माधुरी ताम्हणे

madhuri.m.tamhane@gmail.com

Troubled by unruly rickshaw driver at Panvel station Suffering continues despite taking action
बेशिस्त रिक्षाचालकांचा पनवेल स्थानकात अडसर; कारवाई करूनही मुजोरी कायम, प्रवाशांचे हाल
stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
Sujay Vikhe Patil, terror-mongers,
दहशत माजविणाऱ्यांना चोख उत्तर द्या – डॉ. सुजय विखे पाटील
Inconvenient as Sinnar buses go directly from the flyover without stopping at small villages
नाशिक: लहान गावांच्या थांब्यांना बससेवेची हुलकावणी

रस्त्यावरच्या वाहतुकीदरम्यान नागरिकांना कोणतीही समस्या आली, तर ती समजून घ्यायला आणि सोडवायला वाहतूक पोलीस खात्याची हेल्पलाइन सतत काम करत असते. टाळेबंदीच्या काळात या हेल्पलाइननं खरोखरची अडचण असलेल्या आणि अडकून पडलेल्या अनेक जणांना आधार दिला आणि इच्छित स्थळी पोहोचण्यास मदत केली. त्या वाहतूक  पोलिसांच्या हेल्पलाइनविषयी..

वाहतूक पोलिसांची हेल्पलाइन ही पादचारी आणि वाहनचालक यांच्या रस्त्यावरील सुरक्षित वावराची काळजी घेते. लोकांना घराबाहेर पडल्यावर वाहतुकीदरम्यान जी मदत लागते त्यासाठी ही हेल्पलाइन आहे. या हेल्पलाइनवरून नागरिकांनी  वाहतूक विभागाशी संपर्क साधताच त्यांच्या तक्रारींची किंवा सूचनांची दखल घेतली जाते. ठाणे  वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त

अमित काळे हे वाहतूक विभागाच्या या हेल्पलाइनचं काम कशा प्रकारे चालतं याविषयी विस्तारानं माहिती देतात.

‘‘ वाहतूक विभागाच्या हेल्पलाइन आणि संकेतस्थळाचे फलक जागोजागी सर्वत्र नागरिकांना सहजगत्या दिसतील अशा प्रकारे लावलेले असतात. त्यामुळे अडचणीच्या वेळी लोक आमच्याशी तातडीनं संपर्क साधतात.

उदा. एखाद्या रिक्षा वा टॅक्सी चालकानं भाडं नाकारलं तर प्रवासी या हेल्पलाइनवर तक्रार करतात. अशी तक्रार येताच ‘व्हॉट्सअ‍ॅप’ वा ‘ट्विटर’वर संबंधित रिक्षा किंवा टॅक्सीचा नंबरप्लेटसह फोटो पाठवायला सांगितलं जातं. घडलेल्या प्रकाराची शहानिशा करून संबंधितांवर कारवाई केली जाते. अथवा नजीकच्या वाहतूक पोलीस पथकाला कळवून बीट मार्शलला तिथे रवाना केलं जातं. काही वेळेस रस्त्यात झाड पडलंय आणि त्यामुळे रहदारीला अडथळा आलाय किंवा एखाद्या वाहनाचा अपघात झाल्यानं रहदारी खोळंबली आहे, विशेषत: पावसाळ्यात रस्त्यावर तेल सांडल्यानं धोका निर्माण झाला आहे असेही फोन या हेल्पलाइनवर येतात. काही वेळेला ‘नो पार्किंग’मध्ये गाडय़ा उभ्या केलेल्या असतात. त्या  वाहतूक पोलिसांनी उचलल्यावर कारवाईबद्दल शंका घेणाऱ्या तक्रारींचे फोनही येतात. अशा वेळी तक्रारदाराला समजावून सांगावं लागतं, की चौकात, ‘झेब्रा क्रॉसिंग’वर, गतिरोधकाजवळ गाडी उभी करता येत नाही. काहींना ‘पी-वन’/ ‘पी-टू’ पार्किंग म्हणजे नेमकं काय तेही सांगावं लागतं. कधी कधी आपली गाडी वाहतूक विभागानं उचलून नेमकी कुठे नेली आहे याची चौकशी करणारे फोन येतात. तेव्हा त्यांना व्यवस्थित माहिती द्यावी लागते. काही वेळा नागरिकांच्या सोयीसाठी  वाहतूक वळवावी लागते वा काही रस्ते एकदिशा मार्ग करावे लागतात. संकेतस्थळावर आणि वर्तमानपत्रांतून त्यांची रीतसर माहिती जनतेला दिली जाते. परंतु असे बदल जर नागरिकांना जाचक वाटले आणि त्यांनी त्यास आक्षेप घेणारे फोन हेल्पलाइनवर केले तर त्याचीही दखल घेतली जाते. त्यात तथ्य आहे असं आढळलं तर  वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अशा उपाययोजनांचा फेरविचार करतात आणि त्याप्रमाणे सूचना जारी करतात. नवरात्रोत्सव आणि गणेशोत्सव काळात हेल्पलाइनवर फोन येण्याचं प्रमाण जास्त असतं. कारण त्या दरम्यान अनेक ठिकाणी  वाहतूक वळवलेली असते वा काही रस्ते बंद केलेले असतात. नागरिक त्याची माहिती करून घेण्यासाठी फोन करतात. रस्त्यावर अपघाताची दुर्घटना घडल्याचं कळवणारा संदेश  वाहतूक  पोलिसांना मिळाल्यावर ते तातडीनं घटनास्थळी दाखल होतात. अशा आपत्कालीन परिस्थितीत पोलीस, अग्निशामक दल अशा इतर यंत्रणांचीही मदत घेतली जाते.  वाहतूक विभागाशी हेल्पलाइनवरून कोणीही केव्हाही संपर्क करू शकतं. या हेल्पलाइनची यंत्रणा अशी बनवण्यात आली आहे की विनाविलंब नागरिकांच्या तक्रारींचं निवारण व्हावं,’’असं काळे सांगतात.

संपूर्ण महाराष्ट्रात रस्त्यावर वाहनांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या खूप मोठी आहे. आपल्याकडे वाहनचालक संस्कृतीत शिस्तबद्धता नसल्यानं सिग्नल तोडणं, वेगानं वाहन चलावणं हे सर्रास घडतं. हेल्पलाइनवरून येणाऱ्या तक्रारींचं सर्वेक्षण केल्यास असं आढळून येतं, की वर्षभरात अपघाताची जी प्रकरणं होतात त्यातली पन्नास टक्के प्रकरणं वेगानं बेफामपणे दुचाकी चालवणाऱ्या तरुणांमुळे होतात. तर बाकीच्या अपघातांमध्ये सिग्नल तोडणं,‘लेन कटिंग’ किंवा चुकीच्या पद्धतीनं ‘ओव्हरटेक’ करणं, मोबाइलवर बोलत वाहन चालवणं, दारू पिऊन वाहन चालवणं, ही कारणं दिसतात. पादचाऱ्यांनी रस्ता दुभाजकावरून उडय़ा मारून जाणं किंवा मोबाइलवर बोलत रस्ता ओलांडणं, यामुळेही अपघातांचं प्रमाण खूप वाढलं आहे.

सध्या टाळेबंदीमुळे अपघातांचे फोन येण्याचं प्रमाण कमी झालं असलं, तरी सध्या या हेल्पलाइनवर वेगळ्याच समस्यांचे फोन येऊ लागले आहेत. त्याविषयी सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. अविनाश पालवे सांगतात, ‘‘टाळेबंदीच्या काळात हेल्पलाइनचा सर्वात मोठा उपयोग अडचणीत सापडलेल्या नागरिकांना झाला. एकदा आम्हाला सात महिन्यांच्या गरोदर स्त्रीकडून हेल्पलाइनवर फोन आला. तिला ठाण्याहून पनवेलला जायचं होतं आणि त्यासाठी वाहन मिळत नव्हतं. तेव्हा वाहतूक पोलिसांनी तिच्यासाठी वाहनाची सोय केली आणि  पनवेलला इच्छित स्थळी पोहोचवलं. टाळेबंदीदरम्यान अनेक वृद्ध आणि अपंग व्यक्तींचेही मदतीसाठी हेल्पलाइनवर फोन येत असतात. त्यांना लागेल ती मदत केली जाते. एक वृद्ध गृहस्थ आणि त्यांची पत्नी डोंबिवलीमध्ये अडकले होते. हेल्पलाइनवरून हे वृत्त कळताच  वाहतूक पोलिसांनी त्यांना वाहनाची व्यवस्था करून दिली आणि डोंबिवलीहून अंबरनाथला त्यांच्या मुलीकडे सुखरूप पोहोचवलं.’’

‘‘ वाहतूक विभागानं नागरिकांना वेळोवेळी मदत केली आहेच, पण ‘करोना’च्या आपत्कालीन परिस्थितीत आमचे वरिष्ठ  पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, पोलीस सहआयुक्त  डॉ. सुरेशकुमार मेकला, उपायुक्त अमित काळे हे सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्याही सुरक्षेची काळजी घेतात, त्यांचं मनोधैर्य उंचावण्यासाठी प्रयत्न करतात. करोनाबाधित  पोलिसांना रुग्णालयात प्रवेश देण्यापासून कल्याणकारी निधीतून पैशांची सोय करण्यापर्यंत सर्वतोपरी मदत केली जाते. जिल्हा पातळीवर वाहतुकीची समस्या असल्यास वाहतूक नियंत्रण कक्षांशी लोक संपर्क साधू शकतात,,’’असंही त्यांनी सांगितलं.

टाळेबंदी जाहीर झाल्यावर अचानक नेहमीचं सगळं चक्र बंद पडलं. अशा वेळी  पोलिसांना हेल्पलाइनवर फोन येऊ लागले की अमुक एखाद्या वस्तीतील गोरगरिबांची उपासमार होत आहे. तोवर सेवाभावी व्यक्ती आणि संस्थांनी हे काम हाती घेतलं नव्हतं. मग वाहतूक  पोलिसांनी कित्येक ठिकाणी अन्नाची पाकिटं वाटायला सुरुवात केली. इतकंच नव्हे, तर त्यासाठी महिला पोलीस स्वत: स्वयंपाक करून ही अन्नाची पाकिटं तयार करत होत्या.

टाळेबंदीचा सुरुवातीचा काळ हा सर्वच दृष्टीनं खडतर होता. त्या काळातला  वाहतूक विभागाचा सार्वत्रिक अनुभव पोलीस उपायुक्त अमित काळे सांगतात, ‘‘सुरुवातीच्या काळात आमच्या असं लक्षात आलं, की अनेक लोक ‘अत्यावश्यक कामासाठी निघालोय,’ असं म्हणत मोकळा रस्ता, बाहेरचं वातावरण बघायला मोठय़ा संख्येने घराबाहेर पडत. वैद्यकीय उपचारांची कुठली तरी जुनी कागदपत्रं सोबत घेत, आणि वाहतूक  पोलिसांनी अडवलं, की ‘औषधं आणायला निघालोय,’ असं खोटंच सांगत,  पोलिसांबरोबर हुज्जत घालत. ‘मॉर्निग वॉक’ करणारे तर शासनाचे आदेश धुडकावून रमतगमत गप्पा मारत रस्त्यात फिरत. अशा सर्वावर कडक कारवाई करावी लागली. काहीजण तर घरात बसून आलेला कंटाळा घालवायला रात्रीच्या वेळी बाइकवरून फिरायला निघत. त्यामुळे सुरुवातीच्या काळात वेगवेगळ्या ठिकाणच्या  वाहतूक विभागानं हजारो वाहने जप्त केली. विनाकारण अशा प्रकारे डबल, ट्रिपल सीट घेऊन फिरणाऱ्या, हेल्मेट न घालणाऱ्या लोकांवर कायद्यानुसार कडक कारवाई करावी लागली. अशा वेळीही हेल्पलाइनवर लोकांच्या खूप तक्रारी येत. पण आम्हाला सरकारी निर्देशानुसार काम करणं अनिवार्य होतं. त्या काळात रात्रीची गस्त घालत असताना असंही लक्षात आलं, की बरेच लोक रात्रीच्या वेळी खाजगी वाहनांनी परगावी जात आहेत. आम्ही या हालचालींनाही पायबंद घातला. पुढे परप्रांतीय कामगारांची ट्रक आणि टेम्पोंमधून मोठय़ा संख्येनं वाहतूक सुरू झाली. बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या वाहनचालकांवर आम्ही कडक कारवाई केली. शासनानं श्रमिक रेल्वे सुरू केल्यावर आम्ही मोठय़ा संख्येनं मजुरांना वेगवेगळ्या विभागांतून बसमधून आणून रेल्वे स्थानकावर सोडण्यासही सुरुवात केली. श्रमिकांना बसची नेमकी जागा सांगण्यासाठी आमच्या हेल्पलाइनचा खूपच उपयोग झाला.’’

वाहतूक विभागाच्या सहकार्यामुळे रस्ते दुरुस्ती, रस्त्यांच्या विस्तारीकरणासारख्या अनेक कामांना चालना मिळाली. टाळेबंदीच्या काळात  वाहतुकीचा ताण नसल्यानं ठाणे जिल्ह्य़ातल्या मेट्रोच्या आणि इतर कामांना गती मिळाली. त्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांशी संपर्क साधून  वाहतूक विभागाकडून आवश्यक त्या परवानग्या रीतसर व तातडीनं देण्यात आल्या. नागरिकांच्या सूचनांनुसार रस्त्यांच्या मध्ये येणाऱ्या स्तंभांच्या पुर्नउभारणीचं अवघड काम तडीस नेणं शक्य झालं. सकारात्मक दृष्टिकोनामुळे अनेक ठिकाणची प्रलंबित कामं विनाविलंब तडीस नेणं शक्य झालं. तसंच नागरिकांच्या सूचनांनुसार अनेक नव्या प्रकल्पांचा विचारही सुरू झाला.

काळे सांगतात, ‘‘हेल्पलाइनमुळे नागरिकांच्या समस्यांचं नेमकं स्वरूप आम्हाला कळतं. मी स्वत: अनेकदा खाजगी वाहनानं गल्लीबोळातून फिरतो. जेणेकरून  वाहतूक विभागाच्या त्रुटी, नागरिकांच्या समस्या आणि अपेक्षा यांचं सम्यक दर्शन घडावं आणि त्यानुसार आवश्यक ते बदल करता यावेत. पुढील काळात नागरिकांनी  वाहतुकीच्या नियमांचं चोख पालन केल्यामुळे अपघातांच्या संख्येत घट झाली तर मला अधिक आनंद होईल.

अलीकडेच सर्वोच्च न्यायालयानं अपेक्षा व्यक्त के ली होती, की देशातल्या रस्त्यावरील अपघातांचं प्रमाण किमान दहा टक्के कमी व्हावं.  ठाणे जिल्ह्य़ात आम्ही प्रयत्नपूर्वक ते १९ टक्क्यांनी कमी केलं. त्यासाठी

१३ जानेवारी रोजी ‘रस्ता सुरक्षा समिती’तर्फे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आमचा सत्कार करण्यात आला होता.  वाहतूक विभागासाठी ही निश्चितच अभिमानास्पद बाब आहे.’’

वाहतूक पोलीस मुंबई हेल्पलाइन

८४५४९९९९९९

वाहतूक पोलीस ठाणे हेल्पलाइन

८२८६३००३००

८२८६४००४००

दूरध्वनी क्रमांक – ०२२२५३९४८७६

वेबसाईट ठाणे वाहतूक पोलीस –

http://www.thanetrafficpolice.org