अब्राहम या नावाचा अर्थ म्हणजे मनुष्यजातीचा पिता. अर्थात नामकरण करताना त्याच्या आईला, नॅन्सीला अब्राहमच्या असामान्य व्यक्तिमत्त्वाची कल्पना आली नसेल. तिच्या शिकवणीचा, प्रोत्साहनाचा अब्राहमनं कधीच विसर पडू दिला नाही, तर सावत्र आई, सॅलीबरोबरचं नातं अखेपर्यंत एकसंधच राहिलं. राष्ट्राध्यक्ष म्हणून अब्राहम यांचं जे मोठेपण आहे त्यात त्यांच्या या सख्ख्या आणि सावत्र दोन्ही आईंचं योगदान मोठं होतं.
“Don’t worry when you are not recognized but strive to be worthy of recognition.”
हे वचन निव्वळ एखादा सुविचार नाही, तर आयुष्यात हे वचन खऱ्या अर्थानं सत्यात उतरवलं आहे अब्राहम लिंकन यांनी. एक महान नेता, एक महान वक्ता, एका महासत्तेचा राष्ट्राध्यक्ष आणि माणुसकीची तत्त्वं जगापुढे ठासून मांडणारा एक सच्चा माणूस.
अमेरिकेतल्या एका खेडेगावात जिथे मूलभूत सोयीसुविधा नावालाही नव्हत्या अशा खेडेगावात एका लाकडी ओंडक्याच्या एका खोलीत राहणारा एक साधासुधा मुलगा पुढे जाऊन राष्ट्राध्यक्ष म्हणून पद भूषवतो, हे केवळ कल्पनातीत आहे. या जीवनप्रवासातल्या पायाभरणीच्या काळातली बांधणी नेमकी कशी जुळली याबद्दलचा एक मागोवा.
केन्टुकी राज्यातल्या हार्डीन काऊन्टीत १२ फेब्रुवारी १८०९ साली अब्राहम लिंकन यांचा जन्म झाला. थॉमस लिंकन आणि नॅन्सी हॅन्क्स हे शेतकरी दाम्पत्य अब्राहमचे माता-पिता. १७८२ साली थॉमस आपले वडील अब्राहम यांच्यासह केन्टुकी इथं आला. थॉमस स्वाक्षरी करण्याइतपतच साक्षर होता, पण त्यानं कुशल सुतार म्हणून त्याच्या गावी उत्तम नाव कमावलं होतं. नॅन्सी सूत कातणे आणि वस्त्र कातणे यात तरबेज होती. सुती आणि गरम धाग्यांचे वस्त्र विणून नवरा आणि मुलांसाठी कपडे शिवणे हे तिचे काम असे.
  अब्राहम दोन वर्षांचा झाल्यावर लिंकन कुटुंब नॉब क्रीक नावाच्या दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित झाले. तिथे पाच वर्षे या कुटुंबाचा मुक्काम होता. या काळात तो आपल्या आईवडिलांना कामांमध्ये मदत करायला शिकला. तसंच मोठी बहीण सारा हिच्यासोबत शाळेत शिक्षणाचा श्रीगणेशा केला. मुळाक्षरं, शब्द आणि स्पेलिंग्ज यांच्याशी ओळख झाली. डिसेंबर १८१६ मध्ये शेताच्या मालकीवरून वाद झाला आणि लिंकन कुटुंबाला नॉब क्रीक सोडावं लागलं आणि लिंकन कुटुंब इंडियाना नावाच्या राज्यात स्थलांतरित झाले. जेव्हा जेव्हा थॉमस मधाचं पोळं घरी आणत असे, तेव्हा तेव्हा या मुलांना गोडाधोडाची मेजवानी मिळे.
लिंकन पती-पत्नी प्रचलित गुलामगिरी व्यवस्थेच्या विरोधात होते आणि थॉमस त्याची मतं त्याच्या सहकाऱ्यांसमोर ठामपणे मांडत असे. नॅन्सी स्वत: वाचण्याइतपतच साक्षर होती, तिला लिहिता अजिबात येत नव्हतं; पण तिनं शिक्षणाचं महत्त्व जाणलं होतं. त्यामुळे नॉब क्रीकमध्ये शाळा बरीच लांब असूनसुद्धा मुलांनी शिक्षण घ्यावं याबाबत ती आग्रही होती. तिला आणि थॉमस यांना ज्या संधींना मुकावं लागलं होतं, तसं आपल्या मुलांच्या बाबतीत होऊ  नये, याबद्दल तिची तळमळ असायची. त्यांच्याबाबतीत ती महत्त्वाकांक्षी होती. ती अत्यंत बुद्धिमान होती. ती खूप चांगली आणि अत्यंत प्रेमळ आई होती. अत्यंत धार्मिक होती. अब्राहमनं तिचा उल्लेख ‘एंजल मदर’ असा केला आहे. एका मित्राकडे तिच्याबद्दल बोलताना तो म्हणाला होता, ‘‘आज मी जो कोणी आहे तो तिच्यामुळे आहे. मी तिचा कायमच ऋणी राहीन.’’ उच्च महत्त्वाकांक्षा, मानसिक सतर्कता आणि तारतम्ययुक्त विश्लेषणात्मक बुद्धी, या त्यांच्याकडच्या मोठय़ा गुणांचं श्रेय त्यानं नेहमीच त्यांच्या जन्मदात्या आईला दिलं आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी असताना हे गुण अत्यंत महत्त्वाचे ठरले.
 अब्राहम जेव्हा नऊ  वर्षांचा झाला तेव्हा नॅन्सी ‘मिल्क सिकनेस’ नावाच्या रोगाला बळी पडली. या रोगाला उपाय नव्हता. गाईच्या दुधातून हा रोग माणसांत संक्रमित होत असे. हा रोग झाल्यानंतर नॅन्सीला जेव्हा कळलं की, आपला मृत्यू आता जवळ आला आहे तेव्हा तिनं आपल्या दोन्ही मुलांना जवळ बोलावलं आणि सांगितलं, ‘‘एकमेकांना सांभाळून राहा. माझ्या शिकवणीचा विसर पडू देऊ  नका आणि परमेश्वरावर विश्वास ठेवा.’’
नॅन्सीच्या मृत्यूनंतर काही महिन्यांनंतर थॉमसनं, सॅली बुश जॉनस्टन या विधवेशी लग्न केलं. सॅलीला दोन मुली आणि एक मुलगा, अशी तीन मुलं होती. सॅलीला बघताक्षणी अब्राहमनं धावत जाऊन सॅलीला कमरेला विळखा घातला. सॅली अब्राहमची दुसरी आई झाली. तिनं आल्याबरोबर सर्वप्रथम अस्वच्छ आणि मळलेली, घर आणि मुलं, घासूनपुसून लख्ख केली. सॅली अतिशय उत्साही होती. संतुलित विचारांची होती. काटकसर करून, निगुतीनं संसार करण्याचं कौशल्य तिच्यापाशी होतं. तिच्या तीन आणि थॉमसच्या या दोन मुलांमध्ये तिनं कधी आपपरभाव केला नाही. मुलांची मनं राखून सांभाळ करण्याचं कसब तिच्याकडे होतं.
सॅली स्वत: निरक्षर होती. थॉमसकडून सॅलीला कळलं होतं की, अब्राहमला वाचनाची प्रचंड आवड आहे. त्यामुळे तिनं थॉमसकडे येताना आपल्याकडची काही पुस्तकं अब्राहमसाठी आपल्याबरोबर आणली. अब्राहमकडे तिचं विशेष लक्ष होतं. तिनं त्याच्यासाठी नवीन पोशाख शिवला. त्याच्या वाचनाच्या आणि शिकण्याच्या आवडीचं तिला विशेष कौतुक होतं. या गुणांचं संगोपन केलं तर तो खूप पुढं जाईल, यावर तिचा विश्वास होता. आपल्या शक्ती-बुद्धीप्रमाणे त्याच्या गुणांचा विकास करण्याचा तिनं प्रयत्न केला. अब्राहमनं तिच्याबद्दल म्हटलंय, ‘‘तिनंच पहिल्यांदा आम्हाला शिकवलं की, आपण माणूस आहोत आणि माणसाला आत्मसन्मान असतो. आपला जन्म परिस्थितीचे फटके सहन करण्यासाठी, दुसऱ्यानं घालून पाडून बोललेलं ऐकण्यासाठी किंवा स्वत:ला हीन समजण्यासाठी झालेला नाही.’’
 सॅली त्याच्या लिहिण्या-वाचण्याच्या आवडीचं कौतुक करत असे. दुपार झाली की, एखाद्या झाडाच्या सावलीत एकीकडे न्याहारी घेताना तो सारखा पुस्तक वाचत असे. त्या वेळी सॅली, त्याच्या इतर भावंडांना बजावत असे की ‘तो वाचतोय, त्याला त्रास देऊ  नका.’ इतरांजवळ ती नेहमी त्याचं कौतुक करत असे, ‘हा कुणी तरी मोठा होणार, सारखा वाचत असतो.’
  तिच्यात कामाचा उरक प्रचंड होता. दुसऱ्याला समजून घेण्याचा मोठा गुणही होता. अब्राहम मधूनच उदास व्हायचा, पण ती त्याला समजून घ्यायची. कष्टमय जीवन, आईचा मृत्यू आणि वडिलांचा शिक्षणाला असलेला विरोध याचा एकत्रित परिणाम होता तो. अब्राहमच्या प्रामाणिकपणाबद्दल आणि सत्यप्रियतेबद्दल सॅलीला अत्यंत विश्वास होता. एकदा तो रानात लाकूड तोडत असताना, मातिल्डा ही सावत्र बहीण त्याच्या मागून दबक्या पावलाने गेली आणि त्याला दचकवण्यासाठी तिने त्याच्या पाठीवर उडी मारली. अब्राहमचा तोल गेला. तो पाठीवर बहिणीला सावरत गुडघ्यावर खाली पडला आणि त्याच्या कुऱ्हाडीचं पातं मात्र मातिल्डाच्या गुडघ्याला निसटतं लागलं. जखमेतून रक्त वाहू लागलं. त्यानं शर्ट फाडून जखम बांधली. मातिल्डा सारखी हमसून म्हणत होती, ‘आईला काय सांगायचं? ती रागावेल.’ अब्राहमनं तिला सांगितलं, ‘जसं झालं तसं सांग, म्हणजे ती कमी रागावेल.’
 सॅलीनं एका ठिकाणी म्हटलंय की, ‘‘अब्राहम कधीच उलट शब्द बोलला नाही की कधी वाद घातला नाही. त्याला जेव्हा जेव्हा काही सांगितलं तेव्हा तेव्हा तो तत्परतेनं सगळं ऐकत गेला.’’ सॅलीला जेव्हा विचारलं गेलं की, ‘‘तुमच्या दोन मुलांपैकी सर्वोत्तम मुलगा कोणता होता?’’ तेव्हा तिनं उत्तर दिलं, ‘‘दोन्ही मुलं उत्तमच होती, पण आता दोन्ही मुलं हयात नाहीत, त्यामुळं खरं सांगायचं तर अब्राहम हा थोडा उजवाच होता.’’
एका लाकडी ओंडक्याच्या खोलीतून आलेल्या, स्वत:च स्वत: शिकत यशाच्या आणि शिक्षणाच्या पायऱ्या चढत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झालेल्या, अब्राहमसाठी आपली सावत्र आई सॅली हिचं स्थान म्हणजे ‘अत्यंत जवळची सखी’ एवढं विशेष होतं.
 अमेरिकेच्या प्रगतीच्या वाटेवरचा महत्त्वाचा टप्पा होता, गुलामीच्या प्रथेतून सुटका. यासाठी अब्राहम लिंकन यांचं योगदान विशेष होतं. (त्याचं बाळकडू त्यांना घरातूनच मिळालं होतं. त्यांचे पालक या प्रथेच्या विरुद्ध होतेच.) त्यांचा या प्रथेला जोरदार विरोध होता. ही प्रथा मुळासकट उखडली जावी असे त्यांचे विचार होते. त्या दृष्टीनं त्यांनी सतत पाठपुरावा करत राष्ट्राध्यक्षपद स्वीकारल्यावर तसे कायदे आणले आणि अमेरिकेचा अक्षरश: कायापालट केला. मात्र असं करत असताना ते त्यांचे अनेक शत्रू तयार करत गेले. त्यांना त्याची जाणीव जरी झाली असली तरी त्यांनी त्याची काळजी किंवा पर्वा केली नाही. मैत्रीपूर्ण वातावरणात पुढच्या वाटचाली घडाव्यात असं त्यांना वाटत होतं.

“Do I not destroy my enemies when I make them my friends?” असं जरी अब्राहम यांना वाटलं असलं तरी सॅलीला मात्र खूप आतून वाटत होतं की, त्यांनी राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून येता कामा नये, कारण ते त्यांच्या जिवावर बेतेल. त्यांना कोणी तरी मारून टाकेल आणि दुर्दैवानं सॅलीची ही भीती खरी ठरली. १४ एप्रिल १८६५ साली, गुड फ्रायडेच्या दिवशी, अमेरिकेचे १६वे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांची हत्या झाली.
 अब्राहम या नावाचा अर्थ म्हणजे मनुष्यजातीचा पिता. अर्थात नामकरण करताना नॅन्सीला अब्राहमच्या असामान्य व्यक्तिमत्त्वाची अजिबात कल्पना आली नसेल. तिच्या शिकवणीचा, प्रोत्साहनाचा अब्राहमनं कधीच विसर पडू दिला नाही, तर सावत्र आई, सॅलीबरोबर अब्राहमच्या मनाच्या तारा त्यांच्या नात्याच्या पहिल्या क्षणापासूनच जुळल्या होत्या, त्या अखेपर्यंत एकसंधच राहिल्या. या मायलेकाचं हे अद्भुत नातं, ऋणानुबंधांचा तरलपणा कायमच अधोरेखित करत राहील. राष्ट्राध्यक्ष म्हणून अब्राहम यांचं जे मोठेपण आहे त्यात त्यांच्या या सख्ख्या आणि सावत्र दोन्ही आईंचं योगदान मोठं होतं.