मॅट्रिकला, ग्रॅज्युएशनला चांगले मार्क्स असूनही चांगली नोकरी मिळेना. १०० रुपये पगाराची नोकरी मिळाली होती. त्यातील ५० रुपये खानावळीसाठी जात होते. सर्व जाऊन ५-१० रुपयेच शिल्लक राहायचे. चार आण्याचा मारवाडय़ाचा चहा प्यायला तरी खूप अपराधी वाटायचे. कामात थोडी जरी चूक झाली तरी, बॉसची ती काही न बोलता चष्म्यातील जळजळीत तिरकस नजर काळीज कापत जायची. मन पूर्णपणे नराश्याने घेरले होते. अनेक पर्यायांपकी उंचावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा पर्याय पक्का झाला. त्या दृष्टीने चौथ्या माळ्यावर राहणाऱ्या नातेवाइकाचे घर गाठले, आणि..
आज दोन्ही मुले- एक सून परदेशात आहेत. त्यांची आठवण आली तरी आता त्या त्या देशांमध्ये किती वाजले असतील, आपण निवांत असलो तरी त्यांची ही कार्यालयाची वेळ असेल, नकोच त्यांना डिस्टर्ब करायला, असं वाटत राहतं. आज माझा आलिशान फ्लॅट आहे. दिमतीला नोकरचाकर आहेत. दुसऱ्याचंही लग्न झालं की, त्यांना गरसोय नको, म्हणून दोघांसाठीही स्वतंत्र फ्लॅट घेऊन ठेवलेत. खाजगी नोकऱ्या असल्यामुळे काही समस्या उद्भवतात. त्यांना अडचण नको म्हणून दोन-तीन कमíशयल गाळेदेखील घेतले. मुंबईत एकटीच्या पगारावर मुलांना शिक्षण देऊन त्यांच्या पायावर उभे करणे खरंच कठीण. पण केलं. खूप कष्ट पडले..पण आज हे जे वैभव दिसते आहे ते आपसूक आलेले नाही, नक्कीच नाही. आयुष्यात एक यू-टर्न आला आणि हे सारं घडलं..
नुकतीच मत्रिणीच्या घरी गेले होते. अगदी ३०-३५ वर्षांनी तिची भेट झाली होती. पंचपक्वान्न जेवतानाही तिला, खोलगट ताटलीत बोटाने भाताची शितं ओढून नंतर पेज पिणारी पूर्वीची मी आठवले. तिने ही आठवण सांगताच दोऱ्याची गुंडी उसवावी तद्वत् ३२-३३ वर्षांपूर्वीचा भूतकाळ आठवत गेला. ३५ वर्षांपूर्वी पदवी घेतल्यानंतर घरच्या अठराविशे दारिद्रय़ाला कंटाळून मुंबईत आले. मॅट्रिकला, ग्रॅज्युएशनला चांगले मार्क्स असूनही चांगली नोकरी मिळेना. १०० रुपये पगाराची नोकरी मिळाली होती. त्यातील ५० रुपये खानावळीसाठी जात होते. रेल्वे पास आणि प्रवासाचा खर्च यात २५ रुपये जायचे. २५ रुपये शिल्लक राहायचे. या रुपयातून ताई काहीतरी खाऊ, कपडे पाठवेल या आशेने वाट पाहणाऱ्या भावंडांना काहीतरी खरेदी करून पाठविले की, ५-१० रुपयेच शिल्लक राहायचे. अकाऊंटस् लिहिण्याचे काम सतत करून खूप बोअर व्हायला व्हायचे. चार आण्याचा मारवाडय़ाचा चहा प्यायचा म्हटले तरी, ४ वेळा विचार करावा लागायचा. कधीतरी मन बंड करून उठले आणि तो चार आण्याचा चहा प्यायला की, खूप अपराधी वाटायचे. घर सोडून कधी बाहेर पडले नव्हते. मुंबईतील त्या रेशनच्या तांदळाच्या भाताचा वास जेवणावरची वासनाच उडवून टाकायचा. घरच्या उकडय़ा तांदळाच्या पेजेची खूप आठवण यायची. चाळीतल्या शौचालयाच्या दरुगधीने प्रात:विधीलासुद्धा जावेसे वाटत नसायचे. घरच्यांची खूप आठवण यायची. कामात थोडी जरी चूक झाली तरी, बॉसची ती काही न बोलता चष्म्यातील जळजळीत तिरकस नजर काळीज कापत जायची. भर थंडीतही घाम फुटायचा. घरच्या दारिद्रय़ाला कंटाळून नशीब आजमवायला आई-वडिलांचा विरोध पत्करून मुंबईत आले होते. वडील घरी परत न्यायला आले होते, पण मी परत गेले नव्हते. पण मनाजोगती नोकरी मिळत नसल्यामुळे आणि मागचे दोरही कापल्यामुळे काय करावे हे कळत नव्हते. मन पूर्णपणे नराश्याने घेरले होते. जिवाचे बरेवाईट करायचे विचार सतत मनात येत होते. अनेक पर्यायांपकी उंचावरून उडी मारण्याचा पर्याय पक्का झाला. त्या दृष्टीने प्रभादेवीला चौथ्या माळ्यावर राहणाऱ्या नातेवाइकाचे घर गाठले. माझ्या सुदैवाने त्यांच्या घरातील मंडळी कुठेतरी बाहेर गेली होती. मला चांगला एक तासभर मिळणार होता. त्यांच्या गॅलरीतून खाली पाहिले. जुन्या काळच्या चाळी असल्यामुळे त्या भरपूर उंच होत्या. पण कठडा छातीपेक्षा उंच होता. एवढय़ा उंच कठडय़ावर चढायचे कसे, या विचारात असताना खाली पाहिले.. समोरच्या हॉटेलमध्ये एक व्यक्ती पांगुळगाडा घेऊन चहा-पावाची ऑर्डर करीत होती. मी निरखून पाहत होते. ती व्यक्ती आपल्या थोटय़ा हाताने पाटासारख्या फळीला, चार चाकं लावलेल्या गाडीला ढकलत हॉटेलपर्यंत पोचली होती. आपल्या थोटय़ा हाताने चहा-पाव खाताना त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद माझ्या आयुष्याला यू टर्न देऊन गेला..
थोडय़ा वेळाने माझे ते बाहेर गेलेले नातेवाईक परत आले. त्यांनी आणलेला नाश्ता मला प्रेमाने खायला दिला. माझ्या विचारांची मला खूप लाज वाटायला लागली. मुंबईत जरी माझे अगदी जवळचे नातेवाईक नसले तरी अशी वेळेला हात देणारी माणसे आपल्याला आहेत. या पांगळ्या माणसाप्रमाणे पावसा-पाण्यातून, उन्हातान्हातून हात घासत तर आपल्याला हॉटेलपर्यंत जावे लागत नाही. शिवाय कुणी काही नाही दिले तरी आपल्याला देवाने दिलेले चांगले धडधाकट हात-पाय आहेतच. सोबतीला छोटीशी का होईना नोकरी आहे.
मनात एक दृढनिश्चय करून मी घरी आले. दुसऱ्या नोकरीसाठी प्रयत्न करायचा. जाहिराती, ओळखीपाळखीच्या माणसांमार्फत नवीन चांगल्या नोकरीसाठी कसून प्रयत्न सुरू केले. माझी इच्छशक्ती प्रबळ होती. अगदी दोनच दिवसात कुणा ओळखीच्या माणसाने शेजारच्या कंपनीमध्ये भरती सुरू असल्याचे सांगितले. त्या आठवडय़ाभरात मला असलेल्या पगाराच्या पाचपट पगाराची नोकरी मिळाली. त्या ठिकाणी माझे सर्व स्कील वापरून खूप प्रामाणिकपणे काम सुरू केले..
तिथे रुजू झाल्यावर मी तांत्रिक बाजूसुद्धा समजून घेण्याचा प्रयत्न करू लागले. कंपनीच्या नियोजनापेक्षा खूप अवास्तव खरेदी होत होती. ही बाब मी माझ्या बॉसच्या नजरेला आणताच सर्व पच्रेस ऑर्डर्स माझ्या सहीशिवाय पुढे पाठवायच्या नाहीत, असे आदेश प्रॉडक्शन युनिटच्या प्रमुखांनी पच्रेस अधिकाऱ्यांना दिले. माझा आत्मविश्वास बराच वाढला. एव्हाना माझे लग्न होऊन मला मुलगा झाला होता. परंतु घरी मुलाला वेळ देता येत नव्हता. मुलाला वेळ देता येईल आणि नोकरीही करता येईल अशी नोकरी शोधता, शोधता ३-४ प्रायव्हेट कंपन्या, कॉलेजमधील नोकरी, सेल्स टॅक्स, आरटीओ असे करीत करीत मंत्रालयामध्ये अवर सचिवपदी सध्या कार्यरत आहे. शासकीय नोकरीमुळे मान आहे.
माझ्या आईवडिलांना, माझ्या पतीसाठी, माझ्या मुलांसाठी मी वेळ देऊ शकले. कार्यालयामध्ये मी यशस्वी ऑफिसर आहे. कर्मचारी संघटनेमध्ये उत्कृष्ट अधिकारी म्हणून पुरस्कार प्राप्त झालेला आहे. संवेदनशील स्वभावामुळे समाजकार्यामध्ये रस आहे. मी कधीही नकारात्मकतेला थारा देत नाही. मी जाईन तेथे एक होकारात्मक वातावरण निर्माण करण्यात यशस्वी होते.
एका यू टर्नने मला एक आदर्श मुलगी, एक प्रेमळ पत्नी, एक त्यागी आई, यशस्वी ऑफिसर आणि संवेदनशील अशी समाजकार्य करणारी सतत होकारात्मक विचारसरणीचा प्रचार आणि प्रसार करणारी, कुणाच्याही हाकेला ओ देणारी व्यक्ती बनविलं.