08 March 2021

News Flash

जीवन विज्ञान : अपचन, कुपचन आणि अतिपचन

आयुर्वेदातील छोटे छोटे उपाय करण्यासारखे असतात. पूर्वीच्या काळात पोटाची काही तक्रार असली की डॉक्टर सांगत एरंडेल तेल प्या.

(संग्रहित छायाचित्र)

डॉ. स्मिता लेले

dr.smita.lele@gmail.com

आयुर्वेदाचा ठाम विश्वास आहे की ९० टक्के रोगांची सुरुवात पचनामध्ये होणाऱ्या चुकांमुळे आहे. आयुर्वेदामध्ये अपचन, कुपचन आणि अतिपचन असे तीन विकारांचे वर्णन केले आहे. अपचन जास्त खाल्ल्यामुळे होते. कुपचन हा जैव रासायनिक बिघाड आहे. याची कारणे एन्झायमस् कमी होणे, नीट चावून न खाणे किंवा पोटामध्ये कफ असणे आदी. काही लोकांना अतिपचनाचा त्रास असतो. भरपूर खाऊनसुद्धा अनेक जण खूप बारीक राहतात. त्यांचा पाचकरस इतका तीव्र असतो की सगळ्या अन्नाचे प्रत्येक वेळेला ऊर्जेमध्ये रूपांतर होते. मात्र अशा व्यक्तींच्या शरीराची मेद साठवण्याची प्रवृत्ती नसते.

आजच्या माहितीच्या वाहतूक कोंडीच्या काळामध्ये आहाराच्या पौष्टिकतेबद्दल अति माहिती मिळत असते. इंटरनेटवरसुद्धा कितीतरी उलटसुलट माहिती उपलब्ध आहे. सामान्य माणूस सगळे काही वाचतो आणि त्याचे डोके चक्रावून जाते. शिवाय जाहिरातीच्या युगामध्ये एखाद्या खाद्यतेलाची किंवा ‘हेल्दी फूड’ची जाहिरात पहाताना त्यातील फक्त अर्धसत्य, अर्धविज्ञान दर्शकांच्या पुढे येते. प्रेक्षकांना वाटते की ही तर जादूची कांडी आहे. आईला वाटते की एका वर्षांत माझा मुलगा हे खाऊन आईनस्टाईन- सारखा बुद्धिमान होणार आहे किंवा विराट कोहलीसारखा चपळ खेळाडू होणार आहे. तरुण मुलींना वाटते की हे खाऊन मी सुंदर होणार आहे. असे नसते. प्रत्येक गोष्टीमध्ये न लिहिलेला किंवा अदृश्य भाग असतोच. जसा हिमनगाचा फक्त १/८ भाग वर दिसतो, परंतु पाण्याखाली असलेला बर्फाचा प्रचंड डोंगर त्यावर आपटल्यास मोठे जहाज बुडवू शकतो. ‘अति सर्वत्र वर्जते’ हे सदैव लक्षात ठेवून समतोल साधला पाहिजे. जीवन राहणी व आहार यामध्ये अचानक क्रांतिकारक बदल करू नये. प्रत्येक गोष्टीचे तीन भाग – त्रिपुटी असते. कोण खातोय? काय खातोय? आणि खाल्लेल्या अन्नाचे कसे पचन होत आहे? पहिल्या दोन भागांची थोडीफार माहिती बहुतेकांना आहे. परंतु खाल्लेल्या अन्नाचे पचन कसे होते हे बहुतेकांना माहीत नसते. पचनरूपी सयंत्रामध्ये प्रथम जठरामध्ये रासायनिक क्रिया होते. नंतर लहान आतडय़ामध्ये जैव रासायनिक क्रिया होते. सर्वात शेवटी मोठय़ा आतडय़ामध्ये किण्वण जैविक क्रिया घडतात.

आहारशास्त्राचे तंत्रज्ञान यातील एक भाग म्हणजे खाल्लेलं अन्न पोटात कुठे कुठे आणि किती वेळ असते याचा अभ्यास. पोटाच्या विकाराची तपासणी करताना बेरिअमचा एक्स-रे काढला जातो. पण याचा पचनसंस्थेच्या कार्याच्या अभ्यासाशी संबंध नाही. पचनमार्गात अडथळे नाहीत ना हे पाहण्यासाठी रुग्णाला बेरिअमचे सोल्युशन प्यायला देतात आणि एक्स-रे मशीनमध्ये बेरिअमची पांढरी पावडर दिसत असल्याने एक्स-रे मशीनच्या माध्यमातून संपूर्ण पचनसंस्था बघता येते. ही बेरिअम परीक्षा म्हणजे एखाद्या रेणूंना १५ ते २० मिनिटांत या टोकापासून त्या टोकापर्यंत पळत ठेवल्यासारखे आहे. परंतु आपल्याला पचनसंस्थेतील कार्यात्मक बदल पाहायचा आहे.

बद्धकोष्ठता म्हणजे काय? सुमारे १२ ते २४ तासांत खाल्लेले शौचावाटे बाहेर पडत असेल तर ठीक आहे, परंतु खाणे आणि शौच बाहेर टाकणे यामधला अवधी ३६ ते ४८ तास किंवा त्याहून अधिक काळ असेल तर आपण आपल्याला हळू हळू आजाराकडे घेऊन जातोय हे पक्के समजावे. थोडेसे लक्ष दिलेत तर आपले शरीर काय बाहेर टाकते हे कळण्यासाठी पॅथॉलॉजिकल लॅबमध्ये जाऊन परीक्षण करायची गरज नाही. आपले शरीर आपल्याला छोटे छोटे संकेत देत असते. आपण आपल्या डोळ्यांवर कातडी ओढून दुर्लक्ष करतो. मग निकडीचा प्रसंग येऊन ठेपला की डॉक्टारांकडे पळतो. म्हणून आपल्या शरीराकडे, त्याच्या कृतींकडे विज्ञानाच्या दृष्टीने पाहा. शंतनुराव किर्लोस्करांबद्दल एक गोष्ट वाचलेली आहे. कोणत्याही पार्टीमध्ये जर कोणी त्यांच्याशी गप्पा मारायला लागले तर ते सांगायचे, ‘‘तुम्ही जर कॉन्स्टिपेशन या विषयावर बोलणार असाल तर याचा अर्थ तुम्ही म्हातारे झाला आहात, तुम्ही काही माझ्याशी बोलू नका, कारण मी काही म्हातारा झालेलो नाही.’’  मध्यंतरी म्हणूनच असेल कदाचित ‘पिकू’ चित्रपटही गाजला. या चित्रपटामध्ये एक वृद्ध माणूस (अमिताभ बच्चन यांनी ती भूमिका केली आहे.) एखाद्या तिळाभोवती जसे साखरेचा हलवा बनतो तसे ‘माझे पोट साफ नाही’ या कल्पनेच्या भोवती सतत विचार करून जाळे विणतो. त्याचे संपूर्ण आयुष्य त्याभोवती आहे, इतकेच नाही तर तो घरादाराला या व्यथेभोवती नाचायला लावतो. त्याची अशी अपेक्षा आहे की त्याच्या मुलीनेसुद्धा सगळे सोडून याच विषयावर सतत विचार करावा आणि उपाय काढावा. विनोदाचा भाग सोडा, पण आपल्या रोजच्या जगण्यात श्रेयस आणि प्रेयस खाताना पोट किती साफ आहे, याच्याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे, विशेषत: ५० वर्षे वयानंतर हे जास्त महत्त्वाचे आहे.

आयुर्वेदातील छोटे छोटे उपाय करण्यासारखे असतात. पूर्वीच्या काळात पोटाची काही तक्रार असली की डॉक्टर सांगत एरंडेल तेल प्या. त्यामागचे विज्ञान असे की आधी पोटातली जुनी घाण काढून टाका. माझ्या आईच्या लहानपणी महिन्यातून एकदा कुटुंबातील सगळ्यांना सकाळी एरंडेल तेल प्यायला द्यायचा कार्यक्रम असायचा. आयुर्वेदाचा ठाम विश्वास आहे की ९० टक्के रोगांची सुरुवात पचनामध्ये होणाऱ्या चुकांमुळे आहे. आपले शरीर नको असलेली गोष्ट जेव्हा बाहेर टाकते तेव्हा त्याचे किण्वन होते, परंतु ते गटारामध्ये किंवा निसर्गामध्ये होते. पण ते आपल्या शरीरामध्येच होत राहिल्यास विषारी वायू व अनारोग्यकारक द्रव्ये बनतात. मोठय़ा आतडय़ांमध्ये असे झाल्यावर त्याचा त्रास नक्कीच होतो. प्रौढ व्यक्तींना आम्लपित्त याची तक्रार असते, पण बहुसंख्य वृद्ध लोकांना वातविकाराची तक्रार असते. पदार्थ विज्ञानाप्रमाणे एखाद्या घटकाचे तीन प्रकार  घन, द्रव आणि वायू. जसे बर्फ, पाणी आणि वाफ अशी पाण्याची तीन रूपे असतात. जसजसे तुम्ही घनपदार्थापासून द्रवपासून, वायूकडे जाता तसे ते सूक्ष्म होत जाते. म्हणून वायुविकार हा सर्वात सूक्ष्म आणि हाडांमध्ये भिनणारा असतो. जर पचनामध्ये बिघाड झाला तर पोटामध्ये (जठर) हायड्रोजन वायुसुद्धा तयार होऊ शकतो. पोट गच्च वाटते, कोरडी ढेकर येत राहते. पूर्वी वैद्य पोटावर हलकी टिचकी मारून हे पाहात असत. आदर्श पोट रिकामे असताना मऊ लागले पाहिजे. हा वायू अपचनामुळे किंवा अति खाण्यामुळे नसतो. त्याला वास, रंग, चव नसते. पण कुपचनामुळे हायड्रोजन वायू बनतो. आयुर्वेदामध्ये अपचन, कुपचन आणि अतिपचन असे तीन विकारांचे वर्णन केले आहे. अपचन जास्त खाल्ल्यामुळे होते. कुपचन हा जैव रासायनिक बिघाड आहे. याची कारणे एन्झायमस् कमी होणे, नीट न चावणे किंवा पोटामध्ये कफ असणे आदी आहेत. थोडय़ा लोकांना अतिपचनाचा त्रास असतो. भरपूर खाऊनसुद्धा अनेक जण खूप बारीक राहतात त्यांचा पाचकरस इतका तीव्र असतो की सगळ्या अन्नाचे प्रत्येक वेळेला ऊर्जेमध्ये रूपांतर होते. अशा व्यक्तींच्या शरीराची मेद साठवण किंवा स्नायू बनवण्यासाठी जी काही विशेष प्रक्रिया करायची प्रवृत्ती नसते.

जसजसे वय वाढत जाते तसतसे कुपचन होते. पचनशक्ती कमी होते व काही वेळा अन्नाची अ‍ॅलर्जी होते. खाल्ले तरी पचणारे काही अन्नपदार्थ पुढील आयुष्यात सोसत नाहीत. ‘‘पूर्वी मांसाहार खात होतो, रात्री उशिरा पत्ते खेळत जागरण करीत भजी खात होतो, पण आता हे सोसत नाही, सकाळी माझे डोके दुखते, मळमळते.’’ असं काहीजण सर्रास म्हणायला लागतात. याचा अर्थ आपले शरीर आपल्याशी बोलत असतं आणि ही शरीराची भाषा आपण ऐकली पाहिजे.

बद्धकोष्ठता झाल्यास जसे एरंडेल तेल प्या, असे सांगत तसा दुसरा सल्ला आसायचा की लंघन करा. याचा वैज्ञानिक अर्थ काय आहे, जैविक सयंत्रामध्ये प्रवेशद्वारातून येणारे नवीन अन्न आधी बंद करा म्हणजे त्या सयंत्राला असलेला कामाचा बोजा हलका करण्यासाठी वेळ मिळेल. सातत्याने चालणाऱ्या प्रक्रिया होणारे सयंत्र अधूनमधून पूर्णपणे थांबवून साफसफाई करून संपूर्ण प्रकल्प परत चालू करण्याची पद्धत सर्व रिफायनरी व रासायनिक कारखान्यात असते. आठवडय़ातून एकदा मिताहार घ्या किंवा फलाहार घ्या, असेही सांगितले जाई. एकादशी किंवा चतुर्थी हे दिवस निवडले, म्हणजे चंद्राच्या गतीशी नाते लावून १५ दिवसांतून एकदा उपवास करणे. ज्याला आपण फराळ म्हणतो तो शब्द खरा ‘फलाहार’ म्हणजे फळे खा असा आहे. थोडक्यात, उपवास अथवा लंघन करताना कमी, पचायला हलका आहार घ्या. उपवासाला जे चालतील अशा खाद्यपदार्थाच्या यादीत दोन नावे नव्हती, साबुदाणा आणि बटाटा! कारण हे दोन्ही पदार्थ आपल्या देशातले नाहीत. दुर्दैवाने सामान्य लोकांनी उपवासाची व्याख्या आणि फराळ यामध्ये साबुदाणा खिचडी आणि बटाटय़ाचा कीस याला मानाचे स्थान दिले. या दोन्ही गोष्टी पचायला जड आहेत. उपवासाच्या नावाखाली अशा गोष्टी खाणे म्हणजे चक्क पोटावर अत्याचार करणे. म्हणतात ना, एकादशी दुप्पट खाशी. आवडत असेल तर खुशाल खा, पण नंतर मात्र एक दिवस लंघन करून पोटाला आराम द्या. आपल्या जुन्या खाण्या-पिण्याच्या पद्धतीमध्ये उपवासाला महत्त्व असते ,मात्र अतिरेक नको.

पचनसंस्थेचे योग्य नियंत्रण करण्यासाठी, त्याची स्थिर स्थिती राखण्यासाठी प्रक्रियाकाल असतो. याबाबत जाणून घेऊयात पुढील लेखात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 29, 2020 1:15 am

Web Title: indigestion and diarrhea jivan vidnyan article abn 97
Next Stories
1 मनातलं कागदावर : जुईच्या फुलाचा गंध
2 पालकांची भूमिका महत्त्वाची
3 पुरुष हृदय ‘बाई’ : चौकोनातील वर्तुळ
Just Now!
X