‘‘वामनमध्ये सकारात्मक ऊर्जा भरलेली आहे. मीही तशीच आहे, प्रत्येक नव्या प्रयोगाच्या वेळी तो स्वत:ला शोधत असतो आणि त्या शोधात मी सोबत असतेच. त्याचा एन्.सी.पी.ए. ते मुंबई विद्यापीठ ते आता एन्. एस्. डी. चे संचालकपद हा प्रवास, त्याची दिग्दर्शकीय कारकीर्द, त्याचे विविध सन्मान मला माझे सन्मान वाटले, माझं होणारं कौतुक त्याला त्याचं वाटलं. संसारात आम्ही आमच्या संवेदना बोथट होऊ दिल्या नाहीत. वामनचे मोठेपण मला मान्यच होते, पण त्या मोठेपणाच्या सावलीत मी कधी जगले नाही, त्याने मला माझा सूर्य मिळवू दिला..’’ सांगताहेत अभिनेत्री    गौरी केंद्रे लेखक, दिग्दर्शक वामन केंद्रे यांच्या बरोबरच्या २७ वर्षांच्या सहजीवनाविषयी..
आमच्या लग्नाला २७ वष्रे पूर्ण झाली. पण अजूनही वाटते की आमचे नव्याचे नऊ दिवस संपले नाहीत. आलेला प्रत्येक क्षण आमच्यासाठी नवा होता, आहे व राहील. जीवनाचा प्रत्येक क्षण हा नवा उत्सव आहे, असं मला.. आम्हाला वाटतं!
 माझा नवरा हा चार चौघांसारखा घरादारात गुंतणारा नाही हे मला माहीत होतं आणि मीही घरादारात अडकणारी, चूलमूल करत बसणारी नाही हे त्याला माहिती होतं. तो त्याच्या क्षेत्रात दर वेळी काही तरी नवं करू पाहणारा, शोधणारा आहे. त्याची ती शोधक वृत्ती सामान्य कटकटीपासून त्याला दूर ठेवून जपली पाहिजे याची जाणीव मला आहे आणि माझ्यातल्या कलागुणांची जोपासना करून त्याला प्रेरक राहणं हे आवश्यक आहे याची त्याला जाण आहे. आम्ही एकमेकांसाठी आहोत, हे काळाच्या ओघात आम्हाला कळत गेलं आहे.
आमची पहिली ओळख मात्र समजूतदार नव्हती. मी अकोल्यात राहायचे. मी माहेरची पडते. माझे वडील रेल्वेत नोकरीला, त्यामुळे त्यांची सतत बदली व्हायची. मुंबईपासून सर्वत्र वास्तव्य. शेवटी आम्ही अकोल्याला स्थिर झालो. मी महाविद्यालयीन जीवनात सगळ्या क्षेत्रात भाग घ्यायचे, खेळात भरपूर रुची होती, अभ्यासात हुशार आणि नाटक वगरेही सुरू असायचं. राज्य नाटय़ स्पध्रेत बक्षिसंही मिळाली होती. १९८४ साली पहिल्यांदाच आमच्या अकोल्यात राज्य शासनानं नाटय़ प्रशिक्षण शिबीर भरवलं होतं. तिथं एक चष्मिस, हीरोसारखा दिसणारा पोरगेलासा नुकताच एन्. एस्, डी.मधून प्रशिक्षण घेऊन बाहेर पडलेला मुलगा प्रशिक्षण देणार होता. विद्यार्थ्यांच्या वतीने बोलताना मी म्हटले की, ‘महाराष्ट्र शासनाने आम्हाला शास्त्रशुद्ध नाटक शिकवायला उत्तम शिक्षक पाठवले असतील अशी आशा आहे.’ माझा रोख वामन केंद्रेंकडे होता. त्यांच्या लक्षात आलं की ही पोरगी आपल्याला त्रास देणार. त्यांनी उद्घाटनानंतर लगेच सांगितलं की, ‘आता सुट्टी नाही, मी लगेच शिकवायला सुरुवात करणार’. आणि खरंच म्हटल्याप्रमाणे शिकवायला सुरुवात केली. खूप छान शिकवलं. संध्याकाळी परतताना दुसऱ्या दिवशी वेळेवर यायला सांगितलं. आणि मला दुसऱ्या दिवशी पाच मिनिटं उशीर झाला. सरांनी मला शिबिराबाहेर थांबायला सांगितलं. बाकी सारे बाहेरगावाहून आलेले, त्यामुळे ते तिथेच राहिलेले होते. मी स्थानिक होते म्हणून घरून अर्धा तास सायकल चालवत आले, त्यामुळे उशीर झाला होता. सांगितल्यावर सरांनी समजून घेतलं, मला दुसऱ्या दिवसापासून वेळेवर यायला सूचना देऊन शिबिरात सामावून घेतलं. रोज सकाळी आठ ते रात्री आठ. बारा तास कसे जायचे ते कळायचं नाही. महिना सरला. शिबीर संपलं. संपताना सर  म्हणाले, ‘‘नाटकाकडे गंभीरपणे लक्ष दे. राज्य नाटय़ स्पध्रेमुळे फक्त मर्यादित प्रयोग करशील, पण मुंबईत ये, तिथे खूप काही करू शकशील.’’ मी फक्त मान डोलावली.
त्यावेळी मी कविता करत असे. दादरला वनमाळी हॉलमध्ये माझं काव्यवाचन होतं. बाबांबरोबर तिथे गेले. तर समोर छबिलदास शाळा दिसली. सर म्हणाले होते, की ते तिथे असतात. मी त्यांना शोधत वर गेले. तिथे सीतारामकाका होते. त्यांनी सरांच्या नव्या नाटकाचा रवींद्रला प्रयोग आहे असं संगितलं. मी सीतारामकाकांकडे माझा दादरचा पत्ता दिला व सरांना तिथे येण्याची विनंती करून निघाले. दिवसभर वाट पाहिली, पण ते आले नाहीत. मी ठाण्याला बहिणीकडे गेले. सर नंतर दादरच्या पत्त्यावर पोचले व तिथून त्यांनी ठाण्याला फोन केला व मला म्हणाले, ‘‘आता आलीच आहेस तर राहा, मी एक िहदी नाटक करतोय, त्यात काम कर.’’ बाबांच्या परवानगीनं मी मुंबईत राहिले आणि मग कायमचीच राहिले.
 खरं तर मी १९८४ च्या त्या शिबिरातच सरांच्या प्रेमात पडले होते. त्यांनाही मी आवडत असणार. खरं तर मी त्यांच्यासाठीच आले होते, हे खरं तर आत्ता सांगतेय. ते ‘अफलातून’ नावाचं िहदी नाटक होतं. मग आम्ही एकत्र खूप प्रोजेक्ट केले. १९८४ शिबीर- १९८५ मुंबई- १९८७ लग्न! अर्थात इथे सांगतेय तसा हा प्रवास सोपा नव्हता. वामन आणि संजय सूरकर दोघे मुंबईत दादरला पेईंग गेस्ट म्हणून राहात होते. मला सेंट कोलंबस शाळेत नाटय़शिक्षिका म्हणून नोकरी लागली. नाटक सुरू होतंच. सोबत काम करता करता वामनच्या लक्षात आलं की मला त्याच्याशी लग्न करायचंय. तो मला एकदा त्याच्या मूळ गावी घेऊन गेला. तो बीड जिल्ह्य़ातल्या केज तालुक्यातल्या दरडवाडी येथला. घरचे सगळेच शेतकरी व माळकरी. वडील भारुड कलाकार होते. सारे एकत्र राहायचे. वामन सर्वात मोठा मुलगा. घर मातीचं आणि १९७२ च्या दुष्काळात सर्वस्व हरवलेलं. वामननं मला मुद्दाम घरची स्थिती दाखवली. पण मला त्या स्थितीपलीकडचा माणूस दिसला. वामन नेहमी सांगायचा की, ‘गौरी माणूस वाच’ तसा.    
आमचं लग्न झालं तेव्हा आमच्याकडे मुंबईत शिवनेरीमध्ये एकच खोली होती. मला अनेक जण म्हणाले, ‘‘गौरी तुला मोठय़ा घराची सवय.  इथे कशी राहील?’ किंवा ‘मुंबईत राहतेस, आणि साधं स्वत:चं घरही नाही?’ मी म्हणायचे, ‘‘पण माझ्याकडे माझा वामन आहे ना!’’ माझ्या आईनं वामनला सांगितलं, ‘‘पोरीला स्वैपाक येत नाही, फक्त तिला आवडतं, तेवढंच ती करू शकते.’’ तो म्हणाला, ‘‘मी तिला शिकवीन. मला सगळं येतं. खरंच आहे ते.’’ त्यानं मला स्वयंपाक शिकवला. सयाजी िशदेच्या आईनं मला पिठलं करायला शिकवलं. आमचा संसार सुरू झाला. मी ठराविक पद्धतीची गृहिणी नाही. संसाराची आवड आहे, पण आमचा संसार इतरांसारखा नाही. वामननं लग्न झाल्यावरही माझ्यातल्या कलागुणांना जपलं. दोघांचंही व्यक्तिस्वातंत्र्य आम्ही जपतो. मला नाटकाची आवड तर होतीच, पण वामनचं त्या क्षेत्रातलं थोरपण माहिती होतं. मी आपणहून त्याला सांसारिक गोष्टींपासून दूर ठेवला. घरातली कोणतीही गोष्ट  त्याच्यावर लादली नाही. ज्या जबाबदाऱ्या मी उचलल्या त्या त्याच्यातील सृजनशील कलाकार जपला जावा म्हणून. माझी बौद्धिक भूक मोठी होती, वामनबरोबर राहताना ती पूर्ण होत होती. आमच्यात भांडणं होत नाहीत. मी कधी तरी चिडते त्याचं कारण, वामनला माणसं ओळखता येत नाहीत. तो नेहमीच फसतो, त्याच्याच लोकांकडून कधी कधी गंडवलाही जातो. मग मला राग येतो. पण वामन त्यावर अजिबात प्रतिक्रिया देत नाही, शांत राहतो व  नंतर मला समजावून सांगतो. आम्ही एकमेकांना कधीही अपशब्द बोललेलो नाही. आम्ही नवनव्या संहितांवर बोलतो, चर्चा करतो, तो माझ्या मतांचा आदर करतो. कधी मतं स्वीकारतो, कधी नाकारतो, पण तेही अत्यंत सौम्य पद्धतीनं. त्याच्याकडे कमालीचा संयम आहे. नाटकाच्या तालमीत त्याचं पूर्ण समाधान होईतो तो तालीम करत राहतो. एखाद्या दिवशी जर त्याला हवं तसं काम होत नसेल, तर त्या दिवशी तो पॅक अप करेल आणि दुसऱ्या दिवशी काम करू असं सांगेल. तो हाडाचा शिक्षक आहे, उत्तम ऑर्गनायझर आहे, तसाच उत्तम माणूसही आहे. तो त्याच्या नाटकाच्या जगात रमून जातो. सतत प्रयोगशील राहतो, त्याला नावीन्याची आवड आहे आणि नाटकातील नावीन्याविषयी तो सजग आहे. त्याने गेल्या तीस वर्षांत केलेले विविध प्रयोग पाहा, म्हणजे लक्षात येईल. ‘झुलवा’, ‘दुसरा सामना’, ‘एक झुंज वाऱ्याशी’, ‘रणांगण’, ‘ती फुलराणी’, ‘तीन पशाचा तमाशा’, ‘जानेमन’, ‘प्रिया बावरी’ आणि आता ‘नो सेक्स प्लीज.’ व्यावसायिक रंगभूमीवर तो प्रयोग करायचा, प्रत्येक प्रयोग वेगळा. प्रत्येक प्रयोगानंतर मला प्रश्न पडायचा, हा आता काय करणार? आणि वामन तेव्हा काही तरी नवं करायचा. वामनमध्ये सकारात्मक ऊर्जा भरलेली आहे. मीही तशीच आहे, प्रत्येक नव्या प्रयोगाच्या वेळी तो स्वत:ला शोधत असतो आणि त्या शोधात मी सोबत असतेच.
आमचं लग्न झालं आणि तीन महिन्यांत ‘झुलवा’ आलं. मराठी रंगभूमीवर क्रांतीच घडली. छबिलदासला सतत २२ प्रयोग हाऊसफुल्ल झाले. जयवंत दळवींसारख्या माणसाला उभं राहून नाटक पहावं लागलं. पु. ल. देशपांडे यांनाही तिकिटासाठी प्रयत्न करावे लागले. त्यांना तर खूप आवडायचा वामन. त्यांनी वामनला एन्. सी. पी. ए. ला बोलावलं व त्याला त्यामुळे स्थर्य  मिळालं. ‘झुलवा’ बसवण्याच्या वेळची गोष्ट. नाटक पंधरा दिवसांवर आलं. दुसरा अंक तयार नव्हता. रात्री अकराच्या सुमारास सयाजी आणि वामन घरी आले. म्हणाले, ‘‘आज रात्री अंक लिहून काढणार, तू झोप.’’ जेवल्यावर दोघे लिहीत बसले. तीनला जागी झाले, ते लिहीत होते. नेहमीप्रमाणे मी सहा वाजता उठून त्या एका खोलीच्या घरात आवरायला लागले. त्यांचं लिहिणं सुरूच होतं. साडेसहाच्या सुमारास त्यांचे लिहून पूर्ण झालं. नाटक आजही रंगभूमीवर चालतंय, माझ्या ‘रंगपीठ’च्या वतीनं ते आम्ही करतो. मी एकटीच त्या नाटकात आजही भूमिका करतेय. ‘झुलवा’नं रेकॉर्ड केला. खरं तर वामनच्या प्रत्येक नाटकानं रेकॉर्ड केलं. पण त्यासाठी तो नाटक करत नाही. ते त्याचं पॅशन आहे. त्यातच तो रमतो. माझ्या ‘बालरंगपीठ’साठीही तो तितक्याच झोकून देऊन काम करतो.
 पण अशी माणसं आत्मकेंद्रितही असतात. लग्नाच्या आधीची गोष्ट. वामनला सांस्कृतिक कलासंचालनात काम होतं, मी सोबत गेले होते. मी कार्यालयात गेले नाही. त्याला काम झाल्यावर मला जहांगीर आर्ट गॅलरीत घ्यायला ये असं सांगून मी तिथे गेले. दोन तास झाले तरी महाशय आले नाहीत. तेव्हा मी पब्लिक बूथवरून सांस्कृतिक खात्यात फोन केला. त्यांनी मला सांगितलं की, ‘‘इथून ते कधीच गेले.’’ त्याला रवींद्र नाटय़ मंदिरात तालमीला जायचं होतं तिथे तो गेला असं मला चौकशीनंतर त्यांनी सांगितलं. मी चिडून दादरला आले. तिथून फोन केला आणि तो सहज सुरात म्हणाला, ‘‘हां बोल गौरी.’’ मी भडकलेच. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की तो मला विसरून गेला. मी रागावले, पण नंतर ध्यानात आलं, की तो असाच आहे आणि आता तो मला तसाच आवडतो.
आमच्या ऋत्विकच्या जन्मानंतर मी नाटकात काम करणं बंद केलं. वामननेही ऋत्विकसाठी वेळ काढला होता. तो त्याच्या शाळेत मीटिंगसाठी कधी गेला नाही, पण आम्ही दोघांनी त्याचं बालपण मस्त एन्जॉय केलं. कालांतरानं मी ‘बालरंगपीठ’ सुरू केलं. ऋत्विक त्याचा घटक होताच. वामन ‘बालरंगपीठ’मध्ये मुलांना शिकवायला येतो व त्यांच्यात रमतो. मुंबईतल्या घरात आम्ही तिघे राहतो, पण आला गेला भरपूर असतो, आम्हाला त्याशिवाय चन पडत नाही. दरडवाडीशी सतत संपर्क असतो. सगळे जण वामनदादाला घाबरतात, पण गौरीजवळ सगळे बोलतात. वामननं घरातलं सगळं केलं. बहिणींची लग्नं केली, पुतण्यांची शिक्षणं झाली. या सगळ्याबाबत निर्णय किंवा सल्ल्यासाठी सारे माझ्यापाशी येतात. पण महत्त्वाच्या निर्णयात वामन सर्वाना लागतोच. अर्थात वामनला घरातले पशाचे हिशेब माहीत नसतात. मी सांगतही नाही. तो त्याला हवे तेवढे पसे मागतो, मी ते देते, तो कुठे खर्च करतो, ते त्याला विचारत नाही. मी पसे कुठे गुंतवले याची त्याला खबरबातही नसते. त्यात त्याला रस नाही. तो त्याचा िपडच नाही. त्याची खरेदी म्हणजे गाडीभर गोष्टी. आणि मग वाटत बसतो. तो त्याचा आनंद आहे. माझे सासरे भारुड कलावंत होते. त्यांचं मोठेपण आम्हाला माहिती होतं. त्यांच्या निधनानंतर आम्ही दरडवाडीला मोठा राष्ट्रीय भारुड महोत्सव भरवतो. गेल्या वर्षी नऊशे कलाकार आले होते. नाटय़ संमेलनासारखा थाट असतो. मजा येते. घरचीच भरपूर माणसं असल्याने सारेजण ते कार्य सांभाळतात. मी गौरी केंद्रे हे व्यक्तिमत्त्व उपभोगते.
त्याचा एन्.सी.पी.ए. ते मुंबई विद्यापीठ ते आता एन्. एस्. डी.चे संचालकपद हा प्रवास, त्याची दिग्दर्शकीय कारकीर्द, त्याचे विविध सन्मान मला माझे सन्मान वाटले, माझं होणारं कौतुक त्याला त्याचं वाटलं. संसारात आम्ही आमच्या संवेदना बोथट होऊ दिल्या नाहीत. वामनचे मोठेपण मला मान्यच होते, पण त्या मोठेपणाच्या सावलीत मी कधी जगले नाही, त्याने मला माझा सूर्य मिळवू दिला. हेच जर सहजीवन असेल तर ते मी भरभरून जगतेय.    
(शब्दांकन: प्रा. नितीन आरेकर)