News Flash

संजीवन काव्य

कवितेच्या माध्यमांतून तरल आणि संजीवक स्वप्नांची निर्मिती करणाऱ्या संजीवनी मराठे यांचे जन्मशताब्दी वर्ष आजपासून सुरू होते आहे त्यानिमित्ताने त्यांच्या संजीवन काव्याविषयी..

| February 14, 2015 03:12 am

कवितेच्या माध्यमांतून तरल आणि संजीवक स्वप्नांची निर्मिती करणाऱ्या संजीवनी मराठे यांचे जन्मशताब्दी वर्ष आजपासून सुरू होते आहे त्यानिमित्ताने त्यांच्या संजीवन काव्याविषयी..
‘संजीवनी’ या नावाने काव्यलेखन करणाऱ्या संजीवनी मराठे यांच्या कविता आणि गीते यांनी मराठी मनाला एकेकाळी मोहिनी घातली होती. त्या कवयित्री तर होत्याच, शिवाय कविसंमेलनात स्वत:च्या कविता सुरेल आवाजात त्या गातही असत. १४ फेब्रुवारी १९१६ ला त्यांचा जन्म झाला. शाळकरी वयातच त्या कविता लिहू लागल्या. १९३२ साली कोल्हापूरला भरलेल्या साहित्यसंमेलनात त्यांचा काव्यक्षेत्रात प्रवेश झाला. त्यांचा पहिला कवितासंग्रह ‘काव्यसंजीवनी’ त्याच वर्षी प्रकाशित झाला. पुढे ‘राका,’ ‘संसार’, ‘छाया’, ‘चित्रा’, ‘चंद्रफूल’, ‘मी दिवाणी’ ‘आत्मीय’ अशा अनेक कवितासंग्रहातून आणि ‘भावपुष्प’ व ‘परिमला’गीतसंग्रहांतून त्यांची काव्यजीवनातील वाटचाल रसिकांना अनुभवता आली.  
    संजीवनीबाईंची कविता तरल आणि संजीवक स्वप्नांची निर्मिती करणारी आहे. त्यांची स्वप्ने निसर्गसौंदर्याबरोबरच मानवी जीवनातील शाश्वत मूल्यांकडेही सौंदर्यदृष्टीने पाहणारी आहेत. त्यामुळे
     ‘माझ्या स्वप्नांवरला मोहर,
कुजबुजतो ताऱ्यांच्या कानी’ अशी त्यात अलौकिक सृष्टी येते, त्याच वेळी  
‘हवी मला ती माती जीवर,
माझे पहिले स्वप्न रेखिले’
अशा शब्दांत ती लौकिकाचीही बूज ठेवते, तर कधी,  ‘सुंदराचे स्वप्न माझ्या पाहिलेले लोचनांनी, मी दिवाणी मी दिवाणी’ अशा शब्दांमध्ये स्वत:ची आंतरिक ओढ व्यक्त करते. ‘कविता स्फुरते कशी’ या त्यांच्या सुप्रसिद्ध कवितेत त्या शब्दांच्या गौळणींना स्वप्नसख्याच म्हणतात.
‘प्रेम’ हेही त्यांच्यासाठी एक मनोमन जपलेले स्वप्नच होते.
‘प्रेम असते ज्याचे नाव
सारे जगच त्याचे गाव’
असे विश्वाकार अनुभूती देणारे प्रेम जसे त्यात अभिप्रेत असते, तसेच त्यांच्या लेखी व्यक्तिगत जगण्याला अर्थपूर्णता देणारे ते एक चिरंतन मूल्यही असते. ‘शांत सागरी कशास उठविलीस वादळे?’ या त्यांच्या गाजलेल्या कवितेत त्या लिहितात,
 ‘‘पढविल्या वदे वचांस
 बद्ध त्या विहंगमास
गायिलेस तू कशास गीत नंदनातले?’’
  प्रियकराला यात विचारलेला प्रश्न कवयित्रीच्या मनातील प्रेमविषयक संकल्पनेवर प्रकाश टाकतो. प्रेम ही अशी शक्ती आहे, जी व्यक्तिमनाला मुक्त होण्यासाठी बळ पुरवते, व्यक्तीच्या जगण्याला चैतन्याचा स्वर्गीय स्पर्श देते, असे कवयित्रीला अभिप्रेत आहे. प्रेमाचे हे सर्जक, प्रेरक रूप व्यक्तीच्या विकासासाठी पूरक ठरते. या स्वप्नवत प्रेमाच्या प्राप्तीसाठी म्हणूनच कवयित्रीला सतत ‘स्वप्नांच्या मधुमासाचा’ ध्यास दिसतो.
संजीवनीबाईंच्या कवितांमधील स्वप्नसृष्टीकडे थोडे वास्तवाच्या पायावर उभे राहूनही पाहायला हवे. आपल्या ‘मी दिवाणी’ या कवितासंग्रहात कवयित्रीने आपले मनोगत दिले आहे. त्यातील काही तपशील महत्त्वाचे आहेत. त्या लिहितात की, त्यांच्या घराने बालवयापासून त्यांच्या कवितांना प्रोत्साहन दिले. त्यांचे वडील रसिक होते. ते थिऑसॉफीच्या प्रभावामुळे धार्मिक कर्मकांडांपासून लांब होते, मात्र त्यांची दृष्टी सांस्कृतिकदृष्टय़ा कर्मठ होती. त्यामुळे उमलत्या वयात संजीवनीबाईंना घरातले वातावरण खूप अस्वस्थ करीत असे. ‘आपल्या कल्पनेला ओढ लावणारे सुंदर जग प्रत्यक्षात कधीच भेटणार नाही का?’ या विचाराने त्यांचे स्वतंत्रपणे स्फुरणारे मन बेचैन होई. त्यांना रोजचे जीवन नीरस वाटे. त्यातून त्यांनी मनाने स्वप्नसृष्टीची निर्मिती केली. त्यांची स्वप्नसृष्टी ही वास्तवातील बंदिस्त जगावर त्यांनी अप्रत्यक्षपणे केलेली टीका आहे. तरुण वयात घरचा विरोध असताना त्यांनी रामभाऊ मराठे यांच्याशी विवाह केला होता. या स्वप्नसृष्टीच्या बळावर त्यांनी आपले अंत:स्वातंत्र्य कायम राखले होते, असे दिसते.
संजीवनीबाई, इंदिराबाई आणि पद्माबाई या कवयित्रींनी १९३५च्या नंतर काव्यक्षेत्रात स्त्रीजाणिवांची अभिव्यक्ती काव्यात्म व्यक्त करून रसिकांचे लक्ष वेधून घेतले होते. या तिघींवर रविकिरण मंडळाचा प्रभाव होता. संजीवनीबाईंवर भा. रा. तांबे यांच्या भावगीतांचाही प्रभाव होता. आणखीही एका कवीचा त्यांच्यावर प्रभाव होता, तो कवी म्हणजे रवींद्रनाथ टागोर. टागोरांच्या ‘गीतांजली’ आणि ‘गार्डनर’मधील निसर्गरूपात परमतत्त्व पाहण्याच्या दृष्टीचा ठसा संजीवनीबाईंच्या कवितांमध्येही जाणवतो. उदा.
‘आले होते तुझे निमंत्रण
पहाटपक्ष्याच्या गाण्यातुनि
साखरझोपेमध्ये रंगता
मुळी न पडले माझ्या कानी’
या ओळींतून किंवा
‘आपल्याच प्राणात नांदत असतोस
त्याचे स्पंदन क्षणाक्षणात
त्याच लयीने मला बांधले
तुझ्या ध्यानात-तुझ्या गाण्यात’
अशा चराचराशी एकतानता अनुभवणाऱ्या शब्दांतून हा ठसा जाणवतो. एकीकडे सूर-ताल यांच्यात रंगून भवतालात गुंतणारी ही कवयित्री संसाराचा तालही रंगून अनुभवत होती. संजीवनीबाईंची संसारी भावभावनांची कविता प्रेमरसापासून वत्सलरसापर्यंतच्या गृहिणीपदाच्या छटा घेऊन येते, हे खरे. पण त्यांच्यातील स्त्रीत्वाचे स्वप्न गृहिणीपणाशीच थांबत नाही, हेही खरे म्हणूनच त्या जणू सर्वसामान्य स्त्रीच्या आटोक्यात भव्य स्वप्ने आणून ठेवताना लिहून गेल्या आहेत.
‘‘मी कांता, मी माता, शिक्षक मी, सेवक मी
कलावती, शास्त्रज्ञा, विविधगुणी नटते मी
विश्वाची मी प्रतिभा, मजमधि समृद्धि वसे
संस्कृती मी जणू समूर्त, स्त्री माझे नाव असे’’
त्यांच्या या ओळींचे आवाहन स्त्रीमनाला कायमच होत राहील. संजीवनीबाईंना बदलत्या काळानुसार आपल्या कवितेची ‘चाल’ बदलावी असेही वाटले होते. त्यांनी ‘कविवरा ऐकव नव कविता’, ‘लाल निशाण’, ‘नको निबंधन’ अशा सामाजिक आशयाच्या कविता लिहून पाहिल्या. स्वातंत्र्यसंग्रामच्या काळात त्यांना आपल्या काव्यलेखनाबाबत न्यूनगंड वाटू लागला होता. तेव्हा वि.द.घाटे यांनी त्यांना त्यांची मधुमासाची स्वप्नेच चांगली असल्याचे लक्षात आणून दिले. उसन्या आवाजात सामाजिक विषयावर कविता लिहिण्यापेक्षा स्वत:चा सच्चा सूर महत्त्वाचा असतो आणि नाहीतरी जग स्वप्नांवरच चालते, असे त्यांना सुचवायचे असावे.
संजीवनीबाईंचा सच्चा सूर त्यांच्या गीतांमध्येही उमटला आहे. ‘प्रिया, मी आले रे आज’, ‘एवढे गीत मला गाऊ दे’, ‘सत्यात नाही आले, स्वप्नात येऊ का?’, ‘तेवता तेवता वात मंदावली’, ‘आज माझ्या अंगणात वसंताचा खेळ’ अशी त्यांची अनेक गीते रसिकांच्या मनात घर करून राहिली आहेत. त्यांच्या गीतांमध्ये सहजता आणि प्रासादिकता आहे. कवयित्रीच्या व्यक्तिमत्त्वातील सौंदर्यदृष्टीचा स्पर्श गीतांना लाभला आहे. त्यामुळे ‘आंतरबाहिर एक सुरावर घुमे सुरावट कशी?’ असा निर्मितीचा अचंबित करणारा अनुभव त्या कधी घेतात, तर कधी
‘‘थेंबामधून शब्द येतात, शब्दामधून येतात सूर
गाण्यामध्ये न्हाते तेव्हा, उरतच नाही जवळ दूर’’ असा सर्वस्पर्शी अनुभव त्या घेतात. त्यांच्या गीतांमधील शब्द आणि सूर यांचे अद्वैत अनोखे आहे.
संजीवनीबाईंच्या बालकविताही लक्षवेधी आहेत. बालमनाची संवेदनशीलता लक्षात घेऊन त्यांनी शिशुगीते, कुमारगीते लिहिली आहेत. त्यात वात्सल्यभावनेचा परिपोष आढळतो. त्याचबरोबर मुलांचे खेळकर, चंचल, निरागस भावजीवन त्यात प्रतिबिंबित झालेले दिसते. मुलांशी संवाद साधत लिहिलेल्या या गीतांमध्ये गोडवा आहे. ‘बरं का ग आई’ आणि ‘नको बाई रुसू’ हे त्यांचे बालगीत संग्रह प्रसिद्ध आहेत. त्याशिवाय त्यांच्या काही कवितासंग्रहांमध्येही बालगीतांचा समावेश आहे. त्यांची ‘या गडे हासू या, या गडे नाचू या, गाऊ या मंगलगान,’ तसेच  ‘सोनियाचा पाळणा, रेशमाचा दोर ग
मधोमध विसावला, माझा चित्तचोर ग’ ही गाणी आजही आठवणीत राहिलेली आहेत.
संजीवनीबाईंच्या कविता वाचताना काळाच्या अंतरावरून तिच्या काही मर्यादा जाणवतात आणि ते साहजिकही आहे. आज मराठीतील स्त्रीकाव्य वेगळय़ा टप्प्यावर आहे. पण म्हणून त्यांच्या कवितेच्या परंपरेतील संदर्भखुणा विसरता येणे शक्य नाही.  किंबहुना संजीवनीबाई, पद्मा गोळे, सरिता पदकी आणि शांता किलरेस्कर यांनी पुण्यात ‘साहित्यप्रेमी भगिनी मंडळ’ ही संस्था स्थापन करून आपली दूरदृष्टी व्यक्त केलेली आहे. त्यामुळे प्रत्येक पुढच्या टप्प्यावर मागे वळून पाहण्याचीही गरज आहे. प्रत्येक लेखकाचा स्वत:चा असा प्रभावकाळ असतो. संजीवनीबाईंचा त्यांच्या काळात किती प्रभाव होता, यासाठी त्यांच्या समकालीन लेखिकेची साक्ष काढणे उचित ठरेल.
लीला मस्तकार-रेळे या लेखिकेने ‘कल्लोळ’ या आपल्या आत्मचरित्रात संजीवनीबाईंविषयी लिहिले आहे. त्या म्हणतात, ‘‘पुण्यात परत भेट झाली ती संजीवनी मराठेची. त्या काळातील आधुनिक तरुण कवयित्रीत आणि काव्यगायिकांत संजीवनी अग्रगण्य होती. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या सुवर्ण महोत्सवात ६००० प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी संजीवनी माझ्या डोळ्यांसमोर होती. यशवंत, गिरीश, बोरकर, मायदेव इत्यादी कवींच्या घोळक्यात स्त्रियांतर्फे संजीवनी धिटाईने पुढे झाली आणि जराही न गडबडता तिनं आपलं मधुर काव्य पेश केलं. आणखी एका गोष्टीमुळे त्या काळात संजीवनीचं नाव गाजत होतं. ‘साखरपुडा’ बोलपटातील पदे संजीवनीने केली होती.’’ हे वाचताना संजीवनीबाईंचे काव्यपरंपरेतील स्थान लक्षात येते. ते स्थान केवळ वाङ्मयेतिहासात नोंदवण्यापुरते नसते, तर लोकांच्या मनावर ठसा उमटवून गेलेले असते. अर्थात, खरा कलावंत हा आपल्या कलेच्या परिणामाविषयी उदासीन असतो. तो कलानंदात मग्न असतो. संजीवनीबाईंनीही लिहिले आहे.
‘‘या जगण्याच्या वहीत झर्झर
पाठपोट मी कविता लिहिली
कुणास कळला अर्थ तिचा तर
लिपी तेव्हढी कुणास कळली’’
म्हणूनच त्यांच्या कवितेतील लिपीपलीकडील अर्थ शोधण्याचा प्रयत्न त्यांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त करावासा वाटला.  
डॉ. नीलिमा गुंडी- nmgundi@gmail.com   

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2015 3:12 am

Web Title: immortal poetry of sanjivani marathe
Next Stories
1 सामथ्र्य भावनांचे
2 स्ट्रॉबेरी
3 करून बघावे असे काही
Just Now!
X