26 October 2020

News Flash

निरामय घरटं : निजसुख शोधताना..

हानपणी खूप खेळून थकल्यावर सहज झोपी जाणं, अर्थात व्यथा दूर करून शांत स्थितीकडे जाणं ही शरीरयंत्रणेची अंगभूत पद्धतीच आहे.

वयानुसार आणि काळानुसार मात्र ही शांती कशानं लाभेल हे बदलत जातं.

उमा बापट – umaajitbapat@gmail.com

हानपणी खूप खेळून थकल्यावर सहज झोपी जाणं, अर्थात व्यथा दूर करून शांत स्थितीकडे जाणं ही शरीरयंत्रणेची अंगभूत पद्धतीच आहे. वयानुसार आणि काळानुसार मात्र ही शांती कशानं लाभेल हे बदलत जातं. आपल्या रोजच्या जगण्यात आणि विविध वयात आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी आणि आपल्या हिताच्या गोष्टी अशी प्रेयस आणि श्रेयस यांत एकवाक्यता साधू या. सोयी, सुविधा, समृद्धी यापलीकडचं आपल्या आत दडलेलं निजसुख अनुभवू या.

पंचवीस वर्षांपूर्वी महाराष्ट्रातल्या सधन, सुशिक्षित, शहरी कुटुंबांतून पदवीचं शिक्षण घ्यायला परदेशात जाण्याचं तरुण मुलींचं प्रमाण आजच्या तुलनेत कमी होतं. घरोघरी मोबाइल फोन, इंटरनेटचा वापर नव्हता. विदेशात सामान पाठवायच्या दळणवळणाच्या सेवाही प्रचलित नव्हत्या. त्यामुळे आजच्या तुलनेत घरापासून मैलोन्मैल दूर राहाणं काहीसं कठीण वाटायचं. स्वत:च्या हौसेनं ज्या मुली एकटय़ा परदेशात शिकायला गेल्या, त्यांनी सुरक्षितता जपणारं घर, हक्काची, वेळेला धावून येणारी आपली माणसं, आयत्या मिळणाऱ्या वस्तू, सवयीचं खाणं, सगळं सोडायची तयारी दाखवली. नव्या वातावरणाशी आणि संस्कृतीशी जुळवण्यात वेळ गुंतवायचा, बदलत्या हवामानात आरोग्य राखायचं, स्वत:च कमवायचं, खाणं बनवायचं आणि भरपूर अभ्यासही करायचा. शिक्षणाच्या वेडासाठी हा पर्याय निवडणं काहींच्या मते सुखाचा जीव दु:खात घालण्यासारखं होतं.

पंधरा वर्षांपूर्वी आजच्याइतक्या आधुनिक तंत्रज्ञानातल्या सुविधा हा महाराष्ट्रातल्या शहरी जगण्याचा अविभाज्य घटक बनला नव्हता. तेव्हा परदेशातल्या सुखसुविधा सोडून काही मंडळी स्वत:हून मायदेशी परतण्याचा निर्णय घेत होती. सुखासीन आयुष्य सोडून, कळून-सवरून इथली गर्दी, प्रदूषण, वीज-पाणीपुरवठय़ाची अनिश्चितता अशा दैनंदिन अडचणी झेलायला भारतात परतण्याचं कारण काय, असा प्रश्न त्यांना विचारला जात होता. एका अर्थानं आहे ते सुख दूर सारण्याचा वेडेपणा का करता, असा विचारणाऱ्याचा रोख असायचा.

दोन्ही उदाहरणांतून जाणवेल, की ‘सुख’ ही एक मानसिक स्थिती आहे. प्रत्यक्ष परिस्थिती काय आहे, यापेक्षाही त्याविषयी व्यक्तीला आतून काय वाटतं त्यावर ते ठरतं. ऐश्वर्यात असणाऱ्या राजकन्येला गुलाबांच्या बिछान्यात फु लाचं देठही बोचू शकतं, तर एखाद्याला जमिनीवर, मोकळ्या आकाशाखाली सुखानं, शांत झोप लागू शकते. तान्हेपणी पोट भरलेलं असेल, शारीरिक गरजांची काळजी घेतली असेल, तर बाळांच्या चेहऱ्यावर समाधान दिसतं. भुकेची जाणीव झाली, काही दुखलं तर रडून ती व्यथा बाळं व्यक्तही करतात. मला कशानं बरं वाटतं आणि कशानं त्रास होतो, हे ओळखण्याची समज उपजत असते. बाळ खूप थकलं तर विश्रांतीसाठी झोपी जातं. व्यथा दूर करून शांत स्थितीकडे जाणं, ही शरीरयंत्रणेची अंगभूत पद्धती. पण ही शांती कशानं लाभेल हे मात्र वयानुसार, काळानुसार बदलत जातं.

वसतिगृहात राहून शिक्षण घेणारा आशीष ‘करोना’च्या टाळेबंदीच्या काळात घरी परतला. अचानक वेळ हाताशी सापडला, त्यामुळे जुन्या सामानाची आवराआवरी झाली. लहानपणीच्या आठवणी म्हणून साठवण केलेल्या वस्तू, फोटो बऱ्याच काळानंतर विरंगुळ्यासाठी बाहेर काढले. आशीषनं लहानपणी काढलेली चित्रं, लहानपणीचे अगदी साधा फुगा खेळताना काढलेले फोटो पाहून त्याला वाटून गेलं, ‘माझं बालपण किती सुखात गेलं!’ मोठं झाल्यावर शिक्षणातली सततची स्पर्धा, मेहनतीनं प्रवेश मिळवल्यावर ‘करोना’मुळे अचानक उद्भवलेली अनिश्चितता, यापेक्षा किती सुखाचे होते ते दिवस. ‘नोकऱ्या कशा मिळणार आता तुमच्या पिढीला?’ ही मोठय़ा माणसांची चर्चा कानावर पडत नव्हती, ना माझ्या स्वत:च्याही काही अपेक्षा होत्या स्वत:कडून.

आशीषच्या पिढीतल्या अनुजाला त्याच टाळेबंदीच्या वेळी वाटत होतं की, या परिस्थितीतही आपण किती सुखी आहोत! ना आपल्या घरी कु णी म्हातारं, आजारी माणूस आहे, त्यामुळे अंगावर तशी कु णाची जबाबदारी नाही, ना इतक्या बिकट परिस्थितीतही आपल्यावर खाण्यापिण्याची अडचण ओढवली. बाहेरच्या बातम्या ऐकल्या की तिला वाटायचं, आपण घरात तर घरात, पण किती सुरक्षित आहोत.

मागितल्यावर आवडता खाऊ लगेच मिळणं हे तीन वर्षांच्या मनूसाठी सुख. मित्रांबरोबर गड चढून सर्वात टोकाला पोहोचल्यावर बारा वर्षांच्या पिंटूइतका सुखी दुसरा कु णी नाही! कामात ठरवलेलं यश संपादन केल्यानं नंदूला तरुणपणी स्वकमाईचं सुख मोलाचं. घरात मनाजोग्या सोयीसुविधा करता आल्यानं चाळिशीत भाभींच्या कष्टाचं चीज झालं आणि घरी सुख नांदलं. अण्णांच्या पूर्ण कुटुंबाला समृद्धी लाभली ही त्यांच्यासाठीची अनमोल मिळकत! समाजाशी बांधिलकीतून कावेरी आक्कांना जगण्याचा हेतू उमगला, वयाची ऐंशी र्वष उलटल्यावरही समाजोपयोगी कामात आयुष्य सत्कारणी लागलं आणि त्या समाधानानं जगल्या. सुख हा शब्द कशा ना कशाला तरी जोडून बऱ्याचदा वापरला जातो. तसा तो अनुभवही कशा ना कशाशी जोडलेला आहे. सुखसुविधा, सुखसोयी, सुख-समृद्धी, सुख-समाधान अशी सुखाची विविध रूपं.

क्षणिक आनंदापासून शरीर आणि मनाचं स्वास्थ्य, ते जीवनात सुखी होणं म्हणजे नेमकं काय, या उंचीवर नेणाऱ्या प्रश्नापर्यंत ‘सुख’ ही संकल्पना विस्तारलेली आहे. अब्राहम मॅसलो या मानसशास्त्रज्ञानं माणसाच्या गरजांचे स्तर मांडले आहेत. प्राथमिक गरजा, सुरक्षा, याकडून टप्प्याटप्प्यानं प्रेम, आपुलकी या भावनिक गरजा, बौद्धिक भूक, काही मिळवण्याची आकांक्षा, स्वत:चा शोध ते आत्मसिद्धी या पायऱ्यांमधून माणूस जात असतो. या प्रत्येक टप्प्यावर सुखाची संकल्पना स्वत:साठी घडवत जाणं, सुखाचा शोध घेत राहाणं आणि सुखप्राप्तीची स्थिती अनुभवणं ही निरंतराची प्रक्रिया.

कस्तुरी माध्यमिक शाळेत शिकवताना विद्यार्थ्यांना सांगते, ‘‘मी इंटरनेट वापरून अभ्यासातली माहिती शोधायला सांगते. त्यासाठी मोबाइल किंवा संगणक तुम्ही वापरत असाल. ही साधनं अभ्यासातली माहिती शोधण्यासाठी वापरायची याचं भान ठेवायचं. माहिती शोधायला लागल्यापासून पंधरा मिनिटांसाठी वेळ लावायची. एका दिवशी यापेक्षा जास्त माहिती शोधण्याचं काम मी देणार नाही.’’ मुलांनी ही साधनं वापरताना विचलित होऊ नये, हा तिचा प्रयत्न. ती स्वत:ही शाळेच्या वेळात मैत्रिणींचे फोन वा निरोप आले तर ते बघायची नाही. तिच्या कामात समोरचे विद्यार्थी आणि शिकवण्यासाठी स्वत:ची पूर्वतयारी मनापासून करणं, यातच आपलं भलं आहे हे तिला मनोमन पटलेलं होतं. एकाग्रतेनं शाळेत असणं हेच तिला प्रिय होतं आणि ते तिच्या हिताचंही! शिक्षक म्हणून उत्तम जबाबदारी निभावत असल्यानं कस्तुरी समाधानी आणि सुखी होती. गप्पा हा लाडका उद्योग आणि आपलं काम ही सक्ती, असं द्वंद्व तिच्या मनात नव्हतं. जे तिला श्रेयस्कर होतं ते तिला प्रियही होतं. अशी श्रेयस आणि प्रेयसाची एकतानता होती.

रोजच्या जगण्यात आणि विविध वयातही आपल्याला आवडणाऱ्या आणि आपल्या हिताच्या गोष्टी यात एकवाक्यता असू शकते. घराच्या रचनेत आणि जगण्यात ते सामावलेलं असेल तर याचा प्रत्यय घेत मुलं मोठी होतात. जगण्याची शैली म्हणून ते त्यांच्या आत मुरत जातं.

जिया चार वर्षांची होईपर्यंत तिचे खूप लाड झाले. नंतर तिचा छोटा भाऊ वंश जन्मला. तान्हेपणीच चक्कर येणं, काही सेकंद शुद्ध हरपणं, असं त्याचं आजारपण सुरू झालं. जास्त ताप येऊ नये, मोठे आवाज होऊ नयेत, शक्यतो तो अति दमू नये, अशी त्याची काळजी घ्यायला सांगितली. जियाला हे समजावून सांगितल्यावर तिनं लहान असूनही हट्टीपणा केला नाही.  वंश बरा असेल तेव्हा आई त्यांना जवळच्या बागेत घेऊन जायची. जिया त्यातही एकदम खूश असायची. घरात खूप दंगा, आरडाओरडा जियानं केला नाही. बाबा तिला गच्चीत नेऊन पकडापकडी खेळायचा. जिया या जगण्याचा सहज स्वीकार करू शकली, कारण जियाच्या कुटुंबानं कधी कुरकुर हा एकच सूर पकडला नाही. दु:ख वाटय़ाला आलं असं वाटलं तरी त्यांनी ते सुखानं पेललं.

मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेला उदय आता बहुराष्ट्रीय कंपनीत मोठय़ा पदावर आहे. राहाण्याचं ठिकाण बदललं, पण त्याची जगण्यातली मूल्यं आणि सांस्कृतिक आवडीनिवडी मात्र काहीशा त्याच्या जुन्या घरच्या वातावरणाशी घट्ट जोडलेल्या राहिल्या. सणांच्या पाटर्य़ा करून टाकणं, म्हणजे चैन असं त्याला मुळी कधी वाटलंच नाही. तो गमतीनं म्हणायचा, ‘मी सोय म्हणून फोन बदलला आहे, पण सुखाचा ‘मोड’ बदलला नाही.’ नातेवाईकांबरोबर घरगुती समारंभ ठरवताना तो भावंडांना विचारायचा, ‘सेलिब्रेशन मोड’ कधी बदलणार आहात का? उदयला त्याच्या कामात नवीन तंत्र शिकण्याच्या प्रयत्नात आनंद मिळायचा, त्याच्या मुलांसाठीसुद्धा अमुकतमुक भेट न आणताही वाढदिवस साजरा करता येतो, हे समाधान त्याला मिळायचं. सुख आतून अनुभवत असल्यानं बोलबाला करत मिरवायचं कसं, याचं उत्तर त्याला कधी शोधायचंही नव्हतं.

‘जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तूची शोधूनी पाहे’. समर्थ रामदास स्वामींनी दाखवलेला आपल्या आत सुख शोधण्याचा मार्ग आपण स्वत: सच्चेपणानं जगायला लागलो की कुटुंबातही तो झिरपतो. हवंहवंसं काय वाटतं आणि हिताचं काय आहे, ते जाणून त्यात निजसुख अनुभवता येतं. बालपण ते वृद्धापकाळ या विविध अवस्थांना साजेसं सार्थ जीवन जगू या. माझ्या जीवनाचा हेतू काय, मला काय मिळवायचं आहे आणि माझं रोजचं वागणं यात एकसूरता साधू या. श्रेयस्कारी निजसुख अनुभवणारं आपलं निरामय घरटं अनेकांसाठी सुखदायी करू या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 10, 2020 12:03 am

Web Title: in search of happiness niramay gharta dd70
Next Stories
1 वेश्याकार्य गुन्हा नाहीच, पण…
2 स्त्री सुरक्षेसाठी सशक्त स्त्री पोलीस खातं
3 गर्जा मराठीचा जयजयकार : इंग्रजी एक ‘अतिरिक्त’ भाषा
Just Now!
X