25 January 2021

News Flash

जोतिबांचे लेक : चाकोरी मोडणारे पुरुष 

‘चूल आणि मूल’ ही समाजानं आखून दिलेली स्त्रीत्वाची पारंपरिक चौकट स्त्रीनं केव्हाच ओलांडली.

(संग्रहित छायाचित्र)

हरीश सदानी

महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, र. धों. कर्वे यांसारख्या महाराष्ट्रातील अनेक समाजसुधारक पुरुषांनी स्त्री स्वातंत्र्याचं महत्त्व ओळखून तिला जगण्याचं आत्मभान दिलं. मात्र आजही तिचा ‘माणूस’ होण्याचा संघर्ष सुरूच आहे. या तिच्या प्रवासात अनेक पुरुष सहभागी झालेले आहेत. त्यासाठी त्यांनाही पुरुषी अहंकाराच्या जोखडातून सातत्याने स्वत:ला बाहेर काढावं लागत आहे. पुरुषी वर्चस्ववादी वृत्तीशी लढा द्यावा लागत आहे. लिंगभेदविरहित समाज हाच आधुनिक जगण्याचा पाया आहे हे समजलेल्या आणि त्यासाठी पुरुषप्रधान संस्कृतीची चाकोरी मोडत स्त्रीला सामर्थ्य देणाऱ्या जोतिबांच्या लेकांच्या या आदर्शवत कहाण्या दर पंधरवडय़ाला.

‘चूल आणि मूल’ ही समाजानं आखून दिलेली स्त्रीत्वाची पारंपरिक चौकट स्त्रीनं केव्हाच ओलांडली. जवळजवळ सर्वच क्षेत्रांत, जिथे जिथे पुरुषांची मक्तेदारी होती, तिथे तिथे स्त्रियांनी पोहोचून आपला ठसा उमटवलाय. पण पुरुषत्वाची पारंपरिक चौकट पुरुषांनी ओलांडली का? पुरुष असण्याविषयीच्या वर्षांनुवर्ष चालत आलेल्या धारणा, प्रतिमा, संकल्पना बदलताना आपण कितीशा पाहिल्या आहेत?

पारंपरिक पुरुषपणाच्या रूढ असलेल्या संकल्पनांचा विचार केला, तर पुरुषानं, कमावून आणणारा, मुख्य ‘कर्ता’ म्हणून सर्व कुटुंबीयांना सांभाळणारा, पोषण करणारा, जेता, मिळवता, या भूमिका आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर वठवायला हव्यात, हे अपेक्षिलं जातं. याचबरोबर आपल्या भावना मोकळेपणानं त्यानं व्यक्त करू नयेत, कर्तेपणाचं, मिळवतेपणाचं ओझं असल्यामुळे त्याच्या वागण्यात आक्रमकता, सतत स्पर्धा करण्याची, स्त्रिया आणि इतरांवर नियंत्रण करण्याची हिंसक प्रवृत्ती आल्यास त्यात गैर काही नाही, ही समजूतही रूढ असलेली आपण बघतो.

प्रसिद्ध फ्रेंच लेखिका सिमोन दि बोव्हा यांनी त्यांच्या ‘दि सेकंड सेक्स’ या पुस्तकात जसं म्हटलंय, की ‘स्त्री जन्माला येत नाही, ती घडवली जाते’. स्त्रीबाबत लागू असणारं हे विधान पुरुषाबाबतही तितकंच खरं आहे. पुरुष असण्याविषयीच्या वरील समजुती, संकल्पना लहान वयाच्या मुलग्यांपासून  ते प्रौढ पुरुषांमध्ये आकार घेत असतात. समाजातील सर्व घटक संस्था- कुटुंबसंस्था, धर्मसंस्था, शिक्षणसंस्था, अर्थसंस्था आणि माध्यमसंस्था ‘पुरुषांचं वर्चस्व/ पुरुषांची प्रधानता’ याला खतपाणी घालत असतात. आपल्या बोलण्या-वागण्यातून, हावभाव, पेहराव, इत्यादी स्वरूपात हे पुरुषत्व सतत झळकत असतं. पुरुषपणाच्या साचेबद्ध संकल्पनांबाबत प्रश्न उपस्थित करणं, त्या वारंवार तपासून बदलण्याच्या दृष्टीनं कृतिशील पावलं उचलणं, हे प्रत्येक पुरुषाला आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यात शक्य असतं. लहानपणी, पौगंडावस्थेत शाळेत शिकत असताना, कधी अजाणतेपणी स्वत:हून निवडलेल्या व्यवसायानिमित्तानं, कधी आयुष्यातील एखाद्या घडामोडी वा प्रसंगानिमित्तानं, तर कधी कुणा व्यक्ती किंवा संस्थेचे विचार ऐकण्यात किंवा वाचनात आल्यानंतर. वरील प्रक्रियेतून वाटचाल करणाऱ्या, पारंपरिक पुरुषी मानसिकतेला आव्हान देत, स्त्री-पुरुष नातं निकोप, सुदृढ होण्यासाठी धडपडणाऱ्या पुरुषांच्या कहाण्या या नव्या सदरात तुम्हाला वाचायला मिळणार आहेत. महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशाच्या इतरही ग्रामीण वा शहरी भागातील, विविध पार्श्वभूमीच्या, वयोगटांच्या पुरुषांच्या या कहाण्या असणार आहेत.

पुरुषप्रधान व्यवस्थेमुळे पुरुष म्हणून लहानपणापासून मिळणारे फायदे वा विशेषाधिकार आणि घरातल्या स्त्रियांना मिळणारी दुय्यम वागणूक, रक्षणकर्ता म्हणून त्यांच्या संचारावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्यावर कसे संस्कार केले गेले याची जाणीव झालेले पुरुष इथं भेटणार आहेत. बंगळूरू येथे निवासी मिलिटरी शाळेत इयत्ता सहावीत शिकत असताना ‘रफ आणि टफ’ वागण्याबरोबरच दादागिरी (बुलिंग) आणि छळाद्वारा          पुरुषा-पुरुषांमध्ये विषारी मर्दानगीचे धडे मिळून ‘शिस्त’, ‘इभ्रत’, ‘धैर्य’, ‘बंधुत्व’, याबद्दल चुकीच्या कल्पना कशा घेतल्या ते अश्विन चंद्रशेखर या तरुणाच्या कहाणीतून उमजेल. दिल्लीत १६ डिसेंबर २०१२ रोजी बसमध्ये प्रवास करणाऱ्या २३ वर्षीय तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेनं अनेक जण हेलावले. यांपैकी एक- मुंबईतील दीपेश टँक या तरुणास पुरुष म्हणून स्वत:ची लाज वाटली. व्यक्ती म्हणून अशा घटना थांबवण्यासाठी आपण काय करू शकतो, याचा तो विचार करू लागला. स्त्रियांवरील लिंगाधारित हिंसाचाराबद्दल बोलताना बलात्काराविषयी काही जण जेवढा संताप, रोष व्यक्त करतात, तेवढं शिट्टी वाजवून किंवा अचकटविचकटपणे स्त्रियांना स्पर्श करून जी छेडछाड पुरुष नियमितपणे करीत असतात, त्याबद्दल सहसा कुणी बोलत नाही, हे दीपेशला जाणवलं आणि २०१३ मध्ये त्यानं पुढाकार घेऊन ‘डब्ल्यूएआरआर’ (वॉर अगेन्स्ट रेल्वे राऊडीज) ही मोहीम सुरू केली. रेल्वे फलाटावर स्त्रियांची छेड काढणाऱ्यांविरुद्ध ‘जीआरपी’ (गव्हर्नमेंट रेल्वे पोलीस) आणि ‘आरपीएफ’ (रेल्वे प्रोटेक्शन फोर्स) पोलिसांच्या सहाय्यानं दीपेश ही मोहीम कसा राबवत आला आहे, हे आपण या सदरात समजून घेणार आहोत. दीपेशप्रमाणेच गोरखपूर येथील मनीष कुमार यांनी किशोरवयीन मुलग्यांबरोबर ‘गाली बंद क्लास’ २० वर्षांपूर्वी घेऊन पुढे उत्तर प्रदेश सरकारच्या महिला समस्या योजनेंतर्गत स्त्री-सक्षमीकरणासाठी काय कार्य केलं, तेही जाणून घेणार आहोत.

समाजात स्त्री-पुरुषांच्या असलेल्या असमान, गढूळ आणि अशक्त नातेसंबंधांमागचं एक महत्त्वाचं कारण पुरुष आणि स्त्रियांमध्ये लैंगिकता आणि लिंगभावविषयक व्यापक, एकात्मिक शिक्षणाचा अभाव हे आहे. यामध्ये लैंगिक समागमाबद्दल शास्त्रीय माहितीबरोबरच परस्पर-आदर, संवाद, नातेसंबंधांमागील सहमती आणि नकार हे जीवनकौशल्यविषयक शिक्षण अभिप्रेत असतं. याचं मर्म ओळखून स्वत:च्या आयुष्यातील स्त्रियांबरोबरचे संबंध अधिकाधिक निकोप, सुदृढ कसे होतील याबरोबरच आपल्या अवतीभवतीच्या समुदायामध्ये पण असे नातेसंबंध कसे आकार घेतील यासाठी धडपडणाऱ्या तीन पुरुषांच्या कथा आपण या सदरात पाहाणार आहोत.  या तिघांच्या कृतिशीलतेला निमित्त होतं, ते म्हणजे त्यांच्या आयुष्यातील घडामोडी.  एकाचं कारण होतं, ते त्याच्या छोटय़ाशा गावात सामुदायिक आरोग्यविषयक काम करणाऱ्या संस्थेचं पोहोचणं. दुसऱ्याच्या बाबतीत निमित्त होतं, ते त्याच्या दोन पूर्व-पत्नींशी असणारं नातं किती तकलादू होतं, याचं आणि त्याच्यातील स्वामित्वाच्या, वर्चस्ववादी पुरुषी प्रवृत्तीचं त्याला आलेलं भान. तर तिसऱ्याबाबत १७ वर्ष वैद्यकीय प्रॅक्टिस केल्यानंतर ती बंद करून, देशातील सामान्यजनांमध्ये पोहोचून ‘आरोग्यभान’ देण्याविषयीचा निर्णय घेणं.

बालविवाह, कौमार्य चाचणीसारख्या जुनाट प्रथांना स्वयंस्फूर्तपणे टक्कर देणाऱ्या तरुणांच्या कहाण्याही या सदरात असतील. स्त्रीजाणीवविषयक संवेदनशीलता निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील अशा या पुरुषांना वर्षांनुवर्षांचे घट्ट संस्कार खरवडून काढत, स्वत:शी संवाद साधत, अंतर्मनात दडलेल्या पुरुषाशी सतत झगडावे लागत आहे. स्त्रीशी निरामय नाते निर्माण करण्यासाठी कटिबद्ध असलेल्या पुरुषांना जाण आहे, की त्यांच्यातील पुरुषसत्तेनं घालून दिलेल्या वर्चस्ववादी प्रवृत्तीपासून ते पूर्णपणे मुक्त नाहीत. मित्रमंडळी, सहकारी आणि स्त्रियांसोबत वावरत असताना अधूनमधून डोकावणाऱ्या त्या प्रवृत्तीशी, पुरुषी अहंकाराशी त्यांना झटापट करावी लागत असते. बदलकर्त्यां पुरुषासाठी ती एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे.

एक सशक्त, स्वस्थ समाज निर्माण करण्यासाठी, पुरुष, स्त्रिया आणि इतरलिंगी व्यक्तींमध्ये सहअस्तित्व निर्माण व्हावं यासाठी या सर्वानाच शोषणव्यवस्थेपासून मुक्ती मिळायला हवी. समानतेच्या लढाईत ‘पुरुष’ हा शत्रू नसून पारंपरिक पुरुषी, वर्चस्ववादी दृष्टिकोन हा आपल्या सर्वाचा समान शत्रू आहे. लिंगभेद मिटवून स्त्रियांचं आणि इतर अल्पसंख्याकांचं जगणं सशक्त, समृद्ध, सुरक्षित करण्याबरोबरच समस्त पुरुषांचं जगणंही मानुषी, माणूसपणाच्या वाटेकडे जाणारं असायला हवं.

आधुनिक काळात महात्मा जोतिबा फुले यांनी आपल्या विचार आणि कार्याच्या माध्यमातून जात-धर्माच्या पलीकडे जाऊन स्त्रीच्या पाठीमागे खंबीरपणे उभ्या राहाणाऱ्या ‘नव्या पुरुषा’चा वस्तुपाठ उभा केला. ‘स्त्रिया या जातीव्यवस्थेचं प्रवेशद्वार आहे’ हे विस्तारानं मांडणाऱ्या

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रीदास्य- अंताकरिता अभूतपूर्व योगदान दिलं. महात्मा फुले-आंबेडकरांच्या समृद्ध वारशात रघुनाथ धोंडो कर्वे, साने गुरुजी, आचार्य विनोबा भावे, दादा धर्माधिकारी अशा महाराष्ट्रातील अनेक पुरुषांनी स्त्री-पुरुष समतेच्या विचारांची मशागत महाराष्ट्राच्या, देशाच्या मनोभूमीत प्रयत्नपूर्वक केली आहे. परंतु अनेक शतकं विषमताधारित धर्म आणि जातीव्यवस्थेच्या बंधनात अडकलेल्या समाजात असे परिवर्तनवादी पुरुष अपवादस्वरूपच राहिले आहेत.

सावित्रीच्या लेकी वाढण्याबद्दल आग्रही असणाऱ्या महाराष्ट्रात जोतिबांचे लेकही निपजावे, हा विचारदेखील सहसा होताना दिसत नाही. पिढय़ान्पिढय़ा लिंगभेदानं तयार करून ठेवलेल्या पुरुषपणाची चाकोरी मोडणाऱ्या, चिकाटी आणि जिद्दीनं वेगळी वाट चोखाळणाऱ्या पुरुषांच्या या सदरातील कहाण्या वाचून अधिकाधिक पुरुषांमध्ये तो विचार रुजेल, तो पुढच्या पिढय़ांपर्यंत झिरपेल आणि काही जण तरी या वेगळ्या वाटेनं गेले तरी या सदराचं सार्थक ठरेल.

हरीश सदानी हे लिंगभाव हक्कांसाठी तीन दशकं कार्यरत आहेत. लिंगभेद आणि स्त्रियांवरील लिंगाधारित हिंसेला प्रतिबंध करण्यासाठी पुरुषांनी सुरू केलेल्या ‘मेन् अगेन्स्ट व्हायोलन्स अ‍ॅन्ड अब्युज’ (मावा) या देशातील पहिल्या स्वयंसेवी संस्थेचे ते संस्थापक सदस्य आणि मुख्य कार्यवाह आहेत. लिंगसमभाव, पुरुषत्व आणि सशक्त नातेसंबंध याविषयी देशभरातील हजारो तरुण पुरुष आणि मुलग्यांना ते संवेदनशील करीत आहेत. कार्यशाळा, नाटय़, चित्रपट महोत्सव, समाजमाध्यमे आणि इतर नावीन्यपूर्ण माध्यमांमार्फत ते या पुरुषांमध्ये संवादक-मेंटॉर्स तयार करण्यासाठी कृतिशील आहेत. ‘टाटा सामाजिक विज्ञान संस्थे’तून त्यांनी समाजकार्याचे पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहे. ‘टेड एक्स टॉक्स’मध्ये ते वक्ते म्हणून सहभागी झाले आहेत. स्त्री-पुरुष समानता आणि लैंगिक छळ प्रतिबंधाच्या मुद्दय़ांवर ते शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ, कॉपरेरेट्स आणि स्वयंसेवी संस्थांकरिता सल्लागार आणि प्रशिक्षक म्हणून काम करत आहेत.

saharsh267@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 9, 2021 12:01 am

Web Title: ideal stories of jyotiba sons who break the cycle of patriarchal culture and empower women abn 97
Next Stories
1 गद्धेपंचविशी : या मंडळी सादर करू या!
2 भय इथले संप(व)ले आहे.
3 ..न मागुती तुवा कधी फिरायचे
Just Now!
X