भारत सरकारने खास, वृद्धांकरिता http://www.oldagesolutions.org  WZ संकेतस्थळ सुरू केले आहे. मराठी, िहदी, इंग्रजी, बंगाली, तमिळ, तेलगू अशा प्रमुख भाषांमध्ये हे संकेतस्थळ उपलब्ध आहे. याचे वैशिष्टय़ म्हणजे यात खास वृद्धांसाठी कायदेशीर सल्ला, वैद्यकीय सल्ला मिळण्याची सोय आहे. याशिवाय ज्या वृद्धांना त्यांचे कोणत्याही विषयाच्या संदर्भातील मत मांडायचे असेल त्यांच्याकरिता खास स्वतंत्र व्यासपीठ येथे आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले असून त्यात वृद्धांच्या गरजांचा व्यापक दृष्टीने विचार करण्यात आल्याचे दिसते.
संकेतस्थळावरील ‘करमणूक’ विभागात वृद्धांना वेळ मजेत जावा, यासाठी अनेक कोडी, सुडोकू अशा खेळांच्या लिंकस दिल्या आहेत. ऑनलाइन खेळ खेळता येऊ शकतात, शिवाय व्यायाम, योग, किचन गार्डनिंग यावरही टिप्सवजा मार्गदर्शन आहे. आरोग्य विभागात वृद्धांनी त्यांचे शारीरिक, मानसिक स्वास्थ्य कसे जपावे, त्यांचा आहार कसा असला पाहिजे याची इत्थंभूत माहिती दिलेली आहे. सहयोगी उपकरणे या विभागात वृद्धांच्या दैनंदिन गरजांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या उपकरणांवर विस्तृत माहिती आहे. वृद्धांसाठीच्या विविध योजना जसे की निवृत्ती योजना, वृद्धाश्रम यांचीही माहिती संकेतस्थळावर आहे.