माझ्याबरोबर मला सांभाळणारी माझी माणसं होती म्हणून मला मिळालेला नकार सलला नाही. पण मी दिलेला एक नकार मात्र मी तो ज्या पद्धतीने दिला त्या पद्धतीसाठी मला अजूनही सलतो आहे. त्याच्यासाठी माफीची ओंजळभर ही फुलं..
मी त्या नाटकाची आणि त्या नाटकातल्या राजकन्येची आयुष्यभर ऋणी राहीन..
ती राजकन्या, अतिशय सुंदर आणि हुशार असते. तिला तिच्यासारख्याच हुशार मुलाशी लग्न करायचं असतं. एक वेळ त्याच्याकडे पैसे नसतील फार, तरी चालेल, पण तिने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं मात्र त्याला आलीच पाहिजेत अशी तिची अट असते. एके दिवशी तिच्या राज्यातल्या धोब्याचा मुलगा तिला मागणी घालायचं ठरवतो. तो राजवाडय़ात पोहोचतो. तिची विचारपूस करतो. ती तिच्या बागेत असते. हा तिथे पोहोचतो. त्याला ती दिसते. एक एक करत प्राजक्ताची फुलं डौलदारपणे वेचणारी. तो तिच्यापाशी पोहोचतो. ती त्याला नकार देईल, असं प्रेक्षक म्हणून आपल्याला स्पष्ट दिसत असतं, इतका तो बावळट असतो. ती त्याचा अपमान करणार अशी खात्रीच वाटायला लागते. सुंदर राजकन्यांनी गर्विष्ठ असायलाच हवं आणि अशा बावळटाचा अपमान करणं तर त्यांचं कर्तव्यच असतं, अशी समजूत लहानपणापासून ऐकलेल्या कुठल्याशा गोष्टीमुळे मनाच्या कोपऱ्यात सुप्तपणे होती. धोब्याचा मुलगा राजकन्येला अत्यंत बेधडकपणे मागणी घालतो, तेव्हा पाहणाऱ्याला तो जरा आगाऊच वाटतो. ‘कुठे राजकन्या, कुठे धोबी’.. असं म्हणून आता राजकन्या छद्मी हसेल असं प्रेक्षकातल्या मला वाटत असताना समोर मात्र वेगळंच काही घडत जातं. राजकन्येच्या सुंदर चेहऱ्यावरचं सौम्य, मोहक हसू जरासुद्धा कमी होत नाही. ती एक क्षण त्याच्याकडे पाहते आणि पुन्हा फुलं वेचत राहते. वेचता वेचताच त्याला म्हणते ‘माझ्या एका प्रश्नाचं उत्तर देशील?’  तो मूर्खासारखा ‘विचार विचार’ म्हणतो. ती फुलं वेचता वेचताच त्याला कोडय़ात टाकणारा एक प्रश्न विचारते. तो मुखस्तंभासारखा उभा राहतो. सगळं प्रेक्षागृह हसतं. पण ती नाही हसत. ती त्याला अत्यंत प्रेमाने म्हणते, ‘मी नाही तुझ्याशी लग्न करू शकणार..’ नंतर शांत हसून ती गोळा केलेली हातातली ओंजळभर फुलं त्याच्या हातात ठेवते आणि निघून जाते.. प्रकाश मंद होत असतानाच रंगमंचाबरोबरच प्रेक्षागृहातल्या सर्वाच्याच मनावर समजुतीचा शांत पडदा पडत जातो. त्या पडद्याबरोबर उकलत हळूहळू वाजू लागलेल्या समजुतीच्या टाळ्या माझ्या मनात एक शरमिंदा आवंढा आणतात.. माझे डोळे शांत झरू लागतात..
आपलं प्रेम दुसऱ्यासमोर व्यक्त करण्याच्या कित्येकांच्या कित्येक तऱ्हा असतील. काही जण आत्मविश्वासानं, ऐटबाजपणे ते सांगू शकत असतील. काही जण घाबरगुंडीनं बावळट होऊ जात असतील. जे काही असेल; प्रत्येक व्यक्त करणाऱ्याचा हा क्षण फार लवलवता असतो. विशेषत: तो त्याच्यासाठी. ज्याला होकार किंवा नकार द्यायचा आहे त्यापेक्षा जो पहेल करून आपलं प्रेम सांगतो आहे त्याचं किती काय काय पणाला लागलेलं असतं. त्या विचारणाऱ्याला समोरची व्यक्ती किती किती आणि काय काय असते.. तिच्यासमोर आपल्या खूप आतलं काहीसं तो धाडकन उघडं करत असतो. त्या क्षणाचा राजकन्येनं ठेवला तसा मान ठेवणं किती जणांना जमतं? आणि ज्यांना जमत नाही त्यांना का जमत नसेल?
कॉलेजात असताना माझा माझ्यावर काडीचा विश्वास नव्हता. कुणी मुलगा माझ्या प्रेमात कधीच पडेल असं वाटायचं नाही. त्यामुळे मी राहायचेसुद्धा गबाळ्यासारखी. कुठल्याही कुडत्यावर कुठलीही सलवार चढवून कॉलेजला जायची, त्याचं मला काहीच वाटत नाही असं दाखवायची. त्यामुळे आगाऊ आणि बेधडक वाटायची. ‘रोज डे’ला घाबरून कॉलेजलाच जायचे नाही कारण मला एकही ‘रोज’ मिळणार नाही असं वाटायचं. जी ‘रोज क्वीन’ होईल ती सुंदर असली तरी कशी निर्बुद्ध आहे असं म्हणत दुसऱ्या दिवशी कॉलेजात जाऊन मैत्रिणींना टाळ्या देत खिदळायचे. ‘रोज डे’ फालतूपणा असतो वगैरे बडबडायचे. माझी खात्री होती, जर प्रेमप्रकरण व्हायचं असेल तर मलाच त्या मुलाला विचारावं लागेल. मी विचारलंही. त्या मुलानं मला त्याच्या घरी बोलावलं. मी पंधरा वर्षांची, तो सोळा. त्यानं मला चहा करायला सांगितला. मी म्हटलं, ‘मला येत नाही’. मग तो ‘ऑम्लेट कर’ म्हणाला. तर मी ऑम्लेटरूपी अंडय़ाचा करपलेला काळसर-पिवळा चुरा त्याच्या पुढय़ात ठेवला. त्यानं अचानक आठवल्यासारखं, त्याला दुसरीच कुणी मुलगी आवडत असल्याचं सांगितलं. आणि माझा पहिला प्रेमभंग झाला. मी रडरड रडले. पुन्हा कधीच लग्न न करण्याचा निश्चय केला. त्यानंतर रोज संध्याकाळी मी गॅलरीत बसून लपून रडत असे. आठवडाभर हा प्रकार (माझ्या नकळत) पाहिल्यावर आईनं एके दिवशी मला गॅलरीतून आत, घरात यायला सांगितलं. मी भराभरा डोळे पुसून आत आले. बाबा आरशासमोर दाढी करत होते. त्यांनी मला प्रेमळ स्वरात विचारलं, ‘काय झालं बाळा?’ मी अचानक भोकाड पसरलं आणि बाबांना माझ्या प्रेमभंगाविषयी सांगितलं. बाबा रेजरनं गालावरचा फेस काढत एक गाल फुगवलेल्या अवस्थेतच माझं ऐकत होते. मी धुमसत घोषणा केली, ‘आता मी कधीच लग्न करणार नाही!’ बाबा शांतपणे म्हणाले, ‘का?’ माझा प्रेमभंग होऊनही ते असं कसं विचारतात हे न कळून मी भोकाड कायम ठेवलं. मला थोडं रडू देऊन बाबा म्हणाले, ‘तुझ्या आईच्या आधी दोन मुलींनी मला नकार दिला होता. मी जर तुझ्यासारखंच लग्न न करण्याचा निर्णय घेतला असता तर आज तू असतीस तरी का?’ ते दाढी करतच राहिले. चावी दिलेल्या खेळण्याची चावी संपावी तसं माझं रडणं थांबलं. ‘तुम्ही खोटं बोलताय ना?’ बाबा शांतपणे म्हणाले, ‘विचार आईला’ तेव्हा मला बाबांचं पटलं. एका क्षणात मी आनंदी झाले. आता जाणवतं, बाबा चक्क खोटं बोलले होते, कारण बाबा इतके राजबिंडे होते की सगळ्या मुली त्यांच्यामागे असायच्या. त्यांना कोण नाही म्हणेल! पण माझी समजूत पटली खरी. माझ्याबरोबर मला संभाळणारी माझी माणसं होती म्हणून मला मिळालेला नकार असा सलला नाही. पण मी दिलेला एक नकार मात्र मी तो ज्या पद्धतीने दिला त्या पद्धतीसाठी मला अजूनही सलतो.
माझा एक कॉलेजमधला मित्र होता. तो माझ्या घराजवळ राहायचा, त्यामुळे रोज त्याच्या गाडीवर मला कॉलेजमधून घरी सोडायला यायचा. आम्ही भरपूर गप्पा मारायचो, खूप हसायचो. एके दिवशी नेहमीप्रमाणे मला घरी सोडायला म्हणून तो आला आणि मी गाडीवरून उतरून निघणार तोच मला म्हणाला, ‘थांब पाच मिनिटं, बोलायचं आहे.’ त्याच्या आवाजात एक वेगळीच थरथर होती. ‘बोल ना,’ असं मी म्हणताच तो अचानक म्हणाला, ‘मला तू आवडतेस.’ त्याचा चेहरा मी पूर्वी कधीच असा पाहिला नव्हता. लहान मुलासारखा. आता रडू फुटेल असा. एक क्षण खूप आश्चर्य वाटलं. मग काहीच कळेना काय करायचं; मी खदाखदा हसायलाच लागले. ‘वेडाबिडा आहेस का तू?’ त्याचा चेहरा कुस्करल्यासारखा वेडावाकडा झाला. तो कसाबसा हसण्याचा प्रयत्न करत म्हणाला, ‘हसतेस का?’ मी एकदम त्याला म्हणाले, ‘ए बाबा, माझ्या मनात तसलं काही नाही हा!’ मी हसतच राहिले. तो शक्य तितका शांत आवाज ठेवून म्हणाला, ‘ठीक आहे, पण हसू नकोस.’ त्याचं माझ्याविषयीचं वाटणं कॉलेजमध्ये इतरांना त्यानंच सांगितलं असावं. सगळे त्याबद्दल त्याची टर उडवायचे. हळूहळू मीही उडवायला लागले. इतरांची टर तो उडवून लावायचा, पण मी टर उडवली की त्याचा चेहरा विस्कटून जायचा. स्वत:ला एवढं संवेदनशील म्हणवणाऱ्या मला माझी संवेदना त्या काळात गेली तरी कुठे होती?  हे कधीच कसं दिसत नव्हतं. हळूहळू त्यानं माझ्याशी बोलणं पूर्ण थांबवलं. मला काहीच फरक पडला नाही. ‘गेला उडत’ म्हणून मी माझ्याच जगात. मी राष्ट्रीय नाटय़ विद्यालयात गेले. त्यानंतर अचानक काही निमित्तानं त्याची आठवण झाली. तोपर्यंत वय आणि समजूत दोन्ही वाढलं होतं. मी त्याची माफी मागणारं एक मोठं थोरलं पत्रं त्याला पाठवलं. त्याच्या उत्तराची वाट पाहत राहिले. एके दिवशी त्याचं पत्र आलं. ते अर्वाच्च शिव्यांनी भरलेलं होतं.
तो माझ्या आयुष्यातला पहिला माणूस होता, ज्यानं मला सांगितलं होतं, की त्याचं माझ्यावर प्रेम आहे. हे किती मौल्यवान आहे.. त्या वयात त्याचं मोल नाही राखता आलं. आज, आत्ता या नाटकाचा पडदा पडताना मी माझे झरणारे शरमिंदे डोळे पुसते आहे. नाटकातली राजकन्या धोब्याच्या मुलाला फुलं देऊन कधीची निघून गेलेली आहे. तिच्या त्या ओंजळभर फुलांसाठी आज मीही राजकन्या होईन म्हणते.. आज, माझ्या मित्राच्या पत्रभर शिव्यांच्या बदल्यात माझ्याकडून त्याला माफीची, प्राजक्ताची ओंजळभर फुलं!

land reforms
UPSC-MPSC : भारतातील जमीन सुधारणा अपयशी का ठरल्या? त्यामागची नेमकी कारणे काय होती?
chatura article on immoral relations, immoral relations in marathi
अनैतिक संबंधांना न्यायालयीन संरक्षण देता येणार नाही…
farmer protest marathi news, farmer protest for msp, minimum support price marathi news
टीकाकारांना हमीदर मागणाऱ्या शेतकऱ्यांइतकी समज कधी येणार?
article about society s attitude towards sports careers
चौकट मोडताना : सहज स्वीकार नाहीच