प्रज्ञा शिदोरे – pradnya.shidore@gmail.com

स्वातंत्र्य मिळून ७३ र्वष झालेला भारत देश असू दे, नाही तर २४४ र्वष ‘स्वतंत्र’ असलेला अमेरिका, स्त्रियांच्या स्वातंत्र्याबाबतच्या काही गोष्टी अशा आहेत, ज्यासाठी फक्त कायदे उपयोगाचे नाहीत. स्त्रिया शिकल्या, विविध व्यवसाय क्षेत्रांत अनेकींनी आपली जागा निर्माण केली, तरी ‘आम्ही तिला घरात पूर्ण स्वातंत्र्य दिलंय’ वगैरे शेरे त्यांची पाठ सोडत नाहीत. स्वत:चे निर्णय स्वत: घेणं आणि त्यांच्या परिणामांना सामोरं जाणं, हे स्वातंत्र्य अजूनही अनेक जणींना नाही. म्हणूनच ‘स्वतंत्र ती’चा अनुभव तिला कधी मिळेल, हा खरा प्रश्न आहे.

शाळेत असताना दरवर्षी १५ ऑगस्टचा नेम ठरलेला. गणवेश घालून, तो गणवेश मळणार नाही याची खबरदारी घेत, हमखास भुरभुर पावसात झेंडावंदन. त्यानंतर ‘भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हाचा भारत आणि आताचे प्रश्न’ याविषयी कुणा तज्ज्ञाचं भाषण. मग, ‘स्वातंत्र्य म्हणजे काय’ असा साधारण विषय असलेल्या स्पर्धेतल्या सर्वोत्तम निबंधाचं वाचन. मजकूरही सारखाच असायचा खरं तर सगळ्यांचा. ‘अहिंसेची कास धरून, इंग्रजांशी दोन हात’ वगैरे. त्यामुळे जिचं हस्ताक्षर उत्तम, मांडणी चांगली, तिला साधारणपणे पारितोषिक मिळायचं.

काही वर्षांपूर्वी लोणारला गेले होते. तेव्हा तिथल्या शाळेत, मी शाळेत असतानाचा हा अनुभव पुन्हा आला. तिथल्याही निबंध स्पर्धेत एका मोत्यासारख्या अक्षराला पहिलं बक्षीस मिळालं होतं. इतर काही निबंध नजरेखालून घालत होते तेव्हा एका गिचमिड अक्षरावर नजर स्थिरावली. तिला कशापासून स्वातंत्र्य हवं आहे किंवा तिला तिचं जग कसं हवं आहे, याचा पाढा होता तो. त्या कागदावरच्या लिखाणाला कोणत्याही अर्थानं ‘निबंध’ म्हणता येणार नाही; पण त्या कागदावरची यादी मात्र माझ्या मनात कायमची कोरली गेली. खूप तुटक-तुटक लिहिलेलं होतं त्यावर. जसं- ‘रोज पाणी नाही भरायचं मला, तलावाच्या रानात रात्री जायचंय- दुर्बिणीतून चंद्र बघायला, जोरात सायकल मारायची आहे, ताईंसारखे कपडे करायचेत, कॉलेजला बाहेर जायचंय, तिथल्यासारखं ‘ब्युटी पार्लर’ इथे उघडायचंय..’ वगैरे खूप काही होतं त्यात. तिच्या-तिच्या स्वातंत्र्याच्या कल्पना होत्या त्या. तिची-तिची स्वप्नं. दरवर्षीप्रमाणेच या वर्षीही तिच्या त्या गिचमिड अक्षरातल्या यादीची आठवण झाली.

१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला ब्रिटिश अमलापासून स्वातंत्र्य मिळालं. १४ ऑगस्टच्या मध्यरात्री स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी जगभरातल्या राष्ट्रांना आणि लोकांना उद्देशून एक भाषण केलं. (हे भाषण विसाव्या शतकातील सर्वोत्तम भाषणांपैकी एक समजलं जातं.) या भाषणात ते म्हणाले होते की, ‘या मध्यरात्री, जेव्हा जग झोपलेलं असेल तेव्हा भारत देश जागृत होईल, जीवन आणि स्वातंत्र्यासाठी.’ काँग्रेस पक्ष आणि महात्मा गांधी यांच्या स्वातंत्र्याच्या कल्पना वेगळ्या होत्या. नेहरूंना आधुनिक भारताची मंदिरं उभी करायची होती, तर गांधींना प्रत्येक माणसासाठी स्वराज्य उभं करायचं होतं. प्रत्येक व्यक्तीला सार्वजनिक आयुष्यात स्वातंत्र्य नसेल तर संपूर्ण स्वराज्याला काही अर्थ नाही, असं गांधींचं मत होतं. त्यांच्या ‘हिंदस्वराज्य’ या पुस्तकात ‘स्वराज्य म्हणजे काय?’ असा प्रश्न विचारला होता. इंग्रज भारत देश सोडून गेले म्हणजे स्वराज्य मिळालं, असं नाही. गांधी म्हणतात, की इंग्रज देश सोडून जातील तेव्हा दिल्लीला नक्कीच स्वातंत्र्य मिळेल, आपण राजकीयदृष्टय़ा नक्कीच स्वतंत्र होऊ; पण जेव्हा प्रत्येक गावातल्या, प्रत्येक व्यक्तीला प्रतिष्ठेचं, भयमुक्त जीवन जगता येईल, तेव्हाच भारताला संपूर्ण स्वातंत्र्य मिळेल.  ते स्वातंत्र्य भारतीयांना मिळालं का, हा विचार व्हायला हवा.

स्वातंत्र्याबद्दल जेवढं वाचायला जावं, तेवढी ही स्वातंत्र्याची कल्पना सापेक्ष आणि व्यक्तिनिष्ठ वाटायला लागते. माझ्यासाठी जी स्वातंत्र्याची कल्पना आहे, ते एखादीचं वास्तव असतं; आणि मला ज्या गोष्टींचं स्वातंत्र्य आहे, ते तिच्यासाठी स्वप्नवत असू शकतं; पण काही गोष्टी अशा आहेत, ज्या बाबतीत प्रत्येकीचं एकमत होईल आणि या अशा गोष्टी आहेत, की ज्यासाठी फक्त कायदे उपयोगाचे नाहीत. मग तो ७३ र्वष स्वातंत्र्य मिळालेला भारत देश असू दे, नाही तर २४४ र्वष ‘स्वतंत्र’ असलेला अमेरिका. स्त्रियांच्या स्वातंत्र्यासाठी लढा आज खरं तर र्अध जग लढत आहे. स्त्रिया आज जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात काम करत आहेत, महत्त्वाची पदं भूषवत आहेत; पण तरीही आज अनेक ठिकाणी, अनेक वेळा, कदाचित अनवधानानं किंवा पुरुषप्रधान संस्कृतीमुळे मनात खोलवर रुजलेल्या असमानतेमुळे, ‘आम्ही हिला घरात पूर्ण स्वातंत्र्य दिलं आहे’, ‘मी माझ्या बायकोला ‘इंडीपेंडंट’ केलं आहे’ वगैरे शेरे ऐकू येत असतात. मनात, समाजात रुजलेल्या या स्वातंत्र्य देणाऱ्या आणि घेणाऱ्या अशा दोघांमधलं ‘पॉवर रिलेशन’ खूप खोल आणि पक्कं आहे.

काही दिवसांपूर्वी ‘इन्स्टाग्राम’वर एक ‘साखळी चॅलेंज’ सुरू झालं होतं. काहीही खुलासे न करता आपला स्वत:चा कृष्णधवल फोटो सर्वासमोर ठेवायचा. सध्या समाजमाध्यमांवर सतत अशा विविध साखळ्या सुरू असतात. जसं, १० वर्षांपूर्वीचा फोटो किंवा साडीतला फोटो वगैरे; पण ही साखळी सुरू होण्याचं एक ठोस कारण होतं, टर्कीमध्ये स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराचं प्रमाण गेल्या काही वर्षांत प्रचंड वाढलं आहे. छोटय़ा-छोटय़ा कारणांवरून त्यांचा थेट बळी घेतला जातो. एका पाहणीनुसार टर्कीमध्ये ४२ टक्के स्त्रियांवर कोणत्या ना कोणत्या प्रकारचे शारीरिक अत्याचार झाले आहेत. हे प्रमाण वाढण्याचं कारण स्त्रिया अनेक क्षेत्रांत प्रगती करत आहेत, स्वतंत्रपणे आपली मतं मांडत आहेत हे असावं, असं म्हटलं जातं. अशा बळी गेलेल्या स्त्रियांच्या बातम्या आणि वृत्तपत्रामध्ये कृष्णधवल फोटो येणं हे रोजचंच झालं आहे. अशा स्त्रियांविषयी सहानुभूती म्हणून आणि याविषयीची माहिती जगाला व्हावी म्हणून जगभरातल्या अनेक स्त्रिया आपले फोटो प्रसिद्ध करत होत्या.

गेल्या महिन्यात इजिप्तमध्येही फार विचित्र प्रकार घडला. दोन तरुणींना ‘टिकटॉक’ या समाजमाध्यमावर काही आक्षेपार्ह व्हिडीओ प्रसिद्ध केल्याबद्दल तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली. वरवर पाहिलं तर कुणालाही अतिशय साधा वाटेल असा हा व्हिडीओ आहे; पण कैरोमध्ये त्यांना ‘कौटुंबिक मूल्यांविरोधी’ मतं मांडल्याबद्दल ही शिक्षा झाली आहे. तिथे या २० वर्षांच्या दोन मुलींना शिक्षा झाली; तर टर्कीमध्ये ‘अनैतिक’ समजली जाणारी मतं समाजमाध्यमांवर मांडल्याबद्दल अनेक मुलींना तुरुंगवास भोगावा लागला आहे. टर्की किंवा इजिप्त सोडाच, इथे भारतातही समाजमाध्यमांवर एखाद्या स्त्रीनं विरोधी मत मांडलं, तर तिला खूप खालच्या दर्जाचं ट्रोलिंग, धमक्या या सगळ्याचा सामना करावा लागतो. केवळ तिच्या मताशी सहमत नाही म्हणून नाही, तर तिनं ठामपणे आपलं मत मांडलं म्हणूनही तिला अत्याचार सहन करावा लागतो. स्त्रियांना आपलं मत मुक्तपणे मांडण्याचं स्वातंत्र्य हवं आहे.

आर्थिक स्वातंत्र्याच्या बाबतीतही तेच. कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता स्त्रिया अनेक कामं काम करतात; पण ज्येष्ठांची शुश्रूषा, लहान मुलांचं संगोपन, स्वयंपाक, घरकाम या कामांची गणना एकूण राष्ट्रीय उत्पन्नात (‘जीडीपी’) होत नसल्यानं या कामाला मान नाही. भारतात अशा कामांचं प्रमाण ५२ टक्क्य़ांपेक्षा जास्त आहे. अर्थात स्त्रीला जो मोबदला मिळतो त्यावर तिचा अधिकार कितपत असतो, हादेखील प्रश्न आहे.

नवजात बालिकेपासून ते वृद्धेपर्यंत प्रत्येक वयोगटातली स्त्री ही लैंगिक शोषणाची बळी ठरते आहे. कितीही कायदे आले तरी याचं प्रमाण मात्र कमी होताना दिसत नाही. लैंगिक अत्याचाराच्या भीतीनं आज अनेक सार्वजनिक ठिकाणी जायला स्त्रियांवर बंधनं घातली जातात किंवा अशा गैरप्रकारांच्या भीतीनं जाण्याचं टाळलंही जातं. मुक्त विहरण्याचं स्वातंत्र्य आजही स्त्रियांना नाहीच.

गेली अनेक र्वष युरोपात अनेक ठिकाणी आणि अमेरिकेत गर्भपातविरोधी आंदोलन खूप जोर धरत होतं. मूल ही देवाची देणगी आणि गर्भपात म्हणजे खून, असा प्रचार झाल्यानं अनेक स्त्रियांना कमी वयात किंवा वेगळ्या कारणानं नको असलेलं मातृत्व स्वीकारावं लागतं. यासाठी या आंदोलनाविरोधीचं आंदोलनही उभं राहिलं आहे. या आंदोलनाला अमेरिकेत ‘प्रोचॉइस’ – म्हणजे ‘निवडीच्या स्वातंत्र्याचं आंदोलन’ असं म्हटलं गेलं. स्त्रीच्या शरीरावर केवळ तिचा हक्क आहे, त्यामुळे तिच्यावर मातृत्व लादलं जाऊ नये, आई होण्याच्या किंवा न होण्याच्या निवडीचं स्वातंत्र्य तिच्याकडे असावं, असं त्यांचं म्हणणं. हे निवडीचं स्वातंत्र्य स्त्रियांना हवं आहे.

स्त्रियांना कशापासून स्वातंत्र्य हवं आहे, याची खरं तर माझी यादी वाढतच चालली आहे. यामध्ये मग केवळ स्त्री किंवा पुरुष आहे म्हणून जुन्या रूढी आणि कल्पनांप्रमाणे चालत आलेली कामं करण्यापासून मुक्तता, लग्न करणं- न करणं, एकटं राहणं, याचं स्वातंत्र्य, अशा अनेकानेक गोष्टी.

हे स्वातंत्र्य म्हटलं, की ते कुणापासून? हा प्रश्न साहजिकच समोर येतो. कारण ते स्वातंत्र्य कुणी देणार असेल तर समानतेची भावना जाऊन त्यात परत कुणी तरी कनिष्ठ आणि कुणी तरी वरिष्ठ ही भावना येते. म्हणून अनेक विचारवंतांनी लिहून ठेवलं आहे त्याप्रमाणे, खरं स्वातंत्र्य हे कुणी देत नाही. ते आपल्या मनात असावं लागतं. आपल्या स्वत:बद्दल निर्णय घेण्याचं आणि परिणामांची जबाबदारी घेण्याचं स्वातंत्र्य!

लोणारमधल्या त्या मुलीचं नावही नाही लक्षात माझ्या आज; पण तिच्या यादीमधल्या सगळ्या गोष्टी तिला मिळाव्यात आणि त्या स्वातंत्र्याचं वजनही पेलण्याचं बळ तिला मिळावं, असं मात्र नक्की वाटतंय!