21 January 2021

News Flash

तिचं व्यसन

वेळ कसा घालवावा, या प्रश्नाचं उत्तर तिला ‘व्यसनाधीन होणं’ यात मिळालं आणि तिनं दारूला जवळ केलं. नवऱ्याला आवडायचं नाही, त्यामुळे भांडणं व्हायची. तिची व्यसनाधीनता वाढू

| September 6, 2014 01:01 am

वेळ कसा घालवावा, या प्रश्नाचं उत्तर तिला ‘व्यसनाधीन होणं’ यात मिळालं आणि तिनं दारूला जवळ केलं. नवऱ्याला आवडायचं नाही, त्यामुळे भांडणं व्हायची. तिची व्यसनाधीनता वाढू लागली. माझ्या भारतीय मनाला माझ्या अमेरिकी शेजारणीची अवस्था जाचू लागली. मग..

दरवर्षीप्रमाणे आम्ही मे ते ऑक्टोबर असे सहा महिने मुला-नातवंडांना भेटायला अमेरिकेला गेलो होतो. व्हर्जिनियात मुलाने नवीन घेतलेल्या घरी पोहोचलो. लवकरच रूळलोही.
एका सकाळी पाठीमागच्या डेकवर कॉफी घेत बसलो होतो. शेजारच्या घरातले आमच्याच वयाचे एक गृहस्थ त्यांच्या छोटय़ाशा शेतात काम करत होते. माझ्या मुलाने, अश्विनने त्यांना आमच्या येण्याविषयी सांगितले होते. त्यामुळे त्यांना आमच्याविषयी माहिती होती. आणि त्यांनी हात उंचावून आमच्याकडे पाहून ‘हाय’ केले. आम्ही पण तसेच प्रत्युत्तर दिले. आमच्याकडे येण्याची खूण केली. ते आले जुजबी गप्पा झाल्या आणि कॉफी घेऊन ते संध्याकाळी भेटू या म्हणून गेलेही. त्यांचं नाव जेरी!
संध्याकाळी मुलगा, सून ऑफिसमधून आल्यावर थोडय़ा वेळाने नातवाला फिरवायच्या निमित्ताने सगळेच बाहेर पडलो. कॉलनीतील स्वच्छ, नितळ रस्त्यावरून चालायला बरं वाटत होतं! पाच एक मिनिटांतच जेरी आपल्या पत्नी रिबेकासह समोरून येताना दिसले. रिबेकाशी त्यांनी आमची ओळख करून दिली. पण पाच-दहा मिनिटांनी रिबेका म्हणाली, ‘‘मला घरी जायला हवं!’’ आणि ती घाईघाईने निघून गेली. जेरी गप्प गप्प होते. आम्ही त्यांना विचारलं, ‘‘रिबेका अशी पटकन का निघून गेली?’’ ते म्हणाले, ‘‘ सात ते साडे सात तिची दारू प्यायची वेळ आहे. आताशा ती खूपच दारू प्यायला लागलीय. मला खूप काळजी वाटते तिची.’’ काय बोलावं हे आम्हाला पण सुचेना! तरी धीर करून मी त्यांना विचारलं, ‘‘आम्ही तुम्हाला काही मदत करू शकतो का?’’ ते म्हणाले, ‘‘अगदी नक्की.’’ त्यांनाही तिला यातून बाहेर काढायचं होतंच! उद्या सकाळी बोलू या! असं म्हणून ते निघून गेले. माझ्या मुलांना रिबेकाच्या या सवयीविषयी थोडीफार माहिती होती. पण आम्ही पहिल्यांदाच ऐकत होतो. म्हणून थोडे खिन्न झालो.
तिथे प्रत्येकाच्या घरामागे अर्धा किंवा एक एकर जागा आहे. उरलेल्या तीन बाजूंना लॉन आहे. जेरींना झाडांची फार आवड! भेंडी, काकडय़ा, मिरच्या, सॅलडचे छोटे लाल टोमॅटो, मोठे टोमॅटो अशी भरपूर लागवड त्यांनी केली होती. उरलेल्या भागात सफरचंदाची झाडे लावली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही डेकवर जाऊन बसल्याचे जेरींनी पाहिले. आणि पाच मिनिटांत ते आलेच आमच्याकडे. पत्नीच्या पिण्याच्या सवयीची त्यांची काळजी दिवसेंदिवस वाढत होती. त्यामुळे ते आमच्याशी बोलायला उत्सुक होते. त्यांनी सांगितलं की, त्यांचा एकुलता एक मुलगा नोकरीच्या निमित्ताने युरोपमध्ये स्थायिक झाला आहे. आणि हे दोघे निवृत्तीनंतर घरीच असतात. रिबेकाला कोणतेही छंद नाहीत त्यामुळे तिला एकटेपणा जास्तच जाणवायला लागला आणि त्यातून तिला ही सवय लागली. अमेरिकेत पिणं ही नवीन गोष्ट नाही, तरीही दररोज नित्यनेमाने पिणं हे जेरीलासुद्धा योग्य वाटत नव्हतं. रिबेकाची जवळच राहणारी बहीण अधूनमधून येते तेव्हा रिबेका दारू पीत नाही. कारण बहिणीबरोबर गप्पागोष्टी करणं कधी खरेदीला जाणं यात तिचा वेळ चांगला जातो आणि पिण्याची आठवण होत नाही. पण बहिणीला वरचेवर रिबेकाकडे येणं शक्य होत नाही. जेरींनी आडवळपणाने मला हेच सुचविलं की, मी सकाळी ११ ते १ या रिबेकाच्या पिण्याच्या वेळी नातवाला घेऊन तिच्याकडे जावं किंवा तिला बोलवावं. असं करण्याने आपण तिचं पिणं नक्कीच कमी करू शकतो.
‘शुभस्य शीघ्रम्!’ असा विचार करून दुसऱ्याच दिवशी मी नातवाला घेऊन रिबेकाकडे गेले. तिकडे खरं तर कोणीही कधीही उठून कोणाकडे जात नाही. ज्यांच्याकडे जायचं असेल त्यांना आपल्याला द्यायला वेळ आहे का, याची चौकशी फोनवरून किंवा मेलवरून करूनच जायचं असतं. पण हे अगदीच शेजारचं घर, रिबेका घरीच असते हे पण निश्चित आणि जेरींची इच्छा आणि परवानगी या सर्व जुळून आलेल्या गोष्टींचा फायदा घेऊ या म्हटलं! आणि यातून काही चांगलंच निष्पन्न होईल अशी आशाही होतीच.
आम्ही पोहोचलो शेजारी. दार ठोठावलं. रिबेकाने दार उघडलं! थोडे आश्चर्याचे भाव होते चेहऱ्यावर, पण आम्हाला पाहून तिला आनंद नक्कीच झाला होता. आम्हाला बाहेरच्या खोलीत बसवून ती आत गेली. माझ्या लक्षात आलं की तिने आतमध्ये जाऊन पिण्याचं साहित्य आवरून ठेवलं! माझा नातू ध्रुव हा दीड वर्षांचा, लहान मुलगा, तो शांत बसणं शक्यच नव्हतं. त्याची गडबड, धडपड त्याचा दंगा याची तिला खूपच गंमत वाटली. मी फोन करून त्याची थोडी खेळणी मागवून घेतली. रिबेका त्याच्याशीच गप्पा करत खेळत बसली. नंतर त्याला थोडा खाऊ दिला आणि आमच्या गप्पा सुरू झाल्या. तिचे नातेवाईक, त्यांचे मोजके सण, त्यांची संस्कृती जशी आहे ती तशी का आहे, थोडंसं राजकारण वगैरे बोलणी झाली. तिचं म्हणणं असं होतं की, तुमची हुशार मुलं तुम्ही इकडे पाठवून देता म्हणजे देशातलं ‘क्रिम’ इकडे येतं, त्यामुळे भारताची प्रगती कमी आहे. यावर तिला द्यायला माझ्याकडे उत्तर नव्हतं! पण मनात मान्य केलं की हे खरं आहे, आमची वेगाने वाढणारी लोकसंख्या त्यामुळे कमी पडणारी साधन-सामुग्री आणि अयोग्य नियोजन तसंच योग्य संधी कमी ही कारणं आहेत ‘क्रीम’ अमेरिकेत येण्याची! एक-दीड वाजता मी परत आले. असं सलग चार दिवस झालं! मग त्या शनिवारी आम्ही त्या दोघांना घेऊन भारतीय जेवण जेवायला गेलो. तिथे बुफेमधील कोफ्ता, खीर, डोसा, पंजाबी कढी, रुमाली रोटी हे पदार्थ त्यांना खूप आवडले. रिबेकाच्या लक्षात येणार नाही अशा रीतीने आम्ही तिला सकाळी ११ ते २ या वेळात व्यस्त ठेवू लागलो. आठवडय़ातून दोन वेळा तरी ती आमच्याकडे येऊ लागली. एकदा तिच्या लक्षात आलं की आम्ही तिकडे चार-पाच महिनेच राहाणार, नंतर ती कोणाशी गप्पा करायला येणार? ती म्हणाली, ‘‘तुम्ही भारतात परत गेल्यावर मी येथे येऊन काय करू? तुमचा मुलगा, सून तर दिवसभर नसतात.’’ तेव्हा मी तिला सांगितलं की, ‘‘हा छोटा मुलगा आणि तू, तुम्हा दोघांना आताच एकमेकांचा लळा लागलाय. आणखी थोडय़ा दिवसांनी तर तुम्हाला एकमेकांशिवाय करमायचं पण नाही.’’ तिला ते पटलं!
आता आम्ही कधी कधी त्यांच्या शेतात अर्धा तास फिरायला जाऊ लागलो. सफरचंदाचा मोसम सुरू होत होता. खूप सफरचंद तयार झालेली दिसली. मी तिला विचारले, ‘‘एवढय़ा सफरचंदांचं तुम्ही दरवर्षी काय करता?’’ तेव्हा तिने सांगितल, ‘‘छोटय़ाशा टेंपोमध्ये सगळी तयार झालेली सफरचंदं,थोडी भाजी घेऊन जेरी स्वत: ती विकायला जातात. आता या दिवसांत आठवडय़ातून एकदा इथे फार्मर्स मार्केट भरते. प्रत्येकजण आपापल्या शेतातील वस्तू तिथे नेऊन विकतो. ताज्या वस्तू ग्राहकांना मिळतात आणि आमचाही फायदा होतो. दलाली द्यावी लागत नाही.’’ तिला व्यस्त ठेवण्याचा आणखी एक उपाय मला सुचला. तिला सांगितलं, ‘‘तू अ‍ॅपल जाम, केक असल्या वस्तू ख्रिसमसमध्ये नातेवाइकांना, शेजाऱ्यांना गिफ्ट म्हणून देऊ शकतेस?’’ जेरींना तिने हे सांगितलं. त्यांनाही आनंद झाला. पुढचे दोन- तीन आठवडे आमच्या मदतीने तिने हाच उद्योग केला. बाटल्या विकत आणल्या त्यात जाम, पाय पॅक करून ठेवला. आता ती दुपारी व्यस्त राहू लागली, त्यामुळे तिला पिण्याची आठवण होत नसे. पण संध्याकाळी काय? ते ‘सेशन’ सुरूच होतं. सगळं एकदम बंद होणं कठीणच ना? एक मात्र नक्की की तिने करून ठेवलेले पदार्थ पाहून तिला खूप आनंद व्हायचाच आणि आत्मविश्वास वाढल्याचं कळायचं.
आमच्याकडे नवरात्र होतं. तिने आमच्याकडे स्वत: येऊन खूप माहिती गोळा केली. पुढे दिवाळीत आम्ही त्या दोघांना एकदा गोडा-धोडाचा स्वयंपाक करून जेवायला बोलावलं! आणि तिला आवर्जून सांगितलं की, सणासुदीला आम्ही पिणं टाळतो म्हणून आम्ही फक्त सॉफ्ट ड्रिंक्स दिली आहेत. तिने आठवणीने अ‍ॅपल जाम आणि पायच्या तीन-चार बाटल्या आमच्याकरिता आणल्या.
तिचं पिणं खूप कमी झालं होतं. जेरींनी आम्हाला सांगितले की, आता त्यांची रोजची भांडणं पण जवळ जवळ बंदच झाली आहेत. नंतर हळूहळू आम्ही तिला संध्याकाळचं पिणं बंद करण्याविषयी स्पष्टच सांगायला सुरुवात केली. तिचं दुपारचं पिणं बंद करण्याकरिता आम्ही सर्वानीच खूप प्रयत्न केले हे तिला चांगलंच कळलं. अमेरिकी लोक एकांताच्या नावाखाली एकमेकांकडे कमी जातात. प्रश्न सोडविण्याच्या भानगडीत पडत नाहीत. ज्याचं त्याने करावं, सावरावं अशी त्याची वृत्ती असते हेही तिने आम्हाला सांगितलं.
आमचे भारतात परतण्याचे दिवस जवळ आले. जेरी, रिबेकाला वाईट वाटत होतं. सहा महिन्यांत रिबेकाचं पिणं नव्वद टक्के कमी झाल्याने जेरी खूश होते. ती परत व्यसनाच्या आहारी जाऊ नये असं सर्वानाच वाटत होतं. माझ्या नातवाची आणि तिची चांगलीच गट्टी जमली होती. आणि जेरींनी स्वत: पण तिला त्याबाबतीत मदत करायचं ठरविलं. त्यामुळे सगळं व्यवस्थित चालेल अशी देवाजवळ प्रार्थना करून आम्ही परतलो.
इथे आल्यावर रोजच्या उद्योगात रमले. पण कधी-कधी तिची आठवण होतेच. मग फोन, ई-मेलवरून संपर्क होतो. ती आनंदी आहे म्हणून सगळेच सांगतात आणि ती स्वत: पण सांगते. एका व्यसनग्रस्त स्त्रीला मी त्यातून बाहेर काढू शकले याचा आनंद कोणत्याही आनंदापेक्षा जास्तच होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 6, 2014 1:01 am

Web Title: her addiction
टॅग Chaturang
Next Stories
1 मृत्यू म्हणजे अंत नाही
2 कायदेकानू : ज्येष्ठ नागरिक कायदा २००७
3 खा आनंदाने!: ऋषीची भाजी
Just Now!
X