21 February 2019

News Flash

जागा करा मुलांमधला न्यूटन

मुलांना प्रश्न पडले पाहिजेत. जर प्रश्नच पडले नाहीत तर विविध गोष्टींचा शोध कसा लागणार? गुरुत्वाकर्षणाचा शोध न्यूटनला पडलेल्या प्रश्नातूनच लागला.

| February 15, 2014 01:09 am

मुलांना प्रश्न पडले पाहिजेत. जर प्रश्नच पडले नाहीत तर विविध गोष्टींचा शोध कसा लागणार? गुरुत्वाकर्षणाचा शोध न्यूटनला पडलेल्या प्रश्नातूनच लागला. म्हणूनच मुलांसाठी ‘कुतूहल कोपरा’ तयार करायला हवा. प्रत्येक शाळेतून, प्रत्येक वर्गातून ज्यामुळे त्यांना प्रश्न पडतील आणि त्याची उत्तरे शोधण्यासाठी ते धडपडतील. आणि कुणी सांगावं त्यातूनही तयार होईल एक न्यूटन!
मुलांच्या डोळ्यातली उत्सुकता शाळेला दिसत होती. अंधारात आकाशात जसे तारे चमकतात तसे हे जमिनीवरचे चमकणारे डोळे! किती तरी मुलांच्या डोळ्यातली चमक विरघळून जाताना शाळा बघत होती. शाळेला माहीत होतं, यातली काही मुलं रानफुलांसारखी लवकरच कोमेजून जाणार आहेत. या शाळेला तिची एक श्रीमंत मैत्रीण भेटली. ती म्हणाली, ‘तू काय श्रीमंत आहेस. तुझ्याजवळ येणारी मुलं छान-छान कपडय़ांत असतात, तीन-तीन डबे आणतात, तुझी मुलं वेगवेगळे कपडे घालतात. तुझ्या मुलांना छान प्रयोगशाळा आहे, खेळणी आहेत आणि त्यांच्या आई-बाबांकडे पैसे आहेत. तसंही नंतर काहीच केलं नाही तरी चालतं त्यांना. नशीबवान आहेत ती.’
श्रीमंत शाळा गरीब शाळेला म्हणाली, ‘वरवर दिसायला हे सगळं छान दिसतं. गरजेपेक्षा जास्त असणं ही पण कधी कधी अडचण होते. कारण मग मुलं काहीच करीत नाहीत. तुझी मुलं मातीने मळतात. झाडाच्या सावलीत बसतात. पावसात भिजतात. चिखलात खेळतात, थंडीत-उन्हात शेकतात, पण.. पण माझ्या मुलांना हे काहीच करायचा मोकळेपणा नाही. अगं, त्यांना साधं चालायचंही बळ नसतं..’
‘तुझे प्रश्न वेगळे, माझे प्रश्न वेगळे. मला वाटायचं, मलाच फक्त प्रश्न आहेत. तू श्रीमंत आहेस म्हणजे तुला अडचणीच नाहीत असं मला वाटायचं.. तसं नाही एकंदरीत..दुरून डोंगर साजरेच गं!’
‘पण आज एवढं मनापासून बोलतेस त्या अर्थी काही तरी तुझ्या मनात खदखदतंय.. ’श्रीमंत शाळा म्हणाली.
‘‘बरोबर ओळखलंस! ज्याचं त्यालाच कळत गं! माझ्यापुढे प्रश्न वेगळाच आहे. मी मुलांना बघते तेव्हा.. असं वाटतं मला की ही मुलं किती उत्सुक असतात, त्यांना किती तरी गोष्टींचे कुतूहल असते. पण नंतर त्याचे काय होते? नंतर नंतर तर त्यांना प्रश्नच पडेनासे होतात. उत्सुकता संपते आणि मुलांची यंत्रे होतात..’’ गरीब शाळेनं आपलं मन मोकळं केलं नि तिनं नि:श्वास सोडला. ती विचार करू लागली, मुलांशी बोललं पाहिजे. अनेक मुलांच्या गप्पांतून तिनं हे ओळखलं होतं की, मुलांच्या प्रश्नांना उत्तरं मिळायला हवीत आणि मुलांना प्रश्न आधी पडायला हवेत. त्यासाठी काही तरी झाले पाहिजे. काही तरी केलं पाहिजे.
कोणी तरी शाळेत येणार म्हणून शाळेतले शिक्षक तयारीला लागले. आवराआवर सुरू झाली. अर्थातच शिक्षक कामात म्हणजे मुलांना काही तरी काम देतात, मग मुलं त्यांच्या राज्यात, हा क्षण मुलांना फार आवडतो. बेडय़ा गळून पडतात नि मुलं एकदम याऽहू करून आनंदानं बेहोष होतात. कधी कधी मुलांचं काम लवकर आटपतं नि मग दिलखुलास गप्पांना नुसता ऊत येतो. तसंच झालं. मुलांचे लहान लहान गट पडले. बागेत जशी आळी करून झाडं असतात ना, तशी लहान लहान गटांनी सगळी शाळा कुजबुजू लागली, दंगा करू लागली. शाळेतील हे दृश्य बघायला नेहमीच खूप आवडत असे. मुलं आनंदात की शाळा आनंदात. मुलांच्या गप्पा ऐकणं हा शाळेचा आवडता छंद होता. मुलांच्या गप्पांत आता शाळा सहभागी झाली.
‘आज काय गप्पांत अगदी दंग झालात ना!’
‘हो ना. अगं शाळा, आज कार्यक्रम आहे कसला तरी.. त्यामुळे आमचे सर-बाई त्यातच आहेत! मग आम्ही काय गप्पा मारणार. एरवी वेळ कुठे मिळतो? शिवाय आमचा अभ्यासही करून झालाय.. बरं! तू काय म्हणतेस? आज काही तरी विचारायचं मनात दिसतंय!’
‘तसंच काही नाही, पण आहे विचारायचं! तुम्हाला प्रश्न पडतात. त्याची उत्तरं कशी शोधता?’
‘उत्तरं पुस्तकात असतात. गाइडही असतात. मग उत्तरं शोधायचं टेन्शन कसलं?’
‘तुम्हाला असं वाटतं का की, सगळ्या प्रश्नांची उत्तरं पुस्तकात, गाइडमध्ये असतात म्हणून!’
‘..असं वाटावंच लागतं. परीक्षेत असेच प्रश्न येतात. त्यांना मार्क्‍स असतात. ते नाही मिळाले तर..’
‘ते तर मिळतातच, कारण पुस्तक समजलं किंवा नाही समजलं तरी उत्तरं येतात. तुम्ही फक्त उत्तरंच वाचता.. माझ्या मनात आज वेगळीच कल्पना आलीय.’
‘सांग ना! अगं असं कधी होतं का की तू काही सांगितलंस आणि आम्ही ऐकलं नाही! मग सांग ना लवकर..’
‘बघा हं! तुमच्या मनात कुतूहल असतं.’
‘कुतूहल म्हणजे?’
‘तुम्हाला अनेक गोष्टी समजून घ्याव्याशा वाटतात. अनेक गोष्टी पाहून तुमच्या मनात प्रश्न निर्माण होतात..’
‘असं झालं नाही तर?’
‘मग तुमच्यातला न्यूटन कसा जागा होणार?’
‘आमच्यात न्यूटन आहे? कुठाय?’
‘हो ना, फक्त झोपलाय. त्याला हलवा, जागं करा. त्यासाठी तुम्हाला प्रश्न पडायला हवेत आणि त्याची उत्तरे तुम्ही शोधली पाहिजेत.. हं तर कुतूहल म्हणजे हे सारं अवतीभवतीचं समजून घेणे, जाणून घेणे, त्याची उत्सुकता असणं.. मित्रांनो, न्यूटनला जर प्रश्नच पडला नसता तर?’
 शाळेचे हे बोलणं ऐकून मुलं एकमेकांकडे पाहू लागली. प्रत्येकाचं मन सांगत होतं. ‘काय वाटतं तुला? शाळा, सांग ना आम्हाला? तुम्हाला काय वाटतं काय करावं?’
‘काही सुचत नाही बुवा.’
खरं तर शाळेला मनातून वाईट वाटलं. मुलांनाच तर प्रश्न पडले पाहिजेत. त्याची उत्तरं त्यांनाच शोधावीशी वाटली पाहिजेत. काय करावं?
एक म्हणाला, ‘आमचे विज्ञानाचे सर प्रश्नमंजूषा देतात. मग आम्ही त्याची उत्तरे शोधतो. सर सांगतात. दुसरी म्हणाली, ‘गणित सोडविताना प्रश्न पडतात. मग त्याची उत्तरे जिथं अडतील तिथे सर समजून सांगतात. अजून काय?’
‘अरे दोस्तांनो, याशिवाय जग केवढं आहे. आता तर तुम्ही इंटरनेटच्या जगात वावरता, पण तुमचे प्रश्न.. एक आयडिया आहे.. आपल्या प्रत्येक वर्गात एक ‘कुतूहल घर’ असेल. वर्गातील मुलांचे दोन गट पाडायचे. कुतूहल घरात जे ठेवले असेल त्याला एका गटाने प्रश्न विचारायचे. त्या प्रश्नांची उत्तरे दुसऱ्या गटाने सोडवायची..’
‘कळलं नाही गं शाळा.’
‘आपण एका स्टुलावर ‘पेन’ ठेवलं. कोणते प्रश्न येतील तुमच्या मनात?’
‘पेनाचा उपयोग काय? पेनाचे प्रकार कोणते? पेनाच्या कंपन्या कोणत्या? पेन कुठे तयार होते?’ हळूहळू प्रश्न संपले. मग शाळा म्हणाली, ‘पेनचा जन्म कुठे झाला? कसा झाला?  पेनचे पहिले स्वरूप कसे होते? शाई कशी तयार होते? लिहिता येत नव्हते तेव्हा माणसं काय करीत? पेनचा शोध माणसाने का लावला? किती प्रकारची पेन्स असतात? यातल्या किती प्रश्नांची उत्तरे तुम्हाला माहीत आहेत? आणि वस्तू रोजचीच आहे, पण आपल्या मनात असे विचार आले का? का नाही आले? हाच प्रकल्प.
मुलांना मजा वाटली. मुलांच्या मनात कितीतरी प्रश्न निर्माण झाले. शाळा किती वेगळा विचार करते याचे नवल वाटले. मग काय? वर्गा-वर्गाचे ‘कुतूहल घर’ झाले. कधी माती, कधी दगड, कधी पुस्तक, कधी एखादा लाकडाचा तुकडा, कधी लोखंडाचा तुकडा.. किती तरी वस्तू कुतूहल घरात दिसायला लागल्या. हळूहळू शब्दकोश, संदर्भकोश, विज्ञानकोश इकडे मुलं ओढ घेऊ लागली आणि एरवी नुसतीच बडबड करणारी मुलं आता वेगळ्या अर्थाने गप्पा मारू लागली. पालकांनाही प्रश्न पडला मुलांच्यात असा हा एकदम बदल कसा झाला. शाळेच्या वर्गावर्गातलं ‘कुतूहल घर’ मुलांना खूप आवडलं नि मुलं उत्साहाने त्यात सहभागी होऊ लागली. मुलांमधली शोधकता वाढेल या विचाराने शाळेलाही आनंद झाला.
प्रत्येक वर्गात करता येईल असा ‘कुतूहल कोपरा’? अर्थात रोज नाही. गरजेनुसार त्याचा वेळ-काळ ठरविता येतो. बरं वस्तू ठेवायला खर्चही नाही. मुलांना प्रश्ननिर्मितीच करता येत नाही. कारण प्रश्न शिक्षकांनी विचारायचे, उत्तरं मुलांनी पुस्तकातल्या वाक्यात शोधायची. तेही घडत नाही. प्रश्नांचं स्वरूपच खूप उथळ असतं. ‘हिरवे पिवळे ऊन कोवळे’ या ओळीवर ‘ऊन कोवळे’ याचा अर्थ मुलांना कुठे जाणवतो. प्रश्न असतो ऊन कसे आहे? उत्तर असतं, ऊन हिरवे-पिवळे आणि कोवळे आहे. खरं तर या ओळीतून किती विषयांना स्पर्श करता येतो. शेती, भूगोल, विज्ञान.. एकदा का हे कौशल्य मुलांमध्ये निर्माण झालं तर मुलं-मुलांचीच प्रश्नपत्रिका तयार करतात. खूप मजा येते. बघा तर करून.
रोज शक्य आहे? मुलं रोज प्रश्न विचारून कंटाळतील? असले प्रश्न नकोच. अशा कामाला नकारातून सुरुवात नकोच. त्या ऐवजी ‘हे शक्य आहे’ असं म्हणू या आणि हो हे घरातही करता येते. या मुलांना प्रश्न-उत्तर- माहिती नि त्याचा जगण्यात वापर अशी शोध घ्यायची दिशा ठरवून द्यायची.  आणि बघा मुलं आपोआप आपला शोध घ्यायला सुरुवात करतील. कुणी सांगावं एखादा न्यूटन आपल्याच घरी जन्माला येईल.

 रेणू दांडेकर

First Published on February 15, 2014 1:09 am

Web Title: i am school let awake newton in each student
टॅग Chaturang,School