मुलांची ‘माणसं’ करणं हे शास्त्र आहे, ती कला आहे. हे महत्त्वाचं काम आहे आणि तो स्वत:च्या विकासाचाही भाग आहे. पालकत्वाचा हा अर्थ समजून घ्या. मघ बघा, काय जादू होते ती. कारण मुलांवर प्रेम करा हे आपल्याला माहीत असतं, पण त्यांना सन्मानानं वागवा हे माहीत नसतं.!
आमची मुलं लहान होती तेव्हा लवकरच असं वाटू लागलं की, पालकत्व ही सोपी गोष्ट नाही. फार कठीण काम आहे ते! मुलं वाढवायला जो धीर, जे शहाणपण, जी सहनशक्ती, कल्पकता लागते; ती आपल्याकडे आहे का? प्रेम होतं, पण ते पुरेसं वाटत नव्हतं. कौशल्यं नव्हती. पुरेसा विचार नव्हता. मग आम्ही अभ्यासाला लागलो. पुस्तकं शोधली. अभ्यासक्रमांची माहिती काढली. काही अभ्यासक्रम पूर्ण केले.
मग लक्षात आलं की आपण मुलं जन्माला घालतो खरी, पण त्या मुलांची ‘माणसं’ करणं हे शास्त्र आहे, ती कला आहे. हे महत्त्वाचं काम आहे आणि तो स्वत:च्या विकासाचाही भाग आहे. आपली आता एक नाहीतर दोन मुलं. ती कायम आपले मित्र राहावीत, आपल्यातला संवाद टिकून राहावा, आपलं जगणं ‘क्वालिटी लाइफ’ असावं या साध्या अपेक्षा असतात.
  पालकत्वाच्या अभ्यासात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘आपण पालक म्हणून कसे आहोत?’ हे स्वत:ला विचारणं. काही पालक शिस्तप्रिय तर काही बेशिस्त, काही आळशी तर काही कामसू, काही झटपट तर काही चेंगट, काही रागीट तर काही शांत, काही सुजाण, काही अजाण, अभ्यासू-अभ्यास न करणारे, आधुनिक- पारंपरिक, हौशी-उदासीन, प्रगल्भ-बालीश.
 ज्यांना यातले गुण म्हणता येईल तसे आपण असलो तर मुलांच्या वाढीला त्याचा उपयोग होतो. दोषांचा तोटा होतो ही साधी गोष्ट आहे. पण पालकांना असं वाटतं की शिक्षण झालं, लग्न झालं, मुलं झाली; आता आपण मोठे आहोत, प्रगल्भ आहोत, आता आपण शिकावं असं काही उरलेलं नाही. शिकायचं ते मुलांनी. आपण शिकवायचं.
आणि हे शिकवण्याचं काम पालक सतत करत असतात. मूल चांगलं पोहत असतं तरी काठावरून बाबा सांगतच असतात, ‘‘हं, पाय मार जोरात.’’ मूल चित्र काढत असतं. त्याचं त्याला काढू दे ना! पण नाही. पालक सांगतात, ‘‘ हे फूल असं का काढलंस? असं काढ. पान निळं असतं का? हिरवं रंगव.’’ अशानं मुलाचा काही शिकण्यातला रसच संपेल अशी भीती नाही का वाटत? मुलांच्या कृतींवरची, वेळेवरची, जागेवरची ही आक्रमणं बंद झाली पाहिजेत. त्यांचं निवांतपण जपायला हवं.
आमची एक मत्रीण तिच्या सहा वर्षांच्या मुलीला घेऊन आमच्याकडे आली होती. तिला मी म्हटलं, ‘‘तिला काही खेळणी, पुस्तकं देऊ का?’’ तर ती म्हणाली, ‘‘काहीच नको. ती झोपाळ्यावर बसून तासन्तास आकाशाकडे पाहात राहू शकते.’’ हे फार छान होतं! तिचं निवांतपण आई-वडिलांनी जपलं होतं. कृष्णमूर्तीबद्दल असं लिहिलेलं वाचलं की, ‘त्यांचं मन लहानपणापासून रितं असे.’ असं रिकामं असणं म्हणजे पोकळ नव्हे तर शांत असणं, गजबजलेलं, गडबडलेलं, वादळात सापडलेलं नसणं. मुलांकडे ही क्षमता मुळात असतेच. ती जे करत असतात त्यात ती मनानं पूर्णपणे गुंतलेली असतात. शांत असतात. त्यांना भूक लागली, करायला काही नसलं, काही होत असलं तब्ब्येतीला, तरच ती अस्वस्थ होतात. त्यांचा मूळ स्वभाव उद्योगात रमण्याचा असतो. ही मुलगी नुसतीच आकाशाकडे बघते आहे, असं वाटलं तरी ते खरं नाही. ती शांतपणे बघते आहे, निरीक्षण करते आहे ते पुरेसं आहे. कुणी लगेच तिच्या मागे लागू नये की ‘आता दोन तास काय निरीक्षण केलंस त्यावर निबंध लिही बरं.’..
मुलांचं अवकाश असं व्यापून टाकायचा मोठय़ांना अधिकार नसतो. कारण खलील जिब्रान म्हणतात ते कायम लक्षात ठेवून मुलांना नम्रतेनं वाढवायला हवं.-
   तुमची मुलं ही तुमची नसतात.
   ती असतात जीवनाच्या स्वत:बद्दलच्या
   आसक्तीची मुलं
   ती तुमच्यातून जन्माला येतात, पण
   तुमच्यामुळे नव्हेत
   आणि जरी ती तुमच्याबरोबर असली
   तरी ती तुमची नसतात
  तुम्ही त्यांना तुमचं प्रेम द्या
  पण तुमचे विचार देऊ नका
  तुम्ही त्यांच्या देहाला निवारा देऊ शकता
  पण त्यांच्या आत्म्याला नव्हे
  कारण त्यांचे आत्मे वसतात ‘उद्या’त
  तिथे तुम्ही पोहोचू शकत नाही
  तुमच्या स्वप्नातही नाही.
  तुम्ही त्यांच्यासारखे होण्याचा
   प्रयत्न करू शकता
  पण त्यांना तुमच्यासारखं
  बनवण्याची धडपड करू नका.
  कारण जीवनाचा प्रवाह उलटा वहात नाही.
  तो कधीच ‘काल’पाशी घोटाळत नाही.
  तुम्ही आहात धनुष्य
  त्याच्या प्रत्यंचेवरून भविष्यात
  सोडले जाणार आहेत
 सजीव बाण, तुमची मुलं
  त्या धनुर्धराच्या हातामध्ये
  तुम्हाला वाकायचंय
  त्यात तुम्हाला आनंद मिळू दे.
    पालकत्वाचा हा अर्थ समजून घेतला तर आपलं मुलांवर अधिकार गाजवणं, त्यांना रागावणं, मारणं, त्यांचा अपमान करणं, सतत मागे लागणं, चारचौघांदेखत त्यांची लाज काढणं, त्यांना धमक्या देणं, सतत आज्ञा करणं, खोचक प्रश्न विचारणं, अविश्वास दाखवणं, शिक्षा करणं, अबोला धरणं, उपहास करणं, टोमणे मारणं, सगळं बंद होईल. ही सगळी हत्यारं आहेत ती वापरून आपण आपली सोय बघतो, मुलांवर ताबा गाजवतो, मुलांना जखमी करतो. हे सगळं टाळून तर बघा, काय जादू होते ती!
मुलांवर प्रेम करा हे आपल्याला माहीत असतं, पण त्यांना सन्मानानं वागवा हे माहीत नसतं ना!    

Height of Your Shadow Tells How Much Vitamin D Is Absorbed In Body
तुमच्या सावलीची उंची सांगते शरीराविषयी खूप महत्त्वाची ‘ही’ बाब; तज्ज्ञ सांगतात, उन्हाळ्यात कसा घ्यावा अंदाज?
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
1 in every 10 women in the world lives in extreme poverty
प्रत्येकी १० पैकी एका महिलेचं आयुष्य अत्यंत गरिबीत, युएन वुमेनच्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर
contract farming
शेतमजूर ते शेतकरी!