09 August 2020

News Flash

अडथळ्यांची शर्यत

स्वत:मध्ये बदल घडवण्यातला सर्वात महत्त्वाचा अडथळा म्हणजे आपण स्वत:ची किंमत ठरवणे. कधी सहकाऱ्यांशी तुलना, कधी मित्रांशी, कधी नात्यातील मंडळींशी,

| May 3, 2014 01:01 am

स्वत:मध्ये बदल घडवण्यातला सर्वात महत्त्वाचा अडथळा म्हणजे आपण स्वत:ची किंमत ठरवणे. कधी सहकाऱ्यांशी तुलना, कधी मित्रांशी, कधी नात्यातील मंडळींशी, तर कधी मराठी माणसांशी अशी ठिकठिकाणी स्वत: आणि इतर यांची तुलना करून आपण स्वत:ला एक वैश्विक मूल्य देतो. आणि इतरांनी आपली किंमत तशी केलीच पाहिजे म्हणून आग्रह करतो.
‘मी बदलायचं ठरवलंय.. सगळ्या पुस्तकात म्हणतात त्याप्रमाणे माझी शक्तिस्थाने, माझ्या मर्यादा, मला असलेले धोके आणि विकासाच्या संधी असं सगळं लिहून काढलं, पण ते लिहून झाल्यावर जाणवलं माझ्याकडे काही गुण नाहीतच. आहेत त्या फक्त मर्यादाच. आणि आता पस्तिशीच्या टप्प्यावर बँकेत १५ र्वष नोकरी केल्यावर इतर कुठे काय संधी असणार? हे लिहिलं नसतं तर बरं झालं असतं.’ शशिकांतने वैतागून म्हटले.
‘हो. असं वाटणं शक्य आहे. आपण कधी आपल्याला तपासलेलं नसतं, त्यामुळे हे चित्र खूप निराशादायक वाटतं यात शंका नाही. आपल्याकडे लिहिण्यासारखे किती गुण आहेत हे लिहिताना कोणत्या वृत्तीतून आपण स्वत:कडे बघतो हे बघणे महत्त्वाचे आहे. पण अनेकदा आपल्या गुणांपेक्षा आपल्यात कोणत्या उणिवा आहेत, आपल्या मर्यादा कोणत्या? हे आधी नजरेत भरतं. आणि मग एक निराशाजनक परिस्थिती निर्माण होते आणि आपल्यात काही बदल होणारच नाहीत, अशी खूणगाठ बांधली जाते.’  
 मी शशिकांतला म्हणालो, ‘तू तुझे सगळे गुण लिहिलेच नाहीयेस. अगदी साधी गोष्ट घे. गेली १५  वर्षे सातत्याने आणि चिकाटीने आणि इमानदारीने तुझ्या बँकेत नोकरी केलीस. ज्या बदल्या झाल्या त्या आनंदाने स्वीकारल्यास. कधीही तुझी बिनपगारी रजा झाली नाही. रोज डेबिट-क्रेडिटच्या त्याच त्या एन्ट्री करीत राहिलास. संगणकीकरण झाल्यावरही तू ते चांगल्या रीतीने स्वीकारलंस. कोणालाही संगणकाबद्दल काही अडचण आली तरी तू सहजपणे सोडवू शकतोस, असे तूच मला सांगितले आहेस. घरात वहिनीला मदत करतोस. ती पण नोकरी करते म्हणून जवळपास निम्मी कामे तू करतोस. तुला सुपारीच्या खांडाचेही व्यसन नाही. तुझे पैसे तू शेअर बाजाराचा अभ्यास करून गुंतवले आहेस. इतके सगळे गुण तुझ्याकडे आहेत, पण तू ते लिहिलेच नाहीस!’
‘यात काय गुण आहेत? नोकरी करायची म्हणजे असं वागवंच लागतं’
‘इथेच सगळी गोची आहे, तूच सांग तुझ्याबरोबर कारकून म्हणून जितक्या स्त्रिया आणि पुरुष लागले त्यांच्यापैकी किती जण तुझ्याइतके सातत्याने, प्रामाणिकपणे, नेकीने आणि पूर्णवेळ बसून काम करतात? वहिनीवर ताण येईल म्हणून तू प्रमोशन नाकारलेस. सर्व परीक्षांमध्ये उत्तम गुण मिळवूनदेखील फक्त संसार सुखाचा व्हावा म्हणून अधिकारी पद टाळलेस. आणि पैसे हाती असून, मित्रांच्या मैफिलीत जाऊनसुद्धा लिंबूपाणी पीत राहिलास. अरे हे प्रचंड गुण आहेत. अशा सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरतात. कामावर निष्ठा, बँकेला आपली बँक मानणे आणि बँकेचे कोणत्याही प्रकारे नुकसान होऊन न देणे हे तू तुझेच काम आहे असे समजून केलेस. कर्ज विभागात काम करताना कोणत्याही आमिषाला बळी पडला नाहीस. दिवाळीत आलेली मिठाई वाटेतच कुणाला तरी वाटून टाकत राहिलास. तुझ्यातला इतरांना मदत करायचा भाव सदैव जागा असतो. इतके सगळे गुण असताना तू स्वत:कडे गुण कमी आहेत असे म्हणतोस ते योग्य नाही. ते नकारात्मक आहे. ही नकारात्मक वृत्ती प्रगतीमध्ये आणि बदल घडवून आणण्यामध्ये मोठा अडथळा ठरते. मी तुझा आधी मित्र आणि नंतर समुपदेशक आहे. मी खात्रीने सांगतो, तुझ्यासारखे अनेक जण स्वत:च्या क्षमता आणि कौशल्ये यांची योग्य दृष्टिकोनातून जाणीव ठेवत नाहीत. आणि त्यांना सगळ्या बाबतीत धोके दिसू लागतात. त्यांना इतर कुठे संधी दिसतच नाही. लक्षात ठेव संधी नेहमीच दरवाजा ठोठावत असते. आपल्याला तो क्षीण आवाज ऐकायला वेळ देता येत नाही म्हण किंवा आपले कान तयार नसतात असं म्हण. त्यामुळे तुझ्यासारखी असंख्य गुणी माणसे प्रगती करीत नाहीत. आता मी तुला जे सांगितले आहे त्या दिशेने विचार कर आणि १५  दिवसांनी भेट.’
पंधरा दिवसांनी शशिकांत भेटायला आला. खूप आत्मविश्वासाने त्याने सांगितले की, पुढच्या महिन्यात एका मोठय़ा उद्योग समूहात बँकिंग ऑफिसर म्हणून नियुक्ती होतो आहे. मी फक्त हसलो.
शशीकांतच्या अगदी उलटय़ा स्वभावाचा चंद्रकांत. त्याला आपण इतरांपेक्षा काही खास वेगळे आहोत असे पक्के खात्रीने वाटायचे. त्याच्या सुपीक डोक्यातून निरनिराळ्या कल्पना निघत आणि तो तातडीने अमलात आणत असे. माझी त्याची क्वचित भेट होत असे, परंतु प्रत्येक भेटीत तो वेगळा व्यवसाय करीत असलेला दिसून यायचा. शेवटची माझी त्याची भेट झाली तेव्हा तो ‘सूर्य दिवे’ तयार करून गावोगावीच्या रस्त्यांवर कितीतरी स्वस्तात लावणार होता. मी विचारले, तुझ्या यापूर्वीच्या सूर्य चुलींचे काय झाले? तो म्हणाला ‘जरा गडबड झाली. माझ्या हिशेबाने फक्त महाराष्ट्रात ५० लाख चुली विकण्याची संधी होती. मी सरकारी मदत, बँकेचे कर्ज सगळे करून देण्याची व्यवस्थासुद्धा केली होती, पण आपले लोक बावळट रे. त्यामुळे त्यांचा किती खर्च वाचेल याचा विचारच नाही! शेवटी ठरवले आता काही तरी नवीन करायला हवे. तेव्हा अचानक सुचले, आपण घरात जसे सौर ऊर्जेचे दिवे लावतो, तसे रस्त्यावर लावायचे दिवे केले तर किती मोठी बचत होईल. लगेच पेटंटचा अर्ज दाखल केला.’
‘सध्या काय परिस्थिती?’
‘हळूहळू लोकांना त्याचे महत्त्व पटू लागले आहे. गावोगावी ग्रामसभेत जातो तिथे लोकांना हे दिवे कसे लावावेत, त्यांनी किती फायदा होईल. रस्ते वर्षांतून किमान आठ महिने तरी फुकट प्रकाशित राहतील असे पटवून देतो. त्याच्याकरिता व्यावसायिक दिग्दर्शकाकडून एक छोटी फिल्म तयार करून घेतली आहे. प्रसाद, पैज लावून सांगतो, एक वर्षांत ऑडी घेणार! सॉलिड बिझनेस आहे.’ ‘तुझ्या उपक्रमाला शुभेच्छा,’ असे म्हणून मी सटकलो.
अलीकडेच वर्तमानपत्रात नोटीस वाचली, चंद्रकांतची सर्व मालमत्ता एका सहकारी बँकेने विकायला काढली आहे. वाईट वाटले. कोणा कोणाकडून समजले की अशा कामांसाठी स्थानिक राजकीय नेतृत्वाचे समर्थन लागते. त्यात तो अपयशी ठरला. दुसरे म्हणजे बल्ब विकणारी लॉबी असते. त्यांचा विरोध. त्यात त्याच्या दिव्याने प्रकाश फारसा पडत नसे. दिवा आहे एवढेच कळे. खांबावर बसवलेल्या युनिटच्या चोऱ्या हा एक तापदायक भाग होता. इतके सारे घडलेले समजल्यानंतर एक दिवस फोन आला, ‘प्रसाद माझ्या नव्या कारखान्याचे उद्घाटन अमुकतमुक मंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. जरूर ये.’ माझ्यासारख्या सामान्य जीवन जगणाऱ्या माणसाला चंद्रकांत हे गूढ कोडे वाटते, परंतु स्वत:च्या मर्यादांचा विचार न करता फाजील आत्मविश्वास दाखवणे हा बदलातील मोठा अडथळा असतो. हा फाजील, अवास्तव आत्मविश्वास बाळगणारी माणसे अहंकारी आणि तात्काळ निर्णय घेणारी असतात. समाजाची मूल्ये पाळणे हे त्यांना फारसे महत्त्वाचे वाटत नाही. अशा व्यक्तींमुळे भ्रष्टाचाराला चालना मिळते. त्यांची सगळ्यात मोठी समस्या म्हणजे त्यांच्या अपयशाची जबाबदारी ते नेहमी दुसऱ्या कुणावर तरी टाकतात. काही वेळा परिस्थिती वाईट आणि त्यांच्या नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, पण अशा वेळी आपल्या नियंत्रणातील घटक कोणते आणि आपल्या नियंत्रणाबाहेरचे घटक कोणते हे लक्षात घेणे आणि जे आपल्या नियंत्रणाखाली आहे त्याच्यावर लक्ष केंद्रित करणे त्यांना जमत नाही. शिवाय आणखी एक अडचण म्हणजे त्यांना आभाळाखालच्या प्रत्येक गोष्टीचे ज्ञान असते. इंटरनेटवरून वाचलेली माहिती ते फाडफाड तोंडावर टाकतात.
   अशीही माणसे बदलू शकतात. त्यांनी प्रथम आपल्या नियंत्रणाबाहेर ज्या गोष्टी आहेत, त्यांच्यावर मात करायचा प्रयत्न सोडून द्यायचा आणि आपले कुंपण कुठे आहे ते पक्के ठरवायचे. मला नेहमी क्रिकेटवीर सुनील गावस्करची आठवण येते. त्याला गोलंदाज नेहमी उसळते चेंडू टाकायचे. तो हुक मारीत असे. त्याचा हुकचा फटका इतका लोकप्रिय होता की एका कंपनीने त्याचे स्लो मोशन चित्रांचे पुस्तक काढले होते. पण हाच फटका त्याची मर्यादा ठरू लागली. गोलंदाज त्याला आव्हान देत तो हुक करण्याचा प्रयत्न करीत असता विकेट गमावून बसू लागला. त्याने एक निर्णय घेतला, कोणत्याही परिस्थितीत हुक मारायचा नाही. उसळत चेंडू आला तर खाली झुकायचे. आणि म्यान करून ठेवलेला हुकचा फटका त्याच्या शेवटच्या कसोटीत यशस्वीपणे वापरला. आपले सामथ्र्य कधी आपली मर्यादा बनते, तर आपली मर्यादा ही आपले सामथ्र्य बनते हे त्यांनी लक्षात ठेवले तर पूर्ण पुरुषाकडील त्यांची वाटचाल यशस्वी होऊ  शकेल.
कुठेही ‘बदल’ या विषयावर व्याख्यान द्यायला गेलो की मी काही अडथळ्यांची ओळख करून देतो. आपण सदैव आपल्या स्वत:शी काही तरी बोलत असतो. हे बोलणे इतके वेगाने होते की ते आपले आपल्यालाच ऐकू येत नाही. पण आपण जर अशी वाक्ये नेहमी नेहमी स्वत:शी बोलायला लागलो तर ती आपल्या स्वभावाचा एक भाग बनून जातात. आणि मग आपल्या भावना आणि वर्तन आपोआप घडू लागते. आमच्या व्यसनमुक्तीच्या क्षेत्रातील अनेक समुपदेशक सांगतात की, आजार उलटणे हा सुधारणेचाच एक भाग आहे, कारण आजार उलटला की त्या व्यक्तीला हा आजार कायमचा आहे आणि काळजी घेतली नाही तर उलटू शकतो आणि अधिक नुकसान करतो याची प्रखर अनुभवातून आलेली जाणीव समृद्ध होते.
सर्वात महत्त्वाचा अडथळा म्हणजे आपण स्वत:ची किंमत ठरवणे. कधी सहकाऱ्यांशी तुलना, कधी मित्रांशी, कधी नात्यातील मंडळींशी, तर कधी मराठी माणसांशी अशी ठिकठिकाणी स्वत: आणि इतर यांची तुलना करून आपण स्वत:ला एक वैश्विक मूल्य देतो. आणि इतरांनी आपली किंमत तशी केलीच पाहिजे म्हणून आग्रह करतो. अगदी साधे उदाहरण म्हणजे मोठय़ा जावयाचा मान. त्याची मुलगी लग्नाला आली तरी मोठय़ा जावयाचा मान ठेवायला नको? जास्त पावसाळे बघितल्याचा मान – ठेवायलाच हवा नाही का? ही अडथळ्यांची शर्यत पूर्ण करा. आणि नक्की सांगतो, तुम्ही तुमच्या संपूर्ण क्षमता वापरण्याच्या आनंदी जीवनाकडे वाटचाल करू लागाल!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2014 1:01 am

Web Title: important barrier to change himself
टॅग Chaturang,Corruption
Next Stories
1 पुरस्कार
2 हृदयाची काळजी
3 स्त्रिया, निवडणुकीचे राजकारण आणि लोकशाहीकरण
Just Now!
X