vata05शासनानेही त्यांचा ‘पद्मश्री’ देऊन उचित सत्कार केला.  लाखांच्या वर यशस्वी नेत्रशल्यचिकित्सा करणाऱ्या डॉ. तात्याराव लहाने यांच्या आयुष्यातल्या खूप काही शिकवून जाणाऱ्या वळणवाटा.
शाळेत शिक्षण घेत असताना यश-अपयश म्हणजे नेमकं काय ते तेव्हा कळलंच नव्हतं, तसा अनुभवच आला नव्हता; पण जेव्हा दहावीत गेलो तेव्हा मात्र ते चांगल्याच अर्थाने कळलं. ‘स्कूल डे’ म्हणजे मुलांनीच एक दिवस मास्तर व्हायचा दिवस. त्यात नववीत पहिला येणाऱ्या विद्यार्थ्यांला हेडमास्तर केले जायचे. मी पहिला आलो होतो म्हणजे मीच हेडमास्तर हे नक्की होतं; पण माझ्याकडे घालण्यास चांगले कपडे नाहीत म्हणून प्रथा मोडून पाटलाच्या मुलाला हेडमास्तर करण्यात आले. ही आयुष्यातली पहिली ठेच! खूप वाईट वाटले आणि अपमान कसा असतो हेही कळले. आईवडिलांना याबद्दल काहीच सांगितले नाही, कारण त्यांनी पुन्हा कर्ज काढून कपडे घेतले असते; पण या एका घटनेने माझी जिद्द वाढली व झपाटून अभ्यास केला आणि मी केंद्रात पहिला आलो.
 वैद्यनाथ कॉलेजला प्रवेश घेतला. त्या कॉलेजचे ७ विद्यार्थी मेडिकलला गेले होते. त्यांनी विशेष कोचिंग करण्यासाठी २० मुलांची बॅच निवडण्याचा निर्णय घेतला. मेरिटच्या २० मुलांना मुलाखतीसाठी बोलविले. त्यांची नावे बोर्डावर लावली. माझे नाव पहिल्या क्रमांकावर होते. मुलाखतीत मला एक प्राणिशास्त्रावरचे पुस्तक वाचण्यासाठी दिले. त्यात ‘स्टमक’ (stomach) हा शब्द मी माझ्या गुरुजींनी शिकवल्याप्रमाणे ‘स्टमच’ वाचला. मला उच्चार येत नाहीत म्हणून मेरिटमध्ये असूनही त्या बॅचमध्ये मला प्रवेश मिळाला नाही. इतकंच नाही, तर मला पुस्तके व हॉस्टेलला राहण्यासही नकार देण्यात आला. अपमानाचा, अपयशाचा पुन्हा एकदा कडुशार घोट पिण्याशिवाय गत्यंतर नव्हतं; पण मी जिद्द सोडली नाहीच. ‘कमवा व शिका’ या योजनेअंतर्गत झाडाला पाणी घालून मिळालेल्या पैशातून अभ्यास केला. ती दोन वर्षे अगदी शिक्षकांसहित मुलांनीही मला ‘स्टमच’ म्हणून चिडविले. अपमानाने खरं तर निराश व्हायला व्हायचं; पण मी खचलो तर नाहीच, उलट उच्चारांनी ज्ञानात किंवा हुशारीत फरक पडत नाही हे सिद्ध करण्यासाठी खूप अभ्यास केला. निकाल लागला आणि कळलं की, मी एकटाच मेडिकलला गेलो होतो. त्या २० जणांच्या बॅचमधूनही डॉ. किशोर पैलवान हे एकटेच पुढे आले. मला वाटले मीही त्या बॅचमध्ये असतो तर माझाही प्रवेश झाला नसता कदाचित; पण बॅचमध्ये न घेतल्याने अपमान, अन्याय झाल्याची भावना बळावली व मी जिद्दीने, नेटाने अभ्यास केला आणि डॉक्टर झालो.
मी एम.एस. झालो तसेच एम.पी.एस.सी.ची परीक्षाही पास झालो व अंबेजोगाई येथे अधिव्याख्याता या पदावर रुजू झालो. त्याच वेळी तेथे काम करणारे माझे सहयोगी प्राध्यापक जे माझे गुरू होते त्यांनी राजीनामा देऊन लातूर येथे खासगी व्यवसाय सुरू केला. त्यांचे व माझे पद वेगळे होते तरी एका प्रख्यात दैनिकात अर्धा पान बातमी छापून आली की, डॉ. लहाने यांना रुजू करून घेण्यासाठी अतिशय चांगले नेत्रतज्ज्ञ असूनही त्या प्राध्यापकांना काढून टाकले. ज्या वार्ताहराने हे लिहिले ते माझ्या कॉलनीतच राहात होते. पेशाने प्राध्यापक होते. मी त्यांना जाऊन सांगितले की, ही बातमी साफ चुकीची आहे. ते म्हणाले, ‘‘मला हे माहीत आहे; पण त्यांना सहानुभूती मिळून त्यांची खासगी प्रॅक्टिस चालावी म्हणून मी हे लिहिले आहे.’’  मी सर्द.. नि:शब्द!  त्यानंतर माझ्याकडे येणारा प्रत्येक रुग्ण माझ्याकडे संशयाने बघायला लागला. एक वकील आले. म्हणाले, ‘‘मला हात न लावता तपासा, तसाही मी लातूरलाच त्या सोडलेल्या डॉक्टरकडेच जाणार आहे.’’ मी त्यांना गोळ्या देऊन डोळ्याची शस्त्रक्रिया ताबडतोब करण्याचा सल्ला दिला. ते लातूरला गेले व पुन्हा परत आले. म्हणाले, ‘‘त्यांच्याकडे संबंधित मशीनरी नाही. हे तुम्हीच करा.’’ मी सांगितले, ‘‘हात न लावता शस्त्रक्रिया करता येत नाही.’’  मग म्हणाले, ‘‘तुम्ही यंत्र द्या.’’ मी म्हणालो, ‘‘यादी घेऊन या, सर्व यंत्रे देतो.’’ लातूरला जाऊन ते पुन्हा माझ्याकडे आले. म्हणाले, ‘‘आता लावा हात नि शस्त्रक्रियाही तुम्हीच करा.’’ मी शस्त्रक्रिया केली व जन्मभर त्यांची दृष्टी कायम राहिली.
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर अशा घटना माझी परीक्षा बघणाऱ्याच ठरल्या. मी त्या परीक्षा उत्तीर्ण होत गेलो आणि यशस्वी ठरत गेलो. लग्नाच्या वेळची घटना तर उद्वेगजनकच होती. मी परळीला शिक्षण घेत असताना एका कंडक्टरच्या घरी भाडय़ाने राहत होतो. त्यांची मुलगी दहावीत शिकत होती. मी त्यांना म्हणालो, मला तुमच्या मुलीशी लग्न करायचं आहे. तुम्ही मला इतर काही देऊ नका; पण माझे शिक्षण करा. ते तयार झाले. माझ्या गावी येण्याचा मुहूर्तदेखील ठरला. मी परळीवरून पोहे घेऊन गावी गेलो. बसने जाण्याइतके पसे नव्हते, सायकलवरूनच गेलो. कंडक्टरांचे वडील हणुमंतराव पाटील घोडय़ावर बसून माकेगावला आले होते. गावातील त्यांच्या ओळखीच्या लोकांकडे त्यांनी चहा घेतला असे कळले. इकडे आम्ही दिवसभर त्यांची वाट पाहत होतो; पण ते घरी आलेच नाहीत. नंतर कळले की, गावातील आमच्या भावकीतील लोकांनीच त्यांना सांगितले की, लहानेंकडे राहायला घर नाही किंवा शेतीही नाही. कशाला देता तुमची शिकलेली मुलगी मजुरी करायला यांच्या घरी? त्यांनाही ते खरं वाटलं. आमच्या घरीही न येताच ते परत माघारी निघून गेले.
असे मानापमान सहन करत होतोच; पण मी अंबेजोगाईत आता चांगला रमलो होतो. माझे नाव विचारत रुग्ण येण्यास सुरुवात झाली होती; पण आणखी एक जीवघेणं वळण अचानक समोर येऊन उभं ठाकलं. मे १९९२ मध्ये माझा रक्तदाब २४०-१८० असल्याचे निदान झाले. माझ्या दोन्ही किडनी निकामी झाल्या होत्या. मला मुंबईला हलविण्यात आले. तपासण्या झाल्या व मला डायलिसीसवर ठेवण्याचा सल्ला दिला गेला. मी १९९४ सालच्या जुलमध्ये औषधोपचारासाठी मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात बदली करून घेतली. बॉम्बे हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी मला आणखी एक-दोन वष्रेच आयुष्य असल्याचे जाहीर केले. वर विमा काढण्याचा सल्ला दिला. मी खूपच खचून गेलो. माझ्या मुलाबाळांचं काय? माझी बायको सुलू, आई-वडील, बहीण-भाऊ, सासू हे सर्वच माझ्यावर अवलंबून होते. त्यांच्यासाठी मी विमा काढला. सुलू व आई-वडील घरात असायचे. मला खोकला आला, की उठून बसायचे, काळजी करायचे. मग मी मोठा तक्क्या घेऊन बसल्या बसल्याच झोप घेत असे, कारण बसल्याने खोकला येत नसे. पुढे डॉक्टरांनी डायलिसिस सुरू केले. दहा आठवडे डायलिसिस झाल्यावर किडनी बदलता येईल, असे सांगितले. घरातील सर्वच जण किडनी देण्यासाठी तयार झाले. सर्वाच्या तपासण्या केल्या. त्यात अंजनाबाईंची म्हणजे माझ्या आईची किडनी सर्वात जास्त मॅच झाली. २२ फेब्रुवारी १९९५ ला माझी शस्त्रक्रिया डॉ. माधव कामत व डॉ. चिवबर यांनी सर जे.जे. रुग्णालयातच केली, कारण माझा तो हट्ट होता. माझी आई तिचा अवयव देऊन डॉक्टरांना म्हणायची, ‘‘माझं सगळं काढून घ्या, पण माझा तात्या वाचला पाहिजे.’’ हे फक्त आईच करू शकते. तिच्या या अफाट प्रेमाने मला पुनर्जन्म मिळाला. माझ्यासाठी हे वळण विधायक ठरलं, कारण मी माझं पुढचं आयुष्य गरिबांची सेवा करण्यात घालविण्याचा निर्णय घेतला.
मुंबई येथे रुजू झालो खरं; पण रुग्णांचा माझ्याकडे येण्याचा ओढा तितकासा दिसत नव्हता. शिवाय औरंगाबाद व मुंबईच्या शस्त्रक्रिया पद्धतीत खूपच फरक होता. मी येथील निवासी डॉक्टरांपेक्षा निपुण वाटत नव्हतो. तरी डॉ. रागिणी पारेख यांनी मला बऱ्याच गोष्टी शिकविल्या. तरीही रुग्णसंख्या वाढत नव्हती, कारण बाहेर ‘फॅकोइमलशी पिफकेशन’ पद्धतीने शस्त्रक्रिया होत होत्या. ती शिकण्यासाठी अहमदाबादला गेलो. विभागात १० लाख रुपयांचे फॅकोचे मशीन घेतले, शस्त्रक्रिया सुरू केल्या. तिसऱ्या दिवशी शस्त्रक्रिया करताना गुंता निर्माण झाला. मी खूप खचलो, परत अंबेजोगाईला जायची तयारी केली; पण डॉ. रागिणी व डॉ. मनोज मला डॉ. केकी मेहतांकडे घेऊन गेले. डॉ. मेहता म्हणाले, उद्या शस्त्रक्रिया ठेवा. मी येतो; पण सर्व निवासी डॉक्टरांना बाहेर ठेवा. मी मात्र निवासी डॉक्टरासमोरच शिकवा म्हणून सांगितले. डॉ. मेहता आले. मला मोठे बळ मिळाले. मी शस्त्रक्रिया सुरू केल्या व १३ शस्त्रक्रिया गुंतागुंत न होता यशस्वी केल्या. त्या दिवसापासून माझी भीती गेली ती कायमची! एक महत्त्वाचा टप्पा पार पडला होता. हे मशीन जे.जे.त आल्याचे कळल्याने रुग्णसंख्येतही खूप वाढ होऊ लागली, ती अगदी आजतागायत चालूच आहे..
नेत्र विभागाचे नाव चांगले झाल्याने रुग्णांची संख्या खूपच वाढली. त्यात अगदी इतर ठिकाणी शस्त्रक्रिया करून त्यात गुंतागुंत झालेले रुग्णही येऊ लागले. अचानक एके दिवशी सकाळी मला फोन आला की, तुमच्या विभागात शस्त्रक्रियेनंतर तीन जणांचे डोळे गेल्याची मोठी बातमी वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर आलेली आहे. मी पेपर वाचला, तर जे.जे.मध्ये उपचार केल्याने तीन रुग्णांना दृष्टी गमवावी लागल्याची बातमी छापली होती. मलाही हे ठाऊक नव्हते. रविवार होता. मी वॉर्डात गेलो, तर कुणाचीही दृष्टी गेली नव्हती. मग बातमी का आली? याचा शोध घेतला तेव्हा लक्षात आले, ठाण्यात शस्त्रक्रिया झालेले व दृष्टी गेलेले तीन रुग्ण रात्री दाखल झाले होते. मी त्यांना तपासले. त्यांच्या शस्त्रक्रियाही रविवारीच केल्या. त्यातील दोघांना दृष्टीही परत मिळाली. मी संबंधित वृत्तपत्र कार्यालयात जाऊन संपादकांना भेटलो. त्यांना सांगितले, आपण एका खासगी डोळय़ाचे तज्ज्ञ व वार्ताहरांना शहानिशा करण्यासाठी पाठवा. ते आले, त्यांनी खात्री केली की, या शस्त्रक्रिया ठाण्यात झाल्यात, जे.जे.त नाही. बातमीचं स्पष्टीकरण वा खुलासा छापला गेला, पण तो सहाव्या पानावर; पण लोकांच्या लक्षात राहिली ती पान एकवरचीच बातमी. साहजिकच रुग्णांवर खूपच परिणाम झाला. रोज सातत्याने प्रयत्न केल्यानंतर तसे काहीही झाले नसण्याची बातमी सगळीकडे पसरली. रुग्णसंख्या पूर्ववत होण्यास थोडेथोडके  नाही तर सहा महिने लागले.
समाजात प्रतिष्ठा मिळाल्यानंतर अपमान होत नाहीत किंवा अडचणी येत नाहीत हे काही खरे नव्हे. मला २००८ मध्ये ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यानंतर आमची नेत्र परिषद होती जेथे माझा व डॉ. केकी मेहतांचा ‘पद्मश्री’ पुरस्कार मिळाल्याने सत्कार होणार होता. माझे वर उल्लेख केलेले गुरू आपल्या भाषणात म्हणाले, ‘‘माझे विद्यार्थी प्राध्यापक झाले, नेत्र परिषदेचे अध्यक्ष झाले, सिव्हिल सर्जन झाले; पण त्यांनी ‘पद्मश्री’ होऊन माझे साधे नावही घेतले नाही.’’ काही दिवसांनंतर त्यांनी शस्त्रक्रिया केलेली एक गुंतागुंतीची केस माझ्याकडे आली. मी त्यांना तपासले व सांगितले की, तुमच्यावर माझ्या देवाने शस्त्रक्रिया केली आहे. मात्र डोळय़ात गुंता असल्याने दृष्टी कमी झाली आहे. ते गृहस्थ कोर्टात जाण्याच्या तयारीने सारे कागद घेऊन आले होते; पण तसे न करता ते परत गेले. मला विनोबाजींची वाक्यं नेहमी आठवतात- जशास तसे नव्हे, मात्र अर्थ साधारण असा आहे- तलवारीशी ढालीने लढा, तलवारीची धार आपोआप बोथट होते. आज आम्ही जिवलग मित्र आहोत.
अधिष्ठाता झाल्यानंतरच्या अनुभवांचे तर एक पुस्तक होऊ शकते. या खुर्चीवर बसल्यानंतर चित्रच बदललं. अचानक सगळीकडे प्रेमाचं वातावरण निर्माण झालं. प्रत्येक जण फारच प्रेमाने वागत, नतमस्तक होत. ज्यांना कधी भेटलो नाही तेही लोक दहा जन्मांपासूनचे मित्र असल्यासारखे वागू लागले. त्या सर्वाच्या वागण्यामुळे माझाही सर्वावर विश्वास बसला. इतके मित्र मिळाल्याने मीही फार खूश होतो. प्रत्येकावर माझा विश्वास होता; पण इथेच आणखी एक पराभव माझी वाट बघत होता. माणसांवर ठेवलेल्या विश्वासाचा पराभव.
या दरम्यान माझ्यावर एक प्रसंग आला. मागे-पुढे पाहतो तर सुरुवातीला माझ्याबरोबर २४ तास बसणारे, माझ्या नावाने सत्ता वापरणारेच गायब. त्यांचे फोन बंद. मग इतरांचे काय? परिस्थितीतून निभावलो; पण यातून एक गोष्ट नक्की कळली, की अडचणीवेळी तुमच्याबरोबर तुमचे कुटुंब व तुम्ही एकटे असता. बाकी असतो तो सगळा आभास. अर्थात रुग्णालयाच्या बाहेर मात्र आजही प्रत्येक जण घरच्यासारखं प्रेम करतो. जवळची माणसे अशा वेळीच ओळखता येतात. तुम्ही फक्त चांगलं काम करत राहायचं. लोकांसाठी केलेलं हे काम आणि दुसऱ्यांना मदत करून मिळालेले आशीर्वाद हेच संकटातून मार्ग काढण्यासाठी मदत करत असतात.

पुढील शनिवारी, आपल्या वळणवाटांचा प्रवास सांगतील, सामाजिक चळवळीतले नेते डॉ. कुमार सप्तर्षी.

loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
With the skin or without and cooked Apples relief against gastrointestinal such as diarrhoea and constipation issues
सफरचंदाच्या सेवनाने बद्धकोष्ठता, अतिसाराची समस्या झटक्यात होईल दूर; तज्ज्ञांनी सांगितलेल्या ‘या’ टिप्स करा फॉलो
Boy killed for resisting unnatural act Sheel Daighar police arrests two
अनैसर्गिक कृत्यास विरोध केल्याने मुलाची हत्या, शीळ डायघर पोलिसांनी केली दोघांना अटक
A layer of Water Hyacinth due to pollution in the river saved the life of a young woman who committed suicide
तरुणीने आत्महत्या केली, पण जलपर्णीने वाचवले; ग्रामस्थांनी वेळेत मदत केल्याने तरुणी सुखरूप