लग्नानंतर नको असलेल्या सवयी जर जोडीदाराला असतील तर त्या खटकायला लागतात. त्या जाचक वाटायला लागतात. शिवाय पती आणि पत्नीचं लंगिक आयुष्य आपल्या संस्कृतीमध्ये लग्नानंतरच सुरू होत असतं. त्याबाबतीतसुद्धा एकमेकांशी जुळवून घ्यायला लागतं. रात्रीची जागरणं शिवाय दिवसभराचा कामाचा ताण या सगळ्यात दिवस कसा संपतो ते कळतच नाही. कारण लग्नापूर्वी या गोष्टींची सवयच नसते..   
स काळचे नऊ वाजत आले होते. संगीताला ऑफिसला जायला उशीर होत होता. आजही उठायला उशीर झाला होता. संगीताच्या लग्नाला फक्त चार महिने झाले होते. लग्नानंतर ते दोघे जण बेंगळुरूला राहायला आले होते. अजून घरातल्या कामाला बाई मिळाली नव्हती. घरातली सगळी काम करणं तिला अजिबात जमत नव्हतं. रात्रीही झोपायला उशीर होत होता. लग्नापूर्वीच्या दोघांमधल्या सगळ्या गप्पा तिला आठवत होत्या. तिला तेव्हा सुधीर -तिचा नवरा- जाम समजूतदार वाटला होता.
तितक्यात तिचा फोन वाजला. तिची आई होती फोनवर. तिने सगळा राग आईवर काढला.  ‘‘सकाळी सकाळी कशाला फोन केलास? ऑफिसला जायचं आहे मला. उठल्यापासून नुसती जुंपली आहे कामाला. अगं तो नं. टूरला जातानाही ’ंस्र्३स्र् घेऊन जातो.  हे कळलंच नाही आधी. हे जर मला माहीत असतं ना तर लग्न नसतं केलं मी नक्कीच. आणि तो मला काहीच मदत करत नाहीये. अगं असा नव्हता तो लग्नापूर्वी. आम्ही किती तरी वेळ गप्पा मारायचो, पण तो माझं सगळं ऐकत असे. पण आता सगळं काम मला करावं लागतं आणि त्याबद्दल त्याला काही वाटत पण नाही.’’
* * *
 ‘‘ सूनबाई किती वाजता उठल्या? काय सांगतेस? आठ वाजता? पहिल्यापासून आपल्या घरातल्या पद्धती व्यवस्थित समजावून सांग. शामला तुला सांगते हल्लीच्या मुलींचं काही खरं नाही. इतक्या उद्धट आहेत म्हणून सांगू? आणि प्रत्येक गोष्ट रेडीमेड पाहिजे.’’
 ‘‘अगं हो हो, आत्ता तर कुठे जेमतेम दोन-अडीच महिने होतायत लग्नाला. तिला रुळायला वेळ नको का द्यायला? बरं आत्ता सकाळची वेळ आहे नं, जरा कामं आहेत बरीच. ठेवू आत्ता फोन?’’
 ..असं म्हणत शामलानं फोन खाली ठेवला, शामलाच्या मुलाचं नुकतंच लग्न झालं होतं.  नीला तिची सून- या नवीन सुनेशी शामलालासुद्धा जुळवून घ्यायला अवधी हवा होता.  
शामलाच्या घरात सगळेच लवकर उठत असत. पहिल्याच आठवडय़ात शामलाला ते खटकलं होतं.
नीला आणि नंदू -तिचा मुलगा- बरेच उशिरा उठत होते. आणि मग त्यांचं त्यांचं आवरून लगेच दोघंही ऑफिसला  जात होते. पण इतक्यात काहीच बोलायचं नाही असंच ठरवलं होतं शामलाने.
 लग्नापूर्वी कितीही विचार केला, अपेक्षा मांडल्या, कल्पनेने इमले बांधले तरी प्रत्यक्षात डोळ्यासमोर येणारं दृश्य काही वेगळंच असतं. त्या सगळ्याशी जुळवून घ्यायचं असतं. लग्नानंतरच्या पहिल्या वर्षांला म्हणूनच म्हटलं जातं. बाळाचे जसे पहिल्या वर्षी दुधाचे दात येताना त्याला त्रास होत असतो त्याचप्रमाणे लग्नानंतरचं पहिलं वर्ष हे खूपच महत्त्वाचं असतं. कारण कोणत्याच गोष्टीची सवय नसते. घरातल्या  कामाची नसते.
सगळी माणसं परकी असतात. त्यांच्या वागण्याची सवय नसते. वातावरण निराळे असते.  मुलाकडल्या लोकांनासुद्धा घरात नव्याने येणाऱ्या मुलीची सवय नसते. तिच्या सवयी नेमक्या कशा आहेत हे माहीत नसतं.
लग्नापूर्वी कितीही भावी जोडीदार परिचयाचा वाटला तरी जोपर्यंत २४ तास ते एकत्र राहात नाहीत तोपर्यंत एकमेकांचा अंदाज येणे तसे अवघडच. लग्नापूर्वी एका वेळी २-४ तासच फार तर ५-६ तास ते दोघे एकमेकांना भेटलेले असतात. शिवाय मी किती छान, असं दाखवण्याची जणू चढाओढ लागलेली असते. लग्नापूर्वी जणू ते दोघेजण एकमेकांचे मित्र-मत्रीण असतात. त्यामुळे एखादी गोष्ट नाही आवडली तर तिकडे कानाडोळा केला जाऊ शकतो .
पण लग्नानंतर मात्र नको असलेल्या सवयी जर  जोडीदाराला असतील तर त्या खटकायला लागतात. त्या जाचक वाटायला लागतात. शिवाय पती आणि पत्नीचं लंगिक आयुष्य आपल्या संस्कृतीमध्ये लग्नानंतरच सुरू होत असतं. त्याबाबतीतसुद्धा एकमेकांशी जुळवून घ्यायला लागतं. त्याही बाबतीतल्या प्रत्येकाच्या धारणा वेगवेगळ्या असतात. त्याबद्दल आधी बोललं गेलेलं नसेल तर कधी कधी त्रासाचं होऊ शकतं. रात्रीची जागरणं शिवाय दिवसभराचा कामाचा ताण या सगळ्यात दिवस कसा संपतो ते कळतच नाही. कारण लग्नापूर्वी या गोष्टींची सवयच नसते.  
एका भूमिकेमधून दुसऱ्या भूमिकेत जात असताना स्वत:ला आणि घरातल्या इतरांना अवधी देता यायला हवा. आपण दुसऱ्यावर अतिक्रमण करत नाहीये ना याची खूणगाठ मनाशी बांधायला हवी.
आपल्याकडे पहिल्या वर्षी येणारे सगळे सण साजरे करत असताना एकमेकांना भेटवस्तू देण्याची प्रथा आहे. अशा वेळीदेखील त्याबद्दलच्या चर्चा खूप जास्त प्रमाणात घरात होताना दिसतात. त्याचाही नात्यावर परिणाम झाल्याशिवाय राहात नाही. आपल्याकडे मानपानाच्या प्रथा आणि त्यातून होणारे वादविवाद यामुळे कटुता निर्माण झाल्याशिवाय राहात नाही आणि ते प्रसंग अनेकदा उगाळले जातात.
हे सगळं लग्नाच्या पहिल्या वर्षी अगदी साग्रसंगीत घडत असत आणि त्यामुळेच दोन मनं एकत्र येण्याऐवजी सुरुवातीलाच नात्यात अंतर पडू लागतं. या वेळी काळजी घेणं महत्त्वाचं आहे.
 एकत्र कुटुंब असेल तर घरातल्या मोठय़ांनी देखील नवीन दाम्पत्याला एकमेकांबरोबर जुळवून घेताना वेळ द्यायला हवा. त्यांनी मदत मागितली तरच ती द्यायची अशीही भूमिका ठेवता येईल. एकमेकांच्या स्वभावाचा अंदाज आला की गोष्टी सोप्या होत जातील.
त्याचप्रमाणे मनात कल्पना केल्याप्रमाणेच गोष्टी घडतील अशी अपेक्षा ठेवणं धोक्याचं असू शकतं. किंबहुना अशा मनाप्रमाणे गोष्टी घडणार नाहीत याची खूणगाठ बांधायला हवी.
प्राजक्ती म्हणाली, ‘लग्नानंतर पहिले दोन महिने आमची इतकी भांडणं झाली की मला काही कळेचना.     वास्तविक आमचा प्रेमविवाह. चांगले तब्बल चार र्वष ओळखत होतो. पण लग्नानंतर प्रत्येक गोष्टीवरून खटके उडायला लागले. लग्नानंतर आदित्य -माझा नवरा- टिपिकल ‘नवरा’ झाला होता आणि मला ते अजिबात झेपत नव्हतं.’
 याबाबत आदित्यशी बोलल्यावर तो म्हणाला, ‘‘प्रत्येकच  सवयीमध्ये फरक होता. तिला अतिशय व्यवस्थितपणाची सवय आणि मला फारसा फरक पडत नाही. म्हणजे घरी कुणी पाहुणे मंडळी आली आणि सोफ्यावर काही कपडे पडले असतील तर ते जरा बाजूला करून मी त्यांना आरामात बसायला जागा करून देऊ शकतो, पण ते तिला अजिबात चालत नाही. त्यातून तिचे बाबा इंटिरियर डेकोरेटर. त्यामुळे मग आमच्या घरी आम्हाला नाही असं शिकवलेलं अशा बोलण्यानेच सुरुवात व्हायची. मग वादविवाद. त्यातून लग्नानंतर काहीच महिन्यांनी इग्लंडला जायची संधी मिळाली तेव्हा जास्त जाणीव झाली की, आता प्राजक्तीशी जुळवून घ्यायला हवं, कारण तिथे आता माझी बाजू घ्यायला माझी आई असणार नाही..’’
मला हे सगळं ऐकताना मोठी मौज वाटत होती. आज आदित्य प्राजक्तीच्या लग्नाला चांगली १४-१५ वष्रे झाली आहेत आणि छान चाललंय त्यांचं..
एक दिवस माझी मत्रीण नेहा तिची मुलगी रसिका अशीच सहज गप्पा मारायला आली होती. तिच्या लग्नाला सहा महिने झाले होते. सहजच मी रसिकाला विचारलं, ‘रसिका लग्नापूर्वीच्या तुझ्या अपेक्षा आणि आजचं आयुष्य यात काय साम्य आहे? त्या सगळ्या पूर्ण झाल्या आहेत का?’
‘‘छे छे अजिबात नाही. दोन्हीमध्ये काहीही साम्य नाही,’’  असं म्हणून ती हसायला लागली.
मला  गम्मत वाटली, कारण हीच रसिका लग्नापूर्वी आली होती एक दिवस. सगळ्या अपेक्षा तावातावाने मांडत होती आणि आज मात्र त्या पूर्ण न होऊनसुद्धा ती मजेत होती, कारण आहे त्या परिस्थितीशी तिने छान जुळवून घेतलं होतं.
या सगळ्या परिस्थितीत एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे, पती-पत्नी या दोघांचं एकमेकांवर प्रेम असायला हवं आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते योग्य पद्धतीनं व्यक्तही व्हायला हवं. तर मग आहे त्या आयुष्यात स्वर्ग मानणारेही काही कमी नाहीत. खरं आहे ना..?

98 year old man's reunion with younger brother
सुरकुतलेल्या चेहऱ्यावर उमटलं गोंडस हसू! ९८व्या वर्षी धाकट्या भावाला पुन्हा भेटले आजोबा, पाहा सुंदर Photo
Loksatta Chaturang Working women Responsibility of the child job
इतिश्री: चिमूटभर कमी…
Firing incident
मद्यपान सोडा, तोपर्यंत केस कापणार नाही; मुलाच्या हट्टानंतर वडिलांनी स्वतःवर झाडली गोळी
When a leopard came in front of Karkare couple who were giving nature education to students
पाऊलखुणा दिसताच ‘ते’ थांबले; समोर गेल्यानंतर ‘तो’ पुढ्यात उभा ठाकला; निसर्ग शिक्षणाचे धडे देणाऱ्या दाम्पत्याला…