05-blog…विचार करता करता हसू यायला लागलं. आपण मोबाइलच्या किती आहारी गेलो आहोत याची लख्ख जाणीव झाली, पण त्याच वेळी आपला मोबाइलच आत्ता जवळ नाहीये म्हणून खूप हलकं हलकं वाटत होतं, संपर्कक्षेत्राच्या बाहेर असल्याने मुक्तपणाची एक सुखद भावना निर्माण झाली होती. माझा फोन आज माझ्याचसाठी ‘अनरिचेबल’ होता, पण त्या एका घटनेने किती गोष्टी लक्षात आल्या..

इतर अनेक दिवसांप्रमाणे तो कामाचा दिवस होता. सकाळची घाई-गडबड नेहमीसारखीच. एकीकडे घडय़ाळाकडे लक्ष आणि दुसरीकडे आवराआवर दोन्ही गोष्टी जोडीने सुरू होत्या. ‘बास, आता मात्र निघायलाच हवं’ असं घडय़ाळाच्या काटय़ांनी जाहीर करेपर्यंत डब्याची पिशवी आणि ऑफिसची पर्स तयार होती. आजचा पेपर आल्याआल्याच पर्समध्ये ठेवला होता. लिफ्ट येईपर्यंत घरी एक-दोन सूचना देऊन ‘छान वेळेवर निघाले’ अशा समाधानात आणि खरं तर एखादा गड सर केल्याच्या आविर्भावात घराबाहेर पडले. स्टेशनवर येऊन पाहते तो ‘लेडीज स्पेशल’ ३ मिनिटांत येऊ घातली होती. हुश्श! माझ्यासारख्या लोकलच्या प्रवासिनीला आणखी काय हवं? धावपळ न करता, या प्लॅटफॉर्मवरून त्या प्लॅटफॉर्मवर न जाता, न लोंबकळता, गाडय़ांच्या उशिराने चिडचिड न होता मी ऑफिसला अगदी सुखात पोचणार होते. क्या बात है! मी एकुणात प्रसन्न मूडमध्ये होते. गाडी आली, बसायला चांगली जागा मिळाली. मी बसले, पर्स उघडली आणि धस्स झालं. मोबाइल फोन घरीच विसरले होते..
माझा ‘मोबाइल’ हल्ली भराभरा ‘डिस्चार्ज’ होतो. त्यामुळे चाìजगला लावलेला फोन आणि चार्जर दोन्ही निघता निघता घेऊ असं ठरवलं होतं. तिथेच घात झाला. निघता निघता करायच्या दहा कामांमधली नऊ कामं केली आणि हे एक काम मात्र राहिलं. एकच असलं तरी किती महत्त्वाची गोष्ट मी विसरले होते. एकदम घाबरीघुबरी झाले. काहीच सुचेना. ‘फोन विसरलेय घरी’ एवढंच कळवण्यासाठी सुद्धा मोबाइलच हवा ना! आणि तोच आपल्याजवळ नाहीये. मोबाइल नाही, त्यामुळे एसएमएस नाहीत, ई-मेल्स नाहीत, फेसबुक नाही, व्हॉट्सअ‍ॅप नाही, न्यूज अपडेट्स नाहीत, कामांचे रिमाईंडर्स नाहीत.. बाप रे या ‘नाही’ची यादी वाढतच चालली होती. ऑफिसला जाता जाता आईला फोन करायचा रोजचा नियम. ती वाट बघत असेल, पण मी करू काय? ऑफिसचेही काही फोन करायचे होते, काही येऊ घातले होते..
हताश अवस्थेत काही काळ गेला. आणि अचानक जाणीव झाली. असं काय मोठं आकाश कोसळलंय? नसला एक दिवस मोबाइल तर कुठे बिघडलं? ऑफिसला पोहोचल्यावर मोबाइल विसरल्याचं कळवलं की झालं. पडतील थोडय़ा शिव्या, पण त्या अपरोक्ष. ठीक आहे, हरकत नाही. मघाशी ज्या गोष्टी नाहीत म्हणून पोटात खड्डा पडला होता, त्या नाहीत म्हणून आता छान वाटायला लागलं. ‘व्हॉट्सअ‍ॅप’ पूर्वी कुठे होतं? इतरांकडे आल्यावरही मी अनेक दिवस घेतलं नव्हतं. कशाला सतत कनेक्टेड -जगाच्या संपर्कात राहायचं? स्मार्टफोन येण्यापूर्वी तर फक्त रात्री तेही वेळ मिळाल्यावर ‘फेसबुक’ पाहात होते. आणि त्याही आधी मुळात मोबाइलच नव्हते तेव्हा? तासा तासाला, मिनिटा मिनिटाला स्टेट्स अपडेट्स थोडेच असायचे?
विचार करता करता हसू यायला लागलं. आपण मोबाइलच्या किती आहारी गेलो आहोत याची लख्ख जाणीव झाली आणि त्याच वेळी हा मोबाइलच आत्ता जवळ नाहीये म्हणून खूप हलकं हलकं वाटत होतं, संपर्कक्षेत्राच्या बाहेर असल्याने मनात मुक्तपणाची एक सुखद भावना निर्माण झाली होती.
माझ्या पुण्यातल्या मैत्रिणीची आठवण झाली. ज्याच्या त्याच्या हातात मोबाइल दिसायला लागला तरी तिने मोबाइल घेतला नव्हता. म्हणायची ‘घरापासून ऑफिस अध्र्या तासाच्या अंतरावर, हवाय कशाला मोबाइल? थोडा वेळ तरी स्वत:सोबत घालवावा की माणसाने. हं, पण तीही अखेर मोबाइलच्या नेटवर्कमध्ये अडकलीच म्हणा! मोबाइलच्या सर्वव्यापी संचारानंतर एक गमतीशीर प्रश्न विचारला जायचा. मोबाइल येण्यापूर्वी आपण डावा अंगठा कधी वापरत होतो का? खरंच! पण आता मात्र डावा अंगठाच काय, पण दोन्ही हाताची बोटं कायमच काहीतरी टाइप करण्यात गुंतलेली दिसतात. ट्रेनमध्ये, बसमध्ये, रस्त्यावरून चालतानासुद्धा. घरी असताना तर मुळी विचारायचंच नाही. माणशी किमान एक (कधी कधी दोन/तीनसुद्धा) मोबाइल हवाच, तो जवळही हवा आणि सतत त्यावर काहीतरी देवाण-घेवाण सुरू असायला हवी. आत्ता मी कॉफी शॉपमध्ये अमुक अमुक कॉफी पितोय, आत्ता काय म्हणे मॉलमध्ये चक्कर मारत्येय, तर आत्ता काय – केवढी काळोखी दाटून आल्येय- अगदी सेकंदा-सेकंदाला स्टेट्स अपडेट. आत्ता या क्षणी माझ्या मनात काय आहे, हे सगळ्या जगाला कळलंच पाहिजे या तीव्र इच्छेपोटीच बहुधा अशी ‘ताजी स्थिती’ पुन्हा पुन्हा ताजी होत राहते; केली जाते. पण ताजी स्थिती ‘फेसबुक’वर किंवा अन्य ठिकाणी लिहिल्यानंतर तरी समाधान वाटून स्वस्थ बसावं! तेही नाही. ते किती जणांनी पाहिलंय, कुणा कुणाला आवडलंय, त्यावर कुणाच्या प्रतिक्रिया आल्यायत, वगैरे वगैरे. ही साखळी न संपणारी. हे एक प्रकारचं व्यसनच बनून गेलंय. आणि यातून ‘नोमोफोबिया’ हा आजारही निर्माण झालाय. ‘नो मोबाइल फोन फोबिया’ याचं संक्षिप्त रूप म्हणजे नोमोफोबिया.
तुम्ही फोनशिवाय किती वेळ जगू शकता? दिवस किंवा तास तर राहू द्याच, निदान ५ मिनिटं तरी? की फोन नसला तर सहाव्या मिनिटाला अस्वस्थ होता? फोनची बॅटरी संपेल, नेटवर्क किंवा संपर्कक्षेत्र जाईल म्हणून सतत धास्ती वाटते का? आपल्याला कोणाचा मिस्ड कॉल नाही ना किंवा मेसेज, मेल नाही ना, म्हणून थोडय़ा थोडय़ा वेळाने फोन तपासून पाहता का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर ‘हो’ अशी असतील, तर तुम्ही या अत्याधुनिक आजाराला बळी पडलायत असं समजा.
या आजाराची पाहणी ब्रिटनमध्ये २००८ साली पहिल्यांदा करण्यात आली. त्या वेळी या आजारग्रस्तांचं प्रमाण ५३ टक्के एवढं आढळलं. २०१० मध्ये केलेल्या पाहणीमध्ये हे प्रमाण ६६ टक्क्यांवर पोचलंय. २०१४ मध्ये ते आणखीनच वाढलं असेल – हे आपण आपल्या आजूबाजूच्या मोबाइल धारकांकडे पाहून नक्की म्हणू शकतो.
अनेक अ‍ॅप्स बाळगून असलेला स्मार्ट फोन हातात आल्यामुळे निवांतपणा, मानसिक स्वास्थ्य नाहीसं झालंय, असा अनेकांचा अनुभव असेल. तिने का नाही उत्तर पाठवलं, ‘लास्ट सीन’ अमुक वाजताचं आहे. मग कुठे असेल आत्ता तो-ती? सारखे विचार अनेकदा पिच्छा सोडत नाहीत. एखादा शब्द अडला, ताबडतोब शब्दकोश उघडा, एखादी माहिती हवीय, गूगल सर्च करा, तात्काळ मेसेज पाठवा, तत्क्षणी मेल करा – हे प्रत्येक क्षण झेलण्याची, पकडण्याची गरज सतत नसते, हे लक्षात घ्यायला हवं. त्याऐवजी कधीतरी फोन बाजूला ठेवूनही बाकीचे व्यवहार होऊ शकतात. बोलणं, ऐकणं, पाहणं अशा अनेक गोष्टी फोनशिवायही बिनबोभाट होऊ शकतात. एखादं ठिकाण संपर्कक्षेत्राच्या बाहेर असेल तर फोनचा व्यत्यय नसणं हे खरोखरच खूप सुखाचं होतं.
आज माझंही तेच झालं होतं. माझा फोन आज माझ्याचसाठी ‘अनरिचेबल’ होता. त्यामुळे कोणत्याही अडथळ्याविना माझी कामं चालू होती. हे माझं ‘फीिलग हॅपी’ चं स्टेट्स, खरं तर अपडेट करायला पाहिजे असं मनात आलं. तेवढय़ात फोनची रिंग वाजली. म्हणजे फोन पर्समध्येच होता की काय! पण नाही. रिंग वाजली तरी तो भास होता. फोन जवळ नाही हे सत्य होतं आणि त्यामुळे दिवसभर वाटणारी मुक्तपणाची जाणीवही तेवढीच सत्य होती. त्यामुळे आता मी ठरवलंय. जसा ‘नो टीव्ही डे’, ‘नो कार डे’ असतो, तसाच ‘नो मोबाइल डे’ मी पाळणार आहे.
आपण आनंदी राहण्याचं ठरवलं, तर त्यापासून आपल्याला कोणी रोखू शकत नाही. त्यामुळे मी माझा निर्णय घेतलाय. तुमचं काय?
chaturang@expressindia.com