23 January 2020

News Flash

सृजनाच्या नव्या वाटा : इमली महुआ जाणिवा वाढवणारी शाळा

इमली महुआ - नावच किती वेगळं आहे. आणि ते एका शाळेचं नाव असावं, ही आणखीनच वेगळी गोष्ट.

(संग्रहित छायाचित्र)

रेणू दांडेकर

आजच्या शाळा फक्त पुस्तकी शिक्षणावर भर देणाऱ्या आहेत. तो दृष्टिकोन बदलायचा प्रयत्न ‘इमली महुआ’ने केला. ‘इमली महुआ’ने अनेक पर्याय उभे केले. फक्त शालेय पुस्तकांवरच मुलं अवलंबून राहिली नाहीत, तर वेगवेगळ्या भाषेतली उत्तमोत्तम पुस्तकं ग्रंथालयात जमा होऊ  लागली. प्रत्येक मुलाचा एक फोल्डर तयार झाला. मातीकामाची भट्टी तयार झाली. गणिती शैक्षणिक साधनं आली, रंग जमले. इथली मुलं-मुली शिकायला-शिकवायला शाळेत येऊ लागली.. छत्तीसगडमधल्या बालेंगा पारा इथल्या इमली महुआ या शाळेविषयी.

इमली महुआ – नावच किती वेगळं आहे. आणि ते एका शाळेचं नाव असावं, ही आणखीनच वेगळी गोष्ट. अर्थात २००७ ते २०१० पर्यंत ही शाळा नव्हती तर ते एक शैक्षणिक केंद्र होतं. २०१० ते २०१७ मध्ये नोंदणी होऊन ही शाळा म्हणून नोंदवली गेली. ‘शिक्षण हक्क कायद्या’मुळे आणि मागणी केल्यामुळे ही शाळा नोंदणीकृत झाली. आपल्याकडे जिल्हा परिषदेमध्ये शिक्षणविभाग आणि त्या त्या जिल्ह्य़ाची कामं चालतात तसे छत्तीसगड राज्यात नाही. येथे सर्व व्यवहार, कामं राज्य पातळीवर होतात. २०१९ मध्ये जूनपासून शाळेची नोंदणी केली गेली नाही, त्यामुळे ही शाळा पुन्हा एकदा शैक्षणिक केंद्र म्हणून ओळखली जात आहे. असं असलं तरी जवळ जवळ बारा वर्ष म्हणजे एक तप वेगळ्या विचाराने, वेगळ्या पद्धतीने चालणारी ही शाळा कशी आहे हे नक्कीच जाणून घ्यायला हवं म्हणून मी छत्तीसगडच्या बालेंगा पाराला पोहोचले.

आधी आजूबाजूचा परिसर कसा दिसला मला? तर, गडचिरोलीत गेल्यासारखं वाटलं. बरेच ठिकाणी बस्तर नाव वाचलं आणि भीतीही वाटली. जाताना गाडीचा कंडक्टर म्हणाला, ‘‘आम्ही गणवेश नाही वापरत कारण हा परिसर धोकादायक आहे ना!’’ जे वर्तमानपत्रात वाचतो ते डोळ्यांपुढे आलं. वर्तमानपत्र उघडलं त्या दिवशीच तर ‘नक्षलवाद्यांबरोबर चकमक आणि अमुक जणांची हत्या / अमुक ठार’ अशी बातमी वाचली. नारायणपूर आणि परिसराच्या काही अंतरावर असणारा हा बालेंगापारा पाडा. जाताना कोकोडीच्या स्टॉपवर उतरून पाडय़ाच्या दिशेने जाऊ लागले. तोवर अंधार पडू लागला होता. पाऊसही सुरू झालेला. प्रयागजींबरोबर आम्ही मोटारसायकलवरून जात होतो. ‘राजकीय प्राथमिक शाळे’ची इमारत जाताना रस्त्यावरच दिसली. मोठी इमारत होती. शाळा सुटली असल्यामुळे कोणीच नव्हतं. पुढेही सगळीकडे नळीची कौलं असणारी ठरावीक प्रकारची घरं दिसू लागली, मधेमधे दारू प्यायलेली स्त्री-पुरुष मंडळीही भेटत होती. आम्ही ‘इमली महुआ’ला पोचलो. आदिवासींच्या घोटुलसारखी सगळे एकत्र जमायची ती इमारत मी पाहात होते.

प्रयागजी घरी गेले आणि मग त्या परिसरात मी एकटीच उरले. पाऊस होता. त्या अनोळखी प्रदेशात थोडी भीतीही वाटत होती. जाणारी-येणारी वर्दळ कमी झाली होती. आणि माणसं बोलत होती ते त्यांच्या हळबी या आदिवासी भाषेतच त्यामुळे काहीच कळत नव्हतं. रात्री प्रयागजींच्या घरी दाट रानातनं, अंधारातून वाट काढत गेलो आणि जेवण करून झोपायला परत शाळेत आलो. सकाळी आठ-साडेआठपासून वेगवेगळी मुलं इथे येणार होतीच. जाण्याआधी त्यांचं संकेतस्थळ पाहिलं होतं, लेख, सगळे अहवाल वाचले होते. पण प्रत्यक्ष पाहणं, बोलणं आणि समजून घेणं यात फरक पडतोच.

मिळालेल्या माहितीनुसार मुलं येत नाहीत वा आर्थिक अडचणीमुळे शाळा बंद करण्याची वेळ आली. मालकांच्या मागणीप्रमाणे ही शाळा सुरू ठेवण्यात प्रयागजींना रस नव्हताच. त्यापेक्षा पहिली तीन वर्ष ज्याप्रमाणे शैक्षणिक केंद्र म्हणून (लर्निग सेंटर) ती चालू होती तशीच सुरू राहील असं ठरलं. गेल्या बारा वर्षांत खूप वेगळे प्रयोग, विचारप्रणाली अमलात आणली गेली. त्यातल्या अनेक गोष्टींचा आपल्याला आजही विचार करणं हितावह ठरेल असं वाटतं.

‘आकांक्षा चॅरिटेबल ट्रस्ट’चे प्रमुख प्रयाग जोशी. सी. ए. झालेला आणि बी.एड.ची पदवी मिळवलेला हा मनुष्य गेली बारा वर्षे छत्तीसगडसारख्या ठिकाणी जाऊन एका आदिवासी पाडय़ावर शिक्षणातले प्रयोग करतो हेच मुळात वेगळं आहे. इथे येण्याआधी ते चेन्नईला एका संस्थेत काम करत होते. नऊ महिने पर्यावरणविषयक काम करणाऱ्या एका संस्थेत त्यांनी काम केलं. मग दोन वर्ष एका शाळेत शिकवायचं काम केलं. कारण या क्षेत्रातला अनुभव नव्हता. कोणत्या क्षेत्रात काम करावं हा विचार सुरू असताना मुलं आणि स्त्रियांच्या क्षेत्रात काम करावं असं उत्तर सापडलं.

सुरुवात झाली ती आर्थिक मदतीतून. मुलांना शिक्षणासाठी आर्थिक मदत द्यायला सुरुवात केली. गरिबी आणि आर्थिक समस्या या मुलांमध्ये ताकद-क्षमता असूनही पुढे जायला अडवतात, संघर्ष करावा तर लागतोच शिवाय मनानं ते कमकुवत होतात, त्यांना अवहेलना सोसावी लागते. अशा वेळी मुलांना जर आर्थिक मदत मिळाली तर मुलं पुढं जातात या विचाराने ट्रस्टमार्फत गरजू मुलांना प्रत्यक्ष हातात पैसे न देता आवश्यकतेनुसार त्या त्या संस्थेची फी संस्थेत  पाठवायचं काम सुरू झालं. हे काम ट्रस्टमार्फत आजही सुरू आहे. ही मदत म्हणजे औपचारिक शिक्षण घेताना मिळणारी सुरक्षितता.

प्रयागजींना कुतूहल होतं ते प्राथमिक शिक्षणात काय चालतं हे पाहण्याचं. याआधी प्रयागजींनी महाविद्यालयात शिकवलं होतं. मनात आलं शाळा सुरू करू या. महाराष्ट्रात त्यांनी अनेक ठिकाणी शोध घेतला, परंतु फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी बल्लारचं नाव ऐकलं होतं. सेवाग्राम, परमधाम मुद्रणालय इथल्या मित्रांनी बल्लारमधल्या एका व्यक्तीचं नाव सांगितलं. या व्यक्तीने इथल्या अनेक खेडय़ांचे संपर्क दिले. त्यांनी दहा गावं सांगितली. त्या गावात प्रयागजी फिरले. यातच होतं बालेंगापारा हे गाव. इथल्या गावकऱ्यांशी बोलणं झालं. ‘शाळा काढू या का?’ या विषयावर चर्चा झाली. गावकऱ्यांशी ते अनेक विषयांवर बोलले. त्यातलं त्यांना किती समजलं हा मुद्दा वेगळा होता. पण इथेच शाळा सुरू करायची ठरली.

महत्त्वाचा मुद्दा हा आहे की, विचार मांडून आणि गावकऱ्यांची संमती घेऊनच शाळा सुरू करायचा निर्णय घेतला. महात्मा गांधी,

जे. कृष्णमूर्ती यांचे विचार होतेच, पण सुरुवातीला अभ्यास विषयाला मर्यादा होती. पण प्रत्यक्ष काम सुरू झाल्यावर दृष्टिकोन बदलला. ‘स्कूलिंग’ आणि ‘एज्युकेशन’मध्ये फरक आहे, हे लक्षात आलं. वाचनातून अंतर्बाह्य़ दृष्टी आणि आवाका आला नव्हता, पण प्रत्यक्ष काम करू लागल्यावर येऊ लागला. काय केलं पाहिजे हे समजू लागलं, दिशाच बदलली. आज हे दोन शब्द वेगळ्या अर्थाने ते वापरतात. ‘स्कूलिंग’मध्ये एका सामाजिक रचनेची कल्पना घेऊन त्यावर आधारित गोष्टी घडतात. याला नैसर्गिकपणे होणारं प्रशिक्षण म्हणायला हरकत नाही. इथे समाज कोणताही असला तरी त्या समाजाचं स्वप्न, आदर्शवाद असतो. समाजाला उपयुक्त असणाऱ्या व्यक्ती घडवण्याचा भाग असतो. त्याउलट ‘एज्युकेशन’ हे कुणा एका विशिष्ट व्यक्तीसाठी नसतं. त्यात कुठलं स्वप्न किंवा एक विशिष्ट समाज अशी दृष्टी वा हेतू नसतो. त्यामुळे आपण जिथे काम करणार आहोत ती मुलं, त्यांची भाषा, त्यांच्या क्षमता, ताकद, वृत्ती-प्रवृत्ती या सगळ्याचा अभ्यास ‘इमली महुआ’च्या निर्मितीत होता. इतर शाळांतून घडवण्यावर, त्याची सक्ती करण्यावर भर असतो. ‘तू असा वाग, असा विचार कर, असा चाल, असे कपडे घाल.’ असा आग्रह असतो. या उलट ‘मी कसा आहे, मला काय हवंय,’ याचा शोध घेण्याची वृत्ती ‘इमली महुआ’त तयार होत होती. शोध आणि चौकसपणा याला ‘इमली महुआ’त संधी होती.

आजच्या शाळा म्हणजे पुस्तकी शिक्षणावर भर देणाऱ्या आहेत. तो दृष्टिकोन बदलायचा प्रयत्न ‘इमली महुआ’ने केला. एखादी गोष्ट शिकताना शिकणाऱ्या व्यक्तीपुढे अनेक पर्याय हवेत. ते पर्याय ‘इमली महुआ’ने उभे केले. शालेय पुस्तकं वापरली नाहीत का? तर वापरली. पण याच पुस्तकांवर मुलं अवलंबून राहिली नाहीत. ‘पुस्तकातून शिकू नका.’ असं नाही. एका बाजूला या शाळेतल्या शिक्षणाची दिशा अगदी वेगळी होती पण पालकांच्या अपेक्षा सामान्य पालकांप्रमाणेच होत्या. सरकारी शाळेत जे शिक्षण मिळतं त्यापेक्षा चांगली तयारी या शाळेत होईल का? मुलांना इंग्रजी येईल का? हे प्रश्न पालकांच्या मनात होते. पण संस्थापकाची आणि येथील शिक्षकांची विचारसरणी सारखी असल्याने मुलं घडत गेली.

इथल्या शिक्षकाला ‘कार्यकर्ता’ म्हटलं जातं. दोन स्त्री-कार्यकर्ता इथे सुरुवातीला आल्या. या स्त्रिया ‘सह्य़ाद्री स्कूल’मधल्या होत्या. ही शाळा जे. कृष्णमूर्ती यांच्या विचारसरणीवर चालणारी आहे. प्रत्यक्ष आदिवासी भागात जाऊन शिकवणं, त्यांचं जीवन अनुभवणं, जनजीवनाचा अभ्यास करणं हे करत असताना दोघींमधली एक ४-५ दिवसांतच निघून गेली. काही महिन्यांनी दुसरीही गेली. मग प्रयाग जोशी याचं एकखांबी काम सुरू झालं. सगळ्या जमवाजमवीत एक वर्ष गेलं. मुलांची संख्या वाढली नि सरकारदरबारी नोंदणी केल्यावर सरकारच्या अटीही आल्या. इथे आता तिथलीच आदिवासी मुलं ‘कार्यकर्ता’ म्हणून काम करू लागली. प्रयागजींनी ‘हळबी’ ही आदिवासी भाषा शिकून घेतली. मुलांशी आणि पालकांशी त्यांच्या भाषेत संपर्क साधला जातोय, म्हटल्यावर एक जवळीक निर्माण झाली.

वेगवेगळ्या भाषेतली उत्तमोत्तम पुस्तकं ग्रंथालयात जमा होऊ लागली. प्रत्येक मुलाचा एक फोल्डर तयार झाला. मातीकामाची भट्टी तयार झाली. गणिती शैक्षणिक साधनं आली, रंग जमले. इथली मुलं-मुली शिकायला-शिकवायला शाळेत येऊ लागली. काय असावा पाठय़क्रम? म्हणजे अभ्यासक्रम काय असावा, हे इथले स्थानिक शिक्षक ठरवू लागले. सुरुवातीला दिवसभर काय करायचं याचं नियोजन, सुट्टय़ा, शाळेची वेळ, पुस्तकं, इतर उपक्रम शिक्षक ठरवू लागले. तेवढाच वेळ खेळ, विविध कला, मातीकाम, सायकलिंगसाठी दिला जायचा. सगळ्या शाळेला घेऊन संस्था विविध कामं, शाळा बघायला जायची. कौसानी शाळा (उत्तराखंड), मुस्कान (मध्य प्रदेश), पूवीधाम (तमिळनाडू), मरूधम (आंध्र प्रदेश) अशा मुलांच्या लांबलांबवर सहली जाऊ लागल्या. मुलांचा अनुभवांचा विस्तार वाढत गेला..जाणिवा वाढवणारं शिक्षण देणारी ही शाळा म्हणूनच वेगळी ठरते.

(उर्वरित भाग २१ सप्टेंबरच्या अंकात)

शाळेचा पत्ता  –  प्रयाग जोशी, बालेंगापारा, पोस्ट – किवई बालेंगा, जि. कोंढागाव, राज्य छत्तीसगड (पिन नंबर – ४९४२२६) प्रयाग जोशी यांचा संपर्क – (९९२६६८३७७८)

शाळेचे संकेतस्थळ

www.imleemahua.org.

ई-मेल आयडी –

prayaag-joshi@yahoo.com

renudandekar@gmail.com

chaturang@expressindia.com

First Published on September 7, 2019 12:06 am

Web Title: imli mahua school renu dandekar abn 97
Next Stories
1 आव्हान पालकत्वाचे : कौमार्यपरीक्षा
2 वेध भवतालाचा : आकाशींगा
3 नात्यांची उकल : आनंदाची बकेट लिस्ट
Just Now!
X