जे करायचं नाही असं ठरवलं होतं तेच करावं लागलं, पण त्यामुळे मला ‘मी’ सापडले.
मी वकिलीच्या पहिल्या वर्षांला होते. परीक्षा झाली. दोन पेपर राहिले होते. आई माझ्या लग्नाच्या मागे लागली. त्या दिवशी नागपूरचे ‘पाहुणे’ आले, मी समोर येऊन बसले. (भावी) सासूबाई, त्यांची बहीण व काही पुरुष मंडळी. सर्व कार्यक्रम पार पडला. सासूबाई म्हणाल्या, ‘आम्हाला मुलगी आवडली.’ मी सांगून टाकलं, ‘मी शिकतेय खरी, पण लग्नानंतर नोकरी करणार नाही.’ सासूबाई म्हणाल्या, ‘अगं तुला जे वाटेल ते तू कर. आम्हाला तुझ्या नोकरीची गरजच नाही?’ मी आनंदले. कारण लहानपणापासून आईची नोकरी बघितली होती. तिची धावपळ, चिडचिड. घरी एकटं राहावं लागायचं. आमची शाळा सकाळची तर आईची दुपारची. सगळा दिवस वाडय़ात खेळत राहायचो. म्हणून नोकरीचा रागच यायचा. आता ‘लॉ’च्या प्रथम वर्षांला असतानाच विवाह झालाही. दोन र्वष सर्व नीट चालू होतं, पण नवऱ्याची फॅक्टरी बंद पडली. तो नैराश्यात गेला व नको त्या गोष्टींच्या आहारी गेला आणि माझ्यापुढे काळंकुट्ट भविष्य उभं राहिलं.. दिवस असेच जात होते.
    पहिली मुलगी चार वर्षांची, दुसऱ्या मुलीच्या वेळेस मी आईकडे होते. नवऱ्याला अपघात झाला. घरी दोन लाख रुपयांची चोरी झाली. माझे सर्व दागिने गेले. काय करू काय नको, मला कळेनासे झाले. सर्व बाजूंनी मी हवालदिल झाले. जिवंत राहू की आयुष्य संपवू कळेनासेच झाले. या वेळी माझं सर्व कुटुंब माझ्या पाठीशी उभं राहिलं. आता तुलाच तुझ्या मुलींसाठी स्वत:च्या पायावर उभं राहिलं पाहिजे. धीर सोडू नकोस..
हे तीनच शब्द पण माझ्या आयुष्यासाठी ते टर्निंग पॉईंट ठरले. मी परत माझा ‘लॉ’चा अभ्यास चालू केला. आईने माझ्या दोन्ही छोटय़ा मुलींना सांभाळलं व ‘लॉ’ची परीक्षा तीन वर्षांत पहिल्याच प्रयत्नात मी ६५ टक्के गुण घेऊन पास झाले. सर्वाना आनंद झाला. आई-बाबांमुळे व सासू-सासऱ्यांमुळे हे शक्य झालं. आई माझ्या मुली सांभाळत होती, तर सासूबाई त्यांचा ‘मुलगा’. एक वर्ष काम शोधण्यात गेलं. आता मी नागपूर येथे हायकोर्टात प्रख्यात चांदेकर मॅडमच्या हाताखाली काम करते. स्वत:च्या पायावर उभी आहे. दोन मुलींची देखभालही करते आहे. त्या गाण्यातही चमकताहेत. स्वत: पैसे मिळवत असल्यामुळे स्वत:चा अभिमान वाटतो. प्रतिष्ठाही आहे आणि आत्मविश्वासही मिळवला आहे! नोकरी करणार नव्हते. पण परिस्थितीने करावी लागली, पण त्या एका टर्निग पॉइंटने मला एक वेगळाच आत्मविश्वास मिळवून दिला.    ल्ल