शाकम कनेक्ट म्हणजे – शासकीय कला महाविद्यालय, औरंगाबाद येथील स्कूल ऑफ आर्टच्या आजी-माजी विद्यार्थ्यांनी २०१० पासून सुरू केलेला एक अभिनव उपक्रम – ते आहे जनाना महलच्या वास्तूचं कलादालनात नूतनीकरण. १९७१ पासून २००३ पर्यंत जनाना महलच्या (किला-ए-अर्क) ऐतिहासिक वास्तूमध्ये शासकीय कला महाविद्यालय भरायचं. आता बाजूलाच कॉलेजची नवीन इमारत झालीये. हाच जनाना महल सुरुवातीला झेब-उन्-निसा पॅलेस औरंगजेब यांच्या मोठय़ा मुलीच्या नावाने ओळखला जात होता. बीबी का मकबरा, बावन्न गेट, बावन्न पुरे, पवनचक्की ही जशी महाराष्ट्राच्या औरंगाबाद या टुरिझम कॅपिटल शहराची ओळख, तशीच या जनाना महलची ओळखही त्याच शृंखलेतली! जवळजवळ तीनशे वीस वर्षांपूर्वीची म्हणजे १६९२ पासूनची! औरंगजेब याने उभारलेली ही एक ऐतिहासिक वास्तू, जिथं औरंगजेबाच्या राण्यांचा जनाना महल होता. ती आता अडगळीत टाकली गेलीये. नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. त्या वास्तूचं ऐतिहासिक महत्त्व बघता ती जतन होणं फार गरजेचं आहे. त्यानिमित्ताने या जनाना महलाचे हे आत्मचिंतन..
खूप वर्षांनंतर ‘जनाना महल’च्या, माझ्या प्रांगणात चहलपहल बघत होतो मी! काही वेडय़ांनी तर अगदी जीव तोडून मेहनत घेतली होती या सगळ्यांसाठी. पण हे सारं कशासाठी, ते मात्र लक्षात येत नव्हतं. माझ्या इर्द-गिर्द वाढलेलं अडीच-तीन फुटांचं गवत, काडी-कचरा काढून मला श्वास घेण्याइतकं त्यांनी मोकळं केलं, तेव्हा माझ्या लक्षात यायला लागलं, नक्कीच इथं इव्हेंट असणार ..
सकाळपासून एकेक करून सारे जमत होते. इतक्या वर्षांनंतर परस्परांना भेटल्याचा आनंद कडकडून मिठी मारल्यावरही नजरे-नजरेतून ओसंडताना दिसत होता. चहा, कॉफीच्या चुस्क्यांसोबत ग्रुप ग्रुपने गप्पांचे फड रंगत होते. आपापसांत चाललेल्या त्यांच्या गप्पांनीच मला कळ्ळलं – माझ्या या इमारतीत; जिथं कधी शासकीय कला महाविद्यालय होतं, त्या विद्यालयात शिकून तयार झालेले आजी-माजी विद्यार्थी माझ्यासाठीच आज एकत्र येतायेत म्हणून! मी आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे, ही जाणीव झाल्यानं खडबडून जागे झालेत सगळे! माझ्याबद्दलचं त्यांचं बोलणं ऐकून मलाच एकदम गलबलून आलं..
तेव्हाचा माझा डामडौल तर फारच भव्यदिव्य होता. त्यानंतरही छान रचना होती माझ्या हरेक दालनात! इतका सुनसान मी कधीच नव्हतो. अगदी शेकडो वर्षांपूर्वीसुद्धा माझा हा परिसर चहूबाजूंनी कसा गजबजलेला होता. माझ्या आवारात पोहोचणाऱ्या नागमोडी वाटवळणावर कालपरवापर्यंतसुद्धा गुलमोहरांची व वटवृक्षांची झाडं गर्दी करून होती. आता तीही राहिली नाहीत.
इथं कला महाविद्यालय सुरू झालं त्या गोष्टीलाही आता चाळीस र्वष झाली. तो दिवस अन् आजचा दिवस.. इतक्या वर्षांनंतर ती रेलचेल आजच्यापुरती का होईना माझ्या या थकल्या डोळ्यांना पुन्हा पाहायला मिळणार म्हणून मन सुखावलंय!
अरे, हे काय?..माझ्या पावलांशी फुलांची ताटं उधळली जातायेत? टाळ्यांच्या कडकडाटात सगळे नतमस्तकही होतायेत माझ्या भग्न अवशेषांसमोर! होणारच. होणारच! ज्या भूमीवर मी उभाए ती आहेच इतकी पाक, की मागची तीनशे वीस र्वषच काय; येणारी हजारो र्वषही मी आठवणीत राहीन..
डोळ्यांसमोरच सारं घडतंय तरी उगाचच वाटतंय, हे नतमस्तक होणं आजच्यापुरतंच तर राहणार नाही ना? हा दिवस संपल्यावर जमलेल्यांच्या मन:पटलावरून माझं नाव पुसलं तर जाणार नाही ना? आत्ताच बघतोय मी, जो तो येतोय आणि जमलेल्या आपल्या मित्र-मत्रिणींना, ‘हाय’, ‘हॅलोऽ’ करण्यातच रंगून जातोय. माझ्यावर नजर फिरवणारे, माझ्यासाठी उसासे सोडणारे मोजकेच काही सोडले तर फारसं कुणाचं लक्षच नाहीये माझ्याकडे! माझ्यापेक्षा एकमेकांना भेटण्यातच त्यांना स्वारस्य दिसतंय. माझ्या साफसफाईसाठी झटणाऱ्या काही हातांना सोडून कुणालाही वाटत नाहीये की मलाही कचकचून आिलगन द्यावं, माझ्याशी बोलावं, रंगाचे पापुद्रे उडालेल्या माझ्या िभतीवरून मायेनं हात फिरवावा. आणि मलाही मनात साठलेलं कुणाला तरी भरभरून सांगायचंय; पण, पण कुणी जवळ येईल तर ना!.
अरे, हा कुणी विरळाच दिसतोय! या परिसरात पोहोचताच एका अनामिक आस्थेनं, ओढीनं वेडय़ागत पाहतोय तो माझ्याकडे लांबूनच! नजरही हरवल्यासारखीये. माझ्या आवारात पहिलं पाऊल पडताच एक नि:श्वास सोडला त्यानं. ‘शाकम’च्या बोर्डकडे पाहत पाहत आपल्या गुरुजनांजवळ येत त्याची पावलं थबकली! काही मित्रांचे आवाज त्याच्या कानी पडत होते तरी गुरुजनांच्या आशीर्वादानं भारलेली त्याची नजर मात्र माझ्यावरच खिळून आहे. मीही ओळखलं त्याला.. तडक तो निघालाय. कावरीबावरी नजर घेऊनच उभ्या जिन्याची एकेक पायरी तो चढू लागलाय. चौतीस वर्षांपूर्वी भूलभुलयासारख्या या पायऱ्यांची त्याने खूपदा चढ-उतार केली होती. याच पायऱ्यांवर काही चोरटय़ा नजरांच्या गुलाबी भेटी पाहिल्या होत्या. वरच्या मजल्यावरल्या शेवटच्या दालनात तो आला, जिथं त्याच्या कलेचा पाया रचला गेला होता. ज्या िभतीवरील फळ्यावर पांडेसरांनी त्याला कधी तरी परस्पेक्टिव्ह शिकवलं होतं, कुंभारसरांनी स्टील-लाइफ, लॅण्डस्केपबद्दल सांगितलं होतं, फळा तिथं नव्हताच! पण तो जिथं लटकवला जायचा त्या ठिकाणी काळाचे ओरबाडे बघून त्याचं मन गलबलून आलं. रंग उडालेल्या माझ्या त्या िभतीवर अलवार मनानं त्यानं हात फिरवला. खूप वर्षांनंतर कुणी तरी मला असं जवळ घेतलं होतं. माझ्या सर्वागावरून मायेनं हात फिरवत होतं. इतका वेळ थोपवून धरलेला त्याचा बांध फुटला. आणि मीही इतका वेळ रोखून धरलेलं माझं उसनं अवसानही गळालं. मीही भडाभडा रडू लागलो. अचानक काय झालं कुणास ठाऊक, अंगात काही तरी संचारल्यागत त्याची पावलं झपझप फिरू लागली अन् कॅमेऱ्याच्या एकेका क्लिकसोबत साठवत गेला तो माझं रूप! त्या वेळी आपल्या मनाची लेन्सही त्यानं ओपन ठेवली होती..
वाढलेल्या गवतातून कशीबशी वाट काढत नवीन इमारतीला जोडणाऱ्या इलिमेंट्री, इंटरमिजिएटच्या वर्गाजवळ तो आला. तेथील पत्रांना पडलेल्या भगदाडातूनच आत डोकावला. मोठे परमार सर त्याला शिकवताना दिसू लागले. फोटोग्राफीची डार्करूमही त्याला आठवली. एकेक करून त्याला परब, पेंडसे, लोखंडे, छोटे परमार, दहिवालसर; सारेच आठवले. एकेक करत मग सगळी दालनं तो वेडय़ागत पालथी घालू लागला.. तुटक्या विटा, उखडलेल्या लाद्या, फुटलेली तावदानं, जमलेली कोळिष्टके, टय़ूबलाइटच्या काचेचा खच, गंजलेले कडय़ा-कोयंडे, इमारतीचे भार पेलू न शकणारे आढे, िभतीच्या लाकडी पट्टीतून निखळलेल्या वीजप्रवाहाच्या वायरींसकट सगळ्यांनाच बसलेले काळाचे झटके त्याला बघवत नव्हते. मी अडगळीत टाकला गेलोय, ही खंत माझ्यासारखीच त्यालाही बोचू लागली..
जवळजवळ दीड तासाने तो बाहेर आला. माझ्या मागे असलेल्या हिमायत गार्डनवर त्याने नजर टाकली. गार्डनची रयाही आधीसारखी उरली नव्हती. ‘बीबी का मकबरा’ मात्र आधीच्याच ताठ मानेने उभा असलेला त्याला दिसला. त्याच्याकडे बघून मनातच तो बडबडला – भाग्य तुझं, अद्याप तुझ्याकडे लक्ष देणारे कुणी आहेत!
एव्हाना परस्परांशी गाठीभेटी आटोपून बाकीच्यांची जेवणंही आटोपायला आली होती. अरे, हे आणखी काय? आणखीही काही वेडे येतायेत. माझं अंतरंग कॅमेऱ्यात टिपून घेतायेत. माझा कोपरा-न्-कोपरा जतन करतायेत. म्हणजे हा एकटाच नाही तर, सारेच बावरलेत! एकाच माळेतील विखुरलेले मणी आहेत! फक्त िपड तेवढा वेगळा आहे. मीही वेडाच आहे. या एकाच्याच मागे फिरतोय केव्हाचा भारावल्यासारखा! मी नामशेष होण्याची चिंता तर सगळ्यांच्याच नजरेतून डोकावतेय. धगधगती मशाल होऊन सगळेच निघालेयेत मला पुन्हा उजेडात आणण्यासाठी!
खूप दिवसांपासून मला एक स्वप्न पडत होतं – देशी-विदेशी पर्यटकांनी माझ्या दालना-दालनात छान छान, बेमिसाल पेटिंग्ज् पाहण्यासाठी गर्दी केल्याचं! ते सत्यात यायला आजी-माजी विद्यार्थ्यांसोबत साऱ्या औरंगाबादकरांची साथ मिळाली अन् शासनाची दारं एकजुटीनं ठोठावली गेली तर.. तर माझा जीर्णोद्धार आता दूर नाही..
इथं घडलेल्या हजारो विद्यार्थ्यांसारखंच, इतकी र्वष ज्या भूमीवर मी बिनदिक्कत उभाए त्या भूमीचं, इथल्या मातीचं ऋण मलाही फेडायचंय. शाकम कनेक्टच्या रूपात चिंगारी पेटलीये. त्याचा वणवा व्हायला आता फार वेळ नाही..

Ragging on two postgraduate students at BJ Medical College in Pune print news
धक्कादायक! पुण्यातील बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तरच्या दोन विद्यार्थिनींवर ‘रॅगिंग’
20 people have recorded their testimony in the suicide case of nursing student in Nagpur
नागपुरात बी. एस्सी. विद्यार्थिनीच्या आत्महत्या प्रकरणात २० जणांनी नोंदवली साक्ष
Nursing Student s Suicide Prompts Summer Vacation
नागपुरात विद्यार्थिनीच्या आत्महत्येनंतर वसतिगृह रिकामे, महाविद्यालय प्रशासनाने मग…
MBBS student medical Nagpur
नागपूर : ‘एमबीबीएस’च्या विद्यार्थ्याने स्वत:ला खोलीत कोंडले !