माणसं आणि त्यांच्यातील नातेसंबंध हा खूप गुंतागुंतीचा विषय असतो. माणसांचे अनेक प्रश्न, समस्या या एकमेकांचा आदर न केल्याने, एकमेकांशी संवाद न साधल्यामुळे निर्माण होत असतात आणि आपलीच माणसं आपले शत्रू होण्याइतपत परिस्थिती चिघळत जाते. पण बोलणार कसं आणि कुणाजवळ? अशा अनेक समस्याग्रस्तांसाठी, मग ती लहान मुलं असोत, वयस्क स्त्री-पुरुष किंवा वयोवृद्ध त्यांना ऐकण्यासाठी अनेक ‘कान’ हेल्पलाइनच्या माध्यमातून कार्यरत आहेत. जे तुम्हाला ‘ऐकून’ घेतात आणि समस्या सोडविण्यासाठी आवश्यक मदत करतात. समाज निरोगी राहण्यासाठी दिवसेंदिवस या हेल्पलाइनची गरज वाढतेच आहे. त्याविषयी खास लेख..
 ‘हॅलो.. आम्हाला मदत हवी आहे. खरं तर आम्हाला जगायचं नाहीए. विटून गेलोय अगदी. रात्री बेरात्री बाबा दारू पिऊन येतात. मला, बहिणीला बेदम मारतात. प्लीज काहीतरी करा हो. आम्ही कुणाला काहीच सांगू शकत नाही. माझी आई तर त्याचमुळे डिप्रेशनमध्ये गेलीय. प्लीज प्लीज आम्हाला वाचवा हो..’
‘मी सुजाता बोलतेय, मला जिवाचं बरं-वाईट करून घ्यावंसं वाटतंय. ज्या नवऱ्याच्या भरवशावर लग्न केलं त्यानेच माझा छळ चालवला आहे. मारझोड रोजचीच झालीय, आता तर हात-पाय बांधून ठेवतो, मुलांनाही उपाशी ठेवतो. मी काय करू सांगा, कोणीच नाही माझ्या मदतीला..’
‘तुम्ही मदत करणार का आम्हाला? आम्ही जेष्ठ नागरिक आहोत, दोघंही थकलोय आता. मुलांचं करण्यात आयुष्य गेलं, पण आता मुलांनाच आम्ही जड झालोय. त्यांची बोलणी ऐकून जगणं नकोसं झालंय आम्हाला. तुम्ही आमच्या मुलांना सज्जड दम द्या हो जरा. असं वागवतात का कुणी आपल्या आई-बाबांना?’
अशा दूरध्वनींमधून व्यक्त होणारी हतबलता, एकटेपणा, मनोधैर्य गमावल्याने आलेली निराशा, मनाचा कोंडमारा हा अनुभव ‘हेल्पलाइन’साठी नित्याचा आहे. प्रश्नांच्या चक्रव्यूहात अडकलेल्या पीडित व्यक्तीला प्रत्यक्ष न भेटताही दिलासा देण्याची, हिम्मत देण्याची किमया अशा व्यक्तींशी संवाद साधून साधता येते. म्हणूनच दिवसेंदिवस ‘हेल्पलाइन’ गरजेची होत चालली आहे. आज राज्यभरातच नव्हे तर देशभरात अशा विविध हेल्पलाइन्स लोकांना उपकारक ठरत आहेत. आत्महत्येपासून परावृत्त करताहेत, तर काही अनेकांच्या आयुष्यात समाधान परत आणताहेत. आज कुठलीही व्यक्ती मग ती लहान मूल असो, मध्यमवयीन स्त्री-पुरुष असो की वयोवृद्ध, अनेकांना काही ना काही समस्या असतात. पण अनेकदा ते व्यक्त करण्याचे मार्ग नसतात. अशा वेळी घुसमटलेला जीव आत्महत्येपर्यंत तरी पोहोचतो किंवा नैराश्यात जातो. त्या सगळ्यांसाठीच अशा हेल्पलाइन्स उपयोगी पडत आहेत. मुख्य म्हणजे त्या नि:शुल्क असल्याने किंवा अल्पदरात उपलब्ध होत असल्याने त्यांचा फायदा सहज घेता येऊ शकतो.
महिलांच्या बाबतीत तर अन्याय हा पाचवीला पुजलेला असतो. सामाजिक दडपण/दबाव, खोटी प्रतिष्ठा यामुळे वर्षांनुवर्षे त्या अन्यायाला बळी पडत राहतात. वकिलाची मदत घ्यायची तर अनेकदा आर्थिक बाजू लंगडी असते. समुपदेशनासाठी अनेक जण येतात. पण ज्यांना मदतीची आत्यंतिक गरज आहे, पण योग्य ठिकाणी प्रत्यक्ष पोहोचता येत नाही, अशा स्त्रियांसाठी ३३ वर्षे वकिलीतला, आणि ३८ वर्षांचा समुपदेशनातला असा प्रदीर्घ अनुभव गाठीशी असणाऱ्या अ‍ॅड. नीलिमा कानेटकर यांनी ‘आदिपथ फाऊंडेशन व रिसर्च सेंटर’ या संस्थेमार्फत टोल फ्री हेल्पलाइनची निर्मिती केली आहे. ही हेल्पलाइन १० ऑगस्ट २०१० पासून कार्यरत आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरात त्यांच्या टोल फ्री हेल्पलाइन क्रमांकावरून समुपदेशन मिळू शकतं. ‘आदिपथ’ हेल्पलाइनविषयीची पहिली बातमी वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्या दिवशीच राज्यातल्या ग्रामीण भागांतून अनेक दूरध्वनी आले. सर्वाधिक दूरध्वनी एकत्र कुटुंबातील स्त्रियांचे होते. त्याविषयी अ‍ॅड. कानेटकर म्हणाल्या, ‘भरल्या घरातही एकटेपणा वाटणाऱ्या या स्त्रियांची कुचंबणा मला भीषण वाटली. त्यांना त्रास नक्कीच असेल. मुलांच्या काळजीने या स्त्रिया सासरचा जाच मुकाटय़ाने भोगतायत. पण उद्या ही सहनशक्ती संपल्यावर काय, ह्य़ा सोशिकतेने रौद्र रूप धारण केले तर काही विपरीतही घडू शकते हे मला प्रकर्षांने जाणवले. म्हणूनच अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचण्याचा ध्यास मी घेतलाय.’
या काळातला एक दिवस त्यांच्या मनात कायमचा कोरला गेला. त्यांची एक जवळची मैत्रीण कर्करोगाने रुग्णालयात दाखल होती. शेवटच्या घटका मोजत होती ती. तितक्यात हेल्पलाइनवर आलेला फोन घ्यावाच लागला, ‘मॅडम, माझी मैत्रीण आत्महत्येचा प्रयत्न करतेय. सुदैवाने मी तिला पाहिलं व लागलीच तुम्हाला फोन केला. इतकं बोलून मैत्रिणीने तिला फोन दिला. पुढचं सगळं बोलणं हृदय पिळवटून टाकणारं होतं. ती हमसून हमसून रडत होती.. पहिला आवेश ओसरल्यावर बोलू लागली. ती ब्राह्मण कुटुंबातली, नाकी डोळी नीटस, नोकरी करणारी. एका कचराकाम करणाऱ्या समाजाच्या मुलाबरोबर सूर जुळले. त्याच्याशी लग्न केलं. नवरा पालिकेमध्ये सफाई कामगार. घरच्यांनी हिच्या शिक्षणाचा उद्धार करायला सुरुवात केल्याने त्यांच्यात वाद वाढू लागले. दरम्यान, दोन मुलं झाली. शिवीगाळ, बायकोवर हात टाकणे हा नवऱ्यासाठी सवयीचा मामला होता, पण मुलांसाठी ती सगळं सहन करत होती. लग्नानंतर २३ वर्षे अशी काढली. मुलगाही कमावता झाला होता. एके दिवशी, काही क्षुल्लक कारणाने मुलाबरोबर वाद झाले. वाद विकोपाला गेल्यावर त्याने आईचा अत्यंत तुच्छ शब्दात अपमान केला. ‘तू मुंब्रा पुलाखाली धंदा जरी सुरू केलास तरी मला फरक पडणार नाही.’ ..बस्स या एका वाक्याने तिचं अवसान गळालं. तिने ज्यांच्यासाठी सोसलं त्या मुलाने अशी किंमत केल्यावर ती पार मोडून पडली. तिची पावलं वळली थेट डोंबिवली स्टेशनकडे, गाडीखाली जीव देण्याच्या इराद्याने.. तिचं सुमारे चार तास बोलणं सुरू होतं. तिला आधी मोकळं होऊ दिलं, कायद्याची मदत घेऊ शकते, हे सांगितलं. तिला अभय वाटलं. तिच्यातली ‘ती’ जागी करावी लागली. वेदनेचा निचरा झाल्यानंतर ती सावरली.
 फोन ठेवला आणि इकडे मैत्रीण गेल्याचं कळलं. द्विधा मन:स्थितीने मन सैरभैर झालं. एकीकडे जवळचं कुणीतरी गेल्याची भावना तर दुसरीकडे एक जीव वाचवल्याचं समाधान. ‘हेल्पलाइन’ची गरज यानंतर खऱ्या अर्थाने उमगली. स्त्रियांच्या कल्याणासाठी व त्यांच्या समस्यांसाठी अनेक संस्था, एनजीओ काम करतात, पण अनेकदा त्यांच्याकडे जाण्यासाठीची मानसिक तयारी व आर्थिक अडचण समोर येते.
‘‘अन्यायामुळे पिचलेल्या पीडित व्यक्तीला पुढे अंधारच दिसतो, पण हे आभासी सत्य असते. म्हणूनच त्यांना वास्तवाची जाणीव करून देण्याबरोबर आशावादी करणे हेच आमचे काम,’’ हे पक्कं माहीत असलेल्या पुण्याच्या ‘आशा’ संस्थेच्या ‘सखी हेल्पलाइन’च्या प्रमुख माधवी कुथे यांनी सांगितलं की, ‘‘तंत्रज्ञानामुळे खूप जवळ आलेल्या जगात, माणसं दूर जातायत. प्रश्नांच्या गर्तेत अडकल्यानंतर बाहेर पडण्याची पराकाष्टा करूनही उचित मार्ग सापडत नाही. जगावरचा, माणसांवरचा, स्वत:वरचा विश्वास उडून जातो. त्या वेळी कुठेतरी वाचलेली, कुणीतरी सांगितलेली ‘हेल्पलाइन’एक दिलासा देणारी ठरते.’’
 २००१ सालापासून त्यांची हेल्पलाइन सुरू आहे. त्या सांगतात, ‘सखी’च्या कार्यालयात, रोज सरासरी ४-५ नवे फोन येतातच. हेल्पलाइनवर त्यांना त्यांचं नाव, गाव, पत्ता काहीच सांगायचं नसल्याने ते निर्धास्तपणे आपली दु:खं व्यक्त करतात.  कुठल्याही वयोगटातील अगदी पंचविशीतील तरुणी असो किंवा पंचावन्न वर्षांची प्रौढा आमच्याशी बोलून मोकळ्या होतात. काहीजणी वारंवार फोन करून आमच्या संपर्कात असतात. हेल्पलाइनवरून समस्याग्रस्त व्यक्तीचं समुपदेशन, कायदेशीर सल्ला, मार्गदर्शन केलं जातं. त्यासाठी प्रशिक्षित समुपदेशक व कायदेतज्ज्ञ या ठिकाणी कार्यरत असतात. हेल्पलाइनला फोन आल्यानंतर आम्ही आधी ‘तिचं म्हणणं ऐकून घेतो, तिची समस्या नक्की काय आहे, आमच्याशी बोलून तिला नेमकं काय हवं आहे, हेसुद्धा ऐकून घेतो. शक्य तितक्या शांतपणे हे सगळं करावं लागतं. याच वेळी समुपदेशक तिची मनोवस्थाही तपासत असतो, तिची सपोर्ट सिस्टीम काय आहे, ती कुणाकडे तक्रार करू शकते, तिला कोणत्या संस्था माहिती आहेत, तिला आपण नेमकी काय मदत केली पाहिजे, याचा अभ्यास करत असतो. याचा आढावा घेत तिला मार्गदर्शन करतो.
आमच्याकडे असाच एक दूरध्वनी आला. ती मूळची पुण्याबाहेरची, लग्नानंतर पुणे शहरात आलेली. पदवीधर होती. नव्या वातावरणाशी, नव्या लोकांशी जुळवून घेण्यात एक-दोन वर्षे गेली. मुलगा दीड वर्षांचा झाला तरी घरातल्यांचा त्रास संपत नव्हता. लग्नाला ४ वर्षे झाल्यावर मात्र तिला सारं असह्य़ वाटू लागलं. कुठल्याशा परिचिताकडून तिला ‘सखी हेल्पलाइन’बद्दल कळलं. तिने घरात कुणी नसताना फोन करून तिची व्यथा सांगितली. तिला विभक्त व्हायचं होतं, पण सासरच्यांना पत्ता लागू न देता. ती चोरून फोन करायची, बाथरूममधून, कुणी बाहेर गेल्यावर. तिला आम्ही मार्ग दाखवला. तिला आधार द्यायला कुणीही नव्हते, माहेरच्यांशीही संबंध जेव्हढय़ास तेवढे ठेवलेले. सुमारे सहा महिने ती आमच्या संपर्कात होती. हळूहळू तिला आत्मविश्वास आला. एका कार्यक्रमाच्या निमित्ताने तिच्या माहेरची मंडळी तिला घेण्यासाठी आली. माहेरी पोहोचल्यावर मग तिने सरळ घटस्फोटासाठी अर्जच दाखल केला. आज ती सुखाचा श्वास घेतेय. ’’
     ‘‘स्त्रियांची मानसिक कोंडी फोडण्यासाठी ‘आशा’ संस्थेने त्यांच्या केंद्रात दर बुधवारी, मानसोपचारतज्ज्ञांची ओपीडी सुरू केली. त्याचा प्रतिसाद व परिणाम उत्साहवर्धक होता.’’ माधवी  सांगतात, ‘‘पुण्यातली आमची पहिली संस्था होती, ज्यांनी अशी सोय करण्याचे धाडस केले. कायदेशीर मदतीसाठी वकिलांची सुविधाही आम्ही पुरवतो. ‘सखी’च्या कार्यालयात येणारे दूरध्वनी वैवाहिक व कौटुंबिक समस्यांविषयी अधिक असतात. मात्र, आईवडील जबरदस्तीने लग्न लावताहेत, हे सांगणाऱ्या मुलीचा जसा फोन येतो तसा निम्नस्तरातील वर्गातून अनैच्छिक गर्भधारणा रोखण्यासाठी काय करावे, अशी विचारणा करणाराही दूरध्वनी येतो. यातून वारंवार हे लक्षात येतं की, स्त्रियांविरोधातली हिंसा, क्रूरता ही विकृत मानसिकता दिवसेंदिवस वाढतेच आहे. ती थांबली पाहिजे, हाच हेतू घेऊन ‘सखी हेल्पलाइन’ काम करतेय.’’
कुठल्याही समस्येला उत्तर हे असतंच. किंबहुना वेगवेगळे मार्ग अवलंबले तर एकाच समस्येची अनेक उत्तरंही असू शकतात. समुपदेशातून समस्याग्रस्त व्यक्तीला हीच आशा द्यायची असते. ‘उपलब्ध परिस्थितीत तुझ्यापुढे हे मार्ग आहेत, त्यातून कोणता निवडायचा, याचा सारासार विचार कर’ अशी भूमिका समुपदेशक घेतात, असे अ‍ॅड. कानेटकर सांगतात. यामुळे तिची निर्णयक्षमताही वाढते व आपसूक त्या निर्णयांची जबाबदारी घेण्याची कुवतही येते. संकटात सापडल्यावर महिलांना निराशा येते. ती व्यक्ती कितीही सुशिक्षित, उच्चविद्याविभूषित असो.. मन दु:खाने व्याप्तच राहातं. पण योग्य मार्गदर्शन मिळालं की प्रश्न सुटतात असाही अनुभव आहे.
अशीच एक केस. हेल्पलाइनवर फोन आला. ‘मॅडम मी भोपाळवरून बोलतेय. मी आयएएस अधिकारी आहे, माझं एमबीएही झालंय. माझा नवरा मल्टिनॅशनल कंपनीत नोकरीला आहे. तो माझा क्षणोक्षणी अपमान करतो, माझा मानसिक व शारीरिक छळ करतो. आमचा आंतरधर्मीय विवाह असल्याने दोन्हीकडून मदतीची आशा नाहीच. परवा त्याने मला इतकं मारलं की मला हॉस्पिलटमध्ये दाखल करावं लागलं. मला विभक्त व्हायचंय.’ तिच्यातला आत्मविश्वास पार कोलमडून पडला होता. तिला कायदेशीर सल्ला देण्याबरोबरच मला तिच्यातलं आत्मभानही जागं करावं लागलं. खूप महिने लागले, तिला पूर्ववत होण्यासाठी. पण आज तिने नोकरीचं राज्यच बदलून घेतलं आहे. आता ती जबाबदारीने एका शाळेची मुख्याध्यापक म्हणून काम पाहतेय. या उदाहरणाने हे दाखवून दिलं की मदत कुणालाही लागू शकते. आपण अहंकार व स्वाभिमान यांच्यात गल्लतकरता कामा नये. कुटुंबीय, मित्रपरिवार, सहकारी यांची मदत घेताना कचरता कामा नये. समुपदेशन घेणं, वेळ पडल्यास मानसोपचार घेणं यात काहीच गैर नाही, हे स्वीकारले पाहिजे. हेल्पलाइनवर, आमच्याकडे हुंडाबळी, घरगुती हिंसाचार, चारित्र्याचा संशय याने छळ होणाऱ्या अनेक जणींचे दूरध्वनीही येतात.
हेल्पलाइन ज्येष्ठ नागरिकांसाठीही
स्त्रियांप्रमाणेच आज सर्वात जास्त त्रासलेले आहेत ते ज्येष्ठ नागरिक. अलीकडेच झालेल्या एका सर्वेक्षणानुसार, मुख्य शहरांमध्ये ४९ टक्के  ज्येष्ठ नागरिक एकटे राहतात. ‘हेल्पएज इंडिया’ या ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या संस्थेतर्फे सुरू असणाऱ्या हेल्पलाइनवर येणारे सर्वाधिक दूरध्वनी हे ‘कुणाशीतरी बोलावंसं वाटलं’ या भावनेतून येतात. अर्धा-पाऊण तास बोलल्यानंतर हेल्पलाइनवरचे समुपदेशक विचारतात, ‘आजी, काय काम होतं, कसली मदत हवी आहे का?’ तर पलीकडून उत्तर येतं, ‘सध्या तरी नकोय, पण फारच एकटेपणा वाटला म्हणून केला फोन.’
ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांविषयी ‘हेल्पएज इंडिया’चे मुंबईचे प्रमुख प्रकाश बोरगावकर यांनी सांगितल्यानुसार, ‘त्यांच्या हेल्पलाइनकडे येणारे सर्वाधिक फोन हे एकटेपणाचे त्यापाठोपाठ मुलांकडून-सुनांकडून छळ होतो, मारहाण होते म्हणून सांगणारे असतात. तर त्या पाठोपाठ येणारे व अधिक गंभीर फोन हे मालमत्तेसंबंधीच्या कलहाचे येतात. तर त्यानंतर येणारे दूरध्वनी हे आरोग्याशी संबंधित, विशेषत: अल्झायमर अर्थात स्मृतिभ्रंश, अर्धागवायू यांची माहिती मागणारे असतात.
  ‘हेल्पएज’कडे येणाऱ्या व्यक्तीची अडचण आधी समजून घेतली जाते. त्यांना हव्या असलेल्या आजारांची माहिती देतो. अनेकदा काही आणीबाणीची परिस्थिती असेल तर आमची मोबाइल व्हॅन घेऊन आम्ही घटनास्थळी हजर होतो. पण अनेकदा त्या ठिकाणी पोहोचणं शक्य नसेल त्या वेळी त्यांना नजीकच्या पोलीस ठाण्याचा संपर्क क्रमांक देतो. ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करणाऱ्या स्थानिक संस्थांची माहिती व संपर्क क्रमांकही देतो. जेणेकरून समस्येचे निराकरण त्वरित व्हावे. अनेकदा असं लक्षात येतं की, त्यांना समुपदेशनापेक्षा कुठेतरी गुंतून राहण्याची गरज आहे. अशा वेळी त्यांच्यासाठी सुरू असलेल्या ज्येष्ठ नागरिक संघात नोंदणी करण्याचा सल्लाही देतो. तिथल्या कार्यक्रमात सहभागी झाल्याने त्यांच्यात तजेला येतो.
बोरगावकर सांगतात, ‘‘हेल्पलाइनवरची एक केस अतिशयच गुंतागुंतीची होती. वाशीजवळ राहणाऱ्या एक ज्येष्ठ नागरिक महिला (वय ७० वर्षे) नेहमी फोन करायच्या, मुलगा फार त्रास देतो, मारहाण करतो अशी तक्रार करायच्या. तो त्याच्या वडिलांनाही मारत असे. हा मुलगा पस्तीशीचा. दुबईला नोकरी करायचा. एकदा सुट्टीसाठी इकडे आल्यावर एका अपघातात पाय गमवावा लागल्याने अपंग झाला आणि घराचे चित्र बदलले. मुलगा चिडचिड करू लागला. निराशेत खूप दारू पिऊ लागला. त्या बाईंनी आमची मदत मागितल्यानंतर आम्ही त्यांच्या घरी जाऊन मुलाची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण फरक पडत नव्हता. काही महिन्यानंतर त्या बाईंचाच फोन आला, पतीचं निधन झालं होतं. मुलासोबत राहण्याच्या विचाराने त्यांना धडकी भरली होती. मला मुंबईबाहेरच्या वृद्धाश्रमात ठेवा, म्हणून विनवणी करू लागल्या. त्यांना आम्ही गोव्याला संस्थेच्या वृद्धाश्रमात ठेवलं. एके दिवशी सकाळी सकाळी त्यांचा फोन आला. ‘तुम्ही माझी इथे व्यवस्था केली ठीक आहे, पण मी मेल्यानंतर माझ्यावर अंत्यसंस्कार कोण करणार? वृद्धाश्रमातील एक आजोबा गेले त्यांचं करायला कुणीही घरचं आलं नाही.’ मी त्यांना खूप समजावलं. पण ज्या वेळी मी स्वत: तुमचे विधी करेन, हे आश्वासन दिलं तेव्हाच शांत झाल्या. आश्चर्य म्हणजे आठ दिवसांत त्या वारल्या, पण त्यांच्या त्याच अपंग मुलाला कळवल्यावर त्याने आईला गोव्याहून मुंबईला आणलं व त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.’ अशी उदाहरणं आहेत.
५ जून हा दिवस ‘वर्ल्ड एल्डर अब्युज डे’ असतो. त्यानिमित्ताने केलेल्या पाहणीत ‘हेल्पएज’ला असे आढळून आले की, ८० टक्के वृद्धांचा सून-मुलांकडून शारीरिक छळ होतो. ५ टक्के लोकांना शाब्दिक अरेरावी, अपमान सहन करावी लागते. ९० टक्के लोकांचं म्हणणं होतं, आर्थिकदृष्टय़ा त्यांच्यावर अवलंबून असल्याने दुय्यम वागणूक मिळते.
अर्थात काही सुखद अनुभवही येतातच. एकदा एका ६६ वर्षीय निवृत्त काकांचा फोन आला. ज्येष्ठ नागरिकांसाठीच काम करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. त्यांना आम्ही संस्थेचा कार्यकर्ता म्हणून घेतलं. गेली दोन वर्षे ते संस्थेचे कामकाज चोख सांभाळत आहेत. ज्येष्ठ नागरिकांची वाढती संख्या लक्षात घेता, हेल्पएज इंडिया, सिल्वर लायनिंग व अन्य दोन संस्थांनी पोलिसांची ‘१२९८’ ही हेल्पलाइन ज्येष्ठ नागरिकांसाठीही खुली केली आहे. ३६५ दिवस चोवीस तास तिची सेवा सुरू असणार आहे.
कॉर्पोरेट क्षेत्रातली नोकरी सोडून पूर्णवेळ ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या निवारणाच्या कामी वळलेले, ‘सिल्व्हर लायनिंग’ या संस्थेचे संस्थापक शैलेश मिश्रा सांगतात, ‘‘आमच्या हेल्पलाइनवर येणारे २५ टक्के दूरध्वनी- ‘मुलं बोलत नाहीत,’ हे सांगण्यासाठी येतात, तर २५ टक्के शारीरिक व मानसिक त्रास देत असल्याची माहिती देतात. १० टक्के म्हणतात, ‘आम्हाला समाजातील इतर लोक, शेजारी-नातेवाईक यांच्याकडून त्रास होतो.’ तर २० टक्के लोक अल्झायमरची चौकशी, डॉक्टर यांची चौकशी करण्यासाठी फोन करतात. तर उर्वरित १०-१२ टक्के लोक आया, घरकामासाठी बाई वगैरे बाबींसाठी फोन करतात. या माहितीचा डेटाबेस आमच्याकडे तयार असतो. गरजेनुसार तो ज्येष्ठ नागरिकांना पुरवला जातो.’’
‘‘त्यांचं बोलणं आम्ही ऐकून घेतल्यावरच २५ टक्के समस्या सुटलेलीच असते, तर बाकी गोष्टी सून-मुलांशी बोलून सुटतात. वयामुळे व अनुभवामुळे आलेलं शहाणपण कधी कधी हेकेखोरपणाकडे झुकतं. त्यामुळे त्यांचं समुपदेशन हा अवघड टप्पा असतो. त्यांना कायदेशीर मदत देण्याबरोबर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली तर त्यांना पोलिसांचे सहकार्य मिळू शकेल, असे सुचविल्यावर ते अवघडतात. आमच्या मुलांना तुम्ही सज्जड दम द्या, पण पोलिसांचा ससेमिरा मागे नको. सून-मुलांविरोधातील कारवाईला ते तयार नसतात. म्हणूनच दोन्ही पिढय़ांचा समेट घडवणं, हेच यावरचं उत्तर आहे.’’ मिश्रा सांगतात.
‘‘समुपदेशानंतर येणाऱ्या अडचणी म्हणजे, ज्येष्ठांना कायदेशीर मार्गाने जाण्याचा सल्ला दिला तरी न्यायालयाच्या चकरा मारण्याची त्यांची मानसिक व शारीरिक क्षमता कमी असते. सून-मुलाने घर बळकावून बाहेर हाकलून दिल्याचे प्रकरण असले, तरी त्याचे पुरावे गोळा करण्यासाठीची हुशारी या वयात नसते. त्यासाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी जलदगती न्यायालये हवीत, असे मिश्रा सुचवतात. ‘हेल्पलाइन’च्या माध्यमातून त्यांचे सामाजिक व मानसिक समुपदेशन शक्य असतं, पण अनेकदा वकील देण्याची सेवा आम्हाला परवडणारी नसते.’’
‘‘शक्य तेवढं आम्ही नक्की करतो. एकदा एक ७२ वर्षांचे काका वेळ जात नाही म्हणून तक्रार करू लागले. आम्ही त्यांना ज्येष्ठ नागरिक क्लबचं सदस्य होण्यास सांगितले. आज ते खूष आहेत. त्यांनी अनेक नाटकांमध्ये अभिनय तर केलाच पण इतरांनाही त्यात सामील करून घेतले आहे. एक नेव्हीतून निवृत्त झालेले अधिकारी होते, त्यांनाही आपण निरुपयोगी झाल्याची भावना अस्वस्थ करत होती. आज ते माहिती अधिकार कायदा कसा वापरायचा, याबाबत प्रशिक्षण देणारे वर्ग घेतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली दोन ज्येष्ठ नागरिक कार्यकर्ते सध्या केंद्र सरकारच्या ज्येष्ठ नागरिकांविषयीच्या धोरणासंबंधी विचारणा करण्याच्या कामी लागले आहेत.
‘हेल्पलाइन’ हे एक माध्यम आहे, लोकापर्यंत पोहोचायचं. मुंबईसारख्या शहरात १२ ते १३ लाख ज्येष्ठ नागरिक राहतात, पण आम्ही सर्व संस्था फक्त दोन-अडीच लाख लोकांपर्यंत पोहोचू शकतोय, हे वास्तव मिश्रा यांनी अधोरेखित केले.
म्हणूनच गरज आहे ती जास्तीत जास्त हेल्पलाइन्स अस्तित्वात येण्याची. त्यातल्या संवादाची. त्यातूनच निरोगी, समाधानी समाज घडणार आहे. 

(अधिकाधिक हेल्पलाइनची माहिती मिळविण्यासाठी गुगलवर ‘हेल्पलाइन’ सर्च देऊन ती मिळवू शकता.)
* सिल्व्हर लायनिंग – हेल्पलाइन – ९९८७१०४२३३
    सोमवार ते शुक्रवार सकाळी १० ते ५ पर्यंत
* ज्येष्ठ नागरिकांसाठी अहोरात्र सुरू असणारी सेवा – १२९८
* पोलीस दलातर्फे चालणारी २४ तास सेवा झ्र् १०९०

The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
How to treat heat-related illnesses
उष्णतेच्या लाटेचा कसा करावा सामना? सरकारने मार्गदर्शक सुचना केल्या जारी
stock market, 3 7 crore dmat accounts
सरलेल्या आर्थिक वर्षात ३.७ कोटी डिमॅट खात्यांची भर
In redevelopment of flat holders Redevelopment Senior
पुनर्विकासातील ज्येष्ठ!

महिलांसाठी
*    आदिपथ, मुंबई – १८०० २२ ०२०५  
     किंवा ०२२-२४३६६३८३ सोम. ते  शुक्र.  दुपारी १२ ते ६
*    सखी, पुणे – ९४२१०१६००६ किंवा ०२० २४४८४५३          सोमवार ते शनिवार सकाळी ९-३० ते संध्याकाळी ५-३०
*    पोलिस दलातर्फे कार्यरत १०३ व १००