13 July 2020

News Flash

वो सुबह कभी तो आएगी..

वर्षभरापूर्वी ६ सप्टेंबर २०१८ या दिवशी समलैंगिक संबंधांना गुन्हा ठरवणारं कलम ३७७ सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलं

(संग्रहित छायाचित्र)

शमिभा पाटील

कलम ३७७ रद्द होऊन एक वर्ष पूर्ण झालं. काय काय घडलं गेल्या वर्षभरात? एलजीबीटी समुदाय आणि सर्वसामान्यांमध्ये संवाद सेतू निर्माण झाला का? केरळमधील शैक्षणिक संस्थांमधील एलजीबीटी समूहाचे प्रवेश, बिहारमधील आरोग्यविषयक आर्थिक अनुदान, ‘एलजीबीटीक्यू स्क्वेअर’ ही चळवळ, ‘अनाम प्रेम’ परिवाराचे ‘ट्रान्स एम्पॉवर मेला’, ‘फॅमिली मीट इनिशिएटिव्ह’ यांसारखे सामाजिक उपक्रम..  एलजीबीटी समुदायाच्या आयुष्यात फक्त रात्र नाही हे दाखवून देत आहेत, वो सुबह कभी तो आएगी..

हा त्यांचा आशावाद म्हणूनच त्यांच्यासाठी नाही तर सर्वसामान्यांसाठी जास्त आव्हानात्मक आहे.

मी तृतीयपंथी-एलजीबीटी समुदायाची एक प्रतिनिधी. एक संवेदनशील, सजग नागरिक म्हणून मला सांगावं वाटतंय की, माणूस म्हणून जगण्याच्या आमच्या संघर्षांत, सर्वसमावेशक भारताच्या घडणीत आम्हाला साथ द्या. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या गेल्या ७० वर्षांत आमच्यासोबत बरंच काही घडलंय, चांगलं आणि खूप सारं वाईट. ते सारं मागे ठेवून आम्ही पुढे जातो आहोत. समानतेसाठीचा सुरू झालेला हा अथक लढा आता थांबणार नाहीच. मात्र, तुम्ही सगळे सोबत आलात तर तो अधिक व्यापक, मजबूत होईल, आमच्याही आयुष्यात ती पहाट लवकर उजाडेल जेव्हा आम्ही तुमच्यासारखे ‘माणूस’ असू, आम्हालाही सामान्य माणसासारखं सगळ्यांच्यात मिळून मिसळून जगता येईल, आर्थिक स्वातंत्र्यासाठी आम्हालाही तुमच्या खांद्याला खांदा लावून विकासाच्या वाटेवर चालता येईल. आणि आम्हाला मिळेल तुमच्यासारख्यांचा स्नेह आणि आपलेपणा!

वर्षभरापूर्वी ६ सप्टेंबर २०१८ या दिवशी समलैंगिक संबंधांना गुन्हा ठरवणारं कलम ३७७ सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलं. एलजीबीटी समुदायाला नैसर्गिक कायदेशीर अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य मिळालं. आत्मविश्वास वाढवणाऱ्या या निर्णयाने आमच्या समुदायाला जणू नवजीवन मिळालं. तो स्वातंत्र्याचा क्षण आम्ही पुरेपूर उपभोगला, साजरा केला. मात्र लादलेला अपराधगंड, सामाजिक भीती व मानसिक दडपण झुगारत, नागरिकत्वावर हक्क सांगण्याचा संघर्ष सुरूच आहे. विविध स्तरांवर माझ्या समुदायाची कोंडी फुटण्याची सुरुवात झाल्याचं दिसू लागलं आहे. गेल्या वर्षभरात देशपातळीवर झालेले अनेक निर्णय, भूमिका एलजीबीटी समुदायाची प्रतिष्ठा आणि स्वीकार वाढवणाऱ्या ठरल्यात. अर्थात, हे घडलं २००१ ते २०१८ या अठरा वर्षांच्या अथक, सातत्याच्या संघर्षांतून. या वर्षभरात काय काय विशेष प्रयत्न घडले ते पाहणं म्हणूनच नक्कीच महत्त्वाचं आहे.

मला बऱ्याचदा विचारला जाणारा प्रश्न, ‘कायदा बदललाय, पण समाज बदलला का?’ माझं उत्तर आहे, समाज बदलेल, त्याच्या बदलाचा वेग कमीच आहे. तो वाढवावा लागेल. येत्या काही वर्षांतच समुदायाचे लोक सामाजिक क्षेत्रापासून ते राजकीय, व्यावसायिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला, माध्यमे आणि प्रशासन ते न्यायव्यवस्थेपर्यंत प्रत्येक पदावर नेतृत्व करताना दिसतील याची मला खात्री आहे मात्र त्यासाठी सामाजिक बदलाला कायदेशीर बदलाचं पाठबळ कायम असणं आवश्यकच.

गेल्या वर्षभरापूर्वी मी स्वत:ची तृतीयपंथी ही लैंगिक ओळख सार्वजनिक केली. माझा कार्यकर्त्यांचा पिंड मला स्वस्थ बसू देत नव्हता. मी एलजीबीटी समुदायाचा भाग आहे. संवाद-वाचन अशा माध्यमातून समलैंगिकता व त्याच्याशी निगडित बाबी मी समजून घेत होते. दरम्यान मला जाणवलं, की एलजीबीटी समुदायाचा भाग असले तरी मी समुदाय म्हणून मर्यादित राहणार-जगणार आहे. त्यातून बाहेर पडायचं असेल तर मला व माझ्या समुदायाला उपजीविका आणि इतर कारणांसाठी मुख्य प्रवाहातल्या समाज-समूहात वावरत राहणं भाग आहे. मुख्य प्रवाहातला सर्वसामान्य समाज आणि एलजीबीटी समुदाय यांच्यात ‘संवादसेतू’ बांधण्याची गरज मला वाटली. मग परिवर्तनवादी चळवळीत काम करणाऱ्या विविध कार्यकर्त्यांशी संपर्क साधला. ‘एलजीबीटीक्यू स्क्वेअर’ या नावाने ओळखली जाणारी समिलगी समुदायाची चळवळ व्यापक समाज परिवर्तनाच्या चळवळीचाच अविभाज्य भाग आहे. ही चळवळ ‘वो सुबह कभी तो आएगी’ म्हणत आशावादी दृष्टीने शोषणविरहित, समताधिष्ठित समाजाचं स्वप्न पाहते आहे. म्हणूनच परिवर्तनाच्या विविध चळवळी आणि एलजीबीटी यांच्यातील अंतर कमी होण्याची गरज आहे, असं मला वाटलं. या प्रयोगाचं नावही मी ठरवलं, ‘सेतू संवादाचा.’

मी माझे मानसपिता, वध्र्याच्या ‘नयी तालीम’चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सुगन बरंठ यांच्याशी या संकल्पनेवर बोलले. त्यांनी या कल्पनेचं मनापासून स्वागत करत मला ‘मासूम’ संस्थेच्या मनीषा गुप्ते यांचं नाव सुचवलं. मनीषाताईंसोबत मी व माझा सहकारी अभिलाष चौधरी यांनी ‘सेतू संवादाचा’ संदर्भात चर्चा केली. पहिली बैठक पुण्यात एलजीबीटी समुदायाचा भाग असलेले कलावंत जमीर कांबळे यांच्याकडे झाली. या बैठकीमध्ये मनीषा गुप्ते, गीताली वि. मं., बिंदुमाधव खिरे, मीरा संघमित्रा, सुनीता गांधी, अलका पावनगडकर, मिलिंद देशमुख, हेमलता पिसाळ, माधुरी आवटे, अच्युत बोरगावकर, तेजस्विनी सेवेकरी, साधनाताई, मन्नत शेख, अभिलाष चौधरी, सारंग पुणेकर, अनिल उकरंडे अशी या प्रश्नांविषयी संवेदनशीलतेने विचार करणारी समलैंगिक समुदायाच्या आतली व बाहेरचीही सर्वसमावेशक मंडळी एकत्र आली.

एलजीबीटी घटकांविषयी संवादात्मक चर्चा कशा पद्धतीने होईल यासाठी मग विविध उपक्रम, परिसंवाद, लेखन, संस्थात्मक व व्यक्तिगत पातळीवर कशा पद्धतीने काम करता येईल यासंदर्भात त्या बैठकीमध्ये अतिशय सकारात्मक चर्चा होऊन पहिला कार्यकम पुण्यात घेण्याचं ठरलं. २५ मे या दिवशी पुण्यातील ‘राष्ट्र सेवा दल’ सभागृहात दिवसभराचं चर्चासत्र झालं. समलैंगिक समुदायाच्या संदर्भात ग्रामीण निमशहरी तसेच अगदी शेवटच्या स्तरापर्यंत या पातळीपर्यंत व्यापक स्वरूपाची एक जन आंदोलनात्मक चळवळ उभी राहावी या समुदायाच्या सामाजिक स्वीकृतीचे मार्ग रुंदावले जावेत यासाठीचे कृती-कार्यक्रम ठरले.

एलजीबीटी समुदायाची ही चळवळ व्यापक समाजपरिवर्तनाच्या चळवळीचा एक अविभाज्य भाग आहे. आम्ही सगळे सगळ्या मानवी समाजासाठी समताधिष्ठित समाजाचं स्वप्न पाहतो. म्हणून परिवर्तनाच्या विविध चळवळी, जनसामान्य आणि एलजीबीटी यांच्यातलं अंतर कमी होण्याची गरज आहे. या गरजेचं चच्रेत आणि चच्रेचं कृतीत रूपांतर होत महाराष्ट्रात सेतू संवादाचा हा प्रकल्प आता प्रभावीपणे आकार घेतोय. येत्या काळात कृतीकार्यक्रम घेऊन राज्यभरातल्या ग्रामीण आणि निमशहरी भागात पोचायचं आहे.

याशिवाय बिहार, उत्तर प्रदेश व काही दक्षिण भारतीय राज्यांमध्ये तृतीयपंथीयांसाठी खास महामंडळाची निर्मिती करणं, त्याद्वारे विविध उपक्रम राबवून त्यांच्या कौशल्यांचा विकास करण्याचा प्रयत्न सुरू झाल्याचं दिसतं. शैक्षणिक, सार्वजनिक संस्थांची कागदपत्रं, उपक्रम, यांमध्ये ‘इतर’च्या ऐवजी ‘तृतीयपंथी’ शब्द लिहिणंही अनेक राज्यांनी सुरू केलं आहे. कुठल्याही प्रकारे अल्पसंख्याक असलेल्या घटकांसाठी आवश्यक अशा संधी-सोयीसुविधांची उपलब्धता करून देणं शासन-प्रशासन व्यवस्थेचं कर्तव्यच आहे. कलम ३७७ रद्द करण्याच्या प्रक्रियेदरम्यान देशभरात सुरू झालेल्या चर्चा, जनजागृती यामधून समलैंगिक समूहासह या चळवळीतले कार्यकर्ते, विचारवंत या सर्वाचं मनोबल अजूनच भक्कम झालंय, त्यांचा संघर्षांसाठीचा हुरूप वाढलाय. गेल्या वर्षभरामध्ये केरळ राज्यात झालेले शैक्षणिक संस्थांमधील एलजीबीटी समूहाचे प्रवेश, बिहारमध्ये तृतीयपंथी समुदायाला शासकीय कोटय़ातून मिळणारं आरोग्यविषयक आर्थिक अनुदान या बाबी उल्लेखनीय आहेत. तसेच एलजीबीटी समुदायातील व्यक्तींच्या शैक्षणिक-सामाजिक-आर्थिक स्वावलंबनासाठी वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून चालत असलेले प्रयत्न तर जुनेच आहेत. त्यांच्या प्रयत्नातून कायदा व सामाजिक संवादाच्या माध्यमातून सामाजिक मनोभूमिका तयार करणं, एलजीबीटी समुदायासाठी भवतालाला अधिकाधिक अनुकू ल करणं सुरू आहे. समुदायातल्या ज्येष्ठ कार्यकर्त्यां गौरी सावंत असतील, ‘वंचित बहुजन आघाडी’च्या प्रवक्ता, कविता व लेखनाद्वारे समुदायाचे प्रश्न मांडणाऱ्या दिशा पिंकी शेख, कविता व जनसंवादातून प्रबोधन करणाऱ्या सारंग पुणेकर, या सगळ्यांचे डोळस प्रयत्न केवळ समुदायच नाही, तर इतरही समाजाची इयत्ता वाढवणारे ठरत आहेत.

कृपाली बिडये आणि तिच्या सहकाऱ्यांनी ‘अनाम प्रेम’ संस्थेच्या माध्यमातून दीर्घकाळापासून चालवलेले प्रयत्न खूप प्रभावी ठरत आलेत. ‘ट्रान्स एम्पावर मेला’च्या माध्यमातून ‘अनाम प्रेम’ दर वर्षी भारतभरातल्या तृतीयपंथीयांना एकत्र आणते. त्यांनी बनवलेल्या अनेकविध वस्तू, उत्पादनांची मेळ्याच्या काळात विक्री होते. समाजाच्या सर्व स्तरातले लोक मेळ्यात खरेदी करायला येतात. यासोबतच ‘फॅमिली मीट इनिशिएटिव’ हा संस्थेचा खास उपक्रम. यात तृतीयपंथी व्यक्ती अनेक जनसामान्यांच्या कुटुंबांमध्ये जाऊन राहतात. त्यातून गप्पा, संपर्काचा नैसर्गिक पूल बांधला जातो. तृतीयपंथीयांविषयीचं विकृत कुतूहल जाऊन तिथे मोकळा, निरोगी संवाद प्रस्थापित होतो.

समलैंगिक समुदायाचे प्रश्न, त्यांच्या विवंचना-व्यथा, स्वप्नं मांडणं, त्यांच्या सामाजिक स्वीकृतीसाठीची मनोभूमिका तयार करणं यासाठी चित्रपटासारख्या प्रभावी माध्यमाचाही उपयोग होत असल्याचं काही तुरळक प्रयत्न होताना दिसताहेत. ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’सारखा मुख्य धारेतला नामवंत कलावंतांचा चित्रपट, यूटय़ूबसारख्या माध्यमातून पोचणारे काही लघुपट, काही वेबसीरिजही असे प्रयत्न जाणीवपूर्वक करताना दिसत आहेत. बदलाला सुरुवात झालेली दिसते ती अशा काही उपक्रमातून. ती आता थांबता कामा नये. तरच सामान्य आणि एलजीबीटीक्यू समुदयातील लोकांमधील दरी आपोआप दूर होईल.

‘ट्रान्सव्हिजन’ हे तृतीयपंथीयांच्या समस्यांविषयी बोलणारं, तृतीयपंथीयांनीच चालवलेलं भारतातलं पहिलं यूटय़ूब चॅनल. तिथल्या अँकर अंजली म्हणतात, ‘‘तृतीयपंथीयांविषयी मुख्य प्रवाहातल्या समाजात आजही अज्ञान आणि अंधश्रद्धा घट्ट रुजलेल्या आहेत. त्या दूर झाल्या तर बऱ्याच प्रश्नांची तीव्रता कमी होईल. समुदायाविषयीची वैज्ञानिक माहिती साध्यासोप्या शब्दात पुरवणं हे चॅनलचं मुख्य उद्दिष्ट आहे. हे चॅनेल हैदराबादमधील तृतीयपंथीय मैत्रिणींनी सुरू केलं आहे. अंजलीसोबत जान्हवी राय आणि सोनिया शैक ‘ट्रान्सव्हिजन’साठी काम करतात .

निव्वळ कायदेशीर तरतुदी नव्हे तर सामाजिक संवादानेच प्रश्न सुटू शकतात. भारतीय समाजात जात-वर्ग-लिंगवास्तव एकमेकांच्या हातात हात घालून चालतं. समुदायाचे प्रश्न सोडवताना त्या प्रश्नांचा विचार या वास्तवासह झाला पाहिजे. कारण समुदायातली व्यक्तीही विविध स्तरांवर जात-वर्ग वास्तवाची बळी ठरत राहते. शोषणाची प्रक्रिया गावकुसाच्या शेवटच्या माणसापर्यंत झिरपलेली आहे. ही प्रक्रिया शेवटच्या घटकापासून उखडून काढली जात नाही, तोवर शोषण आणि शोषक हा संघर्ष सुरूच राहील. समुदायाला मान्यता मिळण्यासाठी पितृसत्ताक समाजव्यवस्था समूळ नष्ट झाली पाहिजे. कारण ही व्यवस्था सतत सांगत राहते, की केवळ वंश वाढवणारेच संबंध ‘नैसर्गिक’ असतात. मात्र यात अजिबातच तथ्य नाही.

खरेतर ३७७ सारखे अमानवीय कायदे जगभरात होते, काही ठिकाणी अजूनही आहेत. अनेक देशांमध्ये त्याविरोधात सामाजिक मनोभूमिकेचे निर्माण, राजकीय घडामोडी, कायद्यातील बदल हे सगळे खूप वेगाने झाले. परिणामी त्या-त्या देशातल्या एलजीबीटी समुदायाला त्याचे अधिकार मिळाले. आपल्याकडे एक तर ‘विरोधाला विरोध’ होतो किंवा आपण प्रत्येक गोष्ट ‘निर्मितीक्षम’ आहे का हेच जोखत राहतो. लैंगिकता हा प्रत्येक व्यक्तीचा ‘कल’ आहे, त्यात ‘नैसर्गिक’, ‘अनैसर्गिक’, ‘विकृत’, असं काहीच नाही हे सत्य आता विविध माध्यमातून सतत सांगितले गेलं पाहिजे. कागदावरचा कायदा सामाजिक स्तरावर येऊन तो जगण्याचा भाग झाला पाहिजे.

माझ्या समुदायाचा कायदेशीर-वैधानिक संघर्ष एका दशकाहून जास्त काळ चालू आहे. आजतागायत ‘आपण संख्येने कमी असू, मात्र चुकीचे नक्कीच नाही.’ या एका तत्त्वावरील आढळ  विश्वासानेच हा संघर्ष कायम ठेवता आलाय. तत्त्ववेत्ता विक्टर ह्य़ुगोने म्हटलं आहे, ‘नथिंग इज स्ट्राँगर दॅन अ‍ॅन आयडिया हुज टाइम हॅज कम.’ लैंगिक समानता, वर्गीय, जातीय, धार्मिक समानता, प्रांतिक-भाषिक समानता या गोष्टी हरेक समुदायाला मिळण्याची अनुकूल वेळ संघर्ष करूनच निर्माण करावी लागते. एलजीबीटी समुदाय भारतीय संविधानाच्या ‘व्यक्ती प्रतिष्ठा’ या सूत्राचा संदर्भ घेत सक्षमपणे उभा आहे. आपला संघर्ष सामाजिक स्तरापर्यंत पोहोचवणं, व्यक्ती व माणूस म्हणून समाजात मानाने जगता येणं यासाठी आम्ही कायम संघर्षरत असू. द्युती चंद ही भारताची ओळख जागतिक स्तरावर नेलेली धावपटू. तिने ती समलिंगी असल्याचं काही काळापूर्वी सार्वजनिकरीत्या जाहीर केले. ‘सेलिब्रिटी’ व्यक्तींचं हे धाडस बदलाच्या प्रक्रियेत उत्प्रेरक बनतं. आणि खात्री देतं की हा लढा आता चालूच रहाणार.. जोपर्यंत ‘माणूस’ म्हणून ओळख मिळत नाही तोपर्यंत..

अनोखं स्नेहभोजन 

तृतीयपंथीय हेसुद्धा समाजातील अविभाज्य घटक  आहेत, परंतु सर्वसामान्यांच्या समाजाने कायमच त्यांना खडय़ासारखं बाजूला सारलं. मात्र काळ जसजसा बदलत गेला तसतसा त्यांच्याकडे पहाण्याचा दृष्टिकोनही बदलू लागला. त्यांनाही समाजाचा एक भाग म्हणून स्वीकारलं जाऊ लागलं. त्यासाठी खास, जाणीवपूर्वक प्रयत्न अनेक ठिकाणी होत आहेत. ‘अनाम प्रेम’ परिवार असाच एक अनोखा प्रयोग गेली १५ वर्षे करते आहे.

२००५ मध्ये ‘अनाम प्रेम’ परिवाराने काही तृतियपंथींना एका जैन मंदिरात बोलावून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न सुरू केला. त्या वेळी जैन मुनींनी आणि अनामप्रेमींनी त्यांच्यासाठी प्रार्थना केल्या. लक्ष्मी त्रिपाठी आणि इतर तृतीयपंथी त्या वेळी उपस्थित होते. कृपाली बिडये या छोटय़ा अनामप्रेमीच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर सुरू झाला खरा पण गेली १५ वर्ष सातत्याने प्रेमाचा हा अखंड प्रवाह सुरूच आहे. यानिमित्ताने तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अनेक प्रयोग केले गेले. त्यातील एक मुख्य आणि अनोखा प्रयोग म्हणजे २०१० पासून तृतीयपंथीयांना आपल्या घरी बोलावून दरी दूर करण्याचा प्रयत्न करणं. त्यांचं आदरातिथ्य करणं, त्यांच्यासोबत गप्पा मारणं, एकत्र स्नेहभोजन करणं, एकमेकांना समजून घेणं.

याच उपक्रमाअंतर्गत आम्हीही ठरवलं की हा स्नेहमेळावा आपल्याच घरी करावा. प्रामाणिकपणे सांगायचं तर ज्या दिवशी त्यांना आमंत्रण गेलं तेव्हा संमिश्र भावनांचा कल्लोळ आमच्या मनात होताच. आम्हाला आमच्यापेक्षा आमच्या आजूबाजूच्या लोकांची, शेजाऱ्यांची काळजी होती. ते काय म्हणतील? त्यांना हे आवडेल का? येणारे पाहुणे कसे असतील? कसे वागतील, बोलतील? आमच्या या तृतीयपंथीय पाहुण्यांच्या मनात काळजी होती की आपलं कसं स्वागत होईल? खरंच हे अनामप्रेमी आपल्यासोबत स्नेहभोजन करतील का? गैरसमज व्हायला नको म्हणून आम्ही आधीच या प्रयोगाची कल्पना आजूबाजूच्या रहिवाशांना दिली आणि त्यांच्याकडून सहकार्याची अपेक्षा केली आणि तो दिवस उजाडला.. मालवणी भागात राहणारे गुरू अल्ताफभाई आपल्या सोबत  आणखी चार तृतीयपंथीयांना घेऊन आमच्या घरी आले. सुरुवातीला सर्वाचेच चेहरे गंभीर होते. एक अनामिक भीती सर्वाच्या मनात होती. परंतु माझी पत्नी पूजा आणि इतर ‘अनाम प्रेमी’ंनी त्यांचं ओवाळून स्वागत केलं. आणि मग प्रेमाच्या प्रकाशात सारंच उजळून निघालं.  इतकं अनपेक्षित प्रेममय स्वागत झाल्यावर अल्ताफ भाई, रिया, शैलू, नेहा आणि अमृता यांचे चेहरे आनंदाने फुलले. या प्रयोगाचे साक्षीदार म्हणून  एस. रामचंद्रन, महिमा रायकर, स्नेहा काळे, अनिल सामंत, पुष्पा कोठारी, नलिनी सावंत हे अनामप्रेमीसुद्धा या सोहळ्याला उपस्थित होते.

चहा-बिस्किटांचा आस्वाद सर्वानी घ्यायला सुरुवात केली आणि हळूहळू वातावरणातला तणाव कमी कमी होत गेला. अवघडलेपण नाहीसं झालं आणि सगळेच जण एकमेकांशी मोकळेपणाने बोलू लागले. रियाने सुंदर नृत्य सादर केलं. माझी मुलगी हर्षदाने  व्हायोलिनवर सुरेल गाणं सादर केलं. आणि त्यानंतर आम्ही सर्वानी स्नेहभोजन केलं. खूपच वेगळा आणि आनंदाचा क्षण होता तो. आमच्यासाठी आणि आमच्या पाहुण्यांसाठीसुद्धा. हा आनंदाचा सिलसिला आज कित्येक वर्ष सुरूच आहे. दर वर्षी नवनवीन तृतीयपंथी स्नेही आमच्या आणि इतर अनामप्रेमींच्या घरी जातात. आनंद वाटतात, आनंदात न्हाऊन परततात. हा समाज आपला आहे, आपणही त्याचा अपरिहार्य भाग आहोत ही भावना त्यानिमित्ताने त्यांच्यात रुजते आहे.

‘अनाम प्रेम’ परिवाराचा हा प्रेमाचा प्रयोग असाच चालू राहील आणि ‘ज्योत से ज्योत जगाते चलो प्रेम की गंगा बहाते चलो’ या गीताप्रमाणे प्रेमाच्या या गंगेत सारेच जण सहप्रवासी होऊन प्रेमभावनेने चिंब होतील, एक दिवस.. नक्कीच!

– प्रभाकर पावसकर

लैंगिक अभिव्यक्तीची भूमिका आता बळकट झाली असली तरी, एलजीबीटी समुदायाला सामाजिक स्वीकृतीसाठी अद्याप समुदाय व संस्थात्मक पातळीवर संघर्ष करावा लागत आहे. एलजीबीटी समुदाय, त्यातही विशेषत: तृतीयपंथी समुदायाला थोडीबहुत सामाजिक मान्यता केवळ दैवीकरणाच्या, शोषणाच्या साच्यातून दिली जाते. तृतीयपंथीयांच्या खऱ्या समस्या, व्यथा कुणाला दिसत नाहीत. मूलभूत गरजांच्या पूर्तीसाठीदेखील त्यांना खूप झगडावं लागतं. मग त्यांनी स्वत:चं माणूसपण कसं-कधी सिद्ध करावं! शिक्षण व इतर कौशल्य असलं तरी संधी न देता केवळ तृतीयपंथी म्हणून त्यांना टाळलं जातं. हा समुदाय सामजिकदृष्टय़ा बहिष्कृत असतो. त्यांना मूलभूत अधिकारांपासून वंचित ठेवणं हे खरं तर त्यांच्या मानवी अधिकारांचं हनन आहे. त्यासाठी राजकीय पटलावर भूमिका घेणं व त्याद्वारे जनमानस घडवणं, विविध कायदेशीर तरतुदींमध्ये स्त्री-पुरुषांसोबत तृतीयपंथीयांचा अंतर्भाव करणं गरजेचं आहे.

– दिशा पिंकी शेख, तृतीयपंथी सामाजिक कार्यकर्ता, लेखिका व कवयित्री

३७७ कलम रद्द झालं हे महत्त्वाचंच. आता एलजीबीटी समुदाय आपली लैंगिक ओळख आधिक खुलेपणाने, दडपणाविना व्यक्त करतोय, हे खरंच आहे. पण याचा अर्थ असा नव्हे, की एलजीबीटी समुदायाचे सगळे प्रश्न सुटले. खरं तर कायद्याच्या अनुषंगाने सामाजिक बदल करण्यातही शासनाने पुढाकार घेतला पाहिजे. यातून एलजीबीटी समुदायाला अधिक सन्मानाने, माणूस म्हणून जगता येईल. या समुदायाला सामाजिक स्तरावरची मान्यता मिळणं व अनेकानेक प्रकारच्या भेदभावाला आळा घालणं यासाठी ‘नागरी हक्क सुरक्षा अधिनियम’सारखा एखादा कायदा गरजेचा आहे. यातून एलजीबीटी समुदायाला सामाजिक-भावनिक सुरक्षितता मिळेल. समिलगी विवाहाला कायदेशीर मान्यता मिळाली पाहिजे. ‘दत्तक विधान कायदा’ अजून व्यापक झाला तर समुदायाला मूल दत्तक घेताना अडचणी येणार नाहीत.

– अभिलाष चौधरी, समलैंगिक अधिकार कार्यकर्ता, पुणे

एलजीबीटी समुदायासाठी अजूनही भक्कम असा कायदा नाही. कुणी गैरवर्तन केलं तर त्याच्याविरोधात ठोस कायदेशीर पावलं उचलता येत नाहीत. शैक्षणिक संस्थांमध्येही तृतीयपंथी व्यक्तीविषयी पूर्वग्रह, आकस असल्याचं दिसतं. समुदायामध्ये आत्मविश्वासाची खूप कमतरता आहे. समुदायातील कुशल, शिकलेल्या व्यक्तींनी पुढे येत इतरांना जीवनावश्यक कौशल्यं शिकवणं शक्य आहे. त्याचा विचार झाला पाहिजे.

– पल्लव पाटणकर, समलैंगिक अधिकार कार्यकर्ता, मुंबई

(लेखिका एलजीबीटी समुदायासाठी काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यां आहेत.)

shamp107@gmail.com

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 14, 2019 12:12 am

Web Title: homosexuality section 377 lgbt abn 97
Next Stories
1 अवघे पाऊणशे वयमान : अनादी अस्वस्थ
2 आरोग्यम् धनसंपदा : रक्तक्षयावर पोषणाचा उपाय
3 तळ ढवळताना : पुस्तकं स्फोटक होतात तेव्हा..
Just Now!
X