टाटा उद्योग समूहाचा विस्तार, त्याची भरभराट आणि समाजहिताचा विचार हे शक्य झाले जे.आर.डी. टाटांनी झोकून देऊन, चिकाटीने काम केले म्हणूनच. मात्र त्यामागे होते त्यांच्या वडिलांनी आपल्या वागण्यातूनच घालून दिलेले आदर्श. त्याच्या सोबतीने जाणीवपूर्वक केलेले संस्कार. आणि त्या बरोबरीने जे. आर. डीं.नीही प्रचंड मेहनत घेत वृद्धिंगत केलेल्या आपल्या क्षमता. ‘मला टाटांच्या लायकीचे व्हायला हवे.’ हे त्यांचे स्वत:ला सतत बजावणे असायचे. म्हणूनच त्यांची जडणघडण कशी झाली हे बघणं औत्सुक्याचं ठरेल.
     ‘त्यांनी आभाळाला स्पर्श केला
      आणि त्याच्या गालावर स्मित फुलले
 त्यांनी दोन्ही बाहू पसरले
आणि त्यात अवघे विश्व सामावले
  माणूस आणि संस्था यातून जे भव्य दिव्य घडलं,
  ते त्यांच्या दूरदृष्टीमुळे ..’
ही आहे जे.आर.डी. टाटा यांच्याप्रती ‘एअर इंडिया’ने समíपत केलेली आदरांजली.
हे शब्द त्यांच्या अस्तित्वाचं वर्णन करतात. आज जरी ते रूढार्थाने अस्तित्वात नसले तरी त्यांच्या अस्तित्वाची अनुभूती भारतीय व्यवहारात दर्शनीय असते.
जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा. सर्वसामान्यांचे जे.आर.डी. सर्वसामान्यांच्या कल्पनेपलीकडचं ऐश्वर्य लाभूनही सर्वसामान्यांच्या विश्वाचं भान त्यांनी नजरेआड होऊ दिलं नाही. विमानोड्डाणाच्या वेडाची जादू सतत मनावर असूनसुद्घा आपली पावलं कायम जमिनीवर घट्ट रोवून ठेवली ती सर्वसामान्य पावलांच्या बरोबरीनं! ते भारतातील पहिले परवानाधारक वैमानिक ठरले. आकाशात भरारी घेण्याच्या अभिलाषेनं, टाटा एअरलाइन्सनं सुरुवात करुन एअर इंडिया राष्ट्रीय विमान कंपनीचं नेतृत्व केलं. त्याचबरोबर उद्योगातल्या इतर क्षेत्रांमध्येही लोकहिताचा विचार करुन अनेक बदल केले, सुधारणा केल्या. लोकांसाठी मार्गदर्शक संस्था स्थापन केल्या, त्याही अत्युच्च, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या. आपल्या देशानं, भारतानं कशातही कमी पडू नये, यासाठी हा अट्टहास!
 टाटा उद्योग समूहाचा विस्तार, त्याची भरभराट आणि समाजहिताचा विचार हे शक्य झाले जे.आर.डी. टाटांनी झोकून देऊन, चिकाटीने काम केले म्हणूनच. मात्र त्यामागे होते त्यांच्या वडिलांनी आपल्या वागण्यातूनच घालून दिलेले आदर्श. त्याच्या सोबतीने जाणीवपूर्वक केलेले संस्कार. आणि त्या बरोबरीने जे. आर. डींनीही प्रचंड मेहनत घेत आपल्या क्षमता वृद्धिंगत केल्या. म्हणूनच त्यांची जडणघडण कशी झाली हे बघणं औत्सुक्याचं ठरेल.
  जे. आर. डी. यांचा जन्म २९ जुल १९०४ या दिवशी पॅरिस इथे झाला. त्यांचं नाव जहांगीर ठेवण्यात आलं. वडील आर. डी. टाटा म्हणजे श्री. रतनजी दादाभॉय टाटा आणि आई, फ्रेंच नागरिक, नाव ब्रिएर. लग्नानंतर पारशी धर्माची दीक्षा दिली आणि नाव झाले सुनी टाटा. जे. आर. डीं.चं शालेय शिक्षण पॅरिस, मुंबई आणि योकोहामा या ठिकाणी झालं. त्यांची आई चतुर, हुशार आणि जुळवून घेणारी होती. फ्रान्स ते मुंबई आणि मुंबई ते फ्रान्स असा प्रवास त्यांना मुलांना घेऊन सतत करावा लागत असे.  मुलांच्या वर्तनावर आईवडील दोघांचाही बारकाईने पहारा असायचा. आपल्या हाताखालच्या लोकांशी कशा प्रकारे बोलायचं याचं बाळकडू जे. आर. डी. यांना आपल्या आईवडिलांच्या जागरूकतेमुळे मिळालं. त्यांच्या लहानपणी त्यांना सांभाळायला एक आया होती. त्यांच्या हातून एक चूक घडली आणि ती त्यांच्यावर रागावली. त्याचा राग येऊन जे. आर. डी. तिला रागातच म्हणाले, ‘तुला मारीन.. लाथा घालीन..कारण तू गरीब आहेस.’ त्या आयाने ही गोष्ट त्यांच्या आईच्या आणि आईने ही गोष्ट त्यांच्या वडिलांच्या कानावर घातली. तेव्हा समोरच्या व्यक्तीचा आदर राखलाच गेला पाहिजे, हे कळावं म्हणून वडिलांनी त्यांना चांगलाच चोप दिला.
  त्यांच्या विद्यार्थीदशेत, ते फ्रान्समध्ये तर वडील भारतात, पण तरीही त्यांच्या संवादात कधीच खंड पडला नाही. त्यांच्यातला संवाद हा बहुतेक वेळा पत्रांद्वारे झाला. अनेक छोटय़ा-मोठय़ा गोष्टी त्यांनी एकमेकांशी पत्रांनी कळवल्या. १६ वर्षांचे असताना, व्यावसायिक कारकीर्दीच्या दृष्टीनं विचार करताना त्यांच्या लक्षात आलं की फ्रेंच भाषेचं शिक्षण त्याच्यासाठी निरुपयोगी ठरणार आहे. इंग्रजी भाषा उत्तम रीतीने येत नव्हती. त्यामुळे वडिलांना पत्र लिहून इंग्लंडला जायची इच्छा त्यांनी दर्शवली. वडिलांनी तातडीने याची दखल घेतली. आणि त्यांना इंग्रजी भाषा जलद शिकता यावी यासाठी ‘क्रॅमर’ येथे दाखल केलं. इंग्लंडमध्ये शिक्षणासाठी वास्तव्य असताना तिथे शिकणाऱ्या काही मुलांबद्दल जे. आर. डीं.च्या मनात अढी निर्माण झाली होती. इतरांबरोबर मिसळताना, काही मुलांबरोबर संवाद साधताना गरसमज व्हायला लागले होते. वडिलांकडे त्यांनी या मुलांच्या तक्रारीच लिहून पाठवल्या. पण यावर न चिडता त्यांनी प्रेरणादायी उत्तर पाठवलं. त्यांनी लिहिलं होतं, ‘तू खुल्या मनाने वाग आणि कुणाविषयी विनाकारण मत बनवू नकोस. तुला तिथे जाऊन जेमतेम आठवडा झालाय, इतक्यात तू सगळ्या मुलांना ‘अगदी खोटारडी’ आणि ‘काहीही मनापासून न करणारी मुलं’ असा शिक्का मारलास तर तू लोकांचं घाईघाईनं आणि वरवरचं मूल्यमापन केल्यासारखं होईल. आणि याच स्वभावातून पुढे जेव्हा तू कर्ता पुरुष म्हणून जगात प्रवेश करशील, तेव्हा अपयशी ठरशील! त्यामुळे मी पिता म्हणून तुला आग्रही सल्ला देतो की तू पूर्वग्रहदूषित मतं बनवून त्यांच्यापासून दूर राहू नकोस, उलट, त्या मुलांपकी काहींशी मत्री कर, हे करून पाहिलंस तर हीच मुलं तुला निराळी भासतील.’
याचदरम्यान, त्यांची ७०० फ्रँक्स किमतीची सायकल चोरीला गेली. सोन्याची साखळी, सोन्याचं घडय़ाळ आणि सोन्याची पेन्सिल हरवली. ही गोष्ट जे. आर. डीं.नी आपल्या आईला कळवली. ही गोष्ट आर. डी. टाटांना त्यांच्या पत्नीकडून कळली. जे. आर. डीं.च्या निष्काळजी वृत्तीची त्यांच्या वडिलांना काळजी वाटली, त्यांनी लिहिलं, ‘माझा मुलगा, जो मला व्यवसायातून मदत करणार आहे, तो इतका निष्काळजी कसा असू शकतो. तुला माहीत आहे, तुझे वडील त्यांच्या कुटुंबाला आरामात ठेवण्यासाठी गुलामासारखे कष्ट उपसत आहेत. त्याचे भान कायम ठेव. पण मला जास्त वाईट याचे वाटते आहे की या गोष्टी तू माझ्यापासून लपवल्यास त्याचा. विद्यालयात आणि बाहेर प्रत्येकाशी विनयशीलपणे वाग आणि काहीही घडलं तरी कधीही खोटं बोलू नकोस.’
  मुलांच्या प्रत्येक बारीकसारीक गोष्टींची दखल घेऊन त्यानुसार त्यांच्या मनाला तासून पलूदार व्हावेत याकडे त्यांचा कटाक्ष असायचा, तसंच व्यायाम आणि प्रार्थना करून मुलांना उत्तम शारीरिक तसंच मानसिक आरोग्य लाभावं याचाही आग्रह असायचा. १९२३ मध्ये त्यांची आई वारल्यानंतर त्यांचे वडील त्यांच्या कार्यालयातून दुपारी साडेचार वाजताच घरी येत. आणि मुलांच्या सहवासात राहात. त्यांना मुलांबरोबर वेळ घालवणं मनापासून आवडायचं.
फ्रान्समधलं जे. आर. डीं.चं शालेय शिक्षण झाल्यावर एका वर्षांच्या लष्करी शिक्षणासाठी त्यांना फ्रेंच सन्यात जावं लागलं. ते पूर्ण झाल्यावर महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांना इंग्लंडला जायचं होतं, पण त्यांच्या वडिलांनी त्यांना लगेचच भारतात बोलावून घेतलं. वडिलांच्या शब्दाखातर जे. आर. डी. भारतात परत आले आणि टाटा कंपनीमध्ये रुजू झाले तेही बिनपगारी.
 वक्तशीरपणात आर. डी. टाटा यांनी कधीही कसलीही तडजोड केली नाही. त्याबाबतीत, जे. आर. डीं.ची त्यांच्याबरोबर काम करायला सुरुवात केल्यावर, काही दिवस तारांबळ उडत होती. याबद्दलची आठवण जे. आर. डीं.ची बहीण रोदाबे यांनी एका ठिकाणी सांगितली आहे, ‘आर. डी. टाटा ‘सुनीता’ या त्यांच्या बंगल्यावरून नाश्ता झाला की सकाळी ठीक ८-३० वाजता त्यांच्या ऑफिस कारमध्ये बसायचे. त्या वेळी, जे. आर. डी. नाश्त्याच्या टेबलवरून घाईगडबडीत उठून, हातात टोस्टचा तुकडा घेऊन, धावपळीत जिन्यावरून उतरायचे, वडिलांना गाठायला. कारण आर. डी. टाटा कधीच त्यांच्यासाठी थांबायचे नाहीत. आर. डी. टाटा कार्यालयात सर्वप्रथम पोचायचे आणि भेटायला येणाऱ्यांच्या वेळा सुरू होण्यापूर्वी त्यांचा पत्रव्यवहार पूर्ण झालेला असायचा.’ आपसूकच या वक्तशीरपणाचे संस्कार जे. आर. डीं.मध्येही झिरपले. लोकांच्या भेटीगाठी घेताना वेळ पाळण्यावर त्यांनी वडिलांच्या पावलावर पाऊल टाकलं होतं.
पुढे वडिलांच्या निधनानंतर काम करता करता त्यासाठी आवश्यक ते शिक्षण स्वत:च पुस्तकं वाचून पूर्ण केलं, यादरम्यान, त्यांना टायफॉइड आणि दोनदा पॅरा टायफॉइड झाला होता. तरीही शिक्षणात कुठेही खंड पडू दिला नाही. ‘मला टाटांच्या लायकीचे व्हायला हवे.’ हे त्यांचे स्वत:ला सतत बजावणे असायचे. त्यांची कामासाठीची निष्ठा यातून स्पष्ट होते. केवळ घराण्याच्या पुण्याईवर स्वत:चं अस्तित्व त्यांना अजिबात मान्य नव्हतं. स्वत:ला सिद्ध करण्यासाठी त्यांनी आवश्यक ते परिश्रम घेतले.
टाटा ग्रुप्सची आजची पत, प्रतिष्ठा, उच्चतम दर्जा आणि विश्वासार्हता हे भारतरत्न जे. आर. डीं.च्या देशाप्रतीच्या, समाजाप्रतीच्या निष्ठेची परिणती आहे असं म्हटल्यास वावगं ठरू नये. टाटा परिवाराचे भारतीयत्वाचे संस्कार सचोटीने जपले. सचोटीचा हा वारसा नेटाने जपत जे. आर. डीं.नी  २९ नोव्हेंबर १९९३ रोजी या जगाचा निरोप घेतला.  या अशा पलूदार हिऱ्याला १९९२ साली भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान मिळाला.
जे. आर. डीं.चं नाव जहांगीर होतं. या नावाचा अर्थ जगज्जेता. पण जे. आर. डीं.ना जगज्जेता होण्यापेक्षा सुखी समाधानी जगातले सदस्य निर्माण करण्यात अधिक स्वारस्य होतं. त्या दृष्टीनं दूरदृष्टीसह माणसं आणि संस्था यांचं समीकरण जुळवून समाजोपयोगी कार्ये आकाराला आणली आणि सर्वसामान्यांच्या मनाचे जे. आर. डी. नक्कीच जहांगीर झाले!