News Flash

फिरता रंगमंच

सध्या बहुतेकांचं घर म्हणजे फिरता रंगमंच झाला आहे. कोण कधी कोणत्या भूमिकेत असेल हे न ठरवता नात्यांचे सुरेख बंध बांधले जात आहेत,  एकमेकांना समजून घेत

एकीकडे माझ्यामुळेच सगळं होतंय, हा अहंकार विसरला जातोय, तर दुसरीकडे इतरांच्या कष्टांची किंमतही कळते आहे.

अपर्णा देशपांडे – adaparnadeshpande@gmail.com

सध्या बहुतेकांचं घर म्हणजे फिरता रंगमंच झाला आहे. कोण कधी कोणत्या भूमिकेत असेल हे न ठरवता नात्यांचे सुरेख बंध बांधले जात आहेत,  एकमेकांना समजून घेत एकमेकांसाठी उभं राहाणं म्हणजे काय, याचं प्रत्यक्ष दर्शन घराघरांतून होत आहे. त्यातून एकीकडे माझ्यामुळेच सगळं होतंय, हा अहंकार विसरला जातोय, तर दुसरीकडे इतरांच्या कष्टांची किंमतही कळते आहे. ‘करोना’च्या जगव्यापी संकटाच्या पाश्र्वभूमीवर म्हणूनच या वर्षीच्या ‘जागतिक कुटुंब दिना’चं (१५ मे) महत्त्व वेगळं आहे.

ं‘‘टाळेबंदी वाढली की गं!’’  शेवटची पोळी तव्यावर टाकत नवरा म्हणाला.

‘लॉग आऊट’ करून, लॅपटॉप बंद करत मी म्हणाले, ‘‘खरंच रे..कधी संपेल हे सारं?  बरं, माझं काम झालंय. बाहेरून काही आणायचंय का?’’

‘‘सध्या तरी नाही.. आणि कितीही करून ठेवलं तरी डबे रिकामेच होतायत..पण त्यातही मजा आहे नाही?’’

‘‘एका वेगळ्याच जगात वावरतोय, असं नाही वाटत? अभूतपूर्व काही तरी.’’

‘‘ते ठीक आहे गं..पण प्रचंड हानी झालीये त्याचं काय..’’

‘‘अरे, त्यातूनही जमेची बाजू बघ ना, कुटुंब म्हणून बहुसंख्य घरांनी आणि नात्यांनी कशी कात टाकलीय. पुढच्या पिढीला सांगण्यासारखं केवढं काय अनुभवतोय आपण!’’

माझं ऑफिसचं काम होईपर्यंत नवऱ्यानं बरंच काम उरकलं होतं. गेले काही आठवडे आम्ही जे जगलो होतो, ते अनुभव आयुष्य बदलवून टाकणारे होते, पूर्ण कुटुंबासाठीच!..कदाचित बहुतांश कुटुंबांसाठी!

दोन आठवडय़ांपूर्वीचीच गोष्ट.  सकाळची प्रसन्न वेळ होती. आम्ही दोघं बागेत सफाई करत होतो, अन् शेजारून चिमुकल्या बंटीचा आवाज कानावर आला,‘‘ममा बघ, बाबा नंगू!’’ आम्ही दचकलो. मान्य आहे की टाळेबंदी आहे, आपण घरातच आहोत, पण म्हणून.. ?  इतक्यात बंटीची ममा ओरडली, ‘‘वहिनी, बघा नं राहुलकडे.’’ तिच्या नवऱ्यानं, राहुलनं, डोक्याचा चमनगोटा केला होता. त्यानंच काय, जवळपास सगळ्यांनीच केलाय सध्या. मोगली होऊन तर नाही फिरू शकत ना? नाहीतर आजूबाजूला सगळेच हिमालयात जाऊन तपश्चर्या करून आल्यासारखे दिसतील. बाहेरून सामान घेऊन आलेली व्यक्ती आपला नवराच आहे ना, याची ओळख  देखील अवघड होऊन बसेल. विचार करा, की एकाच कुटुंबात तरुण मुलगा, वडील आणि आजोबा अशा वाढलेल्या दाढी-मिश्या आणि डोक्यावर जंजाळ  घेतलेले.. त्यात पुन्हा ‘वर्क फ्रॉम होम’! लॅपटॉपसमोर बसून, वरती शर्ट-टाय, खाली नुसता टॉवेल गुंडाळला काय, नाहीतर अर्धी चड्डी, काहीपण चालतं..पण डोक्यावरचं झिपरं घरटं? ते कसं चालेल?

मामाचा फोन आला, तर आमच्या लेकीनं सांगून टाकलं, आई  बाबांची हजामत करतेय म्हणून! आता निदान काही महिने तरी

के शकर्तनालयात किंवा पार्लरमध्ये जायची सोय नाही. त्यामुळे समस्त पुरुष आणि स्त्रियांनी  केशकर्तनाचा ‘ऑनलाईन कोर्स’ करून घ्यावा.  गेल्या काही आठवडय़ातली आपली फजिती आठवा. पंप बिघडला, पाणी वर चढलं नाही..  रात्रभर अंधार. कारण काय तर फ्यूज उडाला, किंवा मामुली वायर जोडणी समस्या.. नळाची तोटी खराब झाली, सतत पाणी वाहतंय.. एक नाही, असंख्य फुटकळ अडचणी.. घरात

तीन-तीन अभियंते असतील, पण किरकोळ दुरुस्त्या करायच्या असतील तर ही असली कामं आपली नाहीत बाबा, म्हणून प्लंबर, इलेक्ट्रिशियन, सुतार यांच्यावर अवलंबून राहणारे आपण त्यांच्याविना किती अगतिक होतो ते तीव्रतेनं जाणवलं. अशा वेळेला लक्षात येतं, की पालक म्हणून आपल्या मुलांना जरुरीचं व्यवहारज्ञान देण्यात आपण किती तोकडे पडतोय. म्हणूनच वाटतं, की सगळ्या कुटुंबानंच आता छोटे-छोटे ‘कौशल्य विकास’ वर्ग ऑनलाईन करूनच घ्यावेत. पाश्चात्त्यांच्या पावलावर पाऊल टाकत, पण कामगारांच्या पोटावर पाय न देता छोटय़ा, किरकोळ दुरुस्त्या शिकून घ्यायलाच हव्यात. शिकवणी वर्गात साऱ्या कुटुंबानं एकत्र नोंदणी केल्यास त्यांना घसघशीत सूटही दिली जावी.

या टाळेबंदीच्या काळात साऱ्या समाजाला आणि म्हणूनच प्रत्येक कुटुंबालाही एक वेगळीच दृष्टी मिळालीये हे नक्की. दृष्टी कशी बदलली, तर परवा स्वयंपाक आटोपून मी तोंडावर पाणी मारून येईपर्यंत टेबलावर जेवणाची सगळी तयारी झाली होती. मी प्रवेश केल्याबरोबर सगळ्यांनी चक्क टाळ्या वाजवल्या. कसलं भरून आलं मला!  हा बदल किती आल्हाददायक आहे. समोरच्या व्यक्तीच्या श्रमाची ही किती भावपूर्ण पावती आहे. हे असं एक कुटुंबप्रमुख म्हणून आपण शिकवलं होतं का? तर नाही. हे आजच्या परिस्थितीनं शिकवलंय. आपल्यासाठी एक सशक्त ढाल बनून या विषाणूशी  लढणाऱ्या प्रत्येक सेवाकर्मीसाठी आपण टाळ्या वाजवल्या, हे सगळं मुलांनी अनुभवलंय. समाज काय किंवा कुटुंब काय, दुसऱ्या व्यक्तीकडून सतत सेवा घेत राहणं, हा आपला अधिकार नाहीये, तर त्यामुळे आपण उपकृत होत आहोत, याची जाणीव होतेय ही खूप मोठी बाब आहे. हीच कृतज्ञतेची भावना कुटुंबात खोलवर आणि कायमची रुजली, तर ती सगळ्या जगातील कौटुंबिक स्वास्थ्यासाठी फार मोठी पुंजी असेल.

या काळात लिंगभेद विसरून घरच्या कामाची वाटणी झालीये हे मात्र मान्यच करावं लागेल. चुकूनही कधी घरातल्या कामात लक्ष न घालणारे पुरुष अचानक ‘बेस्ट शेफ’ बनून एकमेकांना ‘चॅलेंज’ देतायत. पदार्थ कसाही झाला तरी घरातली बाई अशी तोंडभरून तारीफ करतेय, की नवऱ्याचा हा उत्साह टाळेबंदीनंतरही कायम राहिलाच पाहिजे. (बायका तशा हुशारच असतात!)

आमच्याकडे तर बाबाची नियमावलीच तयार झालीये.

उगाचच ऊठसूट ट्रॉलीमधली भांडी बाहेर काढायची नाहीत.

फुटकळ कामासाठी घेतलेले चमचे, वाटय़ा प्रत्येकानं तिथल्या तिथे लगेच धुवून टाकायच्या.

जेवताना मोबाइलला हात लावायचा नाही. अन्यथा समोरचं ताट काढून घेण्यात येईल.

घरात कितीही गबाळे दिसलात तरी चालेल, पण कपाटातल्या इस्त्रीच्या कपडय़ांना हात लावायचा नाही. टाळेबंदीनंतर जड जाईल.

गाण्याचे, नाचाचे व्हिडीओ बनवायचे असतील तर बनवा, पण सहभागाची सक्ती नको. (हे फार महत्त्वाचं.)

बाहेरून आणलेल्या सामानाचं वरचं पॅकिंग सॅनिटायझरनं पुसून घ्यायचं..(आणि आणणाऱ्याला पण त्यात ‘बुचकळून’ काढायचं)

मुलांच्या अभ्यासात अडचण असेल तर तो बालेकिल्ला आईनं लढवावा, त्यावेळी असेल ते काम करण्यास बाबा तयार असतील.

सगळ्यात शेवटी जो अंघोळ करेल त्याला धुतलेले कपडे वाळत घालावे लागतील.

हद्द म्हणजे सिंकच्या नळाच्या वरती एक सूचना लावलेली आहे- ताटात अन्नाचा कणही राहता कामा नये. तसं आढळल्यास पुढच्या जेवणाची भांडी त्या सदस्याला घासावी लागतील.

शिस्तीमुळे बऱ्याच असाध्य गोष्टी सहज साध्य झाल्या. जसं- भाजी कुठलीही असो, सगळ्यांनी ताटातलं अन्न संपवणं.  मावशीबाईंना किती खरकटं साफ करावं लागतं याची जाणीव, आपल्या बेशिस्तीमुळे दोन- दोन टोपली भांडी पडत होती याची जाणीव आणि भांडी घासणं ही एक कला आहे याचं ज्ञान. समस्त पतीदेवांनी आपल्या ‘ग्रुप’मध्ये, फोनवर एकमेकांना भांडी घासण्याची कला आणि त्यातले बारकावे यावर सल्लेही देऊन टाकले. बायका ‘गॉसिपिंग’ करतात, पण आता पुरुषही? आमच्या भांडीवाल्या मावशीबाई परत आल्या, की त्यांना घरची बाई नाही, तर बुवा सूचना देणार असं वाटतंय. मुलांमध्येही जाणवण्याइतका फरक पडलाय. कपडे मशीनमध्ये टाकणं, फर्निचर पुसणं, कपाटं आवरणं, कुंडय़ांना पाणी घालणं, कितीतरी कामं, जी करवून घेण्यासाठी मातृवर्ग इतर वेळी रक्ताचं पाणी करत असे, तीच कामं पोरं आता मस्त, आनंदानं पार पाडताना बघून गहिवरून येतंय. आमच्या शेजारचे भाऊजी गच्चीत फेऱ्या मारून आल्यावर त्यांच्या मुलानं लगेच त्यांच्या चपला फळीवर नेऊन ठेवल्या म्हणे. हे बघून वहिनीला तर पोराला कुठे ठेवू असं झालं. आमच्या घराच्या मधल्या ‘पॅसेज’मध्ये तर आम्ही कामाच्या वाटणीचं वेळापत्रकच लावलंय. त्यात चक्क मोबाइल आणि इंटरनेट वापराच्या वेळाही अधोरेखित करून स्पष्ट केल्या आहेत. कपाटावर एक छोटी चिकट वही आणि पेन लावलंय. कुणाला अत्यावश्यक सामानातलं काय हवंय ते आठवणीनं त्यात लिहायचं. बाहेर पडणाऱ्या व्यक्तीनं त्या चिठ्ठीनुसार सगळं सामान आणायचं. कसलं भारी! सगळं कुटुंब इतक्या मोठय़ा काळासाठी निवांत एकत्र आलं. मनमोकळा संवाद झाला. भविष्यातल्या स्वप्नांची गाठोडी मोकळी झाली. अनेक गाठी सुटल्या. अनेक उसवलेले धागे पुन्हा जोडायला उसंत मिळाली. पदोपदी अधीर होणाऱ्या मनाला संयमाची शिकवण मिळाली. सक्तीनं का होईना, अनेक जणांची व्यसनापासून दूर राहण्याची मानसिक तयारी झाली, जी एरवी अत्यंत कठीण बाब आहे. महत्वाचं म्हणजे कौटुंबिक हिंसाचाराच्या अनेक घटना समोर येत असताना आपलं घर त्यापासून कोसो दूर असल्याचंही समाधान अनेक कुटुंबांत पहायला मिळालं.

हे सगळं खूप छान आहे. त्यामुळेच करोनाच्या जागतिक संकटाच्या पाश्र्वभूमीवर आलेल्या या वर्षीच्या ‘जागतिक कुटुंब दिना’चं (१५ मे) रूप आणि महत्त्व वेगळं आहे.  घर सगळ्यांचं असतं, पण बहुतांशी सगळ्या जबाबदाऱ्या घरातल्या स्त्रीवर टाकून सगळे मोकळे होतात. या काळात मात्र घराचा रंगमंच फिरलाय. मी बँकेचे कागद काढून बसले होते आणि तिकडून प्रश्न आला, ‘‘आज जेवणात आलू पराठे चालतील का?’’ ‘‘हो, फक्त आजोबांना कमी तिखट.’’ काय मज्जा नं? भूमिका बदलल्यात चक्क! खरंच रंगमंच फिरलाय की. तसं बघितलं तर सगळी पृथ्वीच एक फिरता रंगमंच आहे, ज्यात मानव एक-एक भूमिका निभावत असतो. सध्या कुटुंबातल्या कलाकारांच्या भूमिकांची काही प्रमाणात अदलाबदल नक्कीच झालीये. त्यात दुसऱ्याची भूमिका निभावताना कराव्या लागणाऱ्या तयारीची बऱ्यापैकी कल्पनाही आलीये. मग मी उत्सुकतेनं  इकडे-तिकडे जरा नाक खुपसलं! चौकशीअंती समजलं, की ही भूमिकांची अदलाबदल तिकडे पण झाली आहे. आजींना इन्शुलिन इंजेक्शन देणं, छोटय़ा मुलांचा ‘पॉटी’ कार्यक्रम सांभाळणं, थोडय़ा मोठय़ा मुलांचे ऑनलाइन प्रकल्प सांभाळणं, या जबाबदाऱ्या बाबा लोकांनी यशस्वीपणे पार पाडल्या आहेत.

टाळेबंदीमधल्या काळात कुटुंबात छोटय़ा-मोठय़ा चकमकी, ठिणग्या आणि खुमासदार कुरघोडय़ा पण झाल्या. ‘‘ ‘यू टय़ूब’ चॅनल सुरू करू का गं? ‘घर- एक खेळ मैदान!’ असं काही?’’, ‘‘ बाबा, इथून पुढे शाळेत जाताना माझ्या वेण्या तुम्हीच घालत जा, अजिबात सुटत नाहीत.’’, ‘‘बाबांनी नवीन पदार्थ शोधून काढलाय- ‘पाण्यात तरंगणारी खिचडी!’ ’’, ‘‘होणारा जावई सगळा स्वयंपाक शिकलाय, आता काळजी नाही बाई,’’ असे बारीक-बारीक फटाके पण फुटले. यामुळे कुटुंबातलं वातावरण कसं मस्त हलकंफुलकं झालं.

कुटुंब म्हणजे फक्त रक्ताच्याच नात्यातल्या लोकांचा समूह असतो का, किंवा त्यात नात्यातल्या इतर व्यक्तीच असतात का? मग जिवाला जीव देणारे आणि संकटकाळी धावून येणारे समाजातले इतर घटक?  ते पण विस्तारित कुटुंबाचाच भाग आहेत ना? गृहिणी चार पदार्थ करताना थोडे जास्त का करतात? लहान मुलं आपल्या घरापेक्षा अनेकदा शेजारी का आनंदानं जेवतात? भिंतीवरून पदार्थांची देवाणघेवाण का सुरू असते?  ज्ञानदेवांनी तर पसायदानात ‘अवघे विश्वची माझे घर’ म्हटलंय. ‘वसुधैव कुटुंबकम्’ ही भावना जोपासणारे आधुनिक संत आहेत ना आजच्याही काळात. रतन टाटा , बिल गेट्स, जॅक मा आणि अनेक जणांनी महामारीच्या ‘रिलीफ फंडा’च्या झोळीला असामान्य वजन प्राप्त करून दिलं आणि  वैश्विक कुटुंबाच्या प्रमुखाची भूमिका चोख निभावली.

आणखी एक लक्षणीय बाब म्हणजे  मिळणाऱ्या वेळेचा फायदा घेत अनेक स्त्रियांनी स्वत:ला ‘अपग्रेड ’ करणारे प्रशिक्षण वर्ग, छंद जोपासणारे क्लासेसही लावले.  घरातील बऱ्याच आघाडय़ांवर पुरुष लढत असण्याचा चांगला फायदा करून घेतला. आमची सोसायटी तशी फार मोठी आहे.  एरवी सगळी कामं  थोडय़ाफार चकमकी सोडल्या तर सुरळीत चालतात. कारण अतिशय  गरम डोक्याचे, अहंकाराचा मुकुट धारण करणारे पुरुष सदस्य अत्यल्प काळासाठी समोरासमोर येतात.  पण सध्या कॉलनी आणि सोसायटीची जबाबदारी आम्ही स्त्रियांनी खांद्यावर घेतलीय. नवरे  तिकडे घरकामात व्यस्त असलेलेच बरे.  नाही तर ठीकठिकाणी नवीन महाभारतं घडतील. सोसायटीचं विजेचं बिल, पाणी बिल, टॅक्स, आणि घरची वैयक्तिक बिलं सगळं आम्ही महिलावर्गानेच सांभाळलं.  हे काम  खरंच किती मोठं आहे याची कल्पना आली. आणि तेवढीच बिचाऱ्या पुरुषांना  सूट !

अनेक शहरांत अनेक ठिकाणी ‘करोना रिलीफफंडा’ साठी स्त्रियांनी प्रचंड मोठी जबाबदारी उचलली आहे. सोसायटय़ांमधून ऑनलाइन फंड आणि धान्य गोळा करणं, ट्रक्सची व्यवस्था, वाटप करताना पोलीस कर्मचाऱ्यांची मदत मागवणं, ही कामंही आम्हीच केली. शिवाय  महापालिके च्या विभागात नगरसेवकांची मदत घेऊन स्त्रियांच्या पुढाकारानं  सगळ्या परिसरात  सॅनिटायझरची फवारणीही करवून घेतली. प्रत्येक यशस्वी स्त्रियांच्या गटामागे पुरुषांचा (घरात राबता) हात होताच. एकू ण काय, भूमिकांमधील बदल दुसऱ्याचं काम समजून घेण्यात फायदेकारक ठरला.

एका फिरत्या रंगमंचासारख्या या पृथ्वीवर ‘आनंद’ चित्रपटात म्हटल्याप्रमाणे आपण एक कठपुतळी आहोत, जिला ‘तो’ नाचवतोय. हे समजावून घेतलं, तर ‘मीच सगळं करतोय/ करतेय’, ‘माझ्यामुळेच घर नीट चाललंय’ यामधला ‘मी’  गळून पडेल. निकोप कुटुंबासाठी ते फार आवश्यक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 9, 2020 1:31 am

Web Title: international day of families 15 may family members helping each other in this corona pandemic dd70
Next Stories
1 भूमिका बदलताना..
2 जीवन विज्ञान : वाढवा प्रतिकारशक्ती
3 मनातलं कागदावर : असाही एक वाढदिवस
Just Now!
X