27 January 2020

News Flash

शंभर वर्षांची बेगमी

आजचा हा सुखी काळ येण्यासाठी कासारसाहेबांचे त्या दिवशी घरी येणे माझ्यासाठी ‘टर्निग पॉइंट’ ठरला.

| December 20, 2014 01:01 am

आजचा हा सुखी काळ येण्यासाठी कासारसाहेबांचे त्या दिवशी घरी येणे माझ्यासाठी ‘टर्निग पॉइंट’ ठरला. त्यांची मी शतश: ऋणी आहे. धान्य पेरले तर दहा वर्षांची बेगमी होते, पण शिक्षण पेरले तर शंभर वर्षांची बेगमी होते. हेच खरे.
मी सातवी पास झाले, पण माझे वडील जुन्या वळणाचे होते. मुलीला जास्त शिकवून काय उपयोग? असं ते म्हणत. त्यामुळे माझं शिक्षण बंद झाले आणि लग्नासाठी ‘उचित’ स्थळांचा शोध घेणे सुरू झाले. मला शिकण्याची खूप इच्छा होती, पण वडील कडक शिस्तीचे! त्यांच्यापुढे ब्र काढायची सोय नव्हती. जून महिना उजाडला, माझी हुरहुर वाढत होती. मात्र जुलै संपत आला तरी शाळेचे दर्शन घेण्याचा योग येईना. माध्यमिक शिक्षकांनी विचारपूस केली, पण काही उपयोग झाला नाही. वर्गातील इतर मुली कधी तरी भेटत. मला फार वाईट वाटे, पण काय करणार? मला बघण्यासाठी पाहुणे येत होते. मला लग्न करायचे नव्हते. आणखी पुढे शिकायचे होते.
 पण माझ्या आयुष्यातला एक दिवस उजाडला तो माझा टर्निग पॉईंट ठरला. माझे वडील शिक्षक होते. शाळेच्या तपासणीसाठी प्रांतअधिकारी येत असत. कासार नावाचे अधिकारी आमच्या शाळेला भेट देत असत. एके दिवशी ते शाळेत आले. शाळेची भेट झाली. माझ्या वडिलांनी त्यांना जेवणासाठी घरी आणले. दुपारची वेळ होती. मी त्यांना जेवायला वाढत होते. तेव्हा ते म्हणाले, ‘बाळ, तू घरी कशी?’ मी गप्पच त्यावर वडीलच म्हणाले, ‘तिचे लग्न करायचे आहे. त्यामुळे तिला शाळेत घातले नाही. आमच्या समाजात जास्त शिकलेली मुले मिळत नाहीत.’ यावर ते म्हणाले, ‘अहो गुरुजी, तुम्ही सुशिक्षित आहात. मुलीचे लग्न एवढय़ा लवकर करू नका. ती हुशार आहे. गावातच शाळा आहे शिकू द्या तिला.’ साहेबांपुढे वडिलांना काही बोलता आले नाही ते गप्प राहिले.
साहेब नुसते बोलून थांबले नाहीत तर शाळेत गेल्यावर त्यांनी एक मुलगा हायस्कूलमध्ये पाठवून तिथल्या शिक्षकांना बोलावून घेतले व मुख्याध्यापकांना माझा दाखला तयार करायला लावून त्या शिक्षकांकडे दिला व माझ्या वडिलांना सांगितले उद्यापासून मुलीला शाळेत पाठवा. वडील घरी आले मला म्हणाले, ‘‘उद्यापासून शाळेत जा.’’ हे ऐकताच मला खूपच आनंद झाला. मी मनापासून अभ्यास करायचे ठरविले. मी प्रत्येक वर्षी चांगल्या मार्कानी उत्तीर्ण होत होते. स्थळ शोधणे सुरूच होते. दहावीच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत माझे लग्न जमले त्यावेळी अकरावी होती. मी लग्नानंतर अकरावीची परीक्षा दिली. वर्षभरात मला मुलगा झाला. माझी शिक्षणाची इच्छा कायमच होती. सासरची परिस्थिती जेमतेम असल्यामुळे नोकरी करणे गरजेचे होते. वडिलांनी पुढाकार घेऊन मला बार्शी येथे अध्यापिका विद्यालयात डी.एड.साठी दाखल केले. माझा मुलगा एक वर्षांचा होता. त्याला सोडून जाताना जीवाची घालमेल होऊ लागली. त्याच्याच भवितव्यासाठी त्याचा विरह सहन करण्याची मी तयारी केली. डी.एड.नंतर मला मुलगी झाली. मुलगी वर्षांची असताना मला येथे नोकरी लागली.
नोकरी लागल्यानंतरही पुढचे शिक्षण घ्यावे असे वाटायचे, परंतु नोकरी, तीन मुले, घरच्या कामाची जबाबदारी, नोकरीत बदली या सर्व व्यापामुळे पुढील शिक्षणाचे विचार मनातच राहिले.
माझी तिन्ही मुले हुशार आहेत. त्यांच्या अभ्यासाकडे मी लक्ष दिले. त्यांचा पाया पक्का केला. तिन्हीही मुले उच्चपदावर नोकरी करीत आहेत. मुले मोठी झाल्यावर आम्ही दोघांनी कॉलेजच्या परीक्षा दिल्या. आम्ही दोघेही एम.ए.मराठी झालो.
आता मुलांचे संसार स्थिरस्थावर झाले आहेत. आम्ही दोघेही सेवानिवृत्तीचा काळ सुखात घालवीत आहोत. सुना-नातवंडे यांच्या सहवासात दिवस मजेत चालले आहेत. हा सुखी काळ येण्यासाठी कासारसाहेबांचे त्या दिवशी घरी येणे माझ्यासाठी ‘टर्निग पॉईंट’ ठरले. कासार साहेबांची मी शतश: ऋणी आहे. धान्य पेरले तर दहा वर्षांची बेगमी होते, पण शिक्षण पेरले तर शंभर वर्षांची बेगमी होते. हेच खरे.    

First Published on December 20, 2014 1:01 am

Web Title: hundred years victual
टॅग Chaturang,Loksatta
Next Stories
1 निद्रेबद्दलचे गैरसमज..
2 ‘मानस प्राणायाम’
3 सुवास्तू
Just Now!
X