timuktिलगव्वाचं रोजचं काम भिक्षा मागण्याचं. त्यात कितीसे मिळणार? पण मुलाला  एम टेक करायची तिची इच्छा आहे. रोज  देवाधर्माची गाणी, भजन म्हणत, सुराची पेटी व दिमडी वाजवीत ती आणि इतरजणी गातात. कोणी पैसे देतं, कोणी भाकरीतुकडा देतं आणि आयुष्य  चालूच राहातं..
 ‘बहुरूपी’ जमातीतील एक जगणं.

‘‘दि स-रात भीक मागीन, कितीबी तरास होवू दे, पन माज्या मल्लेशला एमटेक केल्य बिगर राहनार न्हाई, त्येची लई विच्छा हाय पुढं शिकायची.’’ पालात जन्मलेली, पालात वाढलेली एक भिक्षेकरी विधवा, लिंगव्वा येल्लप्पा संकूल मोठय़ा निर्धाराने बोलत होती. आम्ही बसलो होतो सोलापूर येथील ‘आरटीओ’ कार्यालयाच्या मागे सरकारी जागेवर असलेल्या सुमारे तीनशे पालांच्या वस्तीत. बहुतेक महिला सकाळी लवकर भिक्षा मागण्यास गेलेल्या. नऊ -दहा महिलांसोबत एका पालासमोर आम्ही बोलत होतो. त्या बोलत होत्या त्यांच्या कुटुंबाबाबत आणि जमातीबाबत.
    लिंगव्वा असेल पन्नास-पंचावन्न वर्षांची. तिचे लग्न लवकरच झाले, तेरा-चौदा वर्षांची असताना. चार लेकरांची आई. दोन मुली, दोन मुलगे. सर्वात लहान मल्लेश पोटात असताना त्याचे वडील वारले. दारूच्या व्यसनामुळे लिव्हर खराब होऊन. तो एक चांगला कलाकार होता. वादन, गायन आणि पौराणिक पात्रांचे सोंग करण्यात पटाईत होता. पण लहानपणापासून व्यसनी होता. दिवसभर सुराची पेटी घेऊन गाणे म्हणत भिक्षा मागायचा. रात्री घरी (पालावर) येताना दारूच्या नशेत रस्त्यात पडायचा. लिंगव्वा त्याला शोधून निदान सुराची पेटी घेऊन यायची. जमातीतल्या बहुतांशी पुरुषांची हीच गत. बोलणाऱ्या नऊ  महिलांपैकी सहा विधवा होत्या. त्यांच्या मते, तेथील सुमारे तीनशे पालांतील कुटुंबात ५० टक्क्यांपेक्षा जास्त महिला विधवा आहेत. याच कारणाने. त्याच आपल्या लेकरांना सांभाळतात. भीक मागून. हे सारे पाहून लिंगव्वाला वाटले, आपली पोरं मोठेपणी अशी व्यसनाधीन होऊन मरू नयेत. तिने मोठय़ा लोकांच्या हातापाया पडून आपल्या मुलांना शहरातल्या बालकामगार शाळेत घातलं. नंतर गांधी आश्रमशाळा, बार्शीचे सुलाखे हायस्कूल व शेवटी पोस्ट बेसिक शाळा, सोलापूर असा प्रवास करून दोन्ही मुलं दहावी पास झाली. मोठा पोलीसमध्ये लागला. धाकटा पुढं शिकतोय. आपल्या पोरांचं कौतुक करताना लिंगव्वा म्हणते, ‘‘माझ्या लेकरांचा काई तरास न्हाई बघ. चार घरचं मिळेल ते शिळंपाकं, इटकमुटक, नाक न मुरडता मुकाटय़ानं खाऊन मोटे झाले, शिकले. धाकटा मल्लेश तर लई हुशार. रुपय-दोन रुपयचं घासलेट आणून रातभर जागून आभ्यास करायचा, दिवसा पालात गरम होतंय म्हनून झाडाखाली वाचायचा. बसून झोप येते म्हनून झाडाखाली उभ्या उभ्या, फिरत फिरत वाचायचा. मॅट्रिकमदी ९१ मार्क घिऊन वर ऐंशी पॉइंट (९१.७९ टक्के) घेतलाय बघ. मोटय़ा मोटय़ाची पोरं मागं पडली. त्या वर्सात सगळं मिळून सतरा हजार रुपयं बक्षीस मिळालं. मल्लेशला शिकायला तिवारी मॅडम आनि मोहन चव्हानसर यांनी लई प्रेम दिलं, मदतबी केली. लोक म्हटले, मल्लेश कालेजातबी असंच चांगलं पास झाला तर एक वर्साची फी माफ करू. संगमेश्वर कालेजमधून बारावीत मल्लेशने ८५ टक्के मिळवले. आमच्या जातीला सरकार पैसे देतंय म्हनं पोरांना शिकायला. पन जातीचा दाखलाच मिळाला नव्हता. रेनके अण्णानं दिल्लीहून पत्र लिव्हल तव्वा ‘बहुरूपी’ म्हनून इथं दाखला मिळाला. अता अर्किड इंजिनीअरिंग कालेजात शिकतोय. चौथ्या वर्सात. बी.टेक. करतोय. पुढं एम टेक करायचं म्हनतोय. वर्साला दोन लाख लागत्यात म्हनं. जीव गहान ठिवायचं पन शिकवायचं हाय.’’
िलगव्वाचं रोजचं काम भिक्षा मागण्याचं. कितीसे मिळणार त्यात? पण तिची इच्छाशक्ती आणि निर्धारही खूप मोठा आहे. ही माणसं भिक्षा मागतात म्हणजे भजनं म्हणतात. आणि जे मिळेल ते जमा करतात. त्या सांगत होत्या, ‘‘पंढरीच्या पांडुरंगाची, तसेच इतर देवा-धर्माची गाणी म्हणतो. भजन म्हणतो. सुराची पेटी व दिमडी वाजवीत गातो. कोणी पैसे देतं, कोणी भाकरी-तुकडा देतं, तर कोण पीठकुट किंवा धान्य देतं. जे देईल ते घेतो.’’
‘‘भिक्षा मागत फिरताना बरेवाईट अनुभवही येणारच. काही माणसे धार्मिक, वारकरी असतात. भजन, देवाचे महत्त्व सांगणारे गाणी गायला सांगतात. जेवू घालतात, चांगली बिदागी देऊन पाठवितात. काही वाईट माणसे पण भेटतात. आम्ही असंच एकदा कोकणपट्टीत चिपळूनमध्ये फेरीला गेलो होतो. आमची रामव्वा मावशी तशी वयस्कर. पण एक जण म्हणाला दोनशे रुपये देतो, चल घरात, म्हणून त्याने तिचा हात धरला. आरडाओरडा केला तेव्हा हात सोडून पळून गेला. तेव्हापासून रामव्वा मावशी फेरीला येतच नाही. आम्ही पण एकटीने कुठेच जात नाही. तिघी-चौघी मिळूनच जातो. एकटी सूरपेटी वाजवते, दुसरी दिमडी वाजविते आणि तिसरी-चौथी गायला मदत करतात. जे काही मिळते ते बराबर वाटून घेतो. कधी कोणी आजारी पडलं, किंवा काही कारणानं येऊ  शकले नाही तरी तिचा वाटा तिला दिला जातो.’’
सोलापुरात आमी फार पूर्वीपासून आहोत. अगदी वाडवडिलांपासून. ते बागलकोटवरून येथे आले. आमचा जन्म इथेच झाला. आमच्या लहानपणी आम्ही नेहरूनगर येथील गुरुदेव शिवमंडळ मैदानात अशीच पालं टाकून होतो. तिथून उठवल्यानंतर आम्ही इथे आलो. इथे येऊन पंधरा वर्षांपेक्षा जास्त काळ झाला. आमच्यापैकी काहीजणांना (२५- ३० जणांना) घरकुलं मिळाली आहेत. इथल्या सुमारे तीनशे पालधारकांपैकी केवळ ३४ जणांना रेशनकरड आहेत. त्यापैकी २८ जणांना दारिद्रय़रेषेखालचे कार्ड आहे, बाकी साऱ्या पालधारकांना काहीच नाही. त्यांची सरकारदरबारी ओळखच नाही. आमची पुरुष मंडळी बुडगा नावाचे वाद्य वाजवीत भिक्षा मागतात म्हणून कर्नाटकात आम्हाला ‘बुडगा जंगम’ म्हणून ओळखतात. ’’
भटकेपणाची परंपरा असलेली बुडगा जंगम ही जमात मुळात आंध्र प्रदेशातली. पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या माला, मादिगा इ. अस्पृश्य जातींच्या लोकांचे सणवार किंवा मृत्यूप्रसंगी पौरोहित्य करणारी शूद्रांसाठीची पुजारी जमात. बुडगा म्हणजे कातडी व लाकडापासून तयार केलेले एक खास संगीतवाद्य. त्याच्या साहाय्याने देवांचे स्तवन, कथाकथन व गाणे गात दारोदार भिक्षा मागणे ही त्यांची परंपरा. मुलां-मुलीसह महिला भिक्षा मागण्यात गुंतलेल्या असतात. त्यांच्याकडून वापरल्या जाणाऱ्या बुडग्या या वैशिष्टय़पूर्ण वाद्यावरूनच त्यांना ‘बुडगा जंगम’ असे म्हटले जाते. अन्नाची गरज भागविण्यासाठी ते पूर्वी शिकार करायचे. म्हणूनच त्यांना बेडा (शिकारी) जंगम असेही म्हटले जाते. पण शिकारबंदीचे नवनवीन कायदे झाले, शिवाय वरचेवर जंगले व जंगलाचे क्षेत्र कमी होत गेले. कोणाच्याही मृत्यूप्रसंगी शंख फुंकीत व ‘नंदीघंटा’ वाजवीत प्रेतयात्रेत सामील होणे आणि मृताच्या वारसदाराकडून किमान ‘दोन आणे’ म्हणजे आताच्या बारा पैशांची भिक्षा हक्काने मागून घेणे, शिवाय अंत्यविधीस जमलेल्या मृताच्या नातेवाइकांकडून मिळेल ती भिक्षा घेणे या परंपरेमुळे मागतकरी असाच सामाजिक दर्जा त्यांना मिळाला आहे. अस्पृश्यांचे पुजारी असले तरी ते पूर्वाश्रमीचे अस्पृश्यच.
महाराष्ट्रात या जमातीला मसनजोगी, सुडगाडसिद्ध असे म्हणतात. ही तिन्ही नावे महाराष्ट्राच्या भटक्या जमातींच्या यादीत आहेत. यांच्यापैकी काही जण पुराणातल्या पात्रांचे वेष धारण करून कथाकथन किंवा पौराणिक खेळ करतात. त्यांना ‘वेषागार’, ‘कलाकार’ किंवा ‘बहुरूपी’ असे म्हटले जाऊ  लागले. त्याच त्यांच्या जाती बनल्या. इतर भटक्या जमातीप्रमाणे यांचीही एक स्वतंत्र सांकेतिक भाषा आहे. ‘चला चला चला, बिगी बिगी चला, लग्नाला चला अता, लग्नाला चला’ अशी लगीनघाई करणारा मूळ महाराष्ट्रातला बहुरूपी वेगळा. तो पूर्वाश्रमीचा अस्पृश्य नव्हे. तो पोलीस, विक्रीकर, आयकर इ. अधिकाऱ्यांची सोंगे घेऊनही विनोद निर्माण करतो. हा मराठी भाषिक आहे. नामसदृश्यता असली तरी ‘बहुरूपी’ या एकाच नावाच्या महाराष्ट्रातल्या दोन भिन्न जाती आहेत. यांच्या देव-देवता व भाषासुद्धा भिन्न आहेत. यांच्यात बेटी व्यवहार होत नाही.
पूर्वाश्रमीचे अस्पृश्य असून आणि सर्व दृष्टीने मागास असूनसुद्धा हे लोक महाराष्ट्रात केंद्राच्या सोयी-सवलतीस पात्र नाहीत. साधनविहीन व पोरके असलेल्या या लोकांनी ओळख कशी पटवायची? त्यासाठी आवश्यक कागदपत्राचे पुरावे कोठून व कसे आणायचे? याचे उत्तर शोधले पाहिजे.    
अ‍ॅड. पल्लवी रेणके –pallavi.renke@gmail.com
    
१० जानेवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या ‘भोगले जे दुख त्याला’ या सदरात उल्लेख असणाऱ्या ट्रक ड्रायव्हर योगिता राजवंशी आहेत.