13 August 2020

News Flash

फणा

.. हा क्षण मला आकर्षित करतो आहे. पुन्हा नव्यानं मला ‘फण्याकडे’ पाहायला लावतो आहे. या वेळी एका वेगळ्या दृष्टीनं, बाबांच्या दृष्टीनं. फणा फूत्कारणारा, भिववणारा तसंच

| April 19, 2014 01:01 am

.. हा क्षण मला आकर्षित करतो आहे. पुन्हा नव्यानं मला ‘फण्याकडे’ पाहायला लावतो आहे. या वेळी एका वेगळ्या दृष्टीनं, बाबांच्या दृष्टीनं. फणा फूत्कारणारा, भिववणारा तसंच भारावून टाकणारासुद्धा. फणा फक्त घाबरवणारा विषारी नाही तर दैवीसुद्धा..विलोभनीय.
एकदा मी माझ्या एका लेखकमित्राकडे गेले होते. बोलता बोलता ते मला एका कुठल्याशा अभिनेत्रीविषयी सांगायला लागले. ती अतिशय उत्तम अभिनेत्री. दिसायला सुरेख. तिनं एक-दोन नाटकांमधून अतिशय सुंदर कामं केली. तोच तिला कुण्या श्रीमंत माणसानं मागणी घातली. ‘लग्नानंतर तिनं कधीही नाटकात काम करायचं नाही’ ही त्या माणसाची अट मान्य करून तिनं त्याच्याशी लग्न केलं. याला आता अनेक वर्षे लोटली होती. आता ती मध्यमवयाची झाली होती. मधली इतकी सगळी वर्षे तिला आवडणाऱ्या कशापासून तरी तिनं स्वत:ला पूर्ण तोडलं होतं. दोन दिवसांपूर्वी ती माझ्या या लेखकमित्राकडे आली तेव्हा तिचं रूप पूर्ण पालटून गेलं होतं. तिचे मोठे तेजस्वी डोळे पूर्ण विझून गेले होते. तिच्याविषयी मला सांगताना ते माझे मित्र म्हणाले, ‘‘हे असं इतकं मोठं काही दाबून टाकू नये गं आतमध्ये. दाबलं तरी दाबता येत नाही ते एका मर्यादेपलीकडे. कधी ना कधी ते फणा काढून वर येतंच. तेव्हा ते सांभाळणं फार कठीण होऊन बसतं.’’
  आठ मार्चला माझे दोस्त जयकरकाका यांनी एक फार छान कार्यक्रम केला. आपापल्या ऊर्मीच्या धाडसानं चालत गेलेल्या कितीतरी स्त्रियांना एकत्र आणून त्यांनी त्यांचा सत्कार केला. त्या दिवशी अलकाताईंची आणि माझी पहिली भेट झाली. शिट्टीवर हिंदी, मराठीतली अनेक गाणी सादर करणाऱ्या नाशिकच्या अलका जहागिरदार. साधारण मध्यमवयीन. मानेपर्यंत कापलेले केस. हसतमुख. त्या वेळेच्या बऱ्याच आधी पोचल्या होत्या त्यामुळे त्यांच्याशी छान गप्पा मारता आल्या. ‘‘तुम्हाला मुळात अशी शिट्टीवर गाणी वाजवावी असं वाटलंच कसं आणि का?’’ या माझ्या प्रश्नावर त्यांनी दिलेलं उत्तर आगळं होतं. त्यांचे आजोबा उत्कृष्ट शहनाई वाजवायचे. छोटय़ा अलकाताईंची प्रत्येक सकाळ आजोबांच्या सुंदर शहनाईच्या सुरांनी व्हायची. ते सूर ऐकताच छोटय़ा अलकाच्या घशात आवंढे आल्यासारखं व्हायचं. तिलाही त्या शहनाईतून स्वर फेकण्याची अनिवार इच्छा व्हायची. ती धावत आजोबांपाशी जायची, म्हणायची, ‘मला वाजवायची आहे!’ आजोबा म्हणायचे, ‘हे मुलींनी वाजवायचं वाद्य नाही, तू याला हातही लावायचा नाहीस.’ अलका कासावीस व्हायची. शहनाईचे स्वर तिला पुन्हा पुन्हा बोलवायचे. तिच्याच शब्दांत सांगायचं तर तिला पागल करून टाकायचे. शेवटी न राहवून तिनं तोंडानं शिट्टी वाजवून ते स्वर आळवायला सुरुवात केली. तिचा श्वास शहनाईचे सूर शोधत होता, पण तिला तिचं वाद्य हातात मिळालं नाही तरी तिच्या श्वासानं आतल्या आत कोंडून गुदमरणं नाकारलं. त्या श्वासानं तिच्या शिट्टीत त्याचा सूर शोधला. ती शिट्टीवर वेगवेगळी गाणी वाजवायला लागली. पण मुलीनं मोठय़ांदा हसणंसुद्धा जिथे चूक मानतात तिथे तिनं शिट्टीवर गाणं वाजवलं म्हणजे अनर्थच की! तिच्या शिट्टीची साद फक्त स्वयंपाकघराच्या भिंतीपुरतीच राहिली. तिचा जीव कसनुसा व्हायचा. ही पण एक कला आहे, ती लोकांपुढे यावी असं खूप वाटायचं तिला. त्या कासाविशीत तिनं रडून रडून अनेक उशा भिजवल्या. त्याच सुमारास तिचं लग्न ठरलं. मग मात्र रडणाऱ्या तिनं कसलासा निश्चय केला आणि डोळे पुसले. तिला जाणवलं आता जर ती स्वत:च्या बाजूने उभी राहिली नाही तर कदाचित तिची ही कला कायमची तिच्या आतच पडून राहील. ती घरच्यांना न सांगता तिच्या होणाऱ्या नवऱ्याला भेटली, म्हणाली, ‘मला नाही लग्न करायचं तुझ्याशी. कुठलंही नवं गाणं ऐकलं की मला पागल व्हायला होतं. त्याची धून माझ्या शिट्टीत उतरवल्याशिवाय मला चैनच पडत नाही. लग्नानंतर हे सगळं संपेल.’ त्यावर तो होणारा नवरा म्हणाला, ‘तुला मी कधीच कोणत्याही गोष्टीला अडवणार नाही. वाटल्यास स्टँप पेपरवर लिहून देतो.’ यावर ती म्हणाली, ‘दे लिहून!’  तोही काही कमी नव्हता, म्हणाला, ‘नाही देणार! माझ्या डोळ्यात बघ आणि तूच ठरव मी खरं बोलतो की नाही ते.’ त्यांचं लग्न झालं. तो त्याच्या खऱ्या डोळ्यांना आणि वचनाला जागला. नवऱ्यापेक्षा तिचा मित्रच जास्त झाला. आज तिनं तिचे साडेसहाशेच्या वर कार्यक्रम केले आहेत. त्या आठ मार्चच्या कार्यक्रमात ती पहिलं गाणं सादर करायला रंगमंचावर आली. ते गाणं होतं, ‘आई ये ऽऽ मेहरबाँ’ त्या आधीचं संगीत सुरू झालं तशी ती हळू हळू डुलायला लागली. ते नृत्य नाही म्हणता येणार. नृत्याहूनही उन्मुक्त, पण संथ असं काहीतरी. फार संथ हालचाली. तिचे डोळे बंद होते. विंगेत तिची गोष्टं सांगणारी ती आणि रंगमंचावर डुलणारी ती कुणी वेगवेगळ्याच दोघी जणू. विंगेत ती हसून सांगत होती. ‘‘आता माझी दोन्ही मुलं सेटल्ड आहेत. एक ऑस्ट्रेलियात, एक कॅनडात.’’ रंगमंचावर डुलणारी ती या सगळ्याच्या पलीकडची होती. तिच्या वयाच्या, नवऱ्याच्या, मुलांच्याही पलीकडची. अचानक एका क्षणी तिनं खोल श्वास घेतला. डोळे मिटले आणि समोरच्या ध्वनिक्षेपकाला एका हातानं पकडून शीळ घालायला सुरुवात केली. त्या वेळी तिच्या चेहऱ्यावर एक मंद स्मित उमललं. तिनं स्वत:ला दिलेल्या न्यायाचं स्मित. त्यामुळे तिचा चेहरा तेजस्वी आणि फार सुंदर दिसत होता. तिच्या धाडसानं मला स्तिमित केलं होतं. स्वत:च्या आत उसळू पाहणाऱ्या कशाकशाला पूर्ण न्याय मिळावा म्हणून कशाच्याही, प्रसंगी घरच्यांच्याही विरुद्ध उभं राहण्याचं धाडस. अशा धाडसानंतर आत एक आत्मविश्वासाचा शांत झरा उमलतो. त्यात कुणालाच काहीच दाखवून द्यायचं नसतं. फक्त स्वत:तलं खूप काही मौल्यवान पूर्ण व्यक्त केल्याचं शांत समाधान असतं..त्या ८ मार्चच्या रात्री कार्यक्रम संपवून घरी गेले तरीसुद्धा रंगमंचावर डुलणारी ती अलकाताईंची छबी, माझ्या डोळ्यासमोरून जाईना. खूप अस्वस्थ वाटायला लागलं. माझ्या लेखकमित्रांकडे आलेली ती अभिनेत्री आठवायला लागली. एकदम वाटलं, अलकाताईनंही रडत उशा भिजवत सगळं आयुष्य काढलं असतं तर तिच्याही आतलं उसळू पाहणारं सर्व तिच्याही समोर फणा काढून उभं राहिलं असतं का? मग तिचं काय झालं असतं, माझं काय होईल.. या प्रश्नाशी आले आणि दचकून थांबलेच. हळूहळ ूजाणवायला लागलं अलकाताईनं माझ्या आतलं खूप र्वष दबून राहिलेलं काहीसं जागं केलं आहे. फक्त तिच्यात आणि माझ्यात फरक हा आहे की तिला तिच्या उन्मुक्ततेपासून रोखणारे आसपासचे होते आणि मला रोखणारी मीच आहे. मला कधीचं दिग्दर्शन करायचं आहे. मला अडवणारं कुणीच दृश्य माणूस मला आसपास दिसत नाही. मग तरी ते घडत का नाही? माझा नवरा संदेश कुठल्याही स्त्री दिग्दर्शिकेचा चांगला सिनेमा पाहिला की मला ते दाखवायला घेऊन जातो. त्याचा माझ्यावर माझ्यापेक्षा जास्त विश्वास आहे याबाबतीत, तर मग माझा माझ्यावर का नाही? मी ‘आजी’ नावाचा लघुपट बनवला होता. त्याची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन माझं होतं. निर्मिती मी आणि संदेशनं मिळून केली होती. ते माझ्या आयुष्यातले वेगळेच दिवस होते. मला काडीचंही दडपण नव्हतं. चित्रपट वेळेत संपला. जितक्या पैशात संपणं अपेक्षित होतं त्यापेक्षा कमीच पैशात संपला. आम्ही सगळ्यांनी मजेत तरीही शिस्तीत काम केलं. मला त्या दिवसांमध्ये माझ्यातली आधी कधीही न भेटलेली ‘मी’ भेटू पाहात होती. पण नंतर मी पुन्हा कधीच त्या वाटेनं का जात नाही आहे?
अलकाताईच्या निमित्तानं मला या प्रश्नाचं उत्तर शोधावं लागेल. त्या लघुपटानंतर मी कधीच स्वत:चा चित्रपट दिग्दर्शित करायला हवा होता. त्या लघुचित्रपटाच्या निमित्तानं भेटलेल्या माझ्यातल्या उन्मुक्त मला मी गेली कित्येक वर्षे टाळते आहे. माझ्यातल्या कुठल्या अनामिक भीतीमुळे हे घडतं आहे, हे तपासावं लागेल. नाही तर काही वर्षे अशीच गेली तर माझ्यातलंही बाहेर येऊ न शकलेलं ते काहीसं माझ्यासमोरही फणा काढेल. त्या रात्री एका क्षणी माझ्यासमोर तो फणा डुलत असलेला मला दिसला आणि आतून खूप भीती वाटली. अचानक लहानपणची एक आठवण कुठूनशी समोर येऊन उभी राहिली. मी लहान असताना आम्ही सातारला राहायचो. आमचं घर तळमजल्यावर. आमच्या डोक्यावरच्या घरात माझी एक मैत्रीण राहायची. तिच्या घराकडे जाणारा जिना नागमोडी होता. तिच्या आणि माझ्या या जिन्यावरनं सारख्या खालीवर फेऱ्या व्हायच्या. इतक्या की तो जिना पायाचाच एक भाग असल्यासारखा सवयीचा होऊन गेला होता. एका भर दुपारी अशीच सवयीनं काहीतरी त्या मैत्रिणीला सांगण्याच्या घाईत मी बेफिकिरीनं त्या जिन्याची पहिली पायरी चढली. मात्र.. थांबलेच. समोर एक पिवळा धम्मक नाग सळसळत जिन्यावरून वर चाललेला. किंचाळून उलटी घराकडे पळत सुटले. बाबांच्या नावानं ओरडले. बाबा काठी घेऊन जिन्याच्या दिशेने धावत सुटले. तेव्हा मी तो सळसळणारा नाग आठवत नुसतीच घरात ओरडत होते. थोडय़ा वेळाने बाबा जिन्याकडून परत आले. आईला म्हणाले, जेव्हा त्यांनी त्याला मारायला काठी उचलली तेव्हा अचानक त्याने फणा काढला. तो लाल रंगाचा होता. पिवळ्या धमक शरीराचा लालभडक फणा काढून डोलणारा तो नाग पाहून बाबा भारावल्यासारखे थांबले. त्यांची काठी हवेतच थांबली. श्वासही थांबल्यासारखा झाला. त्यांना काही क्षण भवतालाचा विसरच पडला. त्याच्या सौंदर्यानं त्यांच्यासाठी जणू काळ थांबला. बाबांवर त्याच्या फण्याचं गारूडच पडलं. बाबांना वाटलं याला मारूच नये, मला या क्षणापाशी थांबायचं आहे. हा क्षण मला आकर्षित करतो आहे. पुन्हा नव्यानं मला ‘फण्याकडे’ पाहायला लावतो आहे. या वेळी एका वेगळ्या दृष्टीनं, बाबांच्या दृष्टीनं. फणा फूत्कारणारा, भिववणारा तसंच भारावून टाकणारासुद्धा. फणा फक्त घाबरवणारा विषारी नाही तर दैवीसुद्धा..विलोभनीय.
  अलकाताईमुळे मला माझ्यातला फणा दिसला. योग्य वेळी दिसला. अजून उशीर झाला असता तर तो फूत्कारणारा फणा झाला असता, पण अजून वेळ गेलेली नाही. तो विलोभनीय करणं अजून माझ्या हातात आहे. आत्ता या ८ मार्चच्या रात्री  माझ्यासमोर डुलणारा माझ्या आतला हा फणा मला भिववत असला तरी भारावूनपण टाकतो आहे.
सवयीच्या जिन्याप्रमाणे सरधोपट होऊ पाहणाऱ्या आयुष्याच्या एका पायरीवर अचानक समोर आलेला हा नागाचा फणा माझ्यासाठी फार अमूल्य आहे. लहानपणी वाचलेल्या अनेक गोष्टींच्या पुस्तकांत नागाच्या फण्यावरचा नीलमणी कुठल्याशा खजिन्याचा रस्ता दाखवतो, असं वाचलं आहे. लहानपणी त्या फण्याला घाबरून, किंचाळून पळून गेलेली मी आता मात्र त्याच्यासमोर उभी आहे. अलकाताईच्या शिट्टीची धून ऐकून माझ्या आतलाही तो फणा डोलतो आहे. त्याचं मी माझ्यावर गारूड पडू देत आहे. मला त्याला मारायचंही नाही, दाबूनही ठेवायचं नाही. त्याचं डुलणं पाहात राहायचं आहे. न घाबरता. पापणीसुद्धा लवायला नको. त्याच्या गुंगवण्यात गुंगत जायचं आहे. लागू दे आम्ही दोघांची तंद्री. त्याचं आणि माझंच एक जग. एका क्षणी त्याला वाटेल तेव्हा तो सळसळत चालायला लागेल एक अज्ञात वाट. मीही त्याच्या मागे चालायला लागेन. कुठं जाते ती वाट. पुढं कुठला खजिना आहे. सगळे प्रश्न गळून पडू देत. माझं त्याच्यामागं धाडसानं जात राहणं तेवढं उरू देत.. अज्ञातापर्यंत.!   

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 19, 2014 1:01 am

Web Title: hood
टॅग Drama
Next Stories
1 विमान
2 आरे रांग..आरे रांग रे
3 सुंदर मी आहेच!
Just Now!
X