04 March 2021

News Flash

अपयशाला भिडताना : घरचा अभ्यास

बाईंचं शिकवणंही गणितासारखं नेमकं होतं. प्रत्येक इयत्तेसाठी ठरावीक तीन ते चार भलीमोठी पुस्तकं त्या वर्षांनुवर्ष वापरायच्या.

(संग्रहित छायाचित्र)

योगेश शेजवलकर

yogeshshejwalkar@gmail.com

‘‘मुलांचे पहिल्या चाचणी परीक्षेचे पेपर तपासताना माझ्या लक्षात आलं. वर्गातली मुलं लक्ष देऊन शिकायची, घरचा अभ्यासही करायची. पण त्यांनी लिहिलेल्या उत्तरपत्रिका तसं सांगत नव्हत्या. मी शिकवायला लागल्यानंतर पहिल्यांदाच माझ्या विषयात ढिगाने मुलं नापास झाली होती. त्या दिवशी रात्रभर मी झोपू शकले नाही. कारण त्यांना विषय समजत नसेल त्यासाठी सर्वस्वी मीच जबाबदार होते.’’ हे स्वीकारत, आपल्या वर्गातल्या मुलांच्या या अपयशाला भिडत बाईंनी मार्ग शोधून काढलाच..

‘एका कॅपेचिनोवर फेसाच्या रूपात असलेलं द्रव्य एकूण कॉफीच्या सात टक्के असेल आणि फेस सोडून असलेली कॉफी दोनशे ऐंशी मिलीलिटर असेल तर फेस आणि कॉफी मिळून एकूण किती मिलीलिटर?’

‘एका मोबाइल फोनचं स्टोरेज बत्तीस जीबी आहे तर सेकंदाला साठ एमबीपीएसच्या वेगानं ते स्टोरेज किती मिनिटांत पूर्णपणे भरेल?’

‘मुंबईहून एक ऑडी ताशी ऐंशी किलोमीटर वेगाने निघाली आणि त्याच वेळी पुण्याहून एक ड्रोन ताशी पंचवीस किलोमीटर वेगाने निघालं. मुंबई-पुणे हे अंतर एकशे सत्तर किलोमीटर असेल तर पुण्यापासून किती अंतरावर ऑडी आणि ड्रोन एकमेकांना क्रॉस करतील?’

अशी एकापेक्षा एक अवली गणितं वर्गाबाहेर उभं राहून मी थक्क होऊन ऐकत होतो. त्या दिवशी अनेक वर्षांनी शाळेत बाईंना भेटायला गेल्यावर हे जे काही कानावर पडत होतं ते अपेक्षेपलीकडचं होतं. पन्नाशीच्या उत्तरार्धात असलेल्या बाई आपल्या नेहमीच्याच उत्साहात गणितं सांगत होत्या, तर त्यांच्यासमोरचे विद्यार्थी ड्रोन, ऑडी, मोबाइल, कॅपेचिनो हे शब्द ऐकून आनंदानं गणितं लिहून घेत होते. घरचा अभ्यास लिहून घेतानाचा असा उत्साह मी आयुष्यात कधी पाहिला नव्हता. मी शाळेत असताना कमालीच्या वैतागानं गणिताचा घरचा अभ्यास उतरवून घ्यायचो. तो उतरवताना अक्षर तर इतकं वाईट यायचं की मग उगाचच मला ‘एक दिवस आपणही डॉक्टर होऊ’ असं वाटून जायचं. अर्थात परीक्षेचा निकाल लागला की मग मी गपगुमान इतर क्षेत्रांचा शोध घ्यायला सुरुवात करायचो, ही गोष्ट अलाहिदा. तेवढय़ात तास संपल्याची घंटा झाली आणि माझी तंद्री मोडली.

बाईंचं शिकवणंही गणितासारखं नेमकं होतं. प्रत्येक इयत्तेसाठी ठरावीक तीन ते चार भलीमोठी पुस्तकं त्या वर्षांनुवर्ष वापरायच्या. त्याची कारणंही तशीच होती. कोणत्या वेळी कोणतं गणित शिकवायचं? याचं त्यांचं सूत्र पक्कं होतं. त्यांच्या हाताखालून गेलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी शाळेत असताना आणि शाळेबाहेर पडल्यावर नेत्रदीपक यश मिळवून त्यावर शिक्कामोर्तबही केलं होतं. ‘गणित हे गणित असतं’ असं म्हणत गणिताच्या भाषेला कल्पनाविस्ताराची जोड देणं किंवा अलंकारिक भाषा वापरणं हे बाईंच्या स्वभावात नव्हतं. पण पाठय़पुस्तकात नसलेली अनेक गणितं त्या आमच्याकडून सोडवून घ्यायच्या. आमच्या शाळेत, हायस्कूलमध्ये गेल्यावर पाचवी ते दहावी एकच वर्गशिक्षिका असायच्या. बाई माझ्या वर्गशिक्षिका असल्यामुळे त्यांची शिकवण्याची पद्धत मला चांगली माहिती होती.. ती पद्धत इतकी कशी बदलली? हा विचार करतच मी त्यांच्याबरोबर शाळेच्या स्टाफरूममध्ये आलो.

गणित सुटत नसलं की माझ्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह कसं उभं राहतं? आणि क्षणाक्षणाला ते कसं वाढतं जातं? हे बाईंइतकं चांगलं दुसऱ्या कोणालाही माहिती नव्हतं. तेव्हा थेट मुद्दय़ाला हात घालत त्यांनी विचारलं, ‘‘मग ऑडी आणि ड्रोन एकमेकांना कधी क्रॉस करतील?’’ त्यावर मी शांतपणे म्हणालो, ‘‘बाई, पेपरात त्या पद्धतीचं गणितं आल्यावर मी पहिल्यांदा जे लिहिलं होतं. तेच आजही माझं उत्तर आहे.. की आजकाल कोण कसा वागेल? याचा भरवसा नाही. जेव्हा त्यांना वाटलं तर ते एकमेकांना क्रॉस करतील किंवा समोरासमोर आल्यावर नाक मुरडून आपली दिशाही बदलतील.’’ माझ्या त्या उत्तरावर बाई मोकळेपणाने हसल्या.

‘‘पण तुमच्या गणितात हे दोघं कुठून आले? आमच्या वेळी तर दोन रेल्वे होत्या. एक मुंबईहून निघायची.. तर दुसरी पुण्याहून.’’ माझ्या मनातला प्रश्न विचारला. त्यावर हसून बाई म्हणाल्या, ‘‘अनेक वर्ष वापरलेला ट्रॅक जेव्हा सोडण्याची वेळ आली तेव्हा रेल्वेच्या मर्यादा माझ्या लक्षात आल्या,’’ असं म्हणत बाईंनी क्षणभर विचार केला आणि बोलायला सुरुवात केली, ‘‘मी माझ्या बाविसाव्या वर्षी या शाळेत शिकवायला लागले. माझ्या नशिबानं दुसऱ्याच वर्षी मला पाचवीचा वर्ग आणि त्यातही ‘अ’ तुकडी मिळाली. जेव्हा माझ्या त्या मुलांनी दहावीला खणखणीत रिझल्ट लावला, तेव्हापासून मी आणि ‘अ’ तुकडी हे पक्कं समीकरण तयार झालं. त्याच दरम्यान माझं वैयक्तिक आयुष्यही पुढं जात होतं. लग्न झालं.. मग दोन वेळा मॅटर्निटी लिव्ह.. असं काही न काही. पण तरी या समीकरणात काहीच फरक पडला नाही. पाचवी ते दहावीपर्यंत ‘अ’ तुकडीची मी वर्गशिक्षिका.. असं एकूण तीन वेळा झालं. तू होतास ते दुसऱ्या वेळेस. ते तसंच सुरूही राहिलं असतं. पण मी वर्गशिक्षिका असलेली तिसरी बॅच दहावी झाल्यावर मुख्याध्यापकांनी मला बोलावलं आणि सहावीची एक वर्गशिक्षिका काही कारणाने नोकरी सोडत असल्यानं तिच्या वर्गाची वर्गशिक्षिका होण्याची मला विनंती केली.’’

‘‘म्हणजे ‘अ’ तुकडी गेली?’’ मी उत्सुकतेनं बाईंना विचारलं. कारण ‘अ’ तुकडीची वर्गशिक्षिका नसण्याचं दु:ख काही काही शिक्षकांसाठी फार मोठं असतं हे मला माहिती होतं. माझ्या प्रश्नाचा रोख बाईंना समजला आणि त्या म्हणाल्या, ‘‘हो.. पाचवीची ‘अ’ तुकडी नाही, याचं जरा मला वाईट वाटलं. पण मग मी विचार केला. हरकत नाही, तसंही शाळेत सिद्ध करण्यासारखं आता आपल्याकडे वेगळं काही राहिलेलं नाही. शिवाय स्कॉलरशिप, टॅलेंट सर्चच्या परीक्षांना बसणाऱ्या मुलांना मीच शिकवणार होते.. माझा ‘इगो’ त्याने सुखावणार होता. शेवटी काहीही झालं तरी ‘गणित हे गणित असतं, तुकडी बदलली म्हणून ते बदलत नाही आणि माझं शिकवणंही बदलत नाही,’ असं स्वत:ला समजावत नवीन वर्ष सुरू झालं.’’

‘‘खरं आहे, गणित हे गणित असतं, तुकडी बदलली म्हणून ते बदलत नाही,’’ मी बाईंना त्यांचंच वाक्य पुन्हा ऐकवलं. त्यावर बाई म्हणाल्या, ‘‘मी जो विचार केला त्यातलं फक्त तू जे म्हणालास तितकंच बरोबर होतं ते पहिल्या चाचणी परीक्षेचे पेपर तपासताना माझ्या लक्षात आलं. वर्गातली मुलं चांगली होती. लक्ष देऊन शिकायची.. घरचा अभ्यासही करायची. पण त्यांनी लिहिलेल्या उत्तरपत्रिका तसं सांगत नव्हत्या. त्यात त्यांच्या उत्तरांपेक्षा माझ्यासाठीच प्रश्न जास्त होते. असे प्रश्न जे कधी आपल्याला सोडवावे लागतील असं मला वाटलंही नव्हतं. मी शिकवायला लागल्यानंतर पहिल्यांदाच माझ्या विषयात ढिगाने मुलं नापास झाली. आता आपण इतकं बोलतोच आहोत म्हणून आणखी एक सांगते. नापास होण्याचे पण दोन प्रकार असतात. एक म्हणजे विषय समजला पण गणितं सोडवताना गफलत झाली म्हणून मार्क मिळाले नाहीत आणि दुसरा म्हणजे विषयच समजला नाही त्यामुळे पेपरात काही लिहिताच आलं नाही. त्यांचे पेपर पाहताक्षणी माझ्या लक्षात आलं की, मुलांना विषय समजला नव्हता. त्या दिवशी रात्रभर मी झोपू शकले नाही. कारण त्यांना विषय समजत नसेल त्यासाठी सर्वस्वी मीच जबाबदार होते.’’

हे ऐकून त्यावर काय बोलावं हे मला समजेना. बाईंनी शिकवल्यावरही कोणाला विषय समजत नाही हे पचनी पडणारं नव्हतं. बाई म्हणाल्या, ‘‘त्या एका निकालानं माझ्या वीस वर्षांच्या ट्रॅक रेकॉर्डवर एक प्रश्न उभा केला. तो प्रश्न अतिशय सोपा होता की आजपर्यंत माझ्या वर्गातल्या मुलांना त्यांच्या अंगभूत हुशारीमुळे विषय समजला की माझ्या शिकवण्यामुळे? या प्रश्नामुळे मी कमालीची अस्वस्थ झाले. मुलांना फक्त पास होण्यापुरते मार्क मिळवता आले म्हणजे प्रश्न सुटणार नव्हता.. त्यांना विषय समजणंही तितकंच गरजेचं होतं. कोणत्याही विषयातली गती कधीही फक्त मार्कावरून मोजू नये हे माझं मत पाहिल्यापासून आहे. तुला तर माहितीच आहे.’’

त्यावर मी होकारार्थी मान हलवली. मी सहावीच्या वार्षिक परीक्षेत गणिताच्या पेपरात घोळ घालून इतके कमी मार्क मिळवले होते की शाळेने सातवीत स्कॉलरशिपच्या बॅचमध्ये मला प्रवेश नाकारला होता. तेव्हा मी केलेल्या चुका या फक्त ‘सिली मिस्टेक्स’ आहेत हे सिद्ध करण्यासाठी बाई माझा वार्षिक परीक्षेचा पेपर घेऊन मुख्याध्यापकांकडे गेल्या होत्या आणि मग मला प्रवेश मिळाला होता.

‘‘त्या निकालाची संपूर्ण शाळेत खमंग चर्चा झाली. माझ्याबरोबरच्या इतर शिक्षकांनी त्याचा भरपूर कीस पाडला. त्या एका अपयशामुळे माझ्यासाठी शाळेत सहज असलेल्या अनेक गोष्टी उगाच अवघड झाल्या. इतक्या की स्कॉलरशिपच्या क्लासमुळे माझं माझ्या वर्गाकडे दुर्लक्ष तर होत नाही ना? की ‘अ’ तुकडी नसल्याने माझा शिकवण्याचा उत्साह कमी झाला आहे? असं मुख्याध्यापकांनी मला बोलावून थेट विचारलं. अर्थात मीही मागे हटणार नव्हते. मी दुप्पट जोमानं कामाला लागले. जास्तीत जास्त गणितं सोडवण्यावर भर दिला. घरचा अभ्यास वाढवला. मुलांच्या पालकांना भेटले.. त्यांना मुलांवर लक्ष ठेवायला सांगितलं. धडा शिकवून झाला की दोन-तीन दिवसांनी सरप्राइज टेस्ट घेतल्या. अशी सगळ्या बाजूंनी भक्कम मोच्रेबांधणी करून मुलांना सहामाही परीक्षेसाठी तयार केलं. आजवर कोणी कधीही वाट बघितली नसेल इतकी वाट मी मुलांच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी बघितली. शेवटी एक दिवस माझ्या टेबलावर तो उत्तरपत्रिकांचा गठ्ठा आला. मी अधाश्यासारख्या त्या गठ्ठय़ाच्या दोऱ्या तोडून उत्तरपत्रिका खेचून बाहेर काढल्या.’’ बाई सांगत होत्या.

‘‘मग?’’ आता माझीही उत्सुकता शिगेला पोहोचली होती. त्यावर बाई शांतपणे म्हणाल्या, ‘‘मुलं फक्त काठावर पास झाली होती. पण तीही गणितांचा सराव केल्यामुळे. विषय समजण्याच्या बाबतीत आनंदच होता. मात्र त्या सगळ्यात एक पेपर असा होता, ज्यात त्या मुलाच्या मार्कात कमालीची वाढ झाली होती. गोंधळ उडून हमखास चुकतील अशी गणितंही त्यानं नीट समजून सोडवलेली होती.  ‘हे कसं झालं?’ मला समजेना. शेवटी मी त्याला बोलतं केलं. त्याने जे सांगितलं ते फारच मजेशीर होतं. तो म्हणाला, ‘‘तुम्ही परीक्षेच्या वेळी सरावासाठी ज्या पुस्तकातली गणितं दिली होतीत त्यातली बरीचशी गणितं सायकलबद्दल होती. आमचं घरंच सायकलचं दुकान असल्यामुळे मला सगळं नीट समजलं आणि लक्षातही राहिलं. पण पुढच्या परीक्षेत, नवीन धडय़ांची गणितं सायकलबद्दल नसतील तर मात्र माझं अवघड आहे.’’

‘‘इंटरेस्टिंग’’ मी त्या मुलाने सांगितलेल्या मुद्दय़ाचा विचार करत म्हणालो. तेव्हा बाई म्हणाल्या, ‘‘त्याचं ते बोलणं हे माझ्या बहुतेक प्रश्नांचं उत्तर होतं. शेवटी गणित हे गणित असतं आणि उदाहरणं हे ते शिकण्याचं माध्यम. तेव्हा वर्षांनुवर्ष ठरावीकच प्रकारची- भाषेची उदाहरणं देण्याचा अट्टहास शिक्षकांनी तरी का धरावा? माझ्यासमोर जी मुलं आहेत, त्यांना समजेल अशा भाषेतली उदाहरणं मी जर सांगायला सुरुवात केली तर त्यांना गणित जास्त चांगलं समजण्याची शक्यता होती. अर्थात ते जितकं वाटलं होतं तितकं सोपं नव्हतं. त्यासाठी मला त्यांची भाषा शिकावी लागणार होती.. त्यांना भावणाऱ्या गोष्टींचा अभ्यास करावा लागणार होता.. प्रसंगी मुलं कोणत्या पाश्र्वभूमीतून आली आहेत, याचाही विचार करावा लागणार होता. मी त्यांच्या वयाची होऊ शकणार नाही हे मला माहिती होतं, पण किमान त्यांच्यामधली एक होऊन त्यांना शिकवायचा प्रयत्न नक्कीच करू शकणार होते. मग नव्या पिढीबद्दल जे समजत गेलं त्याची खातरजमा घरी दोन्ही मुलांबरोबर करणं हा माझा घरचा अभ्यास झाला. त्यांच्या दृष्टीनं त्यांची आई मॉडर्न होत होती.. त्यांच्या विषयात रस दाखवत होती.. त्यामुळे त्यांनीही भरपूर मदत केली. अनेक वर्षांनी मी विद्यार्थ्यांच्या भूमिकेत गेले आणि मग एकापाठोपाठ एक प्रश्न सुटायला सुरुवात झाली. आज मागे वळून बघताना मला हे मान्य करावंच लागेल की ‘अ’ तुकडीतून बाहेर पडल्यानेच मला माझ्यातल्या शिक्षकाला नव्यानं शोधण्याची संधी मिळाली. शिकवण्याची नेहमीची माझी पद्धत फसल्याने मला नवीन पद्धत शोधावी लागली. तेव्हा नापास होणं हे इतकंही वाईट नसतं. दोनदा अपयशी ठरल्यानेच आज माझ्याकडे मी तयार केलेली खेळांची, रेसिंग कार्सची, टेक्नॉलॉजीची, शेतीची, फूड आयटम्सची असंख्य गणितं आहेत आणि त्यात नवीन विषयांच्या गणितांची भर घालण्याचा माझा प्रयत्न कायम असतो. तेव्हा मी आता तुकडीच्या.. गुणांच्या.. बुद्धिमत्तेच्या साचेबद्ध मापदंडापलीकडे जाऊन कोणत्याही विद्यार्थ्यांला शिकवू शकते.’’ बाई समाधानाने म्हणाल्या. आज काहीही न सांगताच बाईंनी विचार करण्यासाठी भरपूर मोठा ‘घरचा अभ्यास’ दिला आहे हे माझ्या लक्षात आलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 29, 2020 1:07 am

Web Title: home study apyashala bhidtana chaturang yogesh shejwalkar abn 97
Next Stories
1 निरामय घरटं : नि:शंक ऐकणं
2 व्वाऽऽ हेल्पलाइन : लाजतो मराठी लपवतो मराठी
3 यत्र तत्र सर्वत्र : स्त्रिया, कामगार क्षेत्र आणि सन्मान
Just Now!
X