संगीत आनंद निर्माण करतं, म्हणून तर अभ्यासात संगीताचा वापर जरूर असावा. कोणतंही बौद्धिक काम किंवा कष्टाचं काम करताना संगीत ऐकलं तर उत्साह टिकून राहतो, हे अनेकांनी अनुभवलं असेल. संगीताचा भावनांशी खूप जवळचा संबंध असतो. संगीत आपल्या भावना हव्या तशा वळवू शकतं. जसं एखादं गीत आपलं कामातलं लक्ष खेचून घेतं. नकळतच आपण गाणं गुणगुणायला लागतो. कोणत्याही प्रकारचं चांगलं संगीत, चांगलं गाणं, चांगलं वाद्यवादन ऐकणं हे मेंदूला पोषक असतं. अडगुलं मडगुलं सोन्याचं कडगुलं रुप्याचा वाळा. तान्या बाळा…
असं चालीत म्हटलं की बाळं हसतात. अंगाईगीत म्हटलं की शांत झोपून जातात. टाळ्या वाजवून एखादं गाणं म्हटलं की ऐकतात, खळखळून हसतात. एखाद्या मंद संगीत निर्माण करणाऱ्या खेळण्याकडे आकर्षति होतात.
लहानांवरच नाही तर मोठय़ांवरही संगीताचा प्रभाव असतो. हल्ली तर सगळेच जण एफएम रेडिओवरची गाणी ऐकतच असतात, पण त्यातही ‘सवाई गंधर्व’सारख्या अभिजात संगीत कार्यक्रमांची जादू टिकून आहे. सिनेमातली बरीचशी गाणी आपल्या नकळतच पाठ होऊन जातात. शब्द कानावर पडत जातात. ते शब्द आपण लक्षात ठेवले नाहीत, मुद्दाम ऐकले नाहीत तरी मेंदू लक्षात ठेवतो आणि आपल्याला ते गाणं पाठ होतं. अशी आपली किती तरी गाणी पाठ असतात. मुद्दाम गाण्याचा क्लास न लावताही ती आपल्याला किमान तालासुरात म्हणता येतात. विविध धर्माच्या प्रार्थना संगीतमय असतात. आदिवासी समाजात गायन-वादन-नृत्याला महत्त्वाचं स्थान आहे.
संगीताचा माणसाशी फार जवळचा संबंध आहे. तसाच शिकण्याच्या प्रक्रियेशीही आहे. याचं कारण संगीताचे स्वर कानावाटे मेंदूत जातात. तिथल्या ऑडिटरी कॉर्टेक्सवर या लहरी रेंगाळतात. मेंदूच्या डाव्या-उजव्या भागांना या लहरींचं उद्दीपन मिळतं. त्यामुळे मनाला अतिशय आनंद होतो.
मुलांच्या मेंदूत सततच वेगवेगळ्या प्रकारची माहिती येत असते. अशा सर्व प्रकारच्या माहितीचा साठा करून ठेवणं हे मेंदूचं एक काम असतं. ही माहिती संगीतमय असली तर मेंदू ती पटकन लक्षात ठेवू शकतो. अशा संगीतमय गोष्टी लक्षात ठेवणं मेंदूला फार सोपं पडतं. एखादं उत्तम गाणं ऐकणं, गाणं म्हणणं, वाद्यवादन ऐकणं, नृत्य करणं या संगीताशी संबंधित गोष्टी मेंदूमध्ये आनंदाचं वातावरण तयार करतात. दिवसातून काही काळ जरी आपण उत्तम संगीताच्या सान्निध्यात राहिलो, तरी मेंदूला त्यामुळे गती मिळते.
आपल्याकडे बालवाडीत वेगवेगळी गाणी सारखीच चालू असतात. ते मुलांसाठी अतिशय हिताचं आहे. तालासुरात, एखादं वाद्य घेऊन अभिनयासह गाणं म्हणणं हे तिथे घडतं, पण पुढे काय? ’   प्राथमिक शाळेत संगीताचा भाग एकदम कमी होतो’   माध्यमिक शाळेपर्यंत तर संगीत फारसं उरतच नाही. केवळ सकाळची प्रार्थना, कवितांचं पाठांतर, स्नेहसंमेलन इतकंच संगीत असतं. शाळाशाळांतून संगीत हा विषय शिकवला जातो, हीदेखील चांगली गोष्ट आहे. मात्र त्याहून अधिक काही मुलांना द्यायला हवं.
पाठय़पुस्तकात कविता असतात, पण कविता पाठ करणे ही काही फार आवडीची बाब नसते. उलट परीक्षेसाठी ते पाठ केलं जातं. त्यात रस घेऊन ती मुद्दाम पाठ केली आहे, असं फारसं घडत नाही, पण त्याच वेळेला आपण हे बघतो की, मुद्दाम पाठ न करताही एखादं गाणं जे तालासुरात बसवलेलं आहे, ते लवकर आणि नकळत पाठ होतं. गद्यापेक्षा पद्य लवकर पाठ होतं, हा अनेकांचा अनुभव आहे.
एखादी अवघड संकल्पना तालासुरात गुंफून पाठ केली तर ती जास्त चांगल्या पद्धतीने पाठ होते आणि कायमस्वरूपी पाठ होते, असं लक्षात आलं आहे.
पाढे पाठ करणं नावडीचं काम, पण तेच जर तालासुरात म्हटले तर चटदिशी पाठ होतात. असे अनेक प्रयोग शाळांमध्ये करून बघायला हरकत नाही. ज्या संकल्पना पाठ होत नाहीत, त्यांना छानशी चाल लावली तर लवकर कदाचित आपोआप पाठ होईल.
गॉर्डन शॉ नावाच्या शास्त्रज्ञाने संगीताचा मेंदूवरचा परिणाम यावरचे प्रयोग यशस्वी करून दाखवले आहेत. या प्रयोगांमध्ये संगीतामुळे शिकण्यावर काय परिणाम होतो, हे त्यांनी अभ्यासलं. त्यांच्या असं लक्षात आलं की, अभिजात संगीतामुळे शिकण्याची प्रक्रिया सहज होते. विशेषत: गणितातल्या गुंतागुंतीच्या प्रक्रिया करण्यात संगीताचा हातभारच लागतो.
संगीताचा भावनांशी खूप जवळचा संबंध असतो. संगीत आपल्या भावना हव्या तशा वळवू शकतं. जसं, एखादं गीत आपलं कामातलं लक्ष खेचून घेतं. नकळतच आपण गाणं गुणगुणायला लागतो. एखाद्या भीतीदायक सिनेमात वापरलेलं नुसतं संगीतसुद्धा भीती निर्माण करतं. हे संगीत आपल्याला कधी हळवं करतं, ओढ लावतं, कधी गंभीर करतं, जिथे आपण आहोत, तिथल्यापेक्षा वेगळ्याच वातावरणात घेऊन जातं. कोणत्याही प्रकारचं चांगलं संगीत, चांगलं गाणं, चांगलं वाद्यवादन ऐकणं हे केव्हाही मेंदूला पोषक असतं.
संगीत आनंद निर्माण करतं, म्हणून तर अभ्यासात संगीताचा वापर जरूर असावा, हे आपण लक्षात घ्यायला हवं. कोणतंही बौद्धिक काम किंवा कष्टाचं काम करताना संगीत ऐकलं तर उत्साह टिकून राहतो, हे अनेकांनी अनुभवलं असेल. आपल्याला कुठेही -अगदी भर वाहतुकीच्या, गर्दीच्या रस्त्यावर संगीताची एखादी सुरावट ऐकू आली की, आपलं लगेच लक्ष जातं आणि ते ऐकण्याचा प्रयत्न आपण नकळतच करतो. कारण हेच की, संगीत आपल्याला मुळापासूनच आवडत असतं. हे गाणं आपला मूडसुद्धा बदलवतं.
महेंद्रसिंग धोनीला काही महिन्यांपूर्वी एका मुलाखतीत विचारलं गेलं की, अतिशय ताणाच्या प्रसंगात तू मन कसं शांत ठेवतोस? अशा कसोटीच्या वेळेस तू चांगले फटके मारून संघाला विजय कसा काय मिळवून देतोस? यावर त्याने उत्तर दिले आहे की, मी अशा वेळी गाणं गुणगुणतो. कॅप्टनच्या शिरावर महत्त्वाची जबाबदारी असताना, अटीतटीच्या प्रसंगातही तो संगीताचा आधार घेतो, हे उदाहरण संगीतमहिमा सांगायला पुरेसं बोलकं आहे.
एका कॉलेजमध्ये घडलेला किस्साही खूप बोलका आहे. पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठीचा संध्याकाळचा वर्ग चालू होता. त्या दिवशी सगळ्यांनाच कंटाळा आल्यासारखा वाटत होता. वर्ग सुरू झाला. दहा मिनिटांतच कोणाचा तरी मोबाइल वाजला. वास्तविक ही खूपच खटकणारी गोष्ट असते, पण त्या सेकंदभराच्या सौम्य सुरावटीने वर्गातलं वातावरणच बदलून गेलं. आळस जाऊन एकदमच उत्साह आला. हा किस्सा प्राध्यापिकेनं सांगितलेला आहे. शिक्षिकेच्या मनावर सकारात्मक परिणाम होत असेल तर विद्यार्थ्यांच्या मनावर तर होणारच.
काम किंवा अभ्यास करताना अधूनमधून संगीत ऐकलं तर मेंदूला विश्रांती मिळते. अभ्यास चालू असताना मंद वाद्यसंगीत ऐकणं हिताचं असतं. अभ्यास रूक्ष वातावरणातच करायला हवा असं काही नाही. अगदी गाणं म्हणत, गुणगुणत केलेला अभ्यास परिणामकारक ठरतो. अशा वेळी वाद्यवादन, अभिजात संगीतातल्या सुरावटी ऐकणं योग्य ठरतं. मात्र आपल्याला याचाही अनुभव असेल की कर्कश गाणी, खूप मोठय़ा आवाजात लावलेली गाणी आपल्या मनात आनंद निर्माण करत नाहीत, तर उलट असं संगीत लवकरात लवकर बंद व्हावं असं आपल्याला वाटतं.
डॉ. ट्रेनर यांनी प्रयोगांमधून असं सिद्ध केलं आहे की, गणितविषयक, भाषाविषयक, दृश्य-अवकाशीय अशा अनेक मेंदूक्षेत्रांवर संगीताचा परिणाम होतो. त्यामुळे मुलांना संगीताची ओळख करून द्यायलाच हवी. त्यांना वरचेवर संगीतविषयक कार्यक्रमांना नेलं पाहिजे. चांगलं संगीत त्यांच्या कानावर पडायला पाहिजे. ते स्वत: संगीत शिकले तर उत्तमच. शाळेत विविध पद्धतीने संगीतावर भर द्यावा, असंही त्यांनी आग्रहपूर्वक सांगितलं आहे. यासाठीच उत्तम संगीत लहानपणापासूनच कानावर पडावं; मग ते घर असो की शाळा. संगीताचा शिकण्याशी असलेला असा जवळचा संबंध लक्षात घेऊन त्या पद्धतीने वातावरण तयार करावं. प्रौढ व्यक्तींनाही याची फार गरज आहे. आजकाल विविध आजार बरे होण्यासाठी, मानसिक ताणाच्या निवारणासाठीही संगीतोपचारांचा उपयोग करतात. हे लक्षात घेऊन संगीताकडे जाणीवपूर्वक कान वळवावेत. कानसेन होण्यातून आपण आनंदी-उत्साही तर नक्कीच होऊ शकतो.
drshrutipanse@gmail.com

Bohada look poster
५२ आठवडे, ५२ सोंग अन् त्यांचं अस्तित्व, दाक्षिणात्य निर्माते करणार मराठी चित्रपट ‘बोहाडा’ची निर्मिती
amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’
marathi actress Sharmishtha Raut journey as a poducer
शर्मिष्ठा राऊत: अभिनेत्रीची निर्माती होताना…
artificial intelligence in indian movie
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भारतीय चित्रपट