यामध्ये समन्वयक म्हणून प्रेरणा कुलकर्णी व मुंबईत सुधा गोखले चांगलं काम करत आहेत. मंजिरी सांगते, ‘पुण्याची आधीची व आताचीही समन्वयक अपंग आहे. आधीच्या समन्वयक मुलीला एक हात व एक पाय नव्हता. पण छान बोलायची. पुढे तिला आम्ही व्हीलचेअर घेऊन दिली. आता तिला नोकरीही लागली आहे. आताची समन्वयक ई-मेल चेक करणं, माझ्याशी संपर्क राखणं हे काम उत्तम प्रकारे करते व तिची आई ज्येष्ठांची हेल्पलाइन चालवते. आम्ही सर्व समन्वयक व सेवक-सेविकांना मानधन देत असतो.’
‘माया केअर’ ज्येष्ठांसाठी विविध प्रकारच्या सेवा पुरवते. ज्येष्ठांना पुस्तकं, वर्तमानपत्रं वाचून दाखवणे, त्यांच्यासोबत वेगवेगळय़ा विषयांवर गप्पा मारणे, हॉस्पिटलमध्ये त्यांना सोबत देणे, त्यांची बिले भरणे, बँकांची कामे करणे, एवढंच नव्हे तर त्यांच्या घरी गणपती आणून त्यांना संपूर्ण पूजेची तयारी करून देणे किंवा त्यांच्या परदेशस्थ मुलांनी फोटो पाठवल्यास ते डाऊनलोड करून त्यांचा सुबक अल्बम करून देणे. इतकंच नव्हे तर त्यांच्या मुलांनी इच्छा दर्शवल्यास त्यांच्या वाढदिवसाला सरप्राईज बर्थडे पार्टी आयोजित करणे. सर्व काही त्यांच्यासाठी करण्यास संस्था तत्पर असते.
एकदा एका आजी-आजोबांना इंदोरहून मुंबईतील एका नातलगाच्या घरी यायचे होते. त्या घरी नुकताच कुणाचा तरी मृत्यू झाला होता. त्यांना भेटण्यासाठी हे जोडपे येऊ इच्छित होते. परंतु त्यांना एअरपोर्टवरून एकटय़ाला येणे शक्य नव्हते. ‘माया केअर’च्या सेवकाने त्यांना विमानतळावरून इच्छित स्थळी नेले व परतीच्या प्रवासासाठी पुन्हा विमानतळावर टॅक्सीने आणून सोडले.
अर्थात सर्व सेवांसाठी प्रवासखर्च हा त्या ज्येष्ठानेच करावा असा ‘माया केअर’चा नियम आहे. तसेच संस्थेच्या सर्व सेवा पूर्वनियोजित वेळेनुसार असतात. आपत्कालीन सेवा संस्था देत नाही. संस्थेचे सेवक/सेविका नर्सिग व घरकामाच्या सेवा देत नाहीत. अंथरुणाला खिळलेल्या रुग्णाचा अपवाद वगळता सर्व सेवा हॉलमध्येच देण्यावर संस्थेचा भर असतो.
अभय जोशी संस्थेचे मुख्य स्पॉन्सरर आहेत. ते सांगतात, ‘सुरुवातीला आम्ही सेवांसाठी नाममात्र शुल्क घेत होतो. पण ज्येष्ठांचा फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. आम्ही निराश झालो. शेवटी ‘माया केअर’ बंद करण्याचा निर्णय घेतला. त्याच वेळी लंडनमध्ये राहणारी एक पुणेकर मुलगी आम्हाला भेटली. तिच्या वडिलांना कर्करोग झाला होता. तिची आई वयस्क. दुसरी बहीण अमेरिकेत. अशा स्थितीत ‘माया केअर’च्या सेवकांनी तिच्या वडिलांना केमोथेरपी, रेडीएशनसाठी हॉस्पिटलला नेण्यापासून सर्व सेवा खूप मनापासून केली. ते बरे झाले म्हणून ही लंडनस्थित मुलगी आम्हाला धन्यवाद देण्यासाठी आमचा पत्ता शोधत आली आणि आम्ही आमचा निर्णय बदलला. तेव्हापासून ‘माया केअर’च्या सर्व सेवा आम्ही विनामूल्य देत आहोत व संस्थेचा सर्व खर्च आम्ही स्वकष्टार्जित कमाईतून भागवत आहोत. अर्थात आमच्या सेवेवर खूश होऊन कोणी देणगी दिली तर आम्ही ती स्वीकारतो व ज्या गरजू जेष्ठांवर ती खर्च केली त्यांचे फोटो व तपशील देणगीदारांना कळवतो. किंबहुना अशा देणग्या मिळाल्यास जास्तीत जास्त गरजू रुग्णांना आम्ही मदत करू.’
ठाण्याच्या समन्वयक सुधा गोखले म्हणतात, ‘मी स्वत: सत्तरीची असूनही दुसऱ्यांना मदत करण्यासाठी मी हे काम करते. त्यासाठी मुंबईभर फिरते. खंत एवढीच वाटते की कोटय़वधीची गुंतवणूक असणारे अत्यंत सधन ज्येष्ठसुद्धा ‘माया केअर’ला देणगी तर सोडाच, पण प्रवासभत्ता देतानाही पै पैशाचा हिशोब करतात.’ उज्ज्वला पालेकर पेशाने वास्तुविशारद. केवळ समाजसेवेचे उद्दिष्ट डोळय़ांसमोर ठेवून त्यांनी हे काम सुरू केलं. त्या म्हणतात, ‘ज्येष्ठांसाठी वैद्यकीय सेवा देताना वेळ पाळावी लागते. त्यांची बँकेची कामे जबाबदारीने पार पाडावी लागतात. एका ८० वर्षांच्या अंथरुणाला खिळलेल्या ख्रिश्चन वृद्धेशी इंग्रजीतून गप्पा मारण्यासाठी त्या जात असत. त्यांचे दोघींचे सूर इतके जुळले की तिचा मृत्यू झाल्याचं कळल्यावर खूप दिवस त्या अस्वस्थ होत्या. सध्या त्या प्रसिद्ध लेखिका पद्मजा फाटक यांना सेवा देण्यासाठी ‘अथश्री’त जातात. पद्मजा फाटक म्हणतात, ‘माझ्या आठवडय़ाच्या गोळय़ा नीट लावून ठेवणं, बँकेचे सर्व व्यवहार सांभाळणं आणि माझी वाचनाची भूक भागवणं ही सर्व कामं ‘माया केअर’च्या सेविका उज्ज्वला पालेकर उत्तम प्रकारे पार पाडतात. समाजातल्या सर्व थरांतल्या लोकांनी सेवा घेण्यासाठी आणि संस्थेचा आर्थिक भार उचलण्यासाठी जरूर प्रयत्न करावेत.’
८२ वर्षांच्या करमरकर आजींना लंडनला जाण्यासाठी पहाटे तीनला उठून त्यांना मुंबईच्या विमानतळावर सोडून अनिकेत याडकीकर पुण्यात परतला आणि वेळेवर कामावर हजर झाला, पण आपल्याला जराही थकवा आला नाही. उलट खूप आनंद झाला असं तो म्हणतो. आज सकृत पटवर्धन, छाया खराडे अशी सुशिक्षित तरुण मुलं ‘माया केअर’तर्फे सेवा देण्यासाठी आपले व्यवसाय सांभाळून जातात. अनिकेत सांगतो, ‘मी अनेक ज्येष्ठांकडे सेवा देण्यास जातो. त्यांनी आपल्या जीवनातील उद्दिष्ट साध्य केले आहे. त्यांचा समस्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपल्याला खूप शिकवून जातो. एक ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक भगतसिंगांबरोबर तुरुंगवासात एकत्र होते. माझ्या पिढीने भगतसिंग, राजगुरूबद्दल फक्त वाचलंय. त्यांचे विचार थेट ऐकताना मी भारावून गेलो. शरद कुलकर्णीकाका त्या काळात जपान, चीन, अमेरिकेत कामानिमित्त फिरून आले होते. त्या देशांतील लोकांचे विचार, मतं ऐकून त्याचा वापर मला माझ्या भविष्यकाळातील योजनांसाठी करता येतो. ज्येष्ठांचं ज्ञान कालबाह्य़ झालेलं नाही. उलट त्यांचा अनुभव आपण आपल्या पद्धतीने आपल्या साच्यात बसवला तर आजच्या आमच्या तरुण पिढीला त्याचा खूप फायदा होईल. फक्त त्यासाठी ज्येष्ठांशी संवाद घडायला हवा. तो ‘माया केअर’मुळे घडतो.
पुण्याच्या सानेआजींची ट्रेन मध्यरात्री स्टेशनला आली. तेव्हा त्यांना आणायला मदन आणि गौरी गोखले मध्यरात्री स्टेशनवर गेले. सानेआजी नंतर मंजिरीला म्हणाल्या, ‘अगं तू याला सेवा देणं का म्हणतेस? चार चाकी वाहन घेऊन माझ्यासाठी मध्यरात्री स्टेशनला येणारा, माझ्या बॅगा उचलणारा हा माझा मुलगाच होता की!’
‘माया केअर’चं यापेक्षा वेगळं आणि समर्पक कौतुक ते काय असेल?

madhuri.m.tamhane@gmail.com
पुणे हेल्पलाइन : ९५५२५१०४००
मुंबई हेल्पलाइन : ९५९४०७३४७५ , ९५९४०६३४७५
सुधा गोखले : ९५९४०७३४७५
Website : www.mayacare.com
E-mail-Service@mayacare.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2014 1:07 am

Web Title: helping hands
Next Stories
1 आध्यात्मिक सफाई
2 कायदेकानून : सामाजिक सुरक्षा व कल्याण
3 खा आनंदाने : थंडीची ‘कुरबुर’
Just Now!
X