आजमितीला हुमैरा बाचल पाकिस्तानात शिक्षणाच्या पुरस्कर्त्यांपैकी एक सर्वात प्रसिद्ध व्यक्ती आहे. मलालावर झालेल्या गोळीबाराच्या पाश्र्वभूमीवर ती चिंतित आहे का, असं विचारलं गेलं, तेव्हा ती म्हणाली, ‘‘अजिबात नाही. परिस्थिती बदलायचा प्रयत्न करणाऱ्या आणखी बऱ्याच मुली आहेत ‘त्यांनी’ १०० हुमैरांना मारलं, तरी ते आता आम्हाला थांबवू शकत नाहीत.’’ चोरून शिक्षण घेतलेल्या हुमैराने १४ व्या वर्षी पाकिस्तानातल्या मुलांसाठी शाळा उघडण्याचा निर्णय घेतला.
‘ड्रीम मॉडेल स्ट्रीट स्कूल’ उभारणाऱ्या हुमैरा बाचल या युवतीची ही ओळख.
औ षधाच्या बाटलीवरची एक्स्पायरी डेट काकूला वाचता आली नाही, म्हणून हुमैराचा चुलत भाऊ दगावला तर तिच्या शेजारी राहणाऱ्या बाई घरीच प्रसूत झाल्यावर त्वरित डॉक्टरांची मदत घेण्याइतकी जागरूकता तिच्या नातेवाइकांमध्ये नसल्याने त्या बाळंतिणीने प्रचंड वेदनेत कायमचा निरोप घेतला.. यासारखे अनेक विदारक अनुभव आजूबाजूला पाहतच हुमैरा बाचल लहानाची मोठी झाली, पण शिक्षण नसल्याने सामान्य माणसाचे किती नुकसान होते, या जाणिवेने तिच्या मनात घर केले ते कायमचेच!
म्हणूनच अवघ्या १४ व्या वर्षी कराचीच्या आपल्या वस्तीत हुमैराने एक छोटी शाळा सुरू केली आणि आज २६ वर्षांची ही पाकिस्तानी तरुणी १२०० विद्यार्थी आणि २२ शिक्षक असलेली शाळा चालवते आहे. प्राथमिक शिक्षणानंतर पुढे शिकण्यासाठी वडिलांची परवानगी नसल्याने, लपून-छपून कराचीच्या दुसऱ्या भागातल्या माध्यमिक शाळेत तिने पुढचे शिक्षण घेतले. वडिलांचा विरोध असला, तरी हुमैराच्या आईचा मात्र स्वत: शिकलेली नसूनही मुलीच्या शिक्षणाला पाठिंबा होता. तिचं इराणमधलं कुटुंब सुशिक्षित होतं, तिच्या सगळय़ा बहिणींनीही शिक्षण घेतलं होतं. मुलगी काय करतेय, याबद्दल हुमैराच्या वडिलांना कल्पना नव्हती. पण ती दिवसभर कुठे असते, याबद्दल ते हुमैराच्या आईला प्रश्न विचारायचे आणि आई काही तरी उत्तरे देऊन वेळ निभावून न्यायची.
  तिच्या वडिलांचं शिक्षण झालेलं नव्हतं. ते ट्रक चालवायचे. ‘मी नववीच्या परीक्षेला बसणार, त्याच दरम्यान वडिलांसमोर मी शिक्षण घेतेय आणि त्यासाठी आईचा पाठिंबा असल्याचं गुपित उघड झालं. तेव्हा ते रागाने लालबुंद झाले, मागचापुढचा विचार न करता त्यांनी माझ्या आईला मारहाण केली आणि मलादेखील चोपून काढलं.’ हुमैरा सांगते. पण मार खाऊनदेखील तिची आई विचलित झाली नाही. नवऱ्याला शांत करून तिने हुमैराला नववीच्या प्रवेशपरीक्षेला बसवण्याची परवानगी मिळवली. वडीलही अखेर तयार झाले. हुमैराही परीक्षेत चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाली.
नववी पास झाल्यावर तिच्यात सजगता आली. आपल्या आजूबाजूला, मोआच गॉथ या कराचीतल्या भागात, तिला दिसली ती रस्त्यावर खेळणारी मुलं. कोणीही कधी शाळेचे तोंड पाहिलं नव्हतं, कसलाही अभ्यास केला नव्हता. त्या वेळेला १४ वर्षांच्या हुमैराने ठरवलं की हे चुकीचं आहे. शिक्षण ही एक प्राथमिक गरज आहे आणि तो प्रत्येकाचा मूलभूत हक्क आहे. आपल्या देशाच्या प्रगतीच्या दृष्टीने तर शिक्षणाचे महत्त्व फार आहे. म्हणूनच हुमैराने वस्तीतल्या घरोघरी जाऊन मुलांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांना गळ घातली. पण ज्या वस्तीतली हुमैरा ही पहिली पदवीधर मुलगी, तिथे शिक्षणाविषयी अनास्था तीव्र असणार, हे उघडच होते. हुमैरा म्हणते, ‘दारोदार जाऊन मुलींच्या वडिलांना त्यांना शाळेत पाठवायला सांगणं, म्हणजे तुमचं आयुष्य धोक्यात घालण्यासारखं होतं. पण माझा समाज ज्या प्रकारे शिक्षणाकडे पाहतो ते मला बदलायचंय आणि माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी हे मिशन चालू ठेवेन.’ अर्थात हे बोलणे आणि प्रत्यक्षात करणे हुमैरासाठी नक्कीच सोपे नव्हते.
गेल्या ऑक्टोबरमध्ये पाकिस्तानातील मलाला युसुफझाई या मुलीवर तालिबानने केलेल्या गोळीबाराच्या हल्ल्यानंतर तिने मुलींच्या शिक्षणाला असलेला तिचा पाठिंबा उघडपणे बोलून दाखवल्याचं लक्षात आलं. त्याने हुमैरासारख्या अनेकजणींना स्फूर्ती मिळाली. भारताच्या तुलनेत पाकिस्तान मुलींच्या शिक्षणावर निम्म्यानेदेखील पैसे खर्च करत नाही, असं आकडेवारी सांगते. ग्रामीण पाकिस्तानातील मुलींना तर शाळेचं तोंड पाहणंही माहीत नाही. पाकिस्तानातील फक्त ५७ टक्के मुलं प्राथमिक शाळेत नाव दाखल करतात आणि त्यापैकी जेमतेम निम्मी मुलं पाचव्या इयत्तेपर्यंत पोहोचतात. दुर्गम भागातील आकडेवारी तर याहूनही वाईट आहे.
हुमैराला हे सगळं बदलायचं होतं. म्हणून तिने प्रथम एक खाजगी शाळा सुरू केली आणि वडिलांनी त्यांच्या मुला-मुलींना शाळेत पाठवावं, म्हणून ती घरोघरी गेली. तिच्या या अथक प्रयत्नांचा परिपाक म्हणजेच तिची शाळा. हुमैराच्या कामाची माहिती पाकिस्तानात प्रसृत व्हावी, म्हणून चिनॉय डॉक्युमेंटरीजसारख्या संस्थांचाही हातभार लागला. शरमिन ओबैद चिनॉय हे पाकिस्तानचे पहिले ऑस्कर विजेते चित्रपट निर्माते. गेल्या वर्षभरात त्यांनी सहा लघु चित्रपट बनवले आणि प्रत्येक चित्रपटाचा केंद्रबिंदू होते एक असामान्य पाकिस्तानी व्यक्तिमत्त्व. हुमैरा त्यापैकी एक आहे. या मालिकेत मोआच गॉथ या कराचीतल्या भागात बाचल राहते. तेथील मुलांना शिकवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या भगीरथ प्रयत्नांचे हे चित्रण आहे.
या सगळय़ा पाश्र्वभूमीवर पाकिस्तानचे तत्कालीन अध्यक्ष झरदारी यांनी युनेस्कोच्या पॅरिस येथील कार्यक्रमाच्या वेळी, पाकिस्तानी मुलींच्या शिकवण्यासाठी १० मिलिअन यू.एस. डॉलर्स उभे करण्याची शपथ घेतली, पण हे उद्दिष्ट साध्य होईल, असा विश्वास बाळगणाऱ्यांची संख्या अल्प आहे. आजमितीला हुमैरा बाचल पाकिस्तानात शिक्षणाच्या पुरस्कर्त्यांपैकी एक सर्वात प्रसिद्ध व्यक्ती आहे. मलालावर झालेल्या गोळीबाराच्या पाश्र्वभूमीवर ती चिंतित आहे का, असं तिला विचारलं गेलं, तेव्हा ती म्हणाली, ‘‘अजिबात नाही. मी भयभीत नाही. परिस्थिती बदलायचा प्रयत्न करणाऱ्या आणखी बऱ्याच मुली आहेत. ‘त्यांनी’  १०० हुमैरांना मारलं, तरी ते आता आम्हाला थांबवू शकत नाहीत.’’
हुमैराने सुरू केलेल्या शाळेचं नाव आहे, ‘ड्रीम मॉडेल स्ट्रीट स्कूल.’ तिच्यासारखीच विचारसरणी असणाऱ्या इतर काही जणांचीही साथ तिला तिच्या कार्यासाठी मिळावी आणि मुलींना शिक्षण मिळावं, त्यांची प्रगती व्हावी, स्वातंत्र्य मिळावं म्हणून आतापर्यंत दहा वर्षे या कामासाठी त्यांनी वाहून घेतलं. आतापर्यंत हुमैराच्या स्ट्रीट स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केलेल्या मुलींनी कॉलेजात प्रवेश घेऊन पदव्या मिळवल्या, आणि त्या आता शिक्षिका, परिचारिका, कंपनी कर्मचारी म्हणून काम करत आहेत. हुमैराच्या म्हणण्याप्रमाणे ‘इफ यू कॅन ड्रीम इट, यू कॅन डू इट’ या उक्तीवर ठाम विश्वास असेल, तर लोकांचा दृष्टिकोन बदलणं शक्य आहे. तिच्या मते, गरिबी, सांस्कृतिक प्रभाव, राजकीय हितसंबंध ही येथील  मुलांना शिक्षणापासून वंचित राहावं लागण्यामागची काही प्रमुख कारणं आहेत. शिक्षणामुळे मुली त्यांची पारंपरिक मूल्यं हरवून बसतील, प्रेमात पडून लग्न करू लागतील आणि कुटुंबाकडे दुर्लक्ष करतील अशी भीती मुलींना शाळेत न पाठवण्यामागच्या विचारांमध्ये असते.
समिना हक नावाच्या एका गरीब कुटुंबातल्या मुलीने १८ व्या वर्षी घरच्यांच्या दडपणामुळे लग्न केलं. पण एक मूल झाल्यानंतरही तिने आपल्या शिक्षण घेण्याच्या दुर्दम्य इच्छेमुळे आणि ड्रीम मॉडेल टीमचा पाठिंब्यामुळे इंटरमिजिएट कॉलेजपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. आज ती उमर कोट थारपारकर या तिच्या गावात तरुण मुलामुलींना शिकवते आहे. आणि साक्षरतेचं अत्यल्प प्रमाण असलेल्या तिच्या त्या गरीब वस्त्यांच्या गावात शिक्षणाचं महत्त्व समजावून सांगते आहे.
विमेन ऑफ द वर्ल्ड समिट, २०१३ या न्यूयॉर्क येथे भरलेल्या परिषदेत हुमैराला आणि खलिरा ब्रोही या आणखी एका पाकिस्तानी तरुणीला ‘विमेन ऑफ इम्पॅक्ट अवॉर्ड २०१३’ देऊन सन्मानित करण्यात आलं. तिचं धैर्य, तळमळ यामुळे शिक्षणाचं हे अथक कार्य निरलसपणे सुरू आहे. या कामात ती जीव धोक्यात घालून काम करते याकडे प्रसारमाध्यमाचंही लक्ष्य वेधलं. तिच्या मुलाखतीत तिला विचारण्यात आलं, ‘भविष्यातील लक्ष्य काय?’ तर तिचं उत्तर होतं, ‘मला विद्यापीठ स्थापन करायचं आहे.’
रोटरी क्लब ऑफ कराची फायनान्शियल असिस्टन्सच्या मदतीमुळे तिला ड्रीम फाऊंडेशन ट्रस्ट स्थापन करता आला. जगप्रसिद्ध अँकर आणि सामाजिक कार्यकर्ती ऑप्रा विन्फ्रे यांनी हुमैराचं निरलस कार्य जगापुढे आणायला मदत केली. हुमैराचं कार्य पाकिस्तानातच नव्हे, तर इतर देशांतही स्त्री शिक्षणाची तळमळ असणाऱ्यांना निश्चितच प्रेरणादायी आहे.