अवयवदानाने एखाद्याला नवीन आयुष्य मिळू शकतं, थांबलेलं जगणं सुरू होऊ शकतं. मात्र उपलब्ध आकडेवारीनुसार, अवयवदानाचं प्रमाण- दर दहा लाख लोकांमागे स्पेनमध्ये ३५, इंग्लंडमध्ये २७ तर भारतात फक्त ०.१६ इतकं कमी आहे. ६ ऑगस्ट हा भारतात अवयवदान दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने अवयवदानाचं महत्त्व सांगणारा हा लेख.
‘मरणोत्तर माझ्या ज्या ज्या अवयवांचा उपयोग दुसऱ्या व्यक्तीला होऊ शकेल ते सर्व अवयव दान करून उपयोगात आणावेत,’ अशी माझ्या वडिलांची इच्छा होती; परंतु मृत्यू केव्हा व कसा येईल याची कल्पना नसल्याने किंवा वृद्धत्वामुळे आपले अवयव दुसऱ्याला कितपत उपयोगी येतील याविषयी साशंक असल्याने निदान देहदान वा नेत्रदान तरी करावं, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. परंतु मृत्यू केव्हाही येईल हे लक्षात घेऊन, जर हे अवयवदान करायचंच असेल तर मृत्यूनंतर कुठल्या गोष्टींची पूर्तता करायची असते याची वडिलांनी माहिती घेतली नसल्याने किंवा कधीही कोणताही आजार न झालेले वडील अचानक जाऊन आपल्याला धक्का देणार नाहीत या आमच्या अतिविश्वासामुळे असेल, त्यांची इच्छा पूर्ण करता आली नाही.
देहदान व अवयवदान याविषयीची माहिती वडील हयात असताना मिळवणे झाले नाही. मग त्यानंतर थोडय़ाशा अपराधी भावनेनेच मी या विषयाची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला.  हे करताना लक्षात आलं की, अवयवदानासंबंधीचा कायदा १९९४ सालीच झाला असला तरी २० वर्षांनंतरही त्यातील तरतुदींविषयी फारशी माहिती जनमानसात दिसत नाही. त्यामुळेच आपल्याकडे अवयवदानाचं प्रमाणही कमी आहे.
उपलब्ध आकडेवारीनुसार, निरनिराळ्या देशांतील अवयवदानाविषयीचं प्रमाण- दर दहा लाख लोकांमागे स्पेनमध्ये ३५, इंग्लंडमध्ये २७, अमेरिकेत २६ व कॅनडात १४ इतकं आहे, तर भारतात फक्त ०.१६ इतकं कमी आहे. त्यातही भारतात आत्तापर्यंत सर्वात जास्त अवयवदानाच्या घटना चेन्नई येथे नोंदवण्यात आल्या आहेत.
अवयवदानाविषयीचा कायदा आपल्याकडे करण्यात आल्यानंतर हे काम करण्याकरिता झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटर, मोहन फाउंडेशन, शतायू यांसारख्या काही अशासकीय संस्थांची स्थापना करण्यात आली. या संस्थांच्या मुंबई शाखांमध्ये, मुंबईतील साधारण ३२ मोठय़ा रुग्णालयांची नोंद आहे. या रुग्णालयांच्या मदतीने उपरोक्त संस्थांकडे अवयवांची गरज असणाऱ्या नोंदवण्यात आलेल्या गरजूंची प्रतीक्षा यादी व अवयवदाता यात समन्वय साधला जातो. इच्छुक अवयवदाता या संस्थांच्या संकेतस्थळांवर जाऊन अवयवदानाचा अर्ज भरून ठेवू शकतो. परंतु अवयवदात्याची इच्छा असली तरी त्याच्या मृत्यूनंतर ती पूर्ण करणं मुख्यत निकटच्या नातेवाईकांच्या हाती असतं. या नातेवाईकाने वा कुटुंब सदस्याने संस्थेला कळवल्याशिवाय अवयवदान अशक्यप्राय होतं. म्हणूनच अवयवदानाच्या अर्जावर त्याच्या निकटच्या नातेवाईकासह एका साक्षीदाराची सही आवश्यक असते.
अवयवदानाचा अर्ज भरल्यावर अवयवदात्याला संस्थेकडून अवयवदाता असल्याचं एक कार्ड मिळतं, जे त्याने वाहनचालक परवान्याप्रमाणे सतत जवळ बाळगणं अपेक्षित असतं. समजा एखाद्या व्यक्तीचा फॉर्म भरण्यापूर्वीच मृत्यू झाला व मृत व्यक्तीची अवयवदानाची इच्छा होती की नाही याविषयीही जवळच्या नातेवाईकांनाही काहीही माहिती नसेल तरीही मृताचे अवयव दान करण्यायोग्य असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं तर त्या मृत व्यक्तीच्या जवळच्या एका नातेवाईकाच्या लेखी संमतीनेही अवयवदान करता येतं.
अवयवदानाबाबत अनेक गैरसमजही पसरलेले आहेत. ज्यातला सर्वात मोठा गैरसमज म्हणजे- या क्षेत्रातील काम करणाऱ्या संस्था अवयवांचा काळाबाजार किंवा मनमानी कारभार करत असणार. म्हणून अनेकदा मृताचे नातेवाईक आपल्या प्रियजनांचे अवयव दान करण्याचे टाळून त्या मृत व्यक्तीची इच्छा नजरेआड करताना दिसतात. परंतु येथे हे लक्षात घेणं आवश्यक आहे की, या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था अवयवदानासंबंधीच्या कायद्यांतर्गत असलेल्या आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वांनुसारच काम करतात.
अवयवदानातली दुसरी अडचण म्हणजे हृदय, स्वादुपिंड व यकृत निकामी झाल्याने अकाली मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. परंतु कोणताही जिवंत माणूस दुसऱ्या कोणाला हृदय देऊ  शकत नाही. जिवंत माणसाच्या स्वादुपिंड व यकृत यांचा काही भाग गरजूंच्या शरीरात रोपण करता येतो, परंतु त्यात धोका असू शकतो. त्यामुळे मृत व्यक्तीचे हे अवयव उपलब्ध झाल्यास ते केव्हाही अधिक फायदेशीर ठरू शकतं. दुसऱ्या पद्धतीने, रुग्णालयात व्हेंटिलेटर आणि इतर लाइफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवण्यात आलेल्या व ब्रेन डेड झालेल्या व्यक्तीचेच हे अवयव उपयोगात आणता येतात. मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनीत दुरुस्त होऊ  न शकणारा दोष निर्माण झाल्याने मेंदूला होणारा रक्तपुरवठा बंद झाल्यास परंतु हृदय काम करीत असल्यास त्या व्यक्तीस ‘ब्रेन डेड’ घोषित केले जाते. अशा वेळेस त्या व्यक्तीचे वरील अवयव व्यवस्थित काम करत असतात व दानासाठी ते उपयुक्त ठरू शकतात. तसेच मृत्यू रुग्णालयात झालेला असल्याने डॉक्टरांनी मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना वेळीच जाणीव करून दिल्यास अवयवदानाच्या संख्येत खारीचा तरी वाटा उचलणं शक्य होईल. कारण एका अवयवदात्यामुळे साधारण दहा गरजू व्यक्तींना संजीवनी मिळू शकते. आणि ही संजीवनी प्रत्यक्षात गरजूंपर्यंत पोहोचवणारा मुख्य दुवा असतो मृत व्यक्तीचा नातेवाईक . याशिवाय इतर कोणत्याही कारणाने मृत्य झालेल्या व्यक्तीचे नेत्रदान व त्वचादानही करता येते. तसेच देहदानही करता येते.
अर्थात मृताच्या नातेवाईकांच्या गळी ही गोष्ट त्या क्षणी उतरवणं डॉक्टरांना कठीण जात असणार हे नाकारता येणार नाही. मृतदेहाची खूप विटंबना होते, काढलेल्या अवयवांचा काळाबाजार करतात, लोक काय म्हणतील, पुढचे सोपस्कार करायला पैसे खर्च करायला नकोत असा लोकप्रवाद इत्यादी कारणांमुळे हे होत असणार. एखाद्याला त्वचारोग असेल तर त्याची त्वचा वापरता येत नाही, असाही एक गैरसमज आहे. परंतु कोणताही अवयव वापरण्यापूर्वी तो व्यवस्थित जंतुविरहीत (स्टरलाइज) करूनच वापरला जातो.
याविषयीची माहिती गोळा करताना असे लक्षात आले की, देहदान व अवयवदान या दोन भिन्न प्रक्रिया आहेत. हृदय, फुप्फुस, हाडांच्या पेशी, शिरा, लहान आतडे, स्वादुपिंड, यकृत, मूत्रपिंड, डोळे, त्वचा हे सर्व अवयव दान करता येतात. वर म्हटल्याप्रमाणे स्वादुपिंड, यकृत यांचा काही भाग व एक मूत्रपिंड जिवंतपणीही दान करता येते; परंतु मृत्यूनंतर हे अवयव दान करायचे असल्यास त्वचा व डोळे सोडून इतर अवयव दान करता येत नाहीत, तर फक्त ब्रेन डेड झाल्यासच देता येतात व रुग्णालयात लाइफ सपोर्ट सिस्टीम बंद करण्यापूर्वी ही प्रक्रिया करावी लागते. याकरिता डॉक्टरांचे प्रोव्हिजनल डेथ सर्टिफिकेट व नातेवाईकांचं संमतिपत्र अवयव स्वीकारणाऱ्या संस्थेला ताबडतोब मिळणं आवश्यक असतं. या संस्थेमार्फत अवयव जमा करून घेतल्यावर नातेवाईकांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत या पद्धतीने मृतदेह नातेवाईकांकडे पुढील अंत्यसंस्कारांकरिता लगेचच सोपवला जातो आणि त्याकरिता नातेवाईकांना कोणताही अतिरिक्त भार सोसावा लागत नाही.
नेत्रदान वा त्वचादान करण्याची इच्छा असल्यास व नातेवाईकांनी संमतिपत्र दिल्यास नेत्र व त्वचा जमा करून घेतल्यावर नातेवाईकांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत अशा प्रकारे व्यवस्थित मृतदेह नातेवाईकांकडे दिला जातो. त्वचादानाविषयीही एक गैरसमज आहे की, आपल्याला नंतर मृतदेह बघणं शक्य होणार नाही. परंतु त्वचादान म्हणजे संपूर्ण मृतदेहाची त्वचा न काढता फक्त पोट व मांडी येथीलच त्वचा जमा केली जाते. भाजलेल्या व्यक्तीला त्वचा मिळाल्यास त्याच्या जखमा लवकर भरून येण्यास मदत होते. त्याचप्रमाणे अशी व्यक्ती बरी झाल्यावरही भाजल्याच्या व्रणांमुळे येणाऱ्या विद्रूपतेपासून वाचू शकते.
भारतासारख्या मोठय़ा लोकसंख्येच्या देशात असे अवयव, नेत्र, त्वचा आणि संपूर्ण देह यांची खरं तर खूप मोठी गरज आहे; परंतु अनेक गैरसमज, रुग्णालयांची उदासीनता यामुळे ही गरज काही टक्केही पूर्ण होऊ  शकत नाही. मृत व्यक्तीविषयी नातेवाईकांच्या मनात आदर असतो. तो आदर आपण अशा प्रकारे द्विगुणित करू शकतो अशी नातेवाईकांची मानसिकता व्हायला हवी.
प्रसंगी डॉक्टरांनी नातेवाईकांना पटवून देणं हे आपलं काम मानलं पाहिजे. त्यामुळे मागणी व पुरवठय़ामधील हे मोठे अंतर सहज कमी करता येईल. अनेकांचं आयुष्य नव्याने सुरू करता येईल. आणि तेच सर्वात मोठं समाधान ठरू शकेल.    ल्ल

झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटरचे मुंबईतील मुख्य कार्यालय शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात आहे. त्यांचा संपर्क क्रमांक  ९१६७६६३४६८/ ६९

Chaturgrahi Yog in meen rashi
Chaturgrahi Yog : १०० वर्षानंतर चतुर्ग्रही योग; ‘या’ राशींना मिळणार बक्कळ पैसा, होऊ शकतो मोठा धनलाभ
guru asta 2024
१४ दिवसांनी गुरु होणार अस्त! ‘या’ राशींच्या नशिबाचं टाळं उघडणार; नोकरीपासून प्रेमापर्यंत प्रत्येक कामात मिळू शकते यश
diy quick tips to save energy at home 3 tricks to reduce your electricity bill and save energy know how
उन्हाळ्यात तुमचे वीज बिल येईल २०-३० टक्क्यांनी कमी! वापरा फक्त ‘या’ ट्रिक्स; एसी वापरानंतरही ‘नो टेन्शन’
पाणी किंवा चहात फक्त १५ मिली ‘हे’ द्रव घातल्यास कंबरेचा घेर व वजन होईल कमी; नवीन अभ्यास काय सांगतो?