मंगला गोडबोले – mangalagodbole@gmail.com

बाईनं उत्तम नाव कमावलं किंवा घराबाहेर पडून कितीही यश मिळवलं, तरी ‘संसार सांभाळून सर्व काही करा,’ ही शिकवण काही तिचा पिच्छा सोडत नाही. नाईककाकींच्या तरुणपणी त्यांना हा उपदेश उघड-उघडच मिळाला होता. आता तीस वर्षांनी त्यांच्या मुलीपर्यंत तो छुपेपणानं पोहोचला होता इतकं च! मुळात एखादं किरंकिरं पोर असल्याप्रमाणे ‘संसारा’ला सतत सांभाळावं का लागतं? सारख्या संसारातल्या कुठल्या तरी ‘परीक्षे’ला बसणाऱ्या बायका सभोवताली इतक्या दिसू लागल्या, की शेवटी नाईककाकींनी अस्वस्थ होऊन ‘व्वा हेल्पलाइन’लाच फोन लावला. तेव्हा कळलं, की बायांनीही त्यासाठी काही सोडायची मनाची तयारी करायला हवी..

china people punished for not paying debt
जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही कठीण; कर्ज फेडू न शकणाऱ्यांना चीन कशी शिक्षा करत आहे?
mpsc mantra study current affairs State National International Level Events
mpsc मंत्र: चालू घडामोडी अभ्यासाचा ‘आधार’
Career After 12th Medical courses after twelfth in Marathi
Career After 12th : बारावीनंतर तुम्हाला वैद्यकीय क्षेत्रात करियर करायचेय? मग ‘या’ अभ्यासक्रमांमध्ये घेऊ शकता प्रवेश
Academic difficulties Psychological assessment Career counseling
ताणाची उलगड: स्वत:ला स्वीकारा

पुतणीनं फारच आग्रह केला म्हणून नाईककाकी तिच्या मुलीच्या वाढदिवसाला गेल्या, तर घरदार सगळं फुग्यांनी, माळांनी झळकत होतं; पण पुतणीचा चेहरा तेवढा विझलेला होता. विचारल्यावर नाराज स्वरात म्हणाली, ‘‘बघा ना काकी, रात्री उशिरापर्यंत जागून केलेला ‘बर्डे केक’ पार बिघडला.’’

‘‘एवढंच ना? आता नाक्यानाक्यावर केक मिळताहेत. मागव एखादा.’’

‘‘ते झालंच. रिंकूचा पप्पा गेलाच आहे केक पर्चेस करायला; पण पोरीची हौस होती. नेमकं या आठवडय़ात कंपनीमध्ये ‘अ‍ॅप्रेजल’चं लचांड. रात्री घरी यायला रोजचे साडेनऊ-दहा व्हायचे. कसं केकचं सामान आणलं, केला, माझं मला माहीत. एवढं करून..’’

‘‘केकची ‘केकावली’ झाली का? म्हणजे तो फिस्कटला आणि तू कावलीस!’’

‘‘मी हसण्याच्या मूडमध्ये नाही काकी. वर्षांतून एकदा येणारा पोरीचा दिवस. तिच्या सगळ्या फ्रेण्डस्च्या मम्म्या छान छान केक्स बनवतात म्हणे. तिचीच मम्मी ही अशी..’’

‘‘मग तूही ‘बनव’ ना! बाजारातून आणून स्वत:च केला म्हणून सांगून..  एवढय़ाशा पोरीला काय कळतंय?’’ काकी म्हणाल्या.

‘‘मला कळतंय ना पण! आपण साधं पोरीचं मन जपू शकत नाही. आई म्हणून कमीच पडतो बहुतेक!’’

पुतणी ‘केकसमाचारा’तून बाहेर पडत नव्हती. काकींना आतलं सगळं स्पष्ट दिसत होतं. जबाबदारीची मोठी नोकरी, त्यात नेमकी आताच मूल्यमापनाची वेळ, ताण, जागरणं.. गडबडीत केकचा सगळा कच्चा माल अचूक आणला नसणार. कुठे तरी ‘शॉर्टकट’ मारण्याचा मोह.. तरीही आईपणाच्या  परीक्षेला बसण्याची धडपड.  कदाचित सक्तीही. परीक्षेला ‘ड्रॉप’ घ्यावा, मार्चऐवजी ऑक्टोबरमध्ये पेपर द्यावेत, हा पर्याय तिच्यापुढे नसावा. मुलीच्या वाढदिवसाला ‘आईच्या हातचा केक’ हा जसा काही ‘कंपल्सरी पेपर’ आणि त्यात एरवी एवढी शिकलेली ही पुतणी सपशेल नापास? काकींना पचायला जड गेलं.

आलेल्या पाहुण्यांनी इमानानं तो बिघडलेला केकही पचवला, पप्पानं आणलेलाही रिचवला आणि भरल्या पोटी गप्पा मारणार, तेवढय़ात एका मुलासोबत पार्टीला आलेल्या एक आजी गडबडीनं उठत म्हणाल्या, ‘‘बरं, मी जरा निघू? आज तपनचा डॅडी टूरवरून घरी येणार ना.. त्याची बायको घरी थांबेल, न थांबेल, भरवसा नाही. एवढा पंधरा-पंधरा दिवसांसाठी जातो बिचारा!’’

‘‘मग त्याची बिचारी.. आपलं, बायको काय करत असते इथे?’’

‘‘डान्सचे क्लासेस. पाच-सात बॅचेस, दोन-चार टय़ूशन्स.. घुंगरं आणि ती! नवरा घरी यायच्या वेळेला घरी थांबावं हे वळण नाही.’’ आजी म्हणाल्या.

एकूण त्या कु णा तपनची आई घुंगरं बांधून नाचते, नवऱ्याच्या तालावर नाचत नाही, ही तक्रार होती तर! बिचाऱ्या मुलाच्या स्वागताला त्याची बायको नाही तर आपण तरी जावं, या उदात्त हेतूनं त्या ‘वळणदार’ आजी लगोलग गेल्या. मग उरलेल्या बायकांनी केकसारखाच डान्स क्लासचा विषय चघळायला घेतला. बहुतेकींनी त्याबद्दल ऐकलं होतं. बऱ्यापैकी मोठा व्याप असणार त्या नृत्यवर्गाचा. त्याच्या ‘कमिटमेंट्स’ सांभाळताना नवऱ्याच्या वेळा सांभाळायला कठीण जात असणार त्या बाईला; पण तेवढय़ावरून तिच्या वळणाबद्दल, नवऱ्याशी असलेल्या बांधिलकीबद्दल शंका? आजी इमानानं असं खतपाणी घालत असतील, तर त्यांचा ‘बबडय़ा’ही बायकोच्या ‘कथ्थक’वर अथक  ‘तांडव’च करत असणार. संसाराचा ठेका चुकायला आणि नसती ठोकाठोकी सुरू व्हायला पुरेसं होणार की हे! नाईककाकींना उगाचच अस्वस्थ वाटायला लागलं.

भरपूर पोटपूजा करून घरी पोहोचेपर्यंत नाईककाकांसाठी फार काही रांधण्याचा उत्साह पुरता संपला होता त्यांचा. काही तरी थातुरमातुर करून भागवावं, तर घरी एक जुने स्नेही परगावहून आलेले, तेही न कळवता! स्वागत करणं तर भागच होतं.

‘‘कोर्टाचं काम अचानक निघालं म्हणून.. तशी आमच्या ‘सौ’ची बहीण राहाते गावात; पण तिच्याकडे कुठलं जेवण मिळायला?’’ ते म्हणाले.

‘‘का? त्यांच्या घराला भूकबळी जाण्याची परंपरा आहे का?’’ नाईककाकी.

‘‘तेवढं नाही अगदी, पण धड तयारी नसते, घरात सामान आणलेलं नसतं. मग कुठल्या तरी हॉटेलातून काही तरी मागवायचं, कशी तरी, कशानं तरी वेळ मारून न्यायची. बाकी गाडाभर हुशारी आहे, पण मला तिचा काय उपयोग?’’

कुठे तरी.. काही तरी.. वगैरेतल्या प्रत्येक ‘क’चा ‘क्य’ करताना कहर वाकडं तोंड करत स्नेही सांगायला लागले. त्यांची बहुधा अशी अपेक्षा असावी, की कु णाकडेही न सांगता जाऊन धडकलं  तरीही त्या वेळी नऊवारी नेसून, ओचेपदर बांधून, लगबगीनं त्यांना ऊन-ऊन भातावर ओगराळ्यातून वरणाची धार वाढणारी सुगृहिणी सामोरी यावी. त्यांची अपेक्षा त्यांना लखलाभ, पण बाईची बाकी सगळी हुशारी एका पारडय़ात घातली, तरी दुसरं पाककौशल्याचं पारडंच जड असायला हवं, हा त्यांचा हिशोब फारच ‘नापाक’ होता. या हिशोबानं जाणाऱ्या बहुतेक पुरुषांनी मग आचाऱ्यांशी लग्नं करायला हवी होती. ज्या अर्थी ते (म्हणजे जनरली पुरुष आणि स्पेसिफिकली आचारी) बायकांशी लग्न करतात, त्याअर्थी पाककौशल्याखेरीजच्याही काही गोष्टी महत्त्वाच्या असणार. असं असतानाही, अजूनही..

असल्या उलटसुलट विचारांमध्ये गढल्याचा ताण नाईककाकींच्या चेहऱ्यावर आला, त्या वेळी तो हलका करण्याच्या इराद्यानं स्नेही मोठय़ांदा हसत म्हणाले,‘‘बाकी तुमच्याकडे येताना मला असली काही काळजी नव्हती बरं का. या घरात म्हणजे सगळं कसं चोखच मिळणार. शेवटी संसार सांभाळून सगळं करणाऱ्यांपैकीच तुम्हीसुद्धा.’’

संसार सांभाळून सगळं करणं! किती चिरपरिचित शब्दप्रयोग पडला होता नाईककाकींच्या कानावर. तीस वर्षांपूर्वी त्यांचं लग्न झालं, तेव्हा हीच उदार सवलत त्यांच्या कुटुंबानं त्यांना दिली होती आणि गेल्या वर्षी लग्न झालेल्या त्यांच्या मुलीलाही साधारण याच अर्थाचा संदेश मिळाला होता. पूर्वी उघड आणि स्पष्ट होता, आता छुपा आहे; पण एकूण सारांश तोच आहे. एखाद्या किरकि ऱ्या मुलासारखं सारखं-सारखं संसाराला सांभाळावं का लागतं? आणि तोही पठ्ठय़ा फक्त बाईकडूनच का सांभाळून घेतो? नाईककाकींनी या जुन्याच प्रश्नावर घोटाळत त्या आगंतुक स्नेह्य़ांसाठी नाइलाजानं चार जिन्नस रांधले. त्यांचं पोट भरलं, पण कालपासून हाती घेतलेलं पुस्तक वाचण्यावरून नाईककाकींचं मन उठलं ते उठलंच. त्यांनी नाराजीच्या सुरावटीवर दिवस संपवला.

दुसऱ्या दिवशी सकाळी पहिल्या चहासोबतच वर्तमानपत्रातून एक आनंददायी बातमी समोर आली. त्यांच्या सहनिवासातल्या एका गुणी, होतकरू गायिकेला संगीताची राष्ट्रीय शिष्यवृत्ती जाहीर झाली होती. योग्य वेळी, योग्य गुणवत्तेला अशी जाहीर दाद! नाईककाकींना मनापासून छान वाटलं. त्यांनी आपल्या सहनिवासाच्या ‘लेडीज क्लब सेक्रेटरी’ला उत्स्फूर्तपणे फोन केला आणि या कलावतीचा घरगुती सत्कार करण्याची कल्पना मांडली. समोरचा प्रतिसाद कोमट होता. ‘‘सत्कार ना? करू या की कधी तरी. मी मांडते कमिटीसमोर हा मुद्दा. बजेट बघून ठरवू या कार्यक्रम. का वर्षअखेरीस कॉलनीतल्या सगळ्या गुणवंतांचा एकत्रच सत्कार करायचा का?’’ असली उडतपगडी वाक्यं.

ऐकता ऐकता नाईककाकींच्या तोंडून टोकदार प्रश्न गेलाच, ‘‘तुम्हाला त्यांचं हे यश एवढं मोठं वाटत नाही का?’’

‘‘यश आहे. नो डाऊट! पण त्यांना काय, पोर ना बाळ. व्याप ना ताप. दिवसभर गात बसल्या तरी चालतं. आमच्यासारखं याला शाळेत सोडा, त्याला क्लासमधून आणा, असलं चक्र मागे लागलं असतं, तर गोष्ट वेगळी झाली असती. अशा बायकांचं म्हणजे वेगळं  पडतं..’’

‘अशा’ म्हणजे ‘कशा’ बायका? मूल नसलेल्या? म्हणून रिकामटेकडय़ा? मूल नसलेल्या सगळ्या बायका एवढय़ा गुणवत्तेची कलासाधना करतात? मुलं असलेल्यांची मुलं   कु णी तरी खात्रीनं सांभाळली, तर सगळ्यांच्याच हातून होईल अशी कामगिरी? नाईककाकींना एवढी तिडीक आली, की पुढे बोलावंसंच वाटेना.

तपनच्या आजी मागच्या पिढीतल्या, अचानक उपटलेले स्नेही पुरुषी मनोवृत्तीचे, पण या ‘सेक्रेटरीण’ बाई तर समवयस्क बाईच आहे ना? तरीही असलं मूल्यमापन? हिलाही मोकळ्या मनानं दाद देता येऊ नये? एका ‘मूल नसण्यामुळे’ तिची बाकीची श्रेयंही उणी ठरवावीत?

नाईककाकींना सगळंच अंगावर येणारं वाटायला लागलं. अवतरण चिन्हातलं ‘बाईचं आयुष्य’ त्याही बरंच जगल्या होत्या. लग्न होणं, ते टिकणं, मुलं होणं, जोडीदाराशी सुसंवाद, सासरच्यांचे स्नेहबंध, गृहिणीपणाच्या जबाबदाऱ्या, या सर्व अनुभवांचं मोल त्या जाणून होत्या; पण त्या आव्हानाच्या आनंदाच्या जागा मूल्यमापनाच्या जागा कशा ठरू शकतात, का ठरतात, हे समजत नव्हतं. शिवाय वर्षांनुवर्षांत यात म्हणण्यासारखा ठळक बदलही झाला नव्हता. मूठभर शहरी (तेवढय़ा तरी?) सोडल्या, तर बाकीच्या..

त्यांना एकदम आठवल्या वत्सलावहिनी. आधी समुपदेशक, त्यात स्त्री. त्या नक्कीच यावर वेगळा प्रकाश टाकू शकतील. नाईककाकींनी सरळ ‘व्वा’ हेल्पलाइनचा फोन नंबर फिरवला. उत्तर आलं,

‘‘नमस्कार. मी आपल्याला काय मदत करू शकते?’’

‘‘मला एक सांगा, जगभर सगळीकडे सगळ्या परीक्षांचे अभ्यासक्रम बदलतात ना? जुने विषय जाणं, नवे येणं, ‘एक्झ्ॉम पॅटर्न’ बदलणं..’’ नाईककाकी विचारत्या झाल्या.

‘‘अर्थातच. अहो, जग बदलतं, विस्तारतं, नव्या ज्ञानशाखा येतात. शिक्षणाला काळासोबत राहावंच लागतं; पण प्रश्न काय आहे?’’ वत्सलावहिनी.

‘‘प्रश्न एवढाच आहे, की हे तत्त्व बायकांच्या परीक्षांना का लागू नाही? त्यांना विषय निवडण्याचा अधिकार का नाही? पिढय़ान्पिढय़ा तेच विषय, तेच अभ्यासक्रम, त्याच परीक्षेला बसण्याची सक्ती का असावी?’’

‘‘तेच विषय म्हणताय.. ते कोणते?’’

‘‘हेच बघा ना- बाई बाहेर कितीही कर्तबगारी दाखवो, तिचं लग्न होणं, लग्नात तिचं ‘सुखी’ असणं, मुलं होणं, मुलगा होणं, चारी ठाव स्वयंपाक करता येणं, घर छान-छान ठेवता येणं, यावरच मोजायचं का तिचं यश? समजा, एखाद्या बाईला स्वयंपाक करण्यात गती नाही.. ती ‘ऑप्शन’ला नाही टाकू शकत तो विषय? नोकरांचा, हॉटेलांचा पर्याय नाही वापरू शकत? एखादी ‘मूल नकोच’ असं म्हणू नाही शकत?’’ नाईककाकी.

‘‘म्हणावं की मग! कोण कु णाला थांबवतं अशा बाबतीत?’’

‘‘तसं नाही नुसतं. त्यापायी ती सगळ्यात नापास ठरू नये.’’

‘‘ठरवणाऱ्यांना काहीही ठरवू द्या. बायकांनी बसूच नये त्या तसल्या जुनाट परीक्षेला. खूप मॉडर्न बायका ते करताहेत.’’

‘‘म्हणजे अपयशाचा शिक्का अटळच. त्यापेक्षा संसाराचा अभ्यासक्रम ‘जरा नवा येऊ द्या’ हे आमचं म्हणणं आहे. हे होईल का? कधी?’’ नाईककाकी म्हणाल्या.

‘‘करिक्युलम बदलणाऱ्या कमिटय़ा असतात, मीटिंगा होतात, बराच खल होतो तज्ज्ञांचा. एकदम रातोरात नसतात बदल होत.’’ वत्सलावहिनी.

‘‘मान्य आहे; पण मांडत राहाणं, बदल सुचवत राहाणं तरी सतत व्हावं, नाही का? म्हणून म्हणते, तुमच्यासारख्यांनी लावून धरावं. तुम्ही समाजालाही सल्ले देऊ शकताच की.’’

‘‘बघू. करू प्रयत्न. बायकांचे, घरसंसाराचे अभ्यासक्रम बदला, नवे पेपर काढा, नवी प्रगतिपुस्तकं तयार करा, ठीक आहे?’’

‘‘करेक्ट! तसंही खूप वेगवेगळ्या परीक्षांना बसावं लागतंय हो आताच्या बायकांना! खूप ओढाताण होत्येय त्यांची. त्याबाबत सहानुभूती बाळगायची सोडून..’’

‘‘खरंच. करू आम्ही आमच्या बाजूनं प्रयत्न. तुम्ही तेवढी बायकांची हमी द्या. तुम्हाला बायकांना नुसता कपडय़ा-दागिन्यांचा सोस नाहीये काही. तुम्हाला सगळी चांगुलपणाची ‘सर्टिफिकेटस्’ही हवीयेत ना.. तो सोस सोडायची तयारी करा, मग आग्रह धरा, अभ्यासक्रम नवा येऊ द्या म्हणून!’’ वत्सलावहिनींनी ठासून सांगितलं.

यावर काहीही बोलायची नाईकवहिनींची प्राज्ञा झाली नाही. त्या क्षीण हसल्या, फोन बंद करून बसल्या.