31 October 2020

News Flash

व्वाऽऽ हेल्पलाइन : इतिहासाला जेव्हा जाग येते

सिनेमॅटिक लिबर्टी (म्हणजे जे काही असेल ते) म्हणून कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेच्या ब्यूटिशियनचं एक खास पात्र निर्माण केलं होतं.

| February 15, 2020 01:04 am

(संग्रहित छायाचित्र)

मंगला गोडबोले

mangalagodbole@gmail.com

विद्यार्थी म्हणाला, ‘‘मालिका-चित्रपटासाठी सध्या इतिहास उपयोगी पडतो आहे. इतिहासातल्या एकामागोमाग एक व्यक्तिरेखा चित्रपटाचा विषय होत आहेत, मग ‘कल्याणच्या सुभेदाराची सून’ का नको?’’ ‘‘स्टोरी आहे म्हणायला. पण चिमटीभर गोष्ट रे तिची. धड एक नावसुद्धा दिलेलं नाही त्या गोष्टीत त्या सुनेला. मग तिच्यावर सीरियल.. चित्रपट.. एवढं मोठं होईल?’’ इतिहासाच्या बाईंना प्रश्नच पडला..

कोणे एके काळी ‘उन्नती माध्यमिक विद्यालया’मध्ये इतिहासाच्या शिक्षिका असणाऱ्या कुलकर्णीबाई खरं तर आता वयोमानाने स्वत:च इतिहासजमा झालेल्या होत्या. तरीही त्यांचा एक माजी विद्यार्थी गेले काही दिवस पुन्हा पुन्हा फोन करून त्यांची भेट, हेल्प, गायडन्स वगैरे मागायला लागला तेव्हा त्या बुचकळ्यात पडल्या. शेवटी एकदा तो दोघातिघा सहकाऱ्यांना घेऊन त्यांच्या घरी येऊन धडकला आणि उलगडा झाला. ‘‘इतिहास म्हटला की तुमची याद येते बाई आणि आता तर आपण इतिहासात डायरेक्ट उतरायचंच ठरवलंय.’’

‘‘म्हणजे?’’

‘‘व्हिज्युअलमध्ये काम करतो ना आपण! मालिका-चित्रपट.. मग म्हटलं तुमच्या नॉलेजचा सपोर्ट घ्यायचाच एकदा.’’

‘‘ते बघू पुढं, पण विषय काय घेतोहेस?’’

‘‘कल्याणच्या सुभेदाराची सून.. भारी आहे ना स्टोरी?’’

‘‘स्टोरी आहे म्हणायला. पण चिमटीभर गोष्ट रे तिची. धड एक नावसुद्धा दिलेलं नाही त्या गोष्टीत त्या सुनेला. मग तिच्यावर सीरियल.. चित्रपट.. एवढं मोठं होईल?’’

‘‘आता स्टोरी वनलाइनच असते ना बाई.. पण आपली हिस्ट्री केवढी व्हास्ट..’’

‘‘म्हणूनच म्हटलं, एवढय़ा व्हास्ट हिस्ट्रीमधली एखादी दणकट, बुलंद कॅरॅक्टर घ्यायचं ना!’’

‘‘घेतली असती हो..’’ पण सगळ्या कॅरॅक्टर्स एक्झॉस्ट झाल्या ना.. एकेक करून..’’

‘‘काय सांगतोस? सगळ्या व्यक्तिरेखा संपल्या?’’

‘‘मग बघा ना तुम्हीच.. साध्या बाजी, मुरारबाजीपासून, संताजी, धनाजी, बहिर्जी.. आजी माजी.. आपले सगळेच जी संपले नाजी. वर्ष झालं.. आपली रिसर्च टीम भिंग लावून बसलीये.. मदारी महेतरसुद्धा वापरला. वाघ्यासुद्धा बुक झाला.’’

‘‘वाघ्या.. म्हणजे तो महाराजांचा चितेवर उडी घेणारा इमानी कुत्रा?’’

‘‘ग्येला की तो,’’ स्वत:चाच कुत्रा गेल्यासारखा शोकविव्हळ होत विद्यार्थी म्हणाला. बाईंनी चुचकारलं, ‘‘डायरेक्ट चितेवर उडी ना? जाणारच की कोणी.’’

‘‘ग्येला म्हणजे तसा नाही गेला. सब्जेक्ट गेला ना याचा. अशी एकदा सटासटा इतिहासातली कॅरॅक्टर्स संपवल्यावर प्राणी, पक्षी धुंडणं आलंच. बघतो तर काय, आपला चेतक घोडासुद्धा पाइपलाइनमध्ये अडकलाय की हो!’’

‘‘परमेश्वरा! एवढा आपला घोडा.. पाइपलाइनमध्ये? गुदमरून जाईल की रे एखाद्या दिवशी.’’

‘‘बघा ना. शेवटी एकटी कल्याणच्या सुभेदाराची सून भेटली. टायटल रजिस्टर पण केलं झूममध्ये! महासती.. सून ती.’’

‘‘अच्छा, म्हणजे कल्याणला माघारी गेल्यावर ती सती गेली का?’’

‘‘ते करू आपण मॅनेज. सती वगैरे शब्द कसे पॉवरफुल पडतात. ‘एम.एस.एस.टी.’ हा शॉर्टफॉर्म पण छान पडतो ना. ‘महासती सून ती’ यम. यस. यस. टी.!’’

‘‘बघ बाबा, मुळात हा खरा इतिहास आहे की दंतकथा हेपण माहीत नाही.’’

‘‘इतिहास मॅनेज करता येतो हो बाई सिनेमात, व्ही.एफ.एक्स. वापरणारे आपण. थ्रीडी पण ठेवूच.. हा प्रोजेक्ट कसा हटके झाला पाहिजे.’’

‘‘प्रश्नच नाही. पेपरला वाचतो की आम्ही वर्षांला कुठे सव्वाशे, दीडशे मराठी सिनेमे येतात ते सगळे हटकेच असतात.’’

‘‘अरबी घोडे मागवणार बरं का आपण.’’ विद्यार्थी स्वत:चं देशी घोडं दामटत म्हणाला, ‘‘पिक्चरमध्ये अ‍ॅनिमल्स वापरायची फुल्ल परमिशन घेणार बरं का.’’

‘‘इतिहास वापरायची परमिशन लागते का रे आपल्यात?’’

‘‘बास्का का बाई.. आता तो आपलाच भव्यदिव्य.. व्हास्ट.. उदात्त का काय तो ठेवा नाही का?’’

‘‘म्हणूनच म्हटलं, त्याची थोडी बूज ठेवा.’’

‘‘सगळ्यांना करेक्ट बसवतो बघा इतिहासात! तुमचं पण टायटलमध्ये क्रेडिट, मानधन वगैरे करू बरं का.. निघू मग?’’

‘‘का रे एवढी घाई?’’

‘‘जयंतीला रिलीज डेट गाठायचीय ना..’’

‘‘कोणाच्या जयंतीला?’’

‘‘एवढी व्हास्ट आहे आपली हिस्ट्री.. साताठ महिन्यांनंतर कोणाची ना कोणाची जयंती भेटेलच ना.. पहिली जयंती पकडणार आपण.. आजच्या तारखेला मराठी एन्टरटेमेंट इंडस्ट्रीला आताच्या प्रेझेंटमध्ये हिस्ट्रीशिवाय फ्युचर नाही ना राहिला.. नाविलाज आहे, मी आहे ना सगळं मॅनेज करायला, तुम्ही फक्त सौंस्कृत श्लोकबिक लागले तर द्या काढून.’’

‘‘सुभेदार मुल्ला अहमदची सून संस्कृतचे श्लोक म्हणणारे?’’

‘‘बास्का बाई?’’ बॅक्ग्राउंडला सौंस्कृत बरं जातं श्लोकाबिकाचं. डायरेक्ट पिक्चरचं वजन वाढतं. बाकी ढाली तलवारी.. शालू.. शेले.. टिळे लावायला लाल माती.. फोडायला हिरवे चुडे वगैरे

सौंस्कृ तीत आपण कसूर ठेवणार नाही.. तुम्ही फक्त सुनेला मॅनेज करा!’’

या ठिकाणी तेवढय़ा कुलकर्णी बाई डगमगल्या. कोणत्याही काळातल्या कोणाच्याही सुनेला ‘मॅनेज’ करण्याची कल्पना त्यांना भेदरवून गेली. ती गॅप बघून आणि ती ‘महासती सून’ बाईंच्या गळ्यात पक्की अडकवून विद्यार्थी सटकला. वास्तवात त्याच्या रिसर्च टीमला फारसं काही हेल्प, गाइड वगैरे करण्याची वेळ बाईंवर आली नाही. कोणी फारसं काही विचारलंच नाही. सौंस्कृत किंवा सौंस्कृतीबद्दल डाऊटबिऊट खायची वेळ आली तर थोडंफार विचारत, की बुवा, आबाजी सोनदेवने ‘‘तुम हमको सोनं देव,’’ असं मागणं सुभेदाराकडे केल्याने त्याचं नाव सोनदेव पडलं होतं का? किंवा ‘मातृवत – परदारांश्चय परद्रव्याणी लोष्ठवत..’ हा श्लोक सराऊंड साऊंडमध्ये वाजताना लाकडी दारांचे क्लोजअप पुरतील की दिंडी दरवाजे लागतील?

बाईंकडून एवढा माफक गायडन्स घेईपर्यंत पिच्चरचा शानदार मुहूर्त पेपरांमध्ये झळकलासुद्धा. मुहूर्ताची आयडिया ‘हटके’ होती. सुभेदार आडनावाच्या पाच सुनांच्या ओटीभरण सोहळ्याने मुहूर्त संपन्न झाला. त्यापैकी चार सुना नथ्स आणि बुगडीज् घालून प्रत्यक्ष हजर होत्या. पाचवीला अचानक सिंगापूरला जावं लागल्याने स्काईपवर तिची ओटी भरून कोटा पुरा केला गेला.

इथपासून ‘एम.एस.एस.टी.’चा प्रोग्रेस रिपोर्ट दररोज नाना माध्यमांतून ठिबकू लागला. रस्ता तिथे एसटी धावते, तशी माध्यमं तिथे ‘एम.एस.एस.टी.’ धावू लागली. बातम्या, मुलाखती, क्षणचित्रे, सेटवरच्या गप्पा असा चराचरातून मारा सुरू झाला. कल्याणची लूट आणि सातव्या शतकातली ऑथेंटिक ज्वेलरी देणारे सराफ, फेटे बांधून देणारे आणि नाडीच्या नऊवाऱ्या बनवून देणारे कारागीर, शिवशाहीतला खासा मेन्यू बनवून देणारे हॉस्पिटॅलिटी पार्टनर, तलवारबाजीचा फील अचूक देणारे कोरिओग्राफर, त्यांच्यापासून ते थेट आबाजी सोनदेव- मुल्ला अहमद- आणि त्याची सून या तिघांचे किरदार निभावणारे कलाकार असे सगळे सारखे लोकांसमोर यायला लागले. या चित्रपटासाठी आपण किती प्रचंड मेहनत घेतलीये ते कंठशोष करून सांगायला लागले. केवळ याच एका ऐतिहासिक चित्रपटाला लाभलेले रुबाबदार घोडे आणि वजनदार हत्ती अनेक फोटोंमध्ये झळकले. (या चित्रपटासाठी आपण केवढी मेहनत घेतलीये हे त्यांनी सांगितलं नाही. कारण त्यांच्या तोंडासमोर स्पीकर धरले नव्हते.)

सिनेमॅटिक लिबर्टी (म्हणजे जे काही असेल ते) म्हणून कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेच्या ब्यूटिशियनचं एक खास पात्र निर्माण केलं होतं. त्याचा तर खूपच बोलबोला झाला. नाही म्हटलं तरी सुभेदाराला त्या काळानुसार आठदहा सुना तरी असणार. त्यांच्यात ही एक एवढी सुंदर का दिसली याचं जस्टीफिकेशन करायला या ब्यूटिशियनचा फार उपयोग झाला. शिवाय यानिमित्ताने त्या काळात फेशिअल कसं करत, आयब्रोज कशा खुडत यावरही प्रकाश पडला.

चित्रपटाच्या प्रीमियरला कुलकर्णीबाई काही जाऊ शकल्या नाहीत. पण चित्रपटाचं एक जंगी प्रतीकचिन्ह आणि वाटय़ांच्या ठिकाणी जिरेटोपाची प्रतिमा लटकवलेलं एक मंगळसूत्र त्यांना भेट म्हणून दुसऱ्या दिवशी मिळालं. तरुणपणीच पतीला गमावल्यामुळे त्यांना शिक्षिका व्हावं लागलं होतं खरं तर! पण ती व्यक्तिगत बाब झाली. पुढल्या पंधरवडय़ातच रस्त्यातल्या एक सोडून एका बाईच्या गळ्यात तसली जिरेटोपवाली मंगळसूत्रं दिसायला लागली. चित्रपटाच्या कलेक्शनचे उलटसुलट आकडे छापून यायला लागले. नाही म्हणायला एखादा विरोधाचा सूर उमटला तो ‘अखिल भारतीय मातृभाव संघटने’कडून. थेट महाराजांनीच आईवर्गाच्या सुंदरतेवर शंका घेणं त्यांना अब्रूनुकसानीकारक वाटलं. या बाबतीतल्या मातांच्या दु:खांना वाचा फोडणाऱ्या परिसंवादात बोलण्यासाठी कुलकर्णीबाईंना आमंत्रण आलं तेव्हा मात्र त्या वैतागल्या. काय चाललंय काय आपलं? दोन मिनिटांच्या सीनबद्दलच्या दोन तासांच्या सिनेमावर दोन-चार वर्षे चर्चा करत राहणार का आपण? उजाडल्यापासून सून सून काय? सारखं चारशे-सहाशे वर्षे मागे कसलं जाताय? मग काळाबरोबर कधी राहणार?

त्यांना एकदम वत्सला वहिनींचा आधुनिक अ‍ॅडव्हाइस ऊर्फ ‘व्वा’ या हेल्पलाइनची आठवण झाली. तिथे म्हणे कोणतेही प्रश्न ऐकून घेतात. विचारावा का? विचारूनच टाकू?

‘‘हॅलो, व्वा! हेल्पलाइनवर आपलं स्वागत आहे मॅम, बोला आम्ही आपली काय सेवा करू शकतो?’’

‘‘थोडे दिवस इतिहासाच्या काचातून सुटका देता आली तर बघा.’’

‘‘का हो? जड जातोय का हा सब्जेक्ट? डोक्यात शिरत नाही?’’

‘‘जन्मभर पोरांच्या डोक्यात इतिहास शिरवायची नोकरी केलीये हो मी! त्यात काय विचारता? इतिहास वर्तमानात फार शिरतोय त्याचा त्रास होतोय मला.’’

‘‘इतिहासापासून सुटका? काही तरी बोलू नका. मोर्चाबिर्चा यायचा घरावर, इतिहास आफ्टर ऑल इज प्रेरक, भव्य, दिव्य अँड..’’

‘‘व्हास्ट! बाईंनी विद्यार्थ्यांचा लाडका शब्द लगेच पुरवला.’’

‘‘हो..व्हास्ट असतो, म्हणून तर तो प्रेझेन्ट करणं मस्ट असतं!’’

‘‘अहो, पण रोजचं जगणं फार्स्ट असतं की नाही? आजचे घराघरातल्या लेकीसुनांचे प्रश्न बघायचे की कल्याणच्या सुनेचे? सारखी छाती अभिमानाने भरायची की समस्यांना निधडय़ा छातीने तोंड द्यायचं?’’

‘‘च्.. तुम्ही उगाच फार विचार करता बाई..’’

‘‘उगाच? इतिहासाला जेव्हा एवढी जाग आणली जाते तेव्हा विचार करणं अलाऊड नसतं का? सारखं सारखं लाऊडच करायचं?’’

‘‘रिअ‍ॅलिटी चेक इज डिप्रेसिंग मॅडम. इतिहास कसा मस्त टाइमपास देतो. एन्जॉय करायचा आपण. ते पाहिलेत की नाही?’’

‘‘कोण ते?’’

‘‘एम.एस.एस.टी.मधले घोडे हो, कसले पॉश आहेत. त्यामानाने त्या हत्तींचं मसलटोनिंग जरा कमी पडलं, नाही?’’

यावर क्षणभर काही बोलण्याची बाईंची शक्तीच अचानक कमी पडली. काय बोलायचं? त्यांच्या शांततेवर समोरून हल्ला झाला ‘‘सरेंडर टू इट मॅम. यू विल बी हॅप्पी. इतिहासाच्या टीचर आहात ना?’’

‘‘होते..’’

‘‘गुड.. आता बरं का एक डेली सोप येतोय वाटतं. ‘एम.एस.एस.टी.’च्या ब्यूटिशियनच्या लाइफवर. कालच पेपरला आलंय.’’

‘‘काय.. काल्पनिक सुनेच्या काल्पनिक ब्यूटिशियनवर सीरियल?’’

‘‘येऊ पण शकेल ना! त्यांना पण हिस्ट्री लागेल, रिसर्च लागेल, तुम्ही का जॉइन होत नाही त्यांच्या रिसर्च टीमला? माझा स्ट्राँग अ‍ॅडव्हाइस आहे.. नुसते विचार करू नका.. काही तरी कन्स्ट्रक्टिव्ह करा..’’

‘व्वा’वाल्यांची मोफतची ३ मिनिटं संपली. इतिहासाच्या कुलकर्णी बाईंनी त्या काल्पनिक बाईचा इतिहास मनातल्या मनात कन्स्ट्रक्ट करायला, रचायला घेतला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 15, 2020 1:04 am

Web Title: history awakens vvaa helpline mangala godbole abn 97
Next Stories
1 यत्र तत्र सर्वत्र : राजकारणातील स्त्री
2 गद्धेपंचविशी : ‘दगडावरच्या पेरणी’तून अंकुरले बीज
3 गर्भपात कालमर्यादा कायद्याविरुद्धच्या लढय़ाचं एक तप!
Just Now!
X