‘‘महावीरांच्याच आग्रहाखातर मी माझे पहिलेवहिले ‘बिनपटाची चौकट’ हे आत्मचरित्र लिहिले. या पुस्तकाने माझी स्वतंत्र ओळख करून दिली. मला लेखक म्हणून घडविण्याचे सारे श्रेय मी महावीरांनाच देईन. त्यांचे साहित्यिक मित्र जेव्हा त्यांची चेष्टा करतात, ‘महावीर, तुझी सारी पुस्तके एका पारडय़ात आणि वहिनींचं एकच पुस्तक दुसऱ्या पारडय़ात टाकलं तर..’ तर ते चटकन उत्तर देतात, ‘तिचंच पारडं वजनदार राहील. लक्षात ठेवा, माझा कधीही ‘अभिमान’ होणार नाही.’ हा त्यांच्या मनाचा मोठेपणा.’’ सांगताहेत
लेखिका इंदुमती जोंधळे आपले साहित्यिक, संपादक पती महावीर जोंधळे यांच्याबरोबरच्या ३८ वर्षांच्या सहजीवनाविषयी..

तिचे झुंजू मुंजू गाव
गूढ वाऱ्याचे पाऊल
उतू पाहे ठायीठायी
माघ चांदण्याची भूल
कवी शंकर रमाणींच्या या काव्यपंक्तीतील अवस्थेतून मी अगदी लहानग्या वयातच माझं जन्मगाव सोडलं आणि पुढे किती किती पाऊलवाटा, वाटा, मार्ग- महामार्गाने माझ्या जीवनाचा, खाचखळग्यांचा प्रवास सुरू केला. कित्येक अंधाऱ्या रात्रींतून चाचपडताना पुण्यात्म प्रकाश-दिवे मदतीला आले. त्या प्रकाशाने- शिक्षणाने माझी प्रकाशवाट उजळून निघाली. एका दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर मी माझ्यातल्या ‘मी’ला आत्मभान दिले. आत्मसन्मानासह मला जगायचं होतं, एक ‘माणूस’ म्हणून मला समजून-उमजून घेणाऱ्या ‘माणसा’ची मी वाट पाहत होते आणि अचानक माझ्या ध्यानीमनी नसताना ‘महावीर’ मला भेटले, ते आयुष्याचे जोडीदार म्हणूनच.
बी.एड. होताच कोल्हापूरच्या ‘आंतरभारती’ (सध्याची वि. स. खांडेकर) शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले. स्वावलंबनाचा आनंद काय असतो हे नोकरी करणाऱ्या मुलींनाच माहीत. त्या आनंदाने मी जणू हवेतच तरंगत होते. पण माझे पालकत्व स्वीकारलेल्या माझ्या पालकांनी, म्हणजे पद्मविभूषण अण्णासाहेब सहस्रबुद्धे, दलितमित्र डॉ. ग. रा. गायकवाड, आचार्य कुलाचे मामा क्षीरसागर, राष्ट्रसेवा दलाचे अध्यक्ष श्यामराव पटवर्धन यांनी मला जमिनीवर आणले. औरंगाबादच्या अनंतराव भालेराव (दै. मराठवाडा’चे संपादक) यांचे मानसपुत्र महावीर यांच्याशी संपर्क साधला माझा भाऊ श्रीराम जाधवने. श्रीराम आणि महावीर ‘युक्रांद’चे कार्यकर्ते, मराठवाडा आंदोलनात व नामांतर चळवळीत बरोबर राहून काम केलेले मित्र. त्याच वेळी महाराष्ट्र राज्य नाटय़महोत्सवाचे परीक्षक म्हणून महावीर महिनाभर कोल्हापुरात आलेले. त्या वेळी मी शिवाजी विद्यापीठाच्या मुलींच्या वसतिगृहात राहून बहि:स्थ विद्यार्थिनी म्हणून एम.ए. इंग्लिशचा अभ्यास आणि नोकरीही करीत होते. भावाचे त्या संदर्भात मला पत्र आले. महावीर माझ्या पालकांना भेटले आणि नंतर मला. मी त्यांना विचारले. माझा इतिहास- भूगोल तुम्हाला माहीत आहे का? त्यांनी सांगितले, ‘‘श्रीरामकडून मला सर्व समजले आहे.’’ त्यावर मी, तरीही माझ्यासारख्या अनाथ, घर-दार, आई-वडील नसलेल्या मुलीशी लग्न करणार? का? तेही तुमच्या घरातून आंतरजातीय लग्नाला विरोध असताना? की मी दिसायला जरा बरीय, त्यात मिळवतीय.. ’’ वगैरे वगैरे मी खूप बोलून घेतले. अर्थात हे चार-पाच भेटीनंतर. लग्नाचं पक्कं झाल्यावरच. पण महत्त्वाची अट घातली, काहीही झाले तरी मी नोकरी सोडणार नाही. तुम्ही आणि मी एकाच विचाराच्या (समाजवादी- सवरेदयी- राष्ट्रसेवा दल) माणसांच्या सहवासात वाढलोत, त्यामुळे विचार जुळतील ही खात्रीय. त्यानंतर त्यांनी मला त्यांच्या कथांची (मासिकातील) कवितेची कात्रणं वाचायला दिली. त्या वेळी त्यांची दै. मराठवाडय़ात उपसंपादक म्हणून पक्की नोकरी होती. स्वाभिमानी, कष्टाळू वृत्ती, सरळ स्वभाव ओळखून मीही माझ्या पालकांच्या इच्छेनुसार होकार दिला.
३० डिसेंबर, १९७६ ला अत्यंत साध्या पद्धतीने आम्ही विवाहबद्ध झालो. तीन तपं उलटून गेलीत. आज मागे वळून पाहिल्यावर वाटतं, बापरे! कसा केला आम्ही एवढा प्रवास..? किती नेकीने आणि नेटाने केला हा संसार! यांच्या अडीच खोल्यांच्या भाडय़ाच्या घरात आलो तेव्हा किती हुरळून गेलो होतो. कारण त्यांचं संपूर्ण घर त्यांच्या माणसांनी भरून गेलं होतं. लहानपणापासूनच माणसांची, प्रेमाची भुकेली मी एवढी नाती एकत्र पाहूनच स्वत:ला भाग्यवान समजत होते. नंतर घरात उरलो आम्ही दोघं आणि सासूबाई. यांचा म्हणजे आता माझाही संसार सुरू झाला. आठ-दहा प्लास्टिकचे, पत्र्याचे डबे, एक भराऱ्या स्टो, पाणी साठविण्याची पितळेची हंडा-कळशी, पितळेचीच चार-पाच ताटं-वाटय़ा, तांबे, एक लोखंडी पलंग, गादी, अंथरुणं, पांघरुणं.. बस्स. जरुरीपुरत्या चीजवस्तू. स्वतंत्र बाथरूम- सार्वजनिक संडास. संसाराला अजून काय लागतं? खूश होते मी. वयाची २२-२३ वर्षे मी अनाथाश्रमात घालवली होती. पण आता मी माझ्या हक्काच्या घरात सुरक्षितता अनुभवत होती. महावीरांचे प्रेम मला जगण्याचं बळ आणि उमेद देत होते.
लग्नानंतर पंधरा दिवसांतच मी कोल्हापूरला निघून गेले होते. त्या पंधरा दिवसांत मी एकाही कामाला हात लावला नव्हता. म्हणजे सासूबाई व जाऊबाई आणि इतरांनी काहीच करू दिले नाही. पण आता मी औरंगाबादला श्री सरस्वती भुवन हायस्कूलला शिक्षक म्हणून काम करू लागले होते, त्यामुळे यांच्या (माझ्या) घरात कायमची राहायला आले होते. बाहेरची खोली झाड, अंगण झाडून सडा-सारवण कर, रांगोळी काढ, संडास-बाथरूम धू- त्या सांगत व मी आनंदाने करत होते. मी पाणी मागायच्या आत त्या ग्लास भरून खिडकीत ठेवायच्या. स्वयंपाक खोलीत येऊच द्यायच्या नाहीत. उठल्याबरोबर अगोदर अंघोळ, त्या सांगतील तसे. माझी ताट-वाटी वेगळी. जेवताना वरून वाढायच्या. मला पहिले चार-आठ दिवस लक्षातच नाही आलं त्यांचं वागणं. पण नंतर महिना उलटला, दोन महिने झाले. जणू मी त्यांच्या दृष्टीने अस्पृश्यच होते. कामावरून आल्याबरोबर अंग चोरून बाथरूममध्ये जायचे. सगळे कपडे भिजवायचे. पिळून वाळत घालायचे. मग त्या मला माझ्या ठेवलेल्या कपात चहा करून द्यायच्या. मला खूप त्रास होत होता. आतल्या आत घुसमट होत होती. पण.. मी पुन्हा माझी समजूत घालत होते. काय बिघडले तुझे..? आयतं मिळतं तर खा नं गुपचूप.. पण नाही. माझं मन पुन पुन्हा बंड करून उठायचं. का मी हे सारं सहन करते? अनाथाश्रमातून हक्काच्या घरात आलीस म्हणतेस ना.. पण दुसरं मन म्हणायचं, अगं, तू इथे उपरीच आहेस. वाटायचं, महावीरना हे सगळं सांगावं. पण धीर व्हायचा नाही. माय-लेकराचं भांडण? छे, नकोच ते. आणि एक दिवस रविवारी महावीर जेवायला घरी थांबले. त्यांनी स्वत: हा प्रकार पाहिला. आम्ही जेवलो. मी माझं ताट उचललं, घासलं, धुतलं. माझ्या जागेवर ठेवलं. यांनी बाहेर येऊन मला जवळ घेऊन विचारले, ‘हे असे कधीपासून चालू आहे?’ ‘तुमच्या घरात आल्यापासून..’ मी सांगितलं आणि माझ्या डोळ्यांतून घळाघळा अश्रुधारा सुरू झाल्या. ‘रडू नको’, हे एवढेच म्हणाले. पण दुसऱ्या दिवसापासून त्यांच्या आईला तेच म्हणाले, ‘आई, आजपासून आम्ही दोघं एकाच ताट-वाटीत जेवणार आहोत. आई अवाक्, पण त्या हुशार होत्या. त्यानंतर भाजी-पोळी, भाकरी ताटावरून न पडता नीट व्यवस्थित वाढली जाऊ लागली. ‘माझी आई दुष्ट नाही. तो तिच्या संस्कारांचा भाग आहे. पण मला खात्रीय, तू तिला निश्चितच प्रेमाने जिंकशील.’ यांनी सांगितलं खरं, पण त्यांचं हे प्रेम संपादन करायला मला पंधरा ते वीस वर्षे जाऊ द्यावी लागली. नंतर त्या खरोखरच माझ्या ‘आई’ झाल्या. अर्थातच ते महावीरांच्या खंबीर-प्रेमळ भक्कम आधारामुळे आणि माझ्या सहनशीलतेमुळे.
लग्नानंतर दोन वर्षांनी आम्हाला पहिली मुलगी झाली. तिचं नाव सायली ऊर्फ मैथिली. तिला पाहायला आणि आमच्या नव्या संसाराचा पाहुणचार घ्यायला प्राचार्य नरहर कुरुंदकर आले. आमच्या गरिबीच्या संसारातली भाजी-भाकरी त्यांनी आनंदाने खाल्ली. तेव्हा मला पगार चारशे व महावीरांना दोनशे. पण ते महाराष्ट्रातील नाना मासिके, साप्ताहिके, दिवाळी अंकातून लिहून भरपूर मानधन कमवत होते.
मूल साताठ महिन्यांचं झाल्यावर जर्मनच्या डब्यात पातेली ठेवून वरण-भात शिजवून खाऊ घालणं सुरू झालं. त्यात खूप वेळ, खूप रॉकेलही खर्ची पडायचं. मग आम्ही हळूहळू संसारोपयोगी पण अत्यावश्यक गोष्टी घ्यायला सुरुवात केली. काटकसर तर आमचा दोघांचा स्थायिभावच. प्रथम आम्ही ओळखीने गॅस सिलिंडर घेतले. मग कुकर. त्यानंतर टेबल-खुर्ची, टेबलफॅन, स्टीलचे डबे, ताट-वाटय़ा, पातेली. मग मिक्सर, फ्रीज. हप्त्याहप्त्याने खरेदी केले. या सगळ्या गोष्टी कशा हाताळायच्या हे महावीरांनी मला शिकवलं. भाजी-भाकरी रोजचा स्वयंपाक मला उत्तम यायचा. कारण बोर्डिगमध्ये ते करावंच लागायचं. पण दुसरं पोहे, उपमा, इडली, अन्य काहीही मला जमत नव्हते. पण महावीर उत्तम स्वयंपाकी असल्याने बारीकसारीक अनेक गोष्टी त्यांनी मला शिकवल्या. पाच वर्षांनी दुसऱ्या मुलीचा जन्म झाला. तिचं नाव मानसी. आता आम्हाला बरेचसे स्थैर्य आले होते. नोकरी, धावपळ होतीच, पण त्यातही मला हे नाटक दाखवायचे. संगीत मैफलीला पाठवायचे. औरंगाबादेत जे जे उत्तम सिनेमा-नाटक-संगीत, ते आम्ही पाहायचो, ऐकायचो. त्यांनी लग्नाआधी उत्तमोत्तम नाटकं पाहिलेली. मला त्या नाटकाला पाठवत आणि स्वत: मुलींना सांभाळत.
लहानपणापासून उत्तम वाचायची आवड- गोडी असल्याने यांच्याकडे आल्यावर त्यात वैविध्य आले. एवढेच नाही, तर मला लिहितं करण्यासाठी उत्तम साहित्य व महत्त्वाची स्त्री आत्मकथनं वाचायला आणून दिली. त्यांच्या आग्रहाखातर मी माझे पहिलेवहिले ‘बिनपटाची चौकट’ हे आत्मचरित्र लिहिले. या पुस्तकाने माझी स्वतंत्र ओळख करून दिली. त्याचा पाच विद्यापीठीय स्तरावर अभ्यासक्रमात समावेश झाल्याने महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसमोर मला बोलता आले. त्यांच्याशी संवाद साधता आला. लिहिणारा लिहून जातो, पण वाचणारा किती विविध अंगांनी विचार करतो याचा प्रत्यय त्यांच्या असंख्य प्रश्नांनी-शंकांनी मला आला. आज एवढय़ा वर्षांनंतरही वाचकांची हजारेक पत्रं माझ्या संग्रही आहेत. मी खरंच एवढी भाग्यवान आहे. दुर्गाबाई भागवतांसारख्या विदुषीने त्यांना आवडलेल्या पुस्तकांत ‘बिनपटाची चौकट’चा आवर्जून उल्लेख केला. त्यापेक्षा अजून दुसरा कोणता पुरस्कार मला हवा? मागील नोव्हेंबरात अनुबंध प्रकाशनने ‘बिनपटाची चौकट’ची नववी आवृत्ती काढली.
वयाच्या २२-२३ वर्षांपर्यंत अनाथाश्रमातील माझ्या माणसांनी, शाळेतील शिक्षकांनी, विद्यार्थ्यांनी आणि मित्र-मैत्रिणींनी मला घडवलं. पण लग्नानंतर एक समंजस पत्नी, आई म्हणून घडविण्यात पतीचा आणि माझ्या मुलींचा वाटा फार मोठा आहे. मला लेखक म्हणून घडविण्याचे सारे श्रेय मी महावीरांनाच देईन. त्यांचे साहित्यिक मित्र जेव्हा त्यांची चेष्टा करतात की, महावीर, तुझी सारी पुस्तके एका पारडय़ात आणि वहिनींचं एकच पुस्तक दुसऱ्या पारडय़ात टाकलं तर.. तर ते चटकन उत्तर देतात, ‘तिचंच पारडं वजनदार राहील. लक्षात ठेवा, माझा कधीही ‘अभिमान’ होणार नाही.’ हा त्यांच्या मनाचा मोठेपणा. बायकोने लिहावे, लिहिण्यासारखे तिच्याजवळ खूप आहे, म्हणून सतत मागे लागून लिहून घेणारा नवरा विरळाच. तुझं लिखाण तुझंच असलं पाहिजे. संपादक, लेखक, पत्रकार म्हणून माझ्या लिखाणात त्यांनी कधीच हस्तक्षेप केला नाही.
त्यांचं लिखाण म्हणजे एकटाकी, सुवाच्य, सुंदर अक्षरात. खाडाखोड नाही की पुनर्लेखन नाही. त्याविरुद्ध माझं. आधी कच्चं, मग फेअर. छापून आलेले लेख कुठेही, कसेही पडलेले असतात. वेळ आल्यावर जागेवर सापडणार नाहीत. मग चिडचिड, आरडाओरडा, भांडण, मग अबोला. दहा-पंधरा मिनिटांनी माझे साहित्य माझ्यासमोर आपटले जाते. इतका वेळ धुसफुसणारी मी त्यांच्याकडे पाहते, ‘सॉरी’ म्हणून आमचा अबोला संपतो.
माझा जन्मदाता लेकीचा संसार पाहण्यासाठी येऊ शकला नाही, पण सवरेदयी, राष्ट्रसेवा दलातील ‘बाप मंडळी’ इंदूचा घरसंसार पाहण्यासाठी- राहण्यासाठी येत. माझ्या गरिबीच्या संसारात त्यांचं आगतस्वागत तर केलंच; पण महावीरांच्या साहित्यवर्तुळातील मोठमोठी, ज्येष्ठ दिग्गज मंडळीही घरी आली. कथाकार शंकर पाटील आले की म्हणायचे, ‘इंदू कोल्हापुरी झुणका-भाकर कर.’ नारायण सुर्वे, ‘बाजार’ चित्रपटाचे दिग्दर्शक सागर सरहद्दी तर मुद्दाम यांच्या हातचं जेवायला यायचे. माणसांचा सतत राबता असणं आमच्या अंगवळणी पडले होते. औरंगाबादेत यांच्या चार-सहा मित्रांनी मिळून नाटय़- संगीत- साहित्यिक चळवळ निर्माण करणारी एक भव्य परिवर्तन संस्था स्थापन केली. दोनशे रुपये वार्षिक वर्गणीतून औरंगाबादवासीयांना सत्यदेव दुबे नाटय़महोत्सव पाहायला मिळाला. दिग्गज गायक-वादकांच्या संगीत मैफली, रचनात्मक कार्य करणाऱ्यांना, वाङ्मयीन पुरस्कार सोहळे, त्यानिमित्ताने एका ज्येष्ठ-बुजुर्ग कवी या लेखकांबरोबर नवकवींच्या काव्यांच्या भोजनावळी तृप्त करून गेल्या. एक वा दोन वर्षे नाही, जवळपास अठरा-वीस वर्षे सातत्याने स्नेहसंमेलने पाहता आली- ऐकता आली. आणि तेवढी वर्षे महाराष्ट्रातील कवी-लेखक आमच्या घरी आपलेपणाने राहिले. कवी मंगेश पाडगावकर, विंदा करंदीकर, कवी ग्रेस, गझलसम्राट सुरेश भट, विठ्ठल वाघ, रा. ग. जाधव, नाटय़ कलावंत दामूभाई केंकरे, कमलाकर सोनटक्के, अशोकजी परांजपे, विठ्ठल उमप आणि सुकन्या कुलकर्णीही ‘आपलं’ म्हणून राहून गेले. आम्ही आमच्या नव्या घराचा वास्तुप्रवेश केला तो गोविंदभाई श्रॉफ आणि कॉम्रेड चंद्रगुप्त चौधरींच्या हस्ते अंगणात वृक्षारोपण करून. या साऱ्या थोर- विद्वान, ज्ञानी मंडळींच्या पावलांनी आमचं घर सुशोभित झालं. या साऱ्यांना खाऊ-पिऊ घालण्यात आमचा आनंद द्विगुणित होत होता. आम्ही- खऱ्या अर्थाने त्यांच्या सहवासाने समृद्ध होत होतो.
पण त्याचबरोबर काही संकटांनीही आम्हाला घेरलं. संकटे माणसांना ‘शहाणी’ करतात. आर्थिक नुकसान भरून काढता येते, पण पोटच्या लेकराचे दु:ख, यातना आई-बापांना पाहावत नाहीत. दोन्ही लेकी शिकून-सवरून मोठय़ा झाल्या, पायावर उभ्या राहिल्या. बुद्धिमान, कर्तृत्ववान आमची धाडसी कन्या एका कर्तृत्वशून्य तरुणाच्या प्रेमात पडली. न्यूनगंडाने पछाडून माणुसकीलाही लाजवेल असे पुरुषी वर्चस्व तो गाजवत राहिला. आणि मग व्हायचे तेच झाले.. त्या काळात आम्ही क्षणाक्षणाला मरत होतो.. लेकींच्या बाबतीत प्रत्येक बाप अत्यंत संवेदनशील आणि हळवा असतो. यांनी हातपाय गाळले.. सैरभैर झाले.. पण मी तिच्या आणि यांच्या मागे ठामपणे उभे राहिले. दोघांपैकी कुणाला तरी ‘उभे’ राहावेच लागते ना! मी ते केले. आज माझी ती लेक सुख-समाधानाच्या सर्वोच्च शिखरावर आहे. अत्यंत बुद्धिमान, कुशाग्र बुद्धीचा, ‘माणुसकी’ असलेला जावई- आमचा मुलगाच आमचे सर्वस्व आहे. माणसांच्या चांगुलपणावर आमचा विश्वास आहे. हा चांगुलपणाच नष्ट झाला तर! काय उरले आयुष्यात.. बाकी शून्य..?
एका तपापेक्षाही जास्त काळापासून हे पुण्यात आणि मी आता निवृत्तीनंतर आहे. सरस्वती भुवनच्या शाळा-परिसरात अध्र्यापेक्षा अधिक आयुष्य गेले. पस्तीस वर्षांच्या काळात हजारो विद्यार्थ्यांची मी ‘बाई’ होते. काहींची आई झाले. या मुलांनी नि:स्पृह प्रेम दिले. त्यांची मी ऋणाईतच. आम्ही दोघेही आयुष्य भरभरून जगलो.
शिक्षणाचे रूपांतर ज्ञानात, ज्ञानाचे शहाणपणात, शहाणपणाचे रूपांतर विशाल दृष्टीत व्हायला हवे.. ही विशाल दृष्टी महावीरना प्राप्त झाली. जात, धर्म, पंथ आम्ही मानला नाही. आपल्या कामावरच नितांत श्रद्धा ठेवून स्वकर्तृत्वाने, कुणाचेही कशाचेही पाठबळ नसताना प्रामाणिकपणे अनेक संकटे पार करून, सुख-दु:खात एकमेकांचे हात घट्ट धरून येथपर्यंत आयुष्याचा प्रवास केला तो अगणित सदिच्छांमुळे, आशीर्वादांमुळे.
स्वत:साठी तर कोणीही जगतो.. पण दुसऱ्यांच्या जगण्यासाठी जो धडपड करतो तो खरा माणूस. हे ‘माणूसपण’ सदैव जागृत ठेवून अखंडपणे प्रेमाची सावली देणारा माझा जोडीदार- त्याच्याविषयी माझ्या मनात अखंड तृप्तीची, समाधानाची आणि अद्वैताचीच भावना तुडुंब भरलेली आहे.
आतले आतले, कुणा ना कळू घातले,
इवलेसे रोप, त्याने गगन गाठले.

once upon a tome the misadventures of a rare bookseller book review
बुकमार्क : पुस्तकवेडे आणि बाकीचे सगळे!
Babasaheb Ambedkar published Mooknayak lyrics by Vamandada Kardak in the voice of Hariharan
एका वर्तमानपत्राचे गाणे होताना…! ‘मूकनायक’ या वामनदादा कर्डकांचे गीत हरिहरन यांच्या आवाजात; आज प्रसारण
Uddhav Thackrey Kundli Shine In Loksabha Elections Till 2027
“उद्धव ठाकरेंच्या पत्रिकेतच पुरावा, लोकसभेत शिवसेनेला..”, ज्योतिषांची मोठी भविष्यवाणी
bjp keshav upadhyay article targeting sharad pawar uddhav thackeray and praskash ambedkar
संगीत खंजीर कल्लोळ…