नवीन वर्ष म्हणजे नवीन उमेद- नवीन प्रकल्प!  वय झालंय, आता कुठे नव्याने सुरुवात? आजी-आजोबा नक्कीच असा विचार करतील. पण वाचकांनो, २०१५ आणि पुढील प्रत्येक वर्षांसाठी प्रत्येकाची नियोजनं वेगळी असू शकतात. पण ‘चतुरंग’च्या या समान धाग्यामुळे एक निश्चय तर कायमसाठीच आहे- तो म्हणजे जेवढं आयुष्य आपल्यासाठी विधात्याने ठरवलेलं आहे त्याचा प्रत्येक क्षण आनंदी आणि उत्साही पाहिजे आणि त्यासाठी आरोग्य छानच पाहिजे. आणि ‘छान’ आरोग्य म्हणजे योग्य आहार-विहार-निद्रा! चला तर मग आपण सगळे मिळून काही ‘आरोग्य-संकल्प’ करू या.
१. जे जे पदार्थ नैसर्गिक रूपात आहेत त्यांचे सेवन मी करणार म्हणजेच प्रक्रिया केलेले पदार्थ वज्र्य.
२. माझ्या आरोग्याचे ‘गोरे’ शत्रू- साखर, मीठ, मैदा, पॉलिश केलेला तांदूळ, दूध.
३. मध/ नैसर्गिक गूळ, सैंधव, गहू-ज्वारी-बाजरी-नाचणीसारखी कोंडा असलेली धान्ये, प्रथिनं आणि कॅल्शियमयुक्त सोयाबीन, तीळ, राजगिरा, शेंगदाणे, बदाम-सुकामेवा- माझे मित्र.
४. रोजची ठरलेली जेवणाची वेळ पाळेनच. मन आणि परिसर शांत, सुवासिक असण्याला प्राधान्य (अगरबत्ती चालेल पण टी.व्ही. नाही).
५. भूक नसताना खाणे- विकृती, भुकेपेक्षा थोडे कमी खावे ही प्रकृती आणि भुकेलेल्या जिवाला अन्नदान करणे ही संस्कृती.
६. उकळलेले पाणी दिवसभरात विभागून पिणे.
७. दिवसाचे प्रत्येक जेवण परिपूर्णच हवे म्हणजे कबरेदके, प्रथिने, चरबी, विटामिन्स, खनिजयुक्त जेवण. चपाती आहे, पण डाळ नाही आणि लाल भात आहे, पण भाजी नाही असं    होऊ  नये.
८. अन्न हे पूर्ण ब्रह्म- अन्नामध्ये प्राण असतो. देवाला अर्पण करून, अन्नदेवतेला स्मरून, अन्नदात्याचे आभार मानून पोटातील जठराग्नीचं शमन करण्यासाठी (जिभेचे चोचले पुरवण्यासाठी नाही) अन्न सेवन करावे.   
   माझी एक इच्छा आहे की साधे, सरळ, सोपे आणि चांगले बदल आपल्या राहणीमानामध्ये आपण करू शकलो तर तब्येत छान राहीलच, पण शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्य आणि आध्यात्मिक प्रगतीही साधता येईल. आपल्या आरोग्याविषयी आपणच जागरूक असायला     हवं ना!
काही आजार नसेल तर चांगलंच आहे पण असेल जरी तरी योग्य आहाराने आणि जीवनशैलीमुळे आणि अर्थातच सकारात्मक दृष्टीमुळे आपण तरून जाऊ  शकतो.  माझ्या पप्पांचं नेहमीचं तणाव घालवणारं वाक्य- ‘‘होऊन होऊन काय होणार? बिनधास्त राहा. आजचा दिवस माझा म्हणून, जे शक्य असेल ते चांगलं कार्य हातून घडलं पाहिजे.’’ खूप समाधान आणि मन:शांती मिळते.   
वाचकहो, माझ्या आईपपांनी आयुष्याबाबत दिलेला सकारात्मक दृष्टिकोन आणि अमोघने दिलेलं प्रेमळ प्रोत्साहन म्हणून इथपर्यंत आपला प्रवास एकत्र झाला. भरभरून दिलेल्या तुमच्या उत्साही प्रेरणेमुळे हे शक्य झालं. आयुष्याच्या एखाद्या वळणावर परत भेटूच! तोपर्यंत अलविदा!
उंधियो
साहित्य : ४ लहान वांगी (जांभळी), ४ लहान बटाटे, १/२ कप मिक्स दाणे- तूर, मटार, वाल, ३ टे-स्पून तेल, चिमूटभर हिंग, १/४ टी-स्पून बडिशोप, मेथीची पाने, बेसन/ भाजणी, मसाला
मुटकुळे करण्यासाठी- पुढील सारण वाटून घेणे-१ कप बारीक चिरलेली कोथिंबीर, ३/४ कप ताजा खोवलेला नारळ, २ टी-स्पून धणेपूड, ३ टी-स्पून जिरेपूड, दीड टी-स्पून लाल तिखट, ३ टी-स्पून साखर, १ टी-स्पून गरम मसाला, चवीपुरते मीठ
कृती : वांग्याची देठं कापून घ्यावी आणि बटाटे सोलावेत. दोन्हीला उभ्या चिरा द्याव्यात. भाज्यांमध्ये सारण भरा. कढईत तेल तापवावे. त्यात हिंग-बडिशोप घालावी.
आता भरलेले बटाटे व वांगी घालावी. झाकण ठेवून अगदी लहान आचेवर भाज्या शिजू द्या. दाणे घाला. १० ते १२ मिनिटांनी उरलेले सारण आणि अर्धा कप पाणी घालावे. कढईवर झाकण ठेवून वाफ काढावी. मुटकुळे घाला आणि बाजरीच्या भाकरीबरोबर खा. (सदर समाप्त)