माधुरी ताम्हणे – madhuri.m.tamhane@gmail.com

खासगी आणि सामाजिक संस्थांच्या रुग्णवाहिकांव्यतिरिक्त २०१४ पासून राज्यात शासनाची एकात्मिक आणि अत्याधुनिक अशी ‘१०८’ क्रमांकाची  हेल्पलाइन  रुग्णवाहिका सेवा सुरू  झाली. आजारी वा अपघातग्रस्त रुग्णांना आणीबाणीच्या प्रसंगी उपयोगी पडण्यापासून पंढरीची वारी आणि कुंभमेळ्यासारख्या भव्य सोहळ्यांमध्ये किंवा अगदी नैसर्गिक आपत्तींमध्येही रुग्णांना तातडीनं वैद्यकीय सेवा देण्यापर्यंत या हेल्पलाइननं आपलं काम सिद्ध केलं आहे. याशिवाय गर्भवती आणि अगदी लहान बाळांसाठी ‘जननी शिशू सुरक्षा’ कार्यक्रमाअंतर्गत ‘१०२’ क्रमांकाची रुग्णवाहिका सेवाही विनामूल्य पुरवली जाते. या हेल्पलाइन्सविषयी..

पोलीस आणि अग्निशमन दलाच्या हेल्पलाइन्स ब्रिटिश काळापासून प्रचलित होत्या, पण आपत्कालीन वैद्यकीय यंत्रणा ही मात्र सर्वस्वी आपल्या देशानं आखणी केलेली स्वायत्त आधुनिक यंत्रणा आहे. २०१४ पर्यंत रुग्णवाहिका सेवा ही रुग्णालयं, ट्रस्ट अथवा खासगी मालकीची होती. त्या रुग्णवाहिकांमध्ये अत्याधुनिक सुविधा उपलब्ध नव्हत्या. महाराष्ट्रातील शहरी, ग्रामीण आणि दुर्गम आदिवासी जनतेसाठी सुसज्ज आणि संघटित अशी ‘१०८ हेल्पलाइन’ ही रुग्णवाहिका सेवा उपलब्ध झाली आणि ही कमतरता भरून निघाली.

महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य खात्यानं आपत्कालीन वैद्यकीय सेवा विभागाअंतर्गत २६  जानेवारी २०१४ रोजी एकात्मिक आणि अत्याधुनिक अशी १०८ हेल्पलाइन रुग्णवाहिका सेवा सुरू केली. ही महाराष्ट्र सरकारची अधिकृत रुग्णवाहिका सेवा असून ‘भारत विकास ग्रुप’ (बीव्हीजी) हे या सेवेच्या प्रभावी अंमलबजावणीचं काम करतात. महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवेचे प्रकल्प अधिकारी हे महानगरांमध्ये आणि  जिल्हा पातळीवर सिव्हिल सर्जन (जिल्हा शल्यचिकित्सक) हे या रुग्णवाहिका सेवेचे प्रमुख असतात. या सेवेअंतर्गत एकूण ९३३ रुग्णवाहिका २४ तास आणि आठवडय़ाचे सातही दिवस विनामूल्य सेवा देत आहेत. या सर्व रुग्णवाहिकांमध्ये आधुनिक वैद्यकीय उपकरणं, औषधं आणि एक प्रशिक्षित, प्रमाणित डॉक्टर आणि वाहनचालक उपलब्ध असतात. त्यातील २३३ रुग्णवाहिकांमध्ये गंभीर अवस्थेतील रुग्णांसाठी आवश्यक असणाऱ्या मूलभूत जीवरक्षक प्रणालीनुसार व्हेंटिलेटर, कार्डिअ‍ॅक मॉनिटर, सिरिंज पंप आणि इन्फ्युजन पंप ही अधिकची उपकरणं बसवलेली असतात.

१०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिका हेल्पलाइनसाठी सर्वत्र एकच नियमावली आहे. त्यानुसार तिची कार्यप्रणाली सर्वत्र सारखी असते. मुंबई असो वा गडचिरोली, सर्वत्र सेवेचं स्वरूप एकच असतं. ‘बीव्हीजी’ आपत्कालीन वैद्यकीय सेवेच्या नियंत्रण कक्षाचे व्यवस्थापक

डॉ. प्रवीण साधले या यंत्रणेची कार्यपद्धती सांगतात, ‘‘महाराष्ट्रातील कोणत्याही कानाकोपऱ्यातून या हेल्पलाइनवर फोन आला की सर्वप्रथम तो नियंत्रण कक्षात जातो. ही आणीबाणीची सेवा असल्यानं तो फोन काही सेकंदांत उचलला जातो. फोन करणाऱ्या व्यक्तीला त्याचं नाव, रुग्णाचं नाव, वय, स्त्री वा पुरुष हे सर्व विचारलं जातं. त्यानंतर पत्ता आणि निवासस्थानाजवळची एखादी खूण विचारली जाते. नियंत्रण कक्षात फोन करणाऱ्या व्यक्तीचा नंबर येतोच. तिथेच ही सर्व माहिती नोंदली जाते. फोन करणाऱ्या व्यक्तीनं दिलेल्या माहितीनुसार ‘जीपीएस’ प्रणालीद्वारे त्या पत्त्याच्या सर्वात जवळच्या स्थानी उभी असलेली रुग्णवाहिका शोधून त्यांना वर्दी दिली जाते. त्या रुग्णवाहिकेत असलेल्या डॉक्टरांना फोन करणाऱ्या माणसाचा नंबर दिला जातो. ते त्या रुग्णाच्या नातलगांशी त्वरित संपर्क साधतात. रुग्णाची तक्रार, सद्यस्थिती यानुसार त्यांना तातडीचे प्रथमोपचार सांगितले जातात. विशेष म्हणजे रुग्णवाहिका स्थानिक पातळीवरून रवाना होत असल्यानं त्यातील डॉक्टरांना त्या भागातील बोलीभाषा अवगत असते. त्यामुळे रुग्णांच्या नातलगांशी संवाद साधणं त्यांना सोपं जातं. त्याच वेळी नियंत्रण कक्षातून फोन करणाऱ्या व्यक्तीला कोणत्या क्रमांकाची रुग्णवाहिका किती वेळात पोहोचेल तेही सांगितलं जातं.’’

आजवर पुण्यातील ५,२४,०००, मुंबईतील ३ लाखांच्या वर, मेळघाटातील ९१,०००, तर नंदुरबार- गडचिरोली इथल्या सुमारे ६७,००० रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. ‘बीव्हीजी’ आपत्कालीन वैद्यकीय सेवेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर शेळके सांगतात, ‘‘आजवर वेगवेगळ्या जिल्ह्य़ांतील सुमारे

५६ लाख लोकांना सेवा मिळाली हाच १०८ हेल्पलाइनच्या यशस्वी सेवेचा मापदंड नाही, तर आम्ही असं अनुभवलं आहे, की १०८ हेल्पलाइन सेवेमुळे राज्यातील माता मृत्युदर कमी झाला आहे. त्याचप्रमाणे बालमृत्यूंचं प्रमाणही घटलं आहे. दिवसेंदिवस रस्त्यावरील रहदारी वाढत आहे. तरीही १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिका सेवेनं दिलेला तात्काळ प्रतिसाद आणि सुजाण नागरिकांनी वेळेवर घेतलेला या सेवेचा लाभ, या दोन्हीमुळे रस्त्यावरील अपघातांमुळे होणाऱ्या मृत्यूंच्या दरात लक्षणीय घट झाली आहे.

२६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणाऱ्या जिल्हानिहाय अहवालातील आकडेवारी हेल्पलाइनचं हेच यश अधोरेखित करते.

या हेल्पलाइनद्वारे एक अभिनव संकल्पना आम्ही अमलात आणली आहे. ती आहे ‘बाइक रिस्पॉन्स टीम’. गावातील अतिदुर्गम भागात वा शहरांतील दाट लोकवस्तीच्या झोपडपट्टय़ांमध्ये चारचाकी रुग्णवाहिका पोहोचू शकत नाही. तिथे अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणं बसवलेली बाईक (दुचाकी) रुग्णांपर्यंत पोहोचते. त्यावरील प्रथम प्रतिसादकर्ता त्यांना प्रथमोपचार देतो आणि गल्लीबोळांतून मुख्य रस्त्यावर उभ्या असलेल्या चारचाकी रुग्णवाहिकेपर्यंत आणतो. तिथून रुग्णाची रुग्णालयात रवानगी केली जाते. घरातील वा रस्त्यावरील आजारी किंवा अपघातग्रस्त रुग्णांसाठी १०८ हेल्पलाइन रुग्णवाहिका सेवा अशा प्रकारे तात्काळ मदत पोहोचवते.’’

१०८ हेल्पलाइन रुग्णवाहिका सेवा प्रतिबंधात्मक उपाययोजनाही प्रभावीपणे राबवते. या सेवेअंतर्गत खेडोपाडय़ांत ‘प्रथम प्रतिसादकर्ता’ प्रशिक्षण आयोजित केलं जातं. आजवर ७,००० शहरी आणि ग्रामीण भागातील शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी यांना या यंत्रणेच्या कार्यपद्धतीचं प्रशिक्षण दिलं गेलं आहे. त्यांना विविध व्याधींची माहिती देऊन, आणीबाणीची परिस्थिती कशी हाताळायची, रुग्णवाहिका कधी बोलवायची, तसंच कधी बोलवायची नाही, याची शास्त्रशुद्ध माहिती दिली जाते. उदा. खेळताना मुलगा पडला आणि त्याचा हात फ्रॅ क्चर झाला तर तीही वैद्यकीय आणीबाणीच असते. त्याचा हात  स्थिर राखण्यासाठी त्याला डॉक्टरची मदत लागते, हे समजून रुग्णवाहिका तात्काळ बोलवावी. मात्र केवळ तपासणीसाठी वा ‘एक्स-रे’ काढण्यासाठी डॉक्टरकडे जायचं असेल तर रुग्णवाहिका बोलवू नये, अशी माहिती दिली जाते. एखाद्याला फीट आल्यास पारंपरिक उपाय न करता रुग्णाला मोकळी हवा मिळवून द्यावी आणि रुग्णवाहिकेला तातडीनं फोन करावा अशा प्रकारे प्रथम प्रतिसादकर्त्यांला संगतवार माहिती दिली जाते.

१०८ हेल्पलाइन रुग्णवाहिका सेवा वैद्यकीय कायदेशीर बाबींमध्ये साहाय्यभूत ठरते. रस्त्यावरील अपघात, आग, आत्महत्या, विषबाधा, दंगली अशा प्रसंगी जेव्हा १०८ हेल्पलाइनची रुग्णवाहिका बोलावली जाते तेव्हा नियंत्रण कक्षातून तात्काळ पोलीस ठाणे, अग्निशामक दल अशा यंत्रणांशी संपर्क साधून त्यांचीही मदत घटनास्थळी पोहोचावी असा प्रयत्न केला जातो. काही वेळा आपत्तीचं स्वरूप व्यापक आणि गंभीर असतं. पूरपरिस्थिती, इमारत कोसळणं, आग लागणं इत्यादी. अशा वेळी आपत्तीग्रस्त भागाच्या आजूबाजूच्या सर्व विभागांतील रुग्णवाहिकांशी समन्वय साधून जास्तीत जास्त रुग्णवाहिकांची सोय केली जाते.

१०८ हेल्पलाइन रुग्णवाहिका सेवेची मुळातच अत्यंत काटेकोर आणि नियोजनपूर्वक आखणी केलेली असल्यानं आपत्कालीन परिस्थिती कुठेही उद्भवल्यास तिच्याशी एकाच पद्धतीनं सामना केला जातो. गतवर्षी महालक्ष्मी एक्स्प्रेस पुराच्या पाण्यात अडकली तेव्हा ‘एनडीआरएफ’ च्या (राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल) जवानांबरोबर या रुग्णवाहिका सेवेतील कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना सुरक्षित स्थळी हलवलं. कोल्हापूर इथल्या पूरपरिस्थितीमध्ये एका गावातील ओढय़ाला पाण्याची प्रचंड ओढ असताना एका गर्भवतीला झोळी-स्ट्रेचरवर घालून खांद्यावरून काठावरील रुग्णवाहिकेपर्यंत आणण्यात आलं, तेव्हा गावकऱ्यांची मनं हेलावली. माळीण दुर्घटनेत या रुग्णवाहिका सेवेनं अत्यंत मोलाची कामगिरी बजावली.

डॉ. ज्ञानेश्वर शेळके सांगतात, ‘‘१०८ हेल्पलाइन रुग्णवाहिकेकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना केली जाते ती लक्षणीय आहे. २०१५ मध्ये नाशिक येथे कुंभमेळा झाला. त्या वेळी तिथे १० ‘गो टीम्स’, ८० रुग्णवाहिका आणि ४०० हून अधिक डॉक्टर आणि वाहनचालक उपस्थित होते. एखाद्या रुग्णाला चक्कर आली, अस्वस्थ वाटलं, तर गर्दीतच त्यांना हेरून त्यांच्यावर प्रथमोपचार करून झोळी-स्ट्रेचरवर घालून तातडीनं रुग्णालयात हलवण्यात येत असे. या कुंभमेळ्यात एक लाखापेक्षा अधिक लोकांना योग्य आणि वेळेवर मदत मिळाल्यानं पुढील गुंतागुंत टळली. विशेष म्हणजे आजवरचा सर्वात सुरक्षित कुंभमेळा, अशी त्याची सरकारदप्तरी नोंद झाली.

अशाच प्रकारे पंढरपूरच्या वारकरी दिंडय़ांमध्ये अग्रभागी, मध्ये आणि शेवटी या रुग्णवाहिका असतात. रुग्णानं दिंडी क्रमांक सांगताच ‘जीपीएस’ प्रणालीद्वारे सर्वात जवळच्या रुग्णवाहिकेला वर्दी दिली जाते आणि रुग्णाला तातडीनं मदत मिळते. अशाच अत्याधुनिक तंत्र प्रणालीमुळे गणेशोत्सव, नवरात्रोत्सवातील मिरवणुका, ज्योतिबा, माहूर आणि वणीच्या देवीची जत्रा, अशा अनेक प्रसंगी रुग्णांना योग्य ती मदत दिली जाते आणि त्यासाठी मार्गातील रुग्णालयांशी आधीच संपर्क साधून व्यवस्था केली जाते.

मुंबईत ‘करोना’चा कहर सुरू झाला तेव्हा मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षात वैद्यकीय आपत्कालीन सेवा विभागांतर्गत १०८ हेल्पलाइन रुग्णवाहिकेचा एक छोटा नियंत्रण कक्ष उभारण्यात आला. रुग्णवाहिकांची करोना रुग्णांसाठी आणि इतर रुग्णांसाठी अशी विभागणी करून स्थानिक प्रशासनाशी उत्तम सहकार्य करत मुंबईत ३१ हजारांपेक्षा अधिक, पुण्यात १८,०००, नागपुरात १२,००० करोना रुग्णांना सेवा पुरवण्यात आली.’’

अशा अत्याधुनिक १०८ हेल्पलाइन रुग्णवाहिकेखेरीज गर्भवतींसाठी आणि नवजात बाळांपासून १ वर्षांच्या मुलांसाठी ‘जननी शिशू सुरक्षा’ कार्यक्रमांतर्गत १०२ क्रमांकाची हेल्पलाइन रुग्णवाहिका सेवा विनामूल्य पुरवण्यात येते. गर्भवतीला सरकारी रुग्णालयात या सेवेद्वारे सोडणं आणि ती बाळंत झाल्यावर तिला नवजात बाळासह घरी नेणं यासाठी ही रुग्णवाहिका सेवा उपलब्ध आहे. नवजात बाळ वा एक वर्षांच्या आतल्या बाळास गरज भासल्यास जिल्हा रुग्णालयात वा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यासाठीसुद्धा ही सेवा उपलब्ध आहे.

अत्यवस्थ असलेला एखादा रुग्ण असो, की नवजात बाळाला घरी नेणारी माता असो, ते स्वगृही सुखरूप परततात तेव्हा त्यांच्या नातलगांइतकाच आनंद आणि समाधान रुग्णवाहिकेचे चालक आणि त्यातील डॉक्टरांना वाटत असते. कर्तव्यपूर्तीतून कृतकृत्यतेच्या समाधानाचा हा अपूर्व सोहळा असतो.