19 September 2020

News Flash

जीवनाची समग्रता

सर्वसामान्य माणसाला वाटू शकतं की, समग्र शांती प्राप्त होण्याचा सुंदर अनुभव आपल्याला कुठून येणार? असा साक्षात्कार होण्याची आपली कुवत तरी आहे का?

| February 8, 2014 04:57 am

सर्वसामान्य माणसाला वाटू शकतं की, समग्र शांती प्राप्त होण्याचा सुंदर अनुभव आपल्याला कुठून येणार? असा साक्षात्कार होण्याची आपली कुवत तरी आहे का? आपलं ताणतणावाचं, गुंतागुंतीचं आयुष्य जगताना ध्यान लावणं, मनाच्या साऱ्या क्रिया थांबवून संपूर्ण शांती अनुभवणं कसं शक्य आहे? इथं एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, आपण ‘कोण’ याबद्दलची आपली धारणा आणि आपलं आत्मस्वरूप यात खूप अंतर असतं.
शां ती आणि आनंदप्राप्तीच्या मार्गावर आत्मस्वरूप जाणण्याच्या प्रयत्नात आपण पहिली पायरी गाठतो ती ध्यानाची! सुरुवातीला विचारांचा, भावनांचा, आठवणींचा कोलाहल चाल करून येतो. तो घाबरवणारा असू शकतो. त्यामुळे प्रयत्न क्षीण झाले तरी हा हल्ला परतविण्याचा एकच मार्ग म्हणजे प्रयत्न करीत राहणं. पुन:पुन्हा चिकाटीने, सहनशीलपणे प्रयत्न करीत राहणं. हे प्रयत्न करताना आणखी एक भान बाळगणं आवश्यक असतं. मनाशी संघर्ष करून हे विचार, विकार, आठवणी दाबून, दडपून टाकण्याची चूक करता कामा नये. दडपलेली कोणतीही गोष्ट केव्हा ना केव्हा दुप्पट वेगाने, ताकदीने उसळी मारून बाहेर पडू शकते. आणखी नव्या कोलाहलाला आमंत्रण देऊ शकते. अशा वेळी आपल्याला कोणत्या गोष्टीचा आधार मिळू शकतो? सुरुवातीलाच येणाऱ्या विघ्नाला दूर कसं करायचं? (गौतम बुद्धाच्या वाटेतही ‘मार’ आडवा आला होता, त्याने प्रलोभनं दाखवली होती, भीतीही घातली होती. त्याची इथं सहज आठवण झाल्याशिवाय राहत नाही.)
योगी अरविंद घोष म्हणतात, आपल्या साऱ्यांच्या अंतरात मनापलीकडे, आत्मस्वरूपाकडे पोहोचण्याची एक प्रेरणा असते. आपल्या अस्तित्वाची ती गरज असते. प्रत्येकात वसणारी ही प्रेरणा एखाद्या गुरुकिल्लीसारखी असते. जितकं आपण या गुरुकिल्लीच्या जवळ राहू तितकं आपलं काम सुलभ होत जाईल. जितका या गुरुकिल्लीचा उपयोग करू तितकं आपलं सामथ्र्य वाढत जाईल. नकारात्मक वृत्तीकडून सकारात्मक वृत्तीकडे आपली वाटचाल सुरू होईल. त्या उत्कृष्ट इच्छेचं भान विचारांच्या कोलाहलाला शांत करील. बाहेर धावणारं मन त्या इच्छेशी निगडित झाल्यावर आपोआप शांत होऊ लागेल. विचार विकारांचा तणावपूर्ण मोर्चा जणू वाजतगाजत निघून जाईल.
सुरुवातीला मन शांत करण्यासाठी एखाद्या प्रतिमेशी निगडित करायला हरकत नाही. (पाश्र्वभूमीला साहाय्यकारी अशी ती आत्मरूपाकडे जाण्याची उत्कट आकांक्षा असतेच.) कल्पना करा की, एखाद्या विशाल तरंगरहित प्रचंड सागरावर आपण निश्चलपणे विसावलो आहोत. आपलं अस्तित्व विशाल होत, पसरत चाललं आहे. आपण जडत्व दूर सारलं आहे. अगदी शांत, नि:स्तब्ध नीरवता आत-बाहेर पसरली आहे. या वेळी शांतपणाखेरीज असा अनुभव येऊ लागतो की, आपल्या जाणिवेच्या कक्षा रुंदावत आहेत. आपण अधिक भानावर आहोत, जागृत आहोत. आपण स्वत:ला जितकं सैल सोडू, विश्रांत अवस्थेत राहू, शरीर-मनाचा जखडलेपणा दूर होईल तितकी ध्यानासाठी अनुकूल परिस्थिती तयार होईल. प्रत्येक व्यक्तीच्या मनाच्या जडणघडणीनुसार, कुवतीनुसार मौन साध्य होण्यास कष्ट आणि वेळ लागू शकेल. पण चिकाटीने प्रयत्न सुरू ठेवले तर ते साध्य होईल. सामान्यत: ही प्रक्रिया अडथळय़ांची, वेळ घेणारी, कष्टसाध्य असते. तरीही प्रयत्न सुरू ठेवावा लागतो. पण कधी कधी अचानक आपल्या साधनेच्या कितीतरी पट अधिक प्रमाणात, खूप लवकर प्रयत्नांना यश येतं. अमर्यादपणे पसरलेल्या आत्मतत्त्वाचा साक्षात्कार होतो. एखादा स्रोत अंतरातून उसळून त्याचा प्रत्यय यावा असं घडतं. योगी अरविंद घोष यांना असा साक्षात्कार झाल्याचा, कल्पनेच्या पलीकडे मनाची समग्र शांती प्राप्त होण्याचा तो क्षण त्यांनी अनुभवल्याचं नमूद केलं आहे.
सर्वसामान्य माणसाला वाटू शकतं की, असा सुंदर अनुभव आपल्याला कुठून येणार? असा साक्षात्कार होण्याची आपली कुवत तरी आहे का? आपलं ताणतणावाचं, गुंतागुंतीचं आयुष्य जगताना ध्यान लावणं, मनाच्या साऱ्या क्रिया थांबवून संपूर्ण शांती अनुभवणं कसं शक्य आहे? इथं एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, आपण ‘कोण’ याबद्दलची आपली धारणा आणि आपलं आत्मस्वरूप यात खूप अंतर असतं. आपण जो ‘मी’ समजत असतो त्यावरून आत्मस्वरूपाची पारख करणं चुकीचं ठरतं. योगामुळे त्या सत्य आत्मस्वरूपाचं भान जागं होतं. कारण आपण जेव्हा त्या मार्गाने वाटचाल सुरू करतो तेव्हा आपल्या निसर्गदत्त क्षमतांचा सुप्तावस्थेत असलेला ऐवज हळूहळू जागृत होऊन कामाला लागतो. आपल्यातील अदृश्य बदल घडविण्याची ताकद असलेल्या शक्ती कार्यरत होतात. आपल्या पृष्ठभागावरचा हा जो ‘मी’ असतो त्याला त्या केव्हाच उल्लंघून जातात. सामान्यत: आपल्याला जे अशक्य वाटत असतं ते सारं या जागृत झालेल्या शक्तींमुळे साध्य होऊ लागतं.
या सर्व प्रक्रियेत आपलं आतील अस्तित्व आणि बाह्य़मन यांना साधणारा मार्ग स्वच्छ, मोकळा व्हायला हवा. त्या दोहोंची जोडणी होऊन एका समग्र अस्तित्वाचं भान यायला हवं. अंतर्मनातील जाणीव, क्षमता, शक्ती सारं आपल्या ठायी असतंच. त्याचं भान आपल्याला नसतं. ते काही माहीत नसतं. कारण अनेक विचार-विकारांनी तयार झालेल्या बहिर्मनालाच आपण ‘मी’ समजत असतो. आतलं ते शक्तिमान जागृत अस्तित्व आणि बहिर्मन एकमेकांशी जोडले जायला हवेत. त्या दोहोंमधला मार्ग स्वच्छ, नेटका आणि वाहता करण्यासाठी ध्यानातून मौन साधलं जायला हवं. आपण खरे कोण आहोत, आपल्या अंगी काय ताकद आहे, कोणत्या क्षमता आहेत, कोणत्या शक्ती आहेत ते आपल्याला माहीतच नसतं. या क्षमता, शक्ती सुप्तपणे आतमध्ये पडून असतात. आपलं आतील अस्तित्व आणि बाह्ममन यांना जोडणारा मार्ग मोकळा झाला की आपल्या समग्रतेचं भान आपल्याला येऊ लागतं. त्या आतल्या गाभ्यातल्या स्पंदनांवर चढलेली पुटं, भिंती नाहीशा झाल्या की ध्यान लागू लागतं. ध्यानातील जागृतावस्था आणि चैतन्य वेगळं असतं. आपण दुनियेपासून तुटून, मोडून दूर जाऊन पडत नाही. उलट सर्व विश्वातील एकात्मतेचा प्रत्यय देणारी जागृत अवस्था क्रमाक्रमाने प्राप्त होऊ लागते. या जागृतावस्थेत खऱ्या ‘मी’ची जाणीव होते. योगी अरविंद यांचं असं म्हणणं आहे की, ही केवळ सुरुवात असते. ध्यानामुळे जी शांत अवस्था प्राप्त होते ती निरंतरपणे वसणाऱ्या संपूर्ण शांतीची अवस्था नसते. कारण आपण ध्यान संपविलं, ध्यान केलं होतं ती जागा सोडली, आपण बाहेरच्या जगात आलो, रोजचा वावर, व्यवहार सुरू झाला की परत आपण सवयीनुसार मनाच्या विचार विकारांच्या स्वाधीन होतो. म्हणजे परत आतील शक्तिमान, क्षमतायुक्त अस्तित्व आणि आपला बाह्य़मनातील ‘मी’ या दोहोंचा संबंध तुटतो. आतलं आणि बाहेरचं दुभंगून जातं. हे होता कामा नयेच, पण आणखी ही एक गोष्टीची जाणीव बाळगायला हवी. आतल्या अस्तित्वाच्या शोधात, ध्यानासाठी, साधनेसाठी एकटेपणा, विजनवास पत्करलेला असतो तिथंही अडकून पडता कामा नये. आतील अस्तित्व आणि बाहेरचं रोजचं जगणं हे जागृत एकमेकांशी साधलं जायला हवं. पुष्कळदा आतल्या आणि बाहेरच्या जगाचा सांधा जुळवताना लक्षात येतं की, आतलं जग भौतिक पातळीवर फारसं परिणामकारक ठरत नाही. कारण आपण फक्त स्वत:शी निगडित राहून अंतर्जगात अडकून पडलेलो असतो. त्यामुळे बाह्य़ जगातील भौतिक जीवन आणि शरीर यांच्यात बदल घडवून आणून त्यांचं उन्नयन करणं आपल्याला कठीण जातं. आपलं रोजचं जगणं आणि आतला प्रकाश यांचा संबंध उरत नाही. बाहेर नेहमीप्रमाणे सरधोपट जगणं, सवयी, मनावर झालेले चुकीचे परिणाम, त्यातून घेतलेले निर्णय हे आपलं चालूच राहतं. म्हणून आतलं जग आणि बाहेरचं जग  विभक्त ठेवण्याचा धोका पत्करायचा नाही. समग्रतेने जगण्याकडे आपली वाटचाल होत राहिली पाहिजे.  

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 8, 2014 4:57 am

Web Title: integrity of life
टॅग Chaturang
Next Stories
1 बदलासाठी मी तयार आहे?
2 बालमधुमेही
3 सोबुक्वे
Just Now!
X