आज राज्याच्या पोलीस खात्यात असंख्य पोलीस आपलं कर्तव्य बजावत आहेत. प्रत्येक क्षेत्राप्रमाणे यातही चांगल्या-वाईट प्रवृत्ती आहेतच, मात्र अनेकदा सरसकटीकरण करून सगळ्याच पोलिसांना बदनाम केलं जातं. पोलिसांचे ताणतणाव, त्यांच्या जबाबदाऱ्या आणि मुख्य म्हणजे त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर त्याचा होणारा परिणाम याकडे कुणीच लक्ष देत नाहीत आणि याचा परिणाम त्या पोलिसांनाच वैयक्तिकरीत्या भोगावा लागतो. पोलिसांच्या मुलांचे हे काही कटू अनुभव.
‘लखनभय्याप्रकरणी १३ पोलिसांसह २१ जणांना जन्मठेप’ १२ जुलैला बातमी झळकली. मी खूप अस्वस्थ झाले. मला त्या पोलिसांचे कुटुंबीय, त्यांची मुलं दिसू लागली. एप्रिलमध्ये पोलीस खात्यांमधल्या मुलांशी मारलेल्या गप्पा आठवू लागल्या. आजच्या बातमीचा संदर्भ देत वर्षां, राज, पूजा, अक्षय, विनय, साहिल, मृणाल, स्मृती या साऱ्यांशी पुन्हा गप्पा मारायचं ठरवलं. निरोप देताच पटांगणावर एका झाडाखाली आम्ही जमा झालो.
आज मला त्यांच्या डोळ्यांत अनामिक भीती दिसत होती. त्यांचे शब्द आठवत होते. ‘तुम्ही कोण होणार?’ या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिलं होतं, ‘‘आमचे आई-बाबा सांगतात आणि आम्हालाही तेच वाटतं; पोलीस सोडून काहीही व्हावं.’’ माझा त्यांच्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता. त्यांना म्हटलं, ‘‘अरे, तुम्ही तर म्हणता, आम्हाला खूप अभिमान आमच्या वडिलांचा. त्यांच्याबद्दल खूप आदर वाटतो.’’ माझे शब्द पूर्ण व्हायच्या आत प्रज्ञा म्हणाली, ‘‘बाई, अपवाद सोडा; पण लोकांचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे असतात. गरज सरो आणि वैद्य मरो..’’ सारी जण एकमेकांकडे पाहात गप्प झाली. वर्षां माझ्याकडे रोखून पाहात होती. ती म्हणाली, ‘‘बाई, ही काही पहिलीच बातमी नाही. असं काही ऐकलं की विचित्र अस्वस्थ वातावरण पसरतं. नेहमी भेटणारी मंडळीही संशयानं बघतात, तर कोणी खोटय़ा सहानुभूतीनं. मनात प्रश्न येतो, राजकीय नेत्यांचे निर्णय, धोरणं चुकतात. किती तरी युनिफॉर्ममधली माणसं कामी येतात. मग त्यांना कधी शिक्षा झाल्याचे ऐकिवात नाही ते..’’ तिच्या मैत्रिणींनी तिला शांत केलं. मृणाल सर्वात मोठी. ती सांगू लागली, ‘‘बाई, आमच्यापैकी बहुतेकांच्या बाबांचं लहानपण खेडय़ात गेलं. घरची गरिबी. खूप कष्टानं त्यांनी पोलीस दलात नोकरी मिळवली, पण त्यांचे कष्ट काही चुकले नाहीत. १२-१२ तास डय़ुटी. कधी रात्रपाळी तर कधी दिवसपाळी. काही वेळा तर घोषणा होते, ‘मुंबईत हाय अलर्ट, शिवाय वरिष्ठ नेत्यांच्या भेटी, दंगली, बॉम्बस्फोट आदी. मग तर आमचे बाबा घरातून गायबच होतात. ३-४ च काय, पण सलग ८-१० दिवससुद्धा त्यांचा ना फोन येतो ना निरोप. ते कुठे असतील? काय खात असतील? त्यांना पुरेशी विश्रांती तरी मिळत असेल का? नाना शंका मनात येतात. घरी आईचं कामात लक्ष लागत नाही, ना आमचं शाळेत, अभ्यासात.’’ चुळबुळ्या राज म्हणाला, ‘‘बाई, आम्हालापण वाटतं इतरांच्या बाबांप्रमाणे बाबांनी आम्हाला शाळेत सोडायला यावं, आमचा अभ्यास घ्यावा, आम्हाला फिरायला न्यावं. निदान सणाच्या दिवशी तरी घरी असावं..’’ त्याचा आवाज जड झाला होता. डोळ्यांत पाणी दाटलं होतं. त्याची ताई सांगत होती, ‘‘बाई, यंदा त्यानं हट्टच धरला; दिवाळीत फराळ करीन आणि फटाके उडवीन जर बाबा बरोबर असतील तरच. फराळ संपला. फटाके अजून पडून आहेत. पुढच्या दिवाळीपर्यंत तरी बाबांना त्याच्यासाठी वेळ काढता आला तरी खूप झालं.’’
‘‘बाई, अगदी मान्य, सगळी माणसं सारखी नसतात; पण नाटकांत, चित्रपटांत, बातम्यांत अनेकदा पोलिसांना वाईट पद्धतीने सादर केलं जातं. मग आसपासचे, वर्गातले, अगदी सामान्य कुवतीची, भित्री, घाबरट, बावळट, पैसेखाऊ माणसंदेखील टिंगल-टवाळी करतात, टोमणे मारतात. असा राग येतो ना.. वाटतं..’’ पाटील रागारागाने सांगत होता. त्याला थांबवत सुभाष बोलला, ‘‘पण असं नाही करता येत, आमची आई समजावते. आपण नाही मनाला लावून घ्यायचं, पण सगळ्यांना ते जमतंच असं नाही. मग अशी मुलं लहान वयातच गुंडगिरी करतात. वाईट संगतीला लागतात.’’  मला काही वर्षांपूर्वी दप्तरातून सुरा आणलेले आणि गाडय़ातून टेपरेकॉर्डर, दुकानातून हातोहात सीडी चोरणारी दोन-चार मुलं आठवली. त्यांना अखेर अटक झालीच होती. लगेच आठवली ती घरातून पळून गेलेली राधा आणि प्रिया.. त्यांच्या विचारात असतानाच समर्थ म्हणाला, ‘‘बाई, आमचे बाबा खूप चांगले आहेत, पण दोन गोष्टी होतात. एक त्यांच्या कामाच्या स्वरूपामुळे अनेक जण व्याधिग्रस्त असतात. गुडघेदुखी, पाठदुखी; अ‍ॅसिडिटी तर कॉमन. काही जणांना नाकाडोळ्यांचे त्रास होतात, कर्करोग होतो. आमच्या चाळीत शंभरच्या वर घरं. तिथे अ‍ॅम्ब्युलन्स बोलवावी लागली नाही असा महिनापण जात नसेल.’’ समोर शुभा होती. तिचे बाबा ती लहान असतानाच हार्ट अ‍ॅटॅकने गेले होते. ती चार भावंडं, पण सारी लहान. आई दहावी पास. बाबा गेल्यावर सगळं कुटुंबच रस्त्यावर आलं. क्वार्टर सोडावी लागली. जवळ पैसे नव्हतेच. एका नातेवाईकाकडे सारी पोटभाडेकरू म्हणून राहतात. आई धुण्याभांडय़ांची कामं करते. मला आठवत होती आचार्य, दीपा ही मुलं. आचार्य अभ्यासात हुशार, नियमित शाळेत येणारा. शाळा सुरू झाली आणि इयत्ता दहावीत असणारा आचार्य शाळेतून नाव काढण्यासाठी अर्ज घेऊन आला. सोबत त्याची आई. ‘‘बाई, त्यांना कामाचं खूप टेन्शन होतं. घरी काही बोलत नसत, पण हळूहळू तब्येतीच्या तक्रारी वाढल्या. किती सांगितलं, चांगल्या डॉक्टरला दाखवा, पण नाही. शेवटी नको तेच झालं. आता पोरालापण शाळेतून काढावं लागतंय. तो बालपोलीस म्हणून भर्ती होतोय. तसं नाही केलं तर जागा खाली करावी लागेल.’’ माझ्या चेहऱ्यावरचे भाव ओळखत आचार्य म्हणाला, ‘‘बाई, चिंता करू नका. मी शिक्षण अर्धवट नाही सोडणार. आमची अमेधादीदी तर आता सी.ए. झाली आहे. दीपकदादा वकील. त्यांनापण शिक्षण अर्धवटच सोडावं लागलं होतं.’’  
प्रकाश, श्वेता अशी आणखी ४-६ मुलं होती. नेहमी मस्ती करणारी आणि शिव्याचीच भाषा बोलणारी, सुगंधी सुपारी खाणारी, सतत अनुपस्थित असणारी. थोडय़ाच दिवसांपूर्वी मारामारी केली म्हणून प्रकाशला शिक्षा केली होती. त्याच्याकडे मी रोखून पाहू लागले. त्याच्यात मला त्याची आई दिसू लागली, सतत आजारी असणारी. भेटायला आली तेव्हा जुनाट साडी नेसलेली होती. सांगत होती, ‘‘बाई, काय सांगू, नवऱ्यानं मारलं आणि पावसानं झोडपलं तर सांगणार कोणाला? मी ही अशी अन् बापाचं लक्ष नाही..’’ प्रकाशची कड घेत गौरी म्हणाली, ‘‘बाई, सतत गुंड, गुन्हेगारांच्या आसपास वावरल्यानं आमच्यापैकी काही जणांच्या बाबांना वाईट सवयी लागतात. सतत पान-तंबाखू खाणं, दारू पिणं आणि तोंडात सतत शिव्या. माझी आजी तर एका काकांबद्दल बोलताना म्हणते, ‘‘त्याचं तोंड म्हणजे गटारी अमावास्या आणि काही जण तर थोडे वेडेच होतात..’’  ‘‘म्हणजे?’’ न राहून मी विचारलं. सांगावं का नाही या विचारात सारे पडले, पण ताराला राहावलं नाही. ‘‘बाई, निमेश आणि त्याच्या भावंडांचं बाबांबरोबर पटत नाही. बाबा घरी हे बाहेर. निमेशची आई दिसायला खूप छान. त्याच्या बाबांचा आईवर संशय़  सतत मारझोड. बाई, ते शिंदेकाका एके दिवशी एका ख्रिश्चन मुलीला घरीच घेऊन आले. त्यावरून तर खूपच गोंधळ. दोघेही खूप दारू प्यायचे. दिवसा नोकरी आणि रात्री तमाशा. ती दोघे आणि त्यांचा मोठा मुलगा एड्सनं वारला. त्यांना एक मुलगी होती. ती नको ते धंदे..’’ तिच्या बोलण्यात तथ्य असावं, कारण मला काही वर्षांपूर्वी ९ वीत आल्यावर वर्गातच हमसून हमसून रडणारी, भीतीनं कापणारी सोनल आठवली. ‘‘बाई, असं का? माझे बाबा पोलीस का? मी दिसायला चांगली का? आई स्वत:ला सावरत ब्युटीक चालवते. चार पैसे कमावते, यात चूक काय?’’ तिच्या घरची ही परिस्थिती मी बदलवू शकत नव्हते. तिला आम्ही समुपदेशकाकडे नेलं.
वातावरण जरा गंभीर होतंय हे लक्षात येताच, नेहमी उत्साही असणाऱ्या वर्षां आणि प्रज्ञा म्हणाल्या, ‘‘बाई, आमच्या बाबांप्रमाणे आम्हीही टफ आहोत. थोडय़ा खंबीर आणि सुदैवानं प्रत्येकाची आई खूप शहाणी, समजूतदार आहे. आमच्या आईशी आमची जवळीक आहे. बाबांच्या कामाचा ताण घरादारावर येऊ नये म्हणून प्रत्येकाची आई काळजी घेत असते. आमच्या क्वार्टरमध्ये छान बाग आहे. तिथे आम्ही खेळू शकतो. त्याच्याभोवती कट्टा आहे. एक देऊळ आहे. तिथे आम्ही सर्व एकत्र जमतो. रोज आरती होते. भजनं रंगतात. गप्पांचे फड जमतात. एकमेकांची चौकशी आवर्जून केली जाते. काही सण आम्ही एकत्रच साजरे करतो. सारी एकमेकांना धरून असतात. मुंबईच्या मोठय़ा शहरातलं एक मोठं कुटुंबच म्हणा ना. पुजारीकाका साऱ्यांना प्रसाद देतात आणि धीरही.’’
‘‘खूप छान. पण तणावाच्या वेळी इतर समाज तुमची, तुमच्या बाबांची चौकशी करतो का?’’ मी न राहून विचारलं. ‘‘बाई, आम्ही अपेक्षाच ठेवत नाही. आजी सांगते, अपेक्षा पूर्ण झाली नाही तर वाईट वाटतं. तेव्हा नकोच. म्हणून तर आई-बाबा सांगतात, ‘कोणी व्हा, पण पोलीस नको.’ मुलं आणखी बरंच काही सांगत राहिली. मला मात्र एकच प्रश्न सतावू लागला, खरंच पुढच्या पिढीनं वर्दीवाली नोकरी करायची नाही असं ठरवलं तर..? प्रश्न केवळ काही पोलिसांना झालेल्या शिक्षेचा नाही, तर आम्हा साऱ्यांची मनोवृत्ती बदलल्याचा आहे आणि म्हणूनच खूप खूप खूप जटिल आहे.’’    
chaturang@expressindia.com