‘वाचू आनंदे’, ‘अक्षर सुधार कार्यक्रम’ वा ‘अनमोल मोती’ किंवा ‘पर्लस् ऑफ विसडम्’ या पुस्तकांचा वापर करून मुलांमधली भाषा समृद्ध करण्याचा अनोखा उपक्रम असो. यातून नकळत झालेल्या मूल्य संस्कारांनी मुलांमधली समज वाढते, त्यांची शब्दसंपत्ती वाढते, भावनांक वाढतो. अशा विविध उपक्रमातून ‘पार्ले पंचम’ व ‘बालविकास मंच आणि बालक-पालक संवाद केंद्र’ भाषा संवर्धनासाठी आपला खारीचा वाटा उचलत आहेत.
अपल्या भाषा, खासकरून मायबोली म्हणजे परस्परांना सांधणारा दुवा! कोणतीही गोष्ट ऐकली, पाहिली की त्यावर विचार सुरू होतो. भाषेच्या माध्यमातून! त्यावरची प्रतिक्रिया, अभिव्यक्ती होते तीही भाषेच्या माध्यमातून! भाषा आपल्याला समृद्ध करते, घडवते. आपली संस्कृती फुलते, बहरते. त्याची साक्ष देते भाषाच!  पण गेल्या काही वर्षांत भाषेकडे दुर्लक्ष होऊ लागलं आणि मराठीसकट अनेक भाषांची तर हेळसांडच सुरू झाली, पण याचे परिणाम जसे जाणवत गेले तसे त्यावर उपायही सुरू झाले, देशात आणि विदेशात!
खासकरून १९६० च्या आसपास अनेक उच्चशिक्षित परदेशात जाऊन स्थायिक होऊ लागले. त्यांनी मराठी मंडळे, मंच यांची स्थापना केली. मंदिरं बांधली, पण त्यांना जाणवलं की त्यांच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या पिढीची भारताच्या मातीशी नाळ पक्की करायला आणखी काही करायला हवं. मग जिथे मराठी बोलणाऱ्यांची संख्या जास्त, अशा अमेरिकेतील न्यूजर्सी वा ऑस्ट्रेलियातील सिडनीत दर रविवारची दोन तासांची मराठीची शाळा सुरू झाली. घरी ऐकून मराठी समजत होती, पण बोलताना त्यात तिथला उच्चार नसे वा किमान वाचन करता यावं म्हणून मराठी मुळाक्षरं, बाराखडी, जोडाक्षरं साधारण चौथीपर्यंतच भाग तिथे शिकविला जातो. सिडनीत तर रेडिओवर आठवडय़ातील तीन दिवस दोन तास मराठी कार्यक्रम, मराठी मुलखातलं बातमीपत्र सादर होतं. सध्याच्या आघाडीचा कलाकार श्री सांगतो की माझ्यातील या गुणांची पारख मला झाली सिडनीत. दैनंदिन व्यवहासासाठी जरी मराठीचा वापर केला तरी फरक पडतो, याचे उदाहरण म्हणजे माझी नातवंडं. प्रवासात मराठी गाणी ऐकणं, भेंडय़ा खेळणं आणि मुलं लहान असेपर्यंत दर शनिवारी मराठी चित्रपटांची सीडी पाहणं हे केलं. त्यामुळे आता माझ्या नातींना आजी-आजोबांशी मराठीतून छान संवाद साधता येतो.
‘पार्ले-पंचम’ नावाची एक संस्था, मराठी संवर्धनाच्या कामात आपला खारीचा वाटा उचलते. मराठी दिनाचा आगळावेगळा कार्यक्रम अनेक शाळांना बरोबर घेऊन साजरा करते. नेहमीचं क्रमिक पुस्तक पण मुलांना नवखं वाटू लागतं. अनेक खेळ, कोडी सोडवा, झटपट राऊंड, भेंडय़ा, शब्दखेळ पूर्ण दिवस मुलं रमतात. कार्यक्रमाचं नाव असतं जल्लोष/ जागर मराठीचा. एकदा कोणाच्या तरी वाचनात रत्नागिरीतील ‘वाचू आनंदे’ उपक्रमाची माहिती आली. श्रीधर खानोलकर,  तेजस गोखले, संतोष नाकती, श्रद्धा लिमये, वैजयंती साठे, हर्षदा सबनीस, सुजाता गांगुर्डे अशा अनेक हौशी भाषाप्रेमींच्या ही संकल्पना खूप आवडली. मग त्यांनीही आसपासच्या शाळांसाठी हा उपक्रम सुरू केला. गेली दोन र्वष सातत्याने तो सुरू आहे. त्यात दर महिन्याला मुलांनी वाचन करायचं असतं कधी आत्मचरित्रे, कधी नाटके, कवितासंग्रह इ. मग त्यावर बोलायचं, रसग्रहण करायचं. इ. इंग्रजी आणि मराठी माध्यमात शिकणारी मुलंही त्यात भाग घेतात. काही शाळा आवर्जून मुलांना पाठवतात. दर शनिवारी माधवराव भागवत शाळेत हा उपक्रम चालतो.
वैद्यकीय व्यवसाय २२ वर्षे करीत असताना डॉ. अरुंधती जोशी यांनाही भाषासंवर्धनाची गरज वाटू लागली. त्यामागे दोन कारणं होती. एक गेल्या १०-१२ वर्षांत पालकांच्या अनेक तक्रारी येऊ लागल्या. मुलं हट्टीपणा करतात, ऐकत नाहीत, अभ्यास करीत नाहीत, स्वस्थ बसत नाहीत आदी मुलंही पालकांबद्दल बोलू लागली, ‘आम्हाला समजून घेत नाहीत, सारखा अभ्यास करायला लावतात, घरात खूप एकटं वाटतं. इ. ’ त्याचबरोबर मनावर येणारा ताणतणाव चुकीच्या सवयी यामुळे उद्भवणारे आजार यांचंही प्रमाण वाढलं. त्यांच्या लक्षात आलं यावर पोटात घेणारं औषध नाही तर मनाची घडण, निगराणी करणारं, त्याला फुलविणारं, सुखावणारं औषध हवं आहे. गरज आहे त्यांचा भावनिक मूल्यांकन वाढवण्याची. यातून सुरू झाला ‘बालविकास मंच, बालक-पालक संवाद केंद्र. ’
डॉक्टरांच्या दोन्ही जुळ्या मुलांना श्रवण दोष. त्यामुळे मुलांशी संवाद साधणं, त्यांना वाढवणं इ. करताना येणाऱ्या साऱ्या मानसिक, शारीरिक त्रासातून त्या गेलेल्या, पण त्याच वेळा श्रुती विद्यालय, तिथला सारा कर्मचारी वर्ग आणि खासकरून डॉ. ओझा यांचे त्या खास आभार मानतात. त्यांनी मुलांच्या भाषा संवर्धनासाठी अजोड मेहनत घेतली. म्हणूनच मुलांना थोडय़ाच वर्षांत साधारण मुलांच्या शाळेत समाविष्ट करता आलं. गेल्याच वर्षी दोघे ९३ टक्के गुण मिळवून दहावी उत्तीर्ण झाले. डॉक्टरांना वाटलं या साऱ्यांचे उपकार फेडण्याचा मार्ग आपणही समाजासाठी काही करणं.
‘बालविकास मंच’ सुरू करताना त्यांना मोलाची मदत झाली त्यांची आई प्राध्यापिका विजया वैशंपायन यांची. त्या अखिल भारतीय कीर्तन प्रशिक्षण पदाधिकारीही आहेत. त्यांनी काही गोष्टी निश्चित केल्या. १)वयोगट ठरवला ३-४ ते ६ आणि ७-८ ते १० -१२ वर्षे) मुलांना इथे मोकळेपणा वाटायला हवा. ३) त्यांना आपल्या संस्कृतीची ओळख व्हायला हवी. ४) श्लोक, सुभाषितमाला, म्हणी, सुविचार पाठ व्हायला हवेत. ५) त्यांची शब्दसंपत्ती वाढायला हवी, त्यांचा वापर करता यायला हवा. ६) त्यांचं अक्षर सुधारायला हवं. ७) त्यांनी वाचन करायला हवं. ८) अनेक संस्कार, मूल्य त्यांनी स्वत:हून महत्त्व कळून अंगी रुजवायला हवी.
मग यासाठी त्यांनी छोटय़ांसाठी वाचनालय सुरू केलं. शाळा प्रथम रविवारी घरीच दोन तास भरे. मुलांची संख्या वाढली. मग त्यांच्या एका रिकाम्या ब्लॉकमध्ये शाळा हलवली. शाळेत इंग्रजी आणि मराठी माध्यमाची मुलं येतात. मराठी मुलांसाठी अनमोल मोती तर इंग्रजी माध्यमासाठी स्वामी विवेकानंदाचं ‘पर्लस् ऑफ विसडम्’ पुस्तक निश्चित झालं. त्यांचा अभ्यास करायला पण शाळेत करतो तसा नाही. मुलांना दोन वह्य़ा दिल्या गेल्या एक साधी आणि दुसरी ४ रेघांची व दोन रेघांची. चित्रवर्णन, कल्पना विस्तार, चर्चा, परिसंवाद हे सारं आयोजित करताना भान ठेवलं गेलं विषयांचं! मुलांच्या आवडीचे, त्यांच्या परिचयाचे विषय असले तरी मुलांना वाक्य बनविणं, सुसंबद्धपणे मांडणं, त्याचं इतर विषयांशी नातं जोडणं जमतंच असं नाही. मग ‘शब्द सांगा’, आपण वाक्य बनवू या असं करीत विषय फुलवला जाई. मुलं आपल्या रफ वहीत तसंच उतरवून घेत. कधी समान अर्थी शब्द, कधी विरुद्ध अर्थी, एकाच अर्थाचे अनेक शब्द, एकच शब्दाचे अनेक अर्थ, अनुस्वारांचे शब्द, कानामात्रा नसलेले, जोडाक्षर नसलेले अनेक प्रकार म्हणींच्या गोष्टी, हे सारं हसत-खेळत चाले.
मुलं ‘अनमोल मोती’ वा ‘पर्लस् ऑफ व्हिसडम्’मधून एकच प्रकरण वाचत. मग पुस्तक बंद. काय वाचलं, काय कळलं यावर चर्चा, प्रत्येकानं मत मांडणं, इतरांचं म्हणणं ऐकणं, आपलं म्हणणं इतरांना पटवून देणं, आपलं म्हणणं कोणी खोडून काढलं, टीका केली तरी न चिडणं. हे सारं आपल्याला जमेल तसं वहीत लिहिणं. याहीपेक्षा महत्त्वाचं यातून मी बोध काय घेणार? माझं काही चुकत होतं का? मी काही माझ्या वागण्यात बदल करायला हवा आहे याची त्यांना जाणीव होणं. ते त्यांनी त्यांना जमेल तसं प्रथम रफ वहीत उतरविणं.
अक्षर सुधार कार्यक्रम. मुलांना दिलेल्या चाररेघी वा दुरेघी वहीत त्यांनी रफ वहीतलंच परत शांतपणे घाई न करता उतरवून काढायचं असतं. त्यांनी अनेक गोष्टी साध्य होतात. उजळणी होते. फक्त लेखनावरच लक्ष केंद्रीत होतं. शाळेतून घरी गेल्यावर लगेच गृहपाठ करून टाकण्याचे फायदे समजतात. उरलेल्या वेळात मुलं मोकळेपणानं खेळतात. अनेक गोष्टी आणि गाणी त्यांची पाठ झाली आहेत.
चार ते पाच महिन्यांत मुलांच्यातला बदल जाणवू लागतो. न कळत झालेल्या मूल्य संस्कारांनी समज वाढलेली असते. खाण्याच्या सवयी बदलतात. शाळेतल्या आणि घरी पालकांच्या तक्रारी कमी होतात. भाषा समृद्ध झाल्याचा फायदा अभ्यासात होतो. वर्गात हात वर करून उत्तर देण्याचा आत्मविश्वास येतो. कौतुक होतं आणि त्यानं मुलाची स्वत:बद्दलची प्रतिमा सुधारते. हे खूप खूप महत्त्वाचं असतं. म्हणूनच मुलांची संख्या वाढते आहे. आता त्या पालक आणि बालक दोघांसाठी समुपदेशन करतात.
डॉ. जोशी हे सारं ज्या तळमळीनं सांगतात ते ऐकताना वाटतं लहान गावात व शहरातील मोठय़ा गृहनिर्माण संस्थांत अशी संवाद केंद्र आणि भाषा संवर्धन प्रकल्प व्हायला हवेत. एकमेकांपासून दूर जाणाऱ्या माणसांना बांधून ठेवण्याची ताकद यात आहे. एक मोठं कुटुंब यानं सहज निर्माण होईल.    
पार्ले पंचम- सुजाता गांगुर्डे ९७६९११९२२२
संवाद केंद्र- डॉ. अरुंधती जोशी ९८६९३९१३३८.