मंगला गोडबोले – mangalagodbole@gmail.com

आपल्या हातात एक-एक गॅजेट येत गेलं, तंत्रज्ञान सोपं झालं, हा बदल फायद्याचाच. पण मोबाइलची बटणं ‘क्लिक’ करण्याची सवय झाल्यापासून आपण साध्या मोबाइल नंबर्सपासून आणखीही बरंच काही लक्षात ठेवणं सोडून दिलं. मोबाइल, इंटरनेट, हाताशी वाहन, इमारतीला लिफ्ट, घरगुती वापराची विविध उपकरणं, अशा सुविधा बंद पडल्या तर अनेकांना अगदी पांगळं झाल्यासारखं वाटतं. पंडितकाकांना मात्र ही गोष्ट मान्य नव्हती. धडधाकट शरीराच्या क्षमता पूर्णपणे वापरल्याच नाहीत, तर त्यातली एक-एक क्षमता आपण गमावू की काय, असा प्रश्न त्यांनी ‘व्वा हेल्पलाइन’च्या वत्सलावहिनींना विचारला.

‘‘अंकल.. बॉल प्लीज!’’ गेल्या अध्र्या तासात तिसऱ्यांदा खाली खेळत असलेल्या क्रिकेटवीरांचा बॉल पंडितांच्या बाल्कनीत आला आणि पाठोपाठ पुकाराही आला. पंडित संध्याकाळी एका गायन स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून जाणार होते. त्या वेळच्या भाषणाची थोडी तयारी करत होते. त्यात सारखा हा व्यत्यय. ते त्रासून म्हणाले, ‘‘उपर आके ले जाव तुम्हारा बॉल.’’

‘‘प्लीज अंकल, प्लीज..’’

‘‘तुम्हाला वर यायला काय होतं रे?’’

‘‘लिफ्ट बिघडलीये ना.’’

‘‘दुसराच मजला आहे हा. एवढंही चढवेना होय तुम्हाला?’’

‘‘लेग्ज हर्ट अंकल. पाय दुखतात जिने चढून.’’ पंडितांनी नाइलाजानं उठून, गॅलरीत जाऊन बॉल तर खाली टाकला, पण तेवढय़ात खालचं पोरगं मोठय़ांदा म्हणालं, ‘‘नेक्स्ट टाइम नाही अंकल. गॉड प्रॉमिस! आय विल टेल द बॉल, की डोण्ट गो टू पंडित गॅलरी. ओके?’’

‘‘अरे तुझ्या वयात दहादा  हा जिना चढला असता मी.. माकडासारख्या उडय़ा मारत.’’ पंडितांनी हसू दाबत म्हटलं. जे करट स्वत:

कु णाचं ऐकत नाही त्याचा बॉल काय ऐकणारे कपाळ? पुन्हा भाषणाच्या जुळणीकडे ते वळणार तोच त्यांच्याकडच्या जुन्या कामवालीनं त्यांच्यासमोर गरम पोह्य़ांची बशी ठेवली.

पहिला चमचा तोंडात टाकताच ते म्हणाले, ‘‘आज पोह्य़ांवर लिंबू नव्हतं का गं?’’

‘‘लिंबाचा रस काढण्याचं यंत्र तुटलंय साहेब.’’

‘‘मी यंत्राबद्दल विचारलं नाही, लिंबाबद्दल म्हटलंय. जरा अर्ध लिंबू दे याच्यावर पिळून.’’

बाईनं तरातरा आत जाऊन एक लिंबाचं अर्धुक त्यांच्यासमोर आणून ठेवलं. ‘‘घ्या. आणि करा काय ते.’’ असा होता आविर्भाव.

‘‘मी तुला सोलापुरी चादर पिळायला सांगत नव्हतो गं, साधं लिंबू..’’ पंडित कु रकु रले

‘‘आपली बोटं वळत नाहीत आता. तुम्हीच ट्राय मारा.’’ कामवाली भलतीच फ्रेंडली असल्यानं म्हणू शकली.

पंडितांनी रुबाबात ट्राय ‘मारायला’ घेतला. उजव्या हाताच्या बोटांमध्ये लिंबू धरलं. डाव्या हातांची बोटं खाली अशी गाळणीसारखी धरली. त्यांची आई असंच लिंबू पिळायची त्यांच्या लहानपणी. पुन्हा एवढं घट्ट पिळायची की मागे उरलेल्या सालामध्ये लिंबाचा थेंबभर रस राहू नये. पंडितांना आईची कामाची सफाई येणं शक्यच नव्हतं. पहिल्यांदा बोटांची हालचाल झाली पण रस काही आला नाही. दुसऱ्यांदा लिंबू खाली पडलं आणि बोटांचा चुटकी वाजवल्यासारखा आवाज आला. तिसऱ्यांदा खालची गाळणीवजा बोटं वरच्यांच्या मदतीला अचानक गेली. असं होता होता शेवटी, बऱ्याच झटापटीनंतर बियांसकट लिंबूरसाचा शिडकावा पोह्य़ांवर आणि इतरत्र करण्यात त्यांना यश आलं. विजयी मुद्रेनं ते कामवाल्या बाईकडे बघणार तर ती पुटपुटत होती, ‘‘एवढा कुटाणा करून, एखाद्याचा सूड काढल्यागत लिंबाचा रस काढण्यापरीस ती लिंबू रसाची शिशी विकत आणावी की! आयती मिळते नाक्यानाक्यावर.’’

‘‘आणतो उद्या.’’

‘‘आणि तुम्ही म्हणाला ना, तशी सोलापुरी च्यादर पिळायची बातच सोडा हं साहेब. कपडे धुवायच्या मशिनी नसतील त्या घरात आपण कामच घेत नसतो. आपण फक्त वल्ले कपडे वरती तारेवर सुकायला टाकतो. एकेक मालकिणींना आता काठीनं उंचावर कपडे टाकता येत नाहीत. शंभरदा पाडत्यात खाली. माना दुखतात त्येंच्या.’’ तिनं ठसक्यात सांगितलं.

‘‘हुशार आहात. तू आणि तुझ्या मालकिणी!’’ पंडितांनी तिला त्या विषयासकट आवरतं घेतलं. उंच तारेवर आई सहज आजोबांचं धोतर वाळत घालायची. त्याला एक चुणी पडलेली नसायची. ते चित्र त्यांना आठवल्याशिवाय राहिलं नाही.

स्पर्धेसाठी त्यांना न्यायला एक तरुण कार्यकर्ता आला होता. गाडीत बसल्यावर उगाचच काही तरी बोलायचं म्हणून ते त्याला म्हणाले, ‘‘एकूण किती वेळ चालला तुमचा हा ‘गानयज्ञ’?’’

‘‘यज्ञ म्हणजे बघा.. मी सगळा वेळ तिथे नव्हतो.’’ कार्यकर्ता.

‘‘तरी पण.. एकूण? मोघमात..’’

‘‘म्हणजे बघा, ७० स्पर्धक. प्रत्येकाची गाण्याची तीन मिनिटं. मग मागची पुढची चार-पाच मिनिटं, म्हणजे बघा, ‘सेव्हण्टी मल्टिप्लाइड बाय सेव्हन ऑर एट मिनिट्स, डिव्हायडेड बाय सिक्स्टी. ६० मिनिटांचा एक तास ना..’’

त्यानं आपला मोबाइल फोन हातात घेऊन त्यातल्या कॅल्क्युलेटरवर हिशोब मांडायला सुरुवात केली. एवढय़ा ‘अवघड’ गणिताला त्याला कॅल्क्युलेटर लागावा या कल्पनेनं पंडित जरासे अस्वस्थ झाले. पण वरकरणी हसून म्हणाले, ‘‘राहू द्या हो. एवढा मिनिटा-सेकंदांचा हिशोब करून मला कुठे मोठं जायचंय? घटकाभर ६० स्पर्धक धरले, तर बघा, स्पर्धकही ६०, तासाची मिनिटंही ६०. गुणायला नको, भागायला नको. ७ किंवा ८ तास स्पर्धा झाली असं म्हणता येईल. वरचे १० स्पर्धक एक्स्ट्रा धरायचे.’’ पंडितांनी मनातल्या मनात मोघम गणित केलं. ते त्या कार्यकर्त्यांच्या डोक्यावरून गेलं. तो आपला फोनशी झटापट करत राहिला आणि ‘कारमध्ये रेंज जात्येत वाटतं,’ वगैरे त्रासिक पुटपुट करत राहिला. एकूण तोंडी गणित, मनात आकडे ‘धरून’ हिशेब करणं त्याच्या ‘रेंज’मध्ये नाहीये हे पंडितांच्या लक्षात आलं. मोबाइलची रेंज अध्येमध्ये तरी जात होती. इथे कायमचीच?

स्पर्धेच्या सभागृहात ते पोहोचले, तर शेवटचा स्पर्धक गात होता. आवाज आणि तयारी चांगली होती त्याची. पण तो मध्येमध्ये सारखा आपला डावा तळहात समोर धरून त्यावर नजर टाकत होता. पंडितांना याचा अर्थ कळला नाही. शेजारच्यानं सहजपणे सांगितलं, ‘‘खूप मुलं अशी तळहातावर गाण्यातले शब्द, ओळींची सुरुवात वगैरे लिहून आणतात. सगळी गाणी त्यांच्या मोबाइलमध्ये असतातच ना! पण आम्ही त्यांना स्पर्धेत मोबाइल वापरायला मना केलंय. म्हणून हा शॉर्टकट. हुशारच आताची पोरं.’’

‘‘हो तर.. म्हणून तर तीन मिनिटांचं गाणं त्यांना तोंडपाठ करता येत नाही. तो काय गीतेचा अध्याय म्हणायचा असतो का, मध्येमध्ये अडखळायला? साधी भावगीतं, नाटय़गीतं..’’

‘‘तसं नाही सर. सवय होते ना आधार घ्यायची.. उगाच एखादा शब्द गळफटला म्हणून स्पर्धेत मागे पडायला नको.’’

त्यानं खूप सांगितलं, पण पंडितांना ही सबब पटली नाही. त्यांनी बक्षीस समारंभाच्या आपल्या भाषणामध्ये या मुद्दय़ाचा आवर्जून उल्लेख केला. तो न आवडल्याचं काही स्पर्धकांच्या पालकांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसलं.

‘‘स्पर्धा गाण्याची होती सर, पाठांतराची नव्हे.’’ असं दोघातिघांनी नंतरच्या चहापान कार्यक्रमात सांगितलंही, पण पंडितांना हे स्वीकारता आलं नाही. एवढय़ा लहान-नवतरुण वयामध्ये आवडीचं, घोकलेलं गाणं पाठ नसणं त्यांना अक्षम्यच वाटलं.

घरी आले तर त्यांच्या भागात  गेले चार तास वीजच नव्हती म्हणे. खाली पटांगणात, वरती जिन्याच्या तोंडाशी तीनचार-तीनचार मुलंमुली त्रासून उभी होती. विचारल्यावर बहुतेकांनी उत्तर दिलं, ‘वीज गेल्यानं फार बोअर झालंय’. अनेकांच्या घरात ‘इर्मजसी लॅम्प्स’ होते, कुठे जनरेटर होता, पण त्या पर्यायी आणि क्षीण वीजपुरवठय़ावर बरीचशी गॅजेट्स चालत नव्हती. आणि दिवसाचे तीन-चार तास यंत्रांशिवाय घालवणं या मंडळींना मंजूर नव्हतं. पंडितांचे दोघे मुलगेही त्यांच्यामध्ये होतेच. सगळे उसासे टाकत होते, सुस्कारे सोडत होते, वीज मंडळाचं श्राद्ध घालत होते, आपापल्या दुर्दैवाला शिव्या घालत होते.

अवघी तीन-चार तास वीज नसेल तर या माणसांना एवढं हवालदिल व्हायला होतं? यांना स्वत:चा वेळ स्वत: घालवता येत नाही? आपापसात जिव्हाळगप्पा करता येत नाहीत? वास्तविक स्वत:वर सोडलं की कित्येकदा माणसाच्या मनाला, बुद्धीला धुमारे फुटतात. ही शक्यताही त्यांना आजमवावीशी वाटू नये? पंडित विचार करत राहिले.

रात्री उशिरा वीज आली आणि पाठोपाठ परिसरातल्या नेटकऱ्यांचा ‘‘होऽऽऽ’’ असा आनंदाचा जल्लोषही. आता कसे सगळे आपापल्या यंत्रात डोकं खुपसून बसायला मोकळे होते! डोकं वापरण्याचा त्रास उगाच कोण घेईल? पंडितांना सगळंच अंगावर येणारं वाटलं. धट्टय़ाकट्टय़ा शरीरांची माणसं चौफेर अपंग झाल्यासारखी वाटली. आपल्या देवदत्त शरीराची, गात्रांची ताकद ज्यांना समजलीच नाही अशी माणसं. वापरणं ही फार दूरची गोष्ट. ‘अपंगाशी आणि प्राणाशी गाठ’ असं काही तरी पाठ केलं होतं ना पूर्वी? त्यांनी मनातली खळबळ आणि शब्दाचा खुलासा थेट वत्सलावहिनींकडेच मागायचं ठरवलं. फोन केला, तो लागलाही.

‘‘हॅलो. ‘व्वा’ हेल्पलाइन हिअर. मे आय हेल्प यू?’’ वत्सलावहिनी.

‘‘वत्सलावहिनी, ते ‘अपंगाशी संग’ की काय होतं हो पूर्वी?’’

‘‘अपंगाशी नाही हो, ‘असंगाशी संग, प्राणाशी गाठ’ असं होतं ते! पण त्याचा आज, आमच्याशी काय संबंध?’’

‘‘मला आपण सगळे अपंग होत चालल्यासारखं वाटतंय हो. आपल्याला हात-पाय-डोळे-कान यांच्या शक्ती वापरताच येत नाहीत असं वाटतंय.’’

‘‘कशावरून हा निष्कर्ष काढलात तुम्ही?’’

‘‘तुम्हीच बघा ना. आपल्याला हातानं फळाचा रस काढता येत नाही, स्पर्धेतलं गाणं मेंदूवर कोरून ठेवता येत नाही, छोटी आकडेमोडसुद्धा मनातल्या मनात करता येत नाही. सगळ्याला यंत्राची, अ‍ॅपची मदत घ्यावी लागते.’’ पंडित म्हणाले.

‘‘आता आहेत सगळ्या सोयी, तर लोक वापरणारच ना! आयुष्य सोपं करण्यासाठीची साधनं ही.’’

‘‘पण परिणाम झाला तो माणसांना पांगळं करण्यात, नाही का? असेच स्वत:ला न आजमावता यांची मदत घेत गेलो तर आपण आपल्या एकेक ‘फॅकल्टीज’ गमावणार नाही का मॅडम?’’

‘‘शक्य आहे. ‘यूज इट ऑर लूज इट’- वापरा किंवा गमवा हा निसर्गाचा नियमच आहे. तुम्ही तो कसा मोडू शकाल?’’ वत्सलावहिनी.

‘‘एके काळी मानवाला शेपूट असायची. ती निरुपयोगी झाली, वापरात येईनाशी झाली, म्हणून गळून पडली, असंच ना? तशीच काळाच्या ओघात आपली स्मरणशक्ती, श्रवणशक्ती, आवाज लावणं यांचीही गत होईल का? पूर्वी म्हणे खुल्या पटांगणात, शेकडो प्रेक्षकांसमोर रात्ररात्र नाटकांचे प्रयोग व्हायचे. तेव्हा म्हणे कोणत्याही ध्वनिवर्धकाशिवाय शेवटल्या रांगेतल्या प्रेक्षकाला ऐकू जाईल असा ताकदीचा आवाज लावायचे नट लोक. आता लाऊडस्पीकर असूनही कोण कुजबुजतोय, कोण गुणगुणतोय, कोण पुटपुटतोय.. कळत नाही. कुठे गेली ती बुलंद फुप्फुसांची शक्ती? या गतीनं मला वाटतं शंभर-दोनशे वर्षांनंतर माणसाला बोटांनी कुठली तरी बटणं दाबण्याशिवाय दुसरी काही कृतीच करता येणार नाही. यावर उपाय?’’ पंडितांनी विचारलं.

‘‘हे बघा, आपण कितीही चिडचिड केली तरी लोक उगाचच घसे फोडणार नाहीत किंवा आता नव्यानं सवायकी, अडीचकी पाठ करणार नाहीत. आता तर मानवी बुद्धीलाही आव्हान देणारा ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ आला आहे म्हणे.’’

‘‘मग हाडामासाच्या माणसानं काय करावं? कसं जगावं?’’

‘‘विवेकानं जगावं न् काय! ठरवावं की बुवा, तीन मजल्यांपर्यंत मी पायी चढेन, दोन-चार ओळींची चिठ्ठी मी माझ्या हातानं लिहीन, माझ्या रोजच्या गरजेचे बँकांचे, खात्यांचे, फोनचे नंबर मी लक्षात ठेवीन, तीन अंकी हिशोब मी तोंडीच पाठ करीन.. वगैरे वगैरे. किंवा आठवडय़ातला एक दिवस मी पूर्णपणे गॅजेटविरहित काढीन, असंही..’’

‘‘एवढी तोशीस कोण लावून घ्यायला बसलंय?’’ वत्सलावहिनी.

‘‘मग?’’

‘‘‘आम्ही असू पांगळे, यंत्राविण’ ही नवी ओळ बनवायची आणि घोकायची. यंत्रं माणसावर कुरघोडी करताहेत आणि माणसं आणखीच यंत्रवत, निर्जीव होताहेत हे व्हायला नको असेल, तर यंत्र-तंत्र-सुविधांच्या किती आहारी जायचं हे माणसांनाच ठरवायला हवं ना? हे ठरवण्याचं बटण अजून निघालेलं नाही. तोवर तरी..’’