20 March 2019

News Flash

मी आहे ना

शब्द तीनच. ‘मी आहे ना’. राधाने उच्चारले, आणि वाल्या कोळ्याच्या बायकोने उच्चारले नाहीत. दोन्हीचा परिणाम चांगलाच झाला त्या दोघांवर. असं कसं आणि का? उत्तर आहे

| April 12, 2014 02:31 am

शब्द तीनच. ‘मी आहे ना’. राधाने उच्चारले, आणि वाल्या कोळ्याच्या बायकोने उच्चारले नाहीत. दोन्हीचा परिणाम चांगलाच झाला त्या दोघांवर. असं कसं आणि का? उत्तर आहे परिस्थितीमधील भिन्नता. केवढा फरक आहे या दोन परिस्थितींमध्ये. रवी चांगलं काम करीत असताना राधाने ‘मी आहे ना’ म्हणून आधार दिला, तर दुसरीकडे वाईट कामात भागीदार होणं नाकारल्याने, त्या नकारामुळे महाकाव्य घडलं होतं. काय किमया घडू शकते ‘मी आहे ना’ या शब्दांतून.
माणूस येताना एकटा येतो. कोणाचीही मदत न घेता तो देह, फिरत राहतो सर्वत्र! त्याचं देहात लपलेलं अदृश्य मन मात्र कधीच एकटं नसतं. कायम कोणा एखाद्याच्या सहवासाची खातरजमा करीत भिरीभिरी आपल्या अवतीभवतीच्या माणसांना चाचपडत राहतं. त्यातलं कोणी अस्पष्ट जरी बोललं, ‘मी आहे ना.’ तर लगेच त्याची कळी खुलते. स्मितहास्याची एक लकेर उठून डोळ्यांनीच सांगितलं जातं, ‘बरं झालं तू आहेस माझ्या बरोबर म्हणून.’ ताबडतोब स्वीकार होतो शब्दांमुळे त्या व्यक्तीचा. प्रत्यक्षात नाही भेटलं कोणी असं म्हणणारं, तरी मनातल्या मनात कोणाला तरी बरोबर घेऊनच फिरत राहते मानवी मन. साथ लागते आयुष्यभर कोणाची तरी. स्वत:हून आपलेपणाने कोणी म्हटलं ‘मी आहे ना’ तेव्हा खूप मोठ्ठा भावनिक आधार वाटतो.
व्यावहारिक जगात जवळच्या माणसाने संकटसमयी ‘मी आहे ना’ म्हणून त्रस्त माणसाला आधार द्यायला पाहिजे. पण तो दिला जातोच असं नाही. असतात अनेक कंगोरे यालाही. प्राण एकवटून वेडय़ा आशेने वाट बघतो, कोणी येईल, म्हणेल असं काही तरी धीराचं, देईल आधार. खचून जाताना केवळ आतून ऊर्जा खेचून घेताना श्रद्धास्थानी भडभडून ओकलं जातं. त्याच आधारावर ताकद गोळा करीत सामोरं जायची हिम्मत बांधली जातेच. तरीही ‘मी आहे ना’ हे तीन शब्द, असण्याची भावना बिचाऱ्याला उपाशी ठेवते. कुठली अनामिक शक्ती असते या शब्दांमध्ये?
रवी एक मोठा शास्त्रज्ञ. अचानक दिसायचे प्रमाण कमी झाले, रॅटिनावर पटल यायला लागलं आणि काही दिवसांतच डोळ्यांपुढे पूर्ण अंधकार आला. घरात तीन लहान मुली आणि राधा. यावर काही उपाय नाही, असं डॉक्टरांनी अगदी स्पष्ट सांगितलेलं. राधाच्या पायाखालची जमीन सरकलीच. डोकं अगदी सुन्न झालं. चिल्लय़ापिल्लय़ा तिघी जणी दोघांकडे बघताबघता ‘आई’ म्हणून बिलगल्या. त्यांच्या त्या मऊ स्पर्शाने राधा अचानक खंबीर आणि निर्धारी बनली. रवीचा हात हातात घेऊन राधा म्हणाली, ‘मुली घाबरल्यात कालपासून. ‘मी आहे ना’ कायमची तुझ्याबरोबर. होईल ते होईल. माझा फक्त हात धरायचास तू.’ सर्व ताकदीनिशी राधा उठलीच. ‘मी आहे ना’ धीराने रवीही सावरला. त्यानेही शेवटपर्यंत केली नोकरी. तिघी जणी खूप ‘मोठय़ा’ झाल्यात आज.

तसंच काहीसं शेजारच्या घरात घडत होतं. शमा आणि अभय दोघांच्या नोकऱ्या, छोटंसं गोड सात-आठ महिन्यांचं बाळ, आणि शमाची परीक्षा. घरात हे तिघेच. कसा अभ्यास करायचा? पुढची प्रमोशन्स घेताना पासचा शिक्का हवा होता. परीक्षा तर आली जवळ. एक दिवस अभय म्हणाला, ‘‘पंधरा दिवस मी घरून काम करणार आहे, तू बेडरूममध्ये फक्त अभ्यास करायचा. घरातलं, स्वयंपाक आणि बाळाला मी बघेन. परीक्षेत उत्तम यश मिळवशील तू. काही काळजी करायची नाहीस. ‘अगं, ‘मी आहे ना,’ मस्त सांभाळतो की नाही बघच.’ ‘मी आहे ना’ म्हणत जवळ येणारी अशी माणसं लाभणं गर्भश्रीमंत बनवतं. त्यांनी देऊ  केलेला आधार आत्मिक सुख देऊन यशाला खेचून घ्यायला मदत करतो. जगताना अनेक वळणांवर अशा लोकांना वाटाडय़ाची भूमिका देतो आपण. कोणा एकाने ‘मी आहे ना’ म्हटलं आणि देऊ  केली उभारी, मग प्रत्यक्षात मदत करो वा ना करो. हवी असते फक्त जवळ असल्याची जाणीव, दुराव्याचा शेवट.
का कोण जाणे मला आठवण झाली ती एकदम वाल्या कोळ्याच्या बायकोची. काय नाव तिचं? कुठे वाचलं नाही. कोणी सांगितलंही नाही. सांगायची गोष्ट अशी की, वाल्या कोळ्याने धावत घरी येऊन विचारले, ‘माझ्या पापाचे वाटेकरी कोण कोण होणार?’ बायको गप्प. तेव्हा जर तिने राधासारखं म्हटल असतं, ‘मी आहे ना’ कायमची तुझ्याबरोबर.’ तर, रामनामाचा जप झाला नसता. मुंग्यांनी वारूळ केलं नसतं. वाल्याचा वाल्मीकी झाला नसता. पण रामायण व्हायचं होतं तेसुद्धा वाल्या कोळ्याच्या वाल्मीकीकडून. म्हणून तिने ‘मी आहे ना’ स्वत:ला वाचविण्यासाठी उच्चारलंच नाही. कारण गौण, पण परिणाम खूप महत्त्वाचा झाला. तीन शब्दांची अनुपस्थिती त्याला तीव्रतेने जाणवली. ‘माझी अर्धागीच माझ्याबरोबर राहणार नसेल तर मी काय करू?’ वाल्या कोळ्याने नारदमुनींना विचारले, एकटे पडण्याच्या दु:खातून निर्मिती झाली ऋषी वाल्मीकींची आणि त्यापाठोपाठ रामायणाची. त्याचे सगळे श्रेय द्यायला हवे वाल्या कोळ्याच्या बायकोला.  
शब्द तीनच ‘मी आहे ना’. राधाने उच्चारले, आणि वाल्या कोळ्या च्या बायकोने उच्चारले नाहीत. दोन्हीचा चांगला परिणाम झाला त्या दोघांवर. असं कसं आणि का? उत्तर आहे परिस्थितीमधील भिन्नता. केवढा फरक आहे या दोन परिस्थितींमध्ये. रवी चांगलं काम करीत असताना राधाने ‘मी आहे ना’ म्हणून आधार दिला आणि तर दुसरीकडे वाईट कामात भागीदार होणं नाकारल्याने, त्या नकारामुळे महाकाव्य घडलं होतं.
कोणाच्या पाठी आधारवृक्ष बनून उभं राहायचं हे ठरविण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहेच. आपल्या न बोलण्याने कोणी व्यक्ती वाईट कृत्यापासून परावृत्त होत असेल, तर का आपले आधाराचे अस्तित्व उभे करायचे, वाईटाला खतपाणी घालत पापाचे डोंगर उभारायचे? हे प्रत्येकानं ठरवायला हवं.
कसं असतं ना आपलं, म्हणजे बघा, डोळ्यात कुसळ गेलं तर काढायला कोणीही चालतं, समोरच्याला आपण पटकन म्हणतो, ‘काही दिसतंय का हो? गेलं वाटतं काही तरी डोळ्यात. काढा बरं पटकन.’  पण, मनातली सल काढायचा साधा विचार भंडावून सोडतो. कोणाला सांगायचं, कसं काय बोलायचं, असे प्रश्न त्रास देतात. तेव्हा हीच माणसं लागतात, ज्यांनी स्वत:हून वेळोवेळी सांगितलेलं असतं, मी आहे ना. त्यांच्याच जवळ बोललं जातं अगदी आतलं मनातलं. सल सहज लक्षात येईल, दिसेल अशी नसतेच वरवरची. असते खोल रुतलेली. व्यक्त होते जवळच्या माणसाकडे. माणूस आयुष्य जगतो, ते स्वत:च्या बळावर कमी, अन् इतरांच्या खऱ्याखोटय़ा सहवासावर जास्त.
 माणूस एकटा आला, तसा एके दिवशी एकटाच जाणार, हे माहीत असतं. पण जायची तयारी कोणाची नसते. मृत्यूची भीती जबरदस्त असते प्रत्येकालाच. जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत हे जग सुंदर असते. कोणाला पटो, न पटो, पण आपण आहोत म्हणून हे जग आपलं आहे, त्याला अस्तित्व आहे. स्वत:चं असणं सगळ्यात श्रेष्ठ. आपणच संपल्यावर काय करायचं या जगाचं. म्हणूनच आपण सगळे मरणाला घाबरतो. का वाटते मृत्यूची भीती? कारण तिथे कोणी बरोबर येत नाही. कितीही अवघड, भयप्रद असले तरी जाताना एकटेच जावे लागते. ‘मी आहे ना,’ असं कोण कोणाला कसं काय म्हणणार? जाता येतच नाही दोघांना हातात हात घालून पलीकडे. पण एवढं मात्र खरं की, आपल्या पश्चात आपल्या जिवाभावाच्या माणसांची काळजी घेणारं कोणी भेटलं आणि म्हणालं, ‘अप्पा, उगीच जाताना हळवं होऊ नका, ‘ मी आहे ना.’ माझ्यापरीने सांभाळून घेईन घरातल्यांना. जाताना ओझं नका नेऊ.’ म्हणजे, जरी बरोबर येणार नसलं कोणी तरीही मृत्यूच्या दारापर्यंत कोणीतरी आपलं असतं, हायसं वाटणारे शब्द देतं जाताजाता. केवळ या हायसं वाटायच्या भावनेनं सुखानं राम म्हणता येतं. यालाही पुण्याई लागतेच.    

First Published on April 12, 2014 2:31 am

Web Title: i am there for you