01 December 2020

News Flash

सासू-सासरे होताना

आपण ज्या वेळी कोणतीही नवीन भूमिका स्वीकारतो त्या आधीच त्याची पूर्ण आणि दीर्घ तयारी करायला हवी. सासू-सासरे ही नवीन भूमिका निभावताना तर या तयारीची फारच

| September 7, 2013 01:01 am

अनेक जण आपल्या मुलांच्या संसारात ढवळाढवळ करतात. याचं कारण एकम्हणजे आपल्या मुलांच्या बाबत वाटणारा मालकी हक्क आणि दुसरं महत्त्वाचे म्हणजे त्या आई-वडिलांचे स्वत:चे संपुष्टात आलेले सहजीवन. त्यांचे आपापसातले नातेसंबंध जर पक्के नसतील तर आपल्या मुलांच्या आयुष्याकडे लक्ष देण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरं काही उरलेलं नसणार. मुलांपेक्षा वेगळं विश्व असतं याचं भान फार थोडय़ा जणांना असतं.. सासू-सासरे होताना या लेखाचा हा उत्तरार्ध.
आपण ज्या वेळी कोणतीही नवीन भूमिका स्वीकारतो त्या आधीच त्याची पूर्ण आणि दीर्घ तयारी करायला हवी. सासू-सासरे ही नवीन भूमिका निभावताना तर या तयारीची फारच गरज आहे. आता ही मानसिक तयारी कशी करायची? याविषयीचा काही भाग आपण मागच्या लेखात (२४ ऑगस्ट) पाहिला.
वर्षांनुवष्रे आपल्या मनात तेच तेच पारंपरिक विचार असतात. लग्न झाल्यावर सुनेने अमक्या पद्धतीनेच वागले पाहिजे. घरातले रीतीरिवाज सासूबाईंच्या पद्धतीनेच पाळले गेले पाहिजेत. आणि त्याच वेळी जावयानेदेखील जास्त वेळा सासरी जायचे नाही. असे कितीतरी. परंपरांचे साचे जे आपल्या मनात तयार झालेले असतात, त्या साच्यांना धक्का लागेल की काय असं वाटलं की आपण घाबरे व्हायला लागतो. आणि मन संकुचित करून घेतो.
 त्यापेक्षा आपल्या घरात आता एक नवीन माणूस येणार आहे, किती गम्मत! आता मला पण तिच्याकडून काहीतरी नवीन शिकायला मिळेल, कशी असेल बरं ती? असे कुतूहल मनात जागृत करणं आणि त्याच नजरेने नावीन्याचं स्वागत करणं आपल्याला वेगळ्याच वाटेवर घेऊन जाणारं असतं याची अनेकांना कल्पनाही नाही. खरं तर आपली मुलं आता मोठी आहेत, शिकलेली आहेत, त्यांना कळतं काय करायला हवं आणि काय करायला नको ते. कदाचित जास्त वेळा तो बायकोच्या माहेरी गेला आणि तिच्या माहेरीही ते पसंत असेल तर अशी काय जगबुडी होणार आहे? पण अनेकदा ते मुलाच्या आई-वडिलांच्या पचनी पडतंच असं नाही. आणि ते मुलांच्या पचनी पडू द्यायचं नाही हा विडा पालकांनी उचललेला दिसतो. आपल्या मुलांच्या वागण्याची जबाबदारी पालक सतत आपल्यावरच घेत असतात. अनेकदा असे दिसते की पालक मुलांना वाढूच देत नाहीत. त्यांना त्यांचे निर्णय घ्यायला मदत करणं आणि समजा ते पडलेच तर जरूर तिथे टेकू देणं इतकीच भूमिका पालकांची असायला हवी. आपल्या मुलांच्या संसारात नको तिथे ढवळाढवळ हा तर अतिशय संवेदनशील विषय.
शिरीषचं लग्न होऊन झाले होते चार-पाच महिने. रात्री शिरीष आणि त्याची बायको शीतल दोघे जण त्यांच्या खोलीत गेले की वीस-पंचवीस मिनिटांनी त्याची आई दरवाजा वाजवायची. ‘‘अरे शिरीष, तुला रोज रात्री दूध प्यायची सवय आहे. आज तू दूध प्यायला नाहीस. उघड बघू दरवाजा. तुझी काळजी मलाच हवी घ्यायला.’’ असं अनेकदा व्हायचं. शीतलच्या तळपायाची आग मस्तकात जायची. आणि परिणामी शिरीष आणि शीतलची भांडणं सुरू झाली.
लग्न झालेल्या मुला-मुलीच्या प्रत्येक कृतीमध्ये त्यांच्या आईची इतकी गुंतवणूक असते, की जणू काही आपल्या संसारात जे काही बाकी राहिलेलं आहे, ते आता पूर्ण करायचं आहे. त्यासाठी रोज तिच्याशी-त्याच्याशी संपर्क साधला जातो.  त्याची-तिची आई कोणत्याही शहरात, गावात असू दे ती तिथून आपल्या मुलाच्या-मुलीच्या संसाराकडे  बारीक लक्ष ठेवून असते. या सगळ्यामागची मानसिकता काय असावी असा विचार करत असताना दोन गोष्टी जाणवतात. एक म्हणजे आपल्या मुलांबाबत वाटणारा मालकी हक्क आणि दुसरे म्हणजे त्या आई-वडिलांचे स्वत:चे संपुष्टात आलेले सहजीवन. आपण बारकाईने जर आई-वडील, सासू-सासरे याच्या सहजीवनाकडे पाहिले तर ही गोष्ट नक्की जाणवते. त्यांचे आपापसातले नातेसंबंध जर पक्के बांधलेले नसतील तर आपल्या मुलांच्या आयुष्याकडे लक्ष देण्याशिवाय दुसरं करण्यासारखं त्यांच्याकडे काहीच उरलेलं नसतं. मुलांपेक्षा वेगळं विश्व असतं याचं भान फार थोडय़ा जणांना असतं.
त्याचप्रमाणं आपल्या मुलांच्या आयुष्याबाबत वाटणारा मालकी हक्क. आजपर्यंत मीच त्याच्या किंवा तिच्या सगळ्या गोष्टी पाहत होते, आता दुसरं कुणीतरी वाटेकरी आलं, ही भावना कितीही अमान्य केलं तरी पचनी पडताना दिसत नाही. हा प्रश्न विशेषकरून स्त्रियांबाबत जास्त दिसतो. त्यामुळे मुलं-मुली वयात आली की सासू-सासरे होण्याची तयारी सुरू करायला हवी, असं जे मी मागच्या लेखात लिहिलं होतं ते या संदर्भातही लागू होतं. आपल्या आयुष्याचा उत्तरार्ध अधिक सकस कसा होईल याचं नियोजन ज्यांनी-त्यांनी आधीच करायला हवं. त्यासाठी स्वत:चं आयुष्य आखता आलं पाहिजे. आपापले उद्योग, छंद नवीन नवीन गोष्टी शिकायला हव्यात. म्हणजे मग मुलांच्या आयुष्यात ढवळाढवळ करण्यासारख्या गोष्टींना आळा बसू शकेल. हा मुद्दा इतका सविस्तर लिहिण्याचं कारण असं की न्यायालयात दाखल होणाऱ्या घटस्फोटांपैकी ३० टक्के घटस्फोट हे आई-वडील, सासू-सासरे यांची त्यांच्या मुलांच्या संसारात असलेली ढवळाढवळ असल्याने होताना दिसतात. अगदी माझ्या मुलासारखा आहे हो माझा जावई, असं म्हणत म्हणत सेमी घरजावई करायचा, असेही अनेक कुटुंबात दिसून येते. त्यासाठीच वयाला अनुसरून वर्तन असणे ही प्रगल्भतेची मोठी खूण आहे.
केदारचे लग्न होऊन तीन-चार महिने झाले होते. केदार माझ्या मत्रिणीचा मुलगा. मी एक दिवस सहज तिला विचारलं, ‘कसे आहे नवदाम्पत्य?’ ती म्हणाली, ‘‘अगं, तुला एक गंमत सांगायची आहे, केदार रोज तिला स्वयंपाकात मदत करतो. मला काय वाटतं की त्याला कामात फारसा रस असेल असं नाही, पण तिच्या सहवासाची ओढ नक्की वाटत असणार आणि एकत्र काम केल्यामुळे सहवास मिळतो ना! लग्नापूर्वी मला मदत नाही करायचा, पण तिला करतो हे किती छान आहे नं! मी आपली लांबूनच त्यांची गंमत पाहत असते. मला अजून काय हवे? एक तर मला काम करावे लागत नाही आणि त्या दोघांचं चांगलं जमतंय हेही मनाला आनंद देणारं आहे.’’
मोठय़ा माणसांचं असं वयानुसार असणारं वर्तन प्रगल्भ असायला हवं. आपल्या मुलांच्या लग्नानंतर त्याचं लैंगिक आयुष्य सुरू होत असतं, हेसुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. त्या दोघांचं त्या बाबतीत जमलं की येणाऱ्या अडचणी या तुलनेने सोडवता येऊ शकणाऱ्या असतात. त्यासाठी त्या दोघांना भरपूर एकांत मिळणं अतिशय आवश्यक असतं. कदाचित ते दोघेही सुरुवातीच्या काळात उशिरा उठतील, एकमेकांच्या भोवती भोवती करतील, पण कालांतराने ते कमी होईल याचं भान मोठय़ांना असेल तर प्रश्न सोपे होतात. हे स्वातंत्र्य जर मोठय़ांनी दिलं तर आपल्या मुला-मुलींना आई-वडील, सासू-सासरे यांच्याबरोबर राहावंसं नक्कीच वाटेल.
आणखी एक प्रकर्षांने जाणवलेली गोष्ट म्हणजे सासूबाई स्वयंपाकघराचा ताबा सोडताना दिसत नाहीत. ते त्यांचं अघोषित साम्राज्य असतं. मग अशा वेळी ती नवीन सून त्यातून लक्ष काढून घेते. यात समजून घेणं हा भाग किती होतो हेही महत्त्वाचं आहे. गरज नसताना संवाद होत असेल तर बहुतांश वेळेला त्याचं समस्येमध्ये रूपांतर होतं. अनेक वेळा पालकांना जे सांगायचं असतं तेही ठामपणे त्यांना सांगता येत नाही. आम्ही तुमची मुलं सांभाळणार नाही, असं ठामपणे सांगणारे किती पालक आहेत? मुलंही त्यांना गृहीत धरतात. याही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. माझ्या निवृत्तीनंतर माझ्या आयुष्याचं नियोजन मी केलं आहे, हेसुद्धा सांगणं गरजेचं आहे. समजून घेणं हा भाग प्रत्येक नातं प्रगल्भ करण्यासाठी अतिशय आवश्यक आहे.
अशाच एक अनुराधाताई. एक प्रगल्भ सासूबाई. मला म्हणाल्या, कुण्या देशीचे पाखरू, माझ्या अंगणात आलं. पण ते पाखरू सुखाने नांदायचं असेल तर मलाच लवचीक फांदी व्हावं लागेल तरच ते झुलेल ना?    
 chaitragaur@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 7, 2013 1:01 am

Web Title: how to be a great mother in law or father in law part 2
टॅग Chaturang
Next Stories
1 रंगभूमीचं अपरिमित अवकाश
2 देवा श्रीगणेशा..!
3 चार पिढय़ांचा गणपती
Just Now!
X