26 September 2020

News Flash

आनंदाची निवृत्ती – ‘संगीत विशारद’ होणारच

संसारातल्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पडल्यावर निवृत्तीच्या या टप्प्यावर आपण गाणं शिकायला काय हरकत आहे? असं मला वाटलं व मी यांना माझ्या मनातली

| February 8, 2014 04:13 am

संसारातल्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पडल्यावर निवृत्तीच्या या टप्प्यावर आपण गाणं शिकायला काय हरकत आहे? असं मला वाटलं व मी यांना माझ्या मनातली गोष्ट बोलून दाखवली.. त्यांनी ती उचलून धरली व लगेच मी शोधमोहीम सुरू केली.
  माझ्या मैत्रिणीची मुलगी गायनाचे वर्ग घेत होती. तिला भेटले. वयाच्या ५८ व्या वर्षी माझा उत्साह बघून तिनेही मला प्रवेश दिला आणि माझा गायन क्लास सुरू झाला. ‘या वयात कुठे तुम्ही सभेत गायन करणार आहात?’ ‘या वयात काय करायचंय गाणं शिकून?’ असे बरेच टोमणे मला ऐकायला मिळाले, पण हे म्हणायचे, ‘तुला शिकायचे आहे ना? मग कोणाकडे लक्ष देऊ नकोस.’ यांच्या शब्दांनी मला हुरूप यायचा.. यांनीच मला लगेच हार्मोनिअमही आणून दिला.
  सकाळची सगळी कामे आटपायची व संध्याकाळी ५ ते ६ क्लासला जायचे.. असा माझा दिनक्रम सुरू झाला. कधी-कधी क्लासला निघाले की कोणीतरी यायचे आणि मग क्लासला दांडी मारावी लागायची. क्लासमध्ये एखादा ‘राग’ शिकवल्यावर घरी रियाज करा, असे मॅडम सांगायच्या पण पेटी घेऊन बसले की छोटय़ा नाती जवळ येऊन बसायच्या. ‘आजी मला वाजवू दे ना गं’ असे म्हणून पेटीचा ताबा घ्यायच्या. मग कसला रियाज? अन् कसले काय?.. दिवसा घरात सगळेजण असल्यामुळे रियाज नको वाटायचा. शेवटी मी ठरवले की रात्रीच रियाज करायचा.. आणि मग रात्री १० नंतर माझा रियाज सुरू व्हायचा.. असे करत करत मी गाण्याच्या सहा परीक्षा दिल्या.. नुकतीच मी ‘विशारद सेकंड इअर’ची परीक्षा दिली. पुढच्या वर्षी फायनल आहे आणि कितीही अडचणी आल्या तरी ही ‘विशारद’ पूर्ण करायचे हे माझे स्वप्न आहे..
गाण्याच्या शिक्षणाचे मला खूप फायदे झाले. सरावामुळे आवाज चांगला झाला. त्यामुळे आमच्या भजनी मंडळाची अध्यक्ष झाले. गायनाची लेखी परीक्षाही असते. १०० मार्काचे दोन पेपर असतात. अगदी पुरवण्या घेऊन मी पेपर लिहिले. त्यामुळे लिहिण्याचाही खूप सराव झाला. वर्षभरात ३/४ वेळेस तरी स्टेजवर बसून गायन करावे लागते, त्यामुळे सभाधीटपणा आला. परीक्षेमध्ये सभागायन हा एक प्रकार असतो. माझ्या मैत्रिणी सभागायनाला आल्या होत्या. त्यांच्या समोर मी जवळजवळ ३० मिनिटे शास्त्रोक्त गायन गायले व सगळय़ांना एक सुखद धक्का दिला. खरंच शिकण्याला काही वयाचे बंधन नसते. आपण शेवटपर्यंत विद्यार्थीच असतो याचा मात्र पुरेपूर अनुभव आला. मन आवडत्या विषयात गुंतल्यामुळे आपण ज्येष्ठ नागरिक झालो याचाही विसर पडला नि जगण्याचा वेगळाच आनंद घेता आला..    

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 8, 2014 4:13 am

Web Title: i will be the master in music
टॅग Chaturang
Next Stories
1 कायदेकानू : पोटगीचा अधिकार
2 एक अटळ शोकांतिका..
3 प्रतिसाद
Just Now!
X