‘सेवाव्रती’ हा रुग्णसेवेच्या संकल्पनेला वेगळा आयाम व परिमाण देणारा औरंगाबादमधला एक अत्यंत यशस्वी प्रकल्प. ६० वृद्ध सेवाव्रती आज इथल्या रुग्णालयात नियमितपणे निरपेक्ष, नि:स्वार्थी सेवा देत आहेत. आपल्या निवृत्तीनंतरची पोकळी या सेवाव्रतींनी रुग्णांच्या सेवेने भरून काढली आहे. नुकत्याच   (१ ऑक्टोबर) रोजी साजऱ्या करण्यात आलेल्या जागतिक वृद्ध दिवसाच्या निमित्ताने या कर्मयोग्यांच्या या अक्षय सेवाव्रताविषयी..

आठ-दहा वर्षांपूर्वीची गोष्ट. औरंगाबादमधल्या डॉ. हेडगेवार रुग्णालयात ज्योती नवाथे नावाच्या एक रुग्ण आल्या. त्यांचा कान प्रचंड दुखत होता. रुग्णालयाचे कान-नाक-घसातज्ज्ञ डॉ. भारत देशमुख सलग बारा तास अनेक छोटय़ा-मोठय़ा शस्त्रक्रिया करून घरी पोहोचतात न पोहोचतात तोच त्यांचा फोन वाजला. रुग्णालयाच्या निवासी डॉक्टरांनी जरा चाचरतच रुग्णाविषयी सांगितलं. यावर एक क्षणाचाही विलंब न करता ते येतो म्हणाले. त्यांची निष्ठा, व्यवसायाप्रतिचं त्यांचं समर्पण पाहून नवाथे पती-पत्नी एवढे भारावले की चार दिवसांत ते परत येऊन रुग्णालयाच्या व्यवस्थापनाला भेटले आणि म्हणाले की, आम्हाला तुमच्या सेवाव्रती उपक्रमात सहभागी व्हायचंय!

तेव्हापासून आजगायत हे जोडपं रुग्णसेवेसाठी आठ-आठ तासांचं नि:स्वार्थी योगदान देतंय. असे एक-दोन नव्हे तर तब्बल ६० सेवाव्रती आज        डॉ. हेडगेवार रुग्णालयात नियमितपणे निरपेक्ष सेवा देत आहेत. हे सर्व जण आलेत ते स्वत:च्या पावलांनी. कुठंही जाहिरात दिलेली नाही. कुठल्याही मानधनाचं मधाचं बोट नाही. स्वत:च्या आजारपणात औषधोपचार तरी विनामूल्य होईल इतकीही अपेक्षा नाही. एवढंच नव्हे तर आमच्या चहाचे पैसे आम्हीच देणार हा त्यांनी स्वत:च स्वत:ला घालून दिलेला नियम ‘मा फलेषु कदाचन’ हा गीतेतील कर्मयोग या निस्पृह, नि:स्वार्थी, निर्मळ मनाच्या सेवाव्रतींच्या प्रत्येक कृतीतून दिसतो.

‘सेवाव्रती’ हा रुग्णसेवेच्या संकल्पनेला वेगळा आयाम व परिमाण देणारा एक अत्यंत यशस्वी प्रकल्प. निवृत्तीनंतर काय, हा प्रश्न अनेकांना पडतो. या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न प्रत्येक जण आपल्या परीने करत असतो. पण आयुष्याचा उत्तरकाळ कोणतीही अपेक्षा न ठेवता, रुग्णसेवेत व्यतीत करणारे साठीपुढचे अनेक तरुण-तरुणी      डॉ. हेडगेवार रुग्णालयात दिसतात. हे सेवाव्रती स्वागत कक्षापासून ऑपरेशन थिएटपर्यंत सर्वत्र कार्यरत आहेत. निवृत्तीनंतरची पोकळी त्यांच्या आयुष्यात आलीच नाही. हा कालखंड त्यांनी सेवेचं व्रत घेऊन अधिकच सुंदर बनवलाय.

या उपक्रमाचे पहिले शिलेदार भालचंद्र कुलकर्णी. त्यांना जाऊन एक वर्ष झालं, तरी आजही त्यांच्या नावापाठी कै. लिहायला कोणाचाच हात धजावत नाही. स्टेट बँकेतून शाखाधिकारी म्हणून निवृत्त झालेल्या या गृहस्थांना मिळालेल्या वेळेचं काय करावं ते सुचत नव्हतं. घरीही बसवत नव्हतं. त्याच तिरमिरीत ते उठले आणि डॉ. हेडगेवार रुग्णालयात येऊन त्यांनी जाहीर केलं की, ‘‘मला येथे काम करायचंय’’. तिथल्या डॉक्टरांना वाटलं की हे काही दिवसांचं वेड असेल. पण ते येत राहिले. कसलीही अपेक्षा न ठेवता पडेल ते काम करत राहिले. त्यांचा तो दृढनिश्चय पाहून व्यवस्थापनही अचंबित झालं. त्यांच्यानंतर २ ते ३ महिन्यांनी प्रल्हाद पानसे आले. तेही एका मोठय़ा निमशासकीय कंपनीतील सरव्यवस्थापक पदावरून निवृत्त झालेले. त्यांनी आजूबाजूच्या ग्रामीण भागातून रुग्णालयात येणाऱ्या गरीब, अशिक्षित रुग्णांना मार्गदर्शन करण्याचं काम हाती घेतलं. माधुरीताई आफळे यांनी त्याआधीच रुग्णालयात रक्तपेढीसाठी दात्यांच्या यादीतून त्यांच्या जन्मतारखा शोधून त्यांना पत्राद्वारे वाढदिवशी रक्तदानासाठी उद्युक्त करायचं काम सुरू केलं होतं. प्राजक्ता पाठक याही सुरुवातीपासूनच्या सेवाव्रती. सासूबाई कर्करोगानं आजारी असताना त्यांना तीव्रतेनं जाणवलं की अशा रुग्णांना उपचारांसोबत भावनिक आधार देणारं कुणी तरी हवं आहे. या प्रेरणेनं त्यांनीही कामाला सुरुवात केली. याच कालावधीत (२००० मध्ये) रुग्णालयाच्या नवीन इमारतीच्या उभारणीचं काम सुरू होतं. रुग्णालयाचे संचालक डॉ. अनंत पंढरे यांनी समाजातला हा महत्त्वाचा घटक (निवृत्त मंडळी) आणि हॉस्पिटलच्या गरजा यावर विचार करून ‘सेवाव्रती’ योजना ठरवली.

तोपर्यंत दहा जणांचा गट कार्यरत झाला होता. सुरुवातीला आलेले अनुभव, रुग्णांची गरज आणि डॉ. पंढरे यांचं मार्गदर्शन यातून ही संकल्पना फुलत गेली. माधुरी आफळे, पानसे, कुलकर्णी, नवाथे यांनी सेवाव्रतींचा समन्वय, नियोजन, प्रशिक्षण याची जबाबदारी घेतली. त्यानंतर म्हणजे २००५ पासून सेवाव्रतींच्या गटाने पद्धतशीरपणे स्वागत कक्ष,      क्ष-किरण विभाग, प्रवेश सेवा, संवाद सेतू, तज्ज्ञ डॉक्टरांसंबंधी मार्गदर्शन, स्त्रीरोग विभाग तसेच विविध वॉर्डमध्ये कामाला सुरुवात केली. पूर्वी उच्चपदावर काम करणाऱ्या अनेक सेवाव्रतींनी इथं येण्याआधी त्या मानसन्मानांची झूल जाणीवपूर्वक उतरून ठेवलीय. विक्रीकर विभागाचे उपायुक्तपद भूषवलेल्या कैलासचंद्र पोहनेरकरांना एका रुग्णाला स्ट्रेचरवरून नेताना पाहून त्यांचे सहकारी स्तंभित झाले आणि नंतर तेही या सेवायज्ञात सामील झाले.

जगन्नाथ कहाळेकर, वय र्वष ९५ हे इथले ज्येष्ठ सेवाव्रती. स्वातंत्र्यसैनिक असलेले कहाळेकर आजोबा गेली १२ वर्षे न चुकता सकाळी-संध्याकाळी रुग्णालयात येतात. काठी टेकत टेकत ते ५-६ मजले चढतात. प्रत्येक मजल्यावरच्या रुग्णांची प्रेमाने विचारपूस करतात, त्यांच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवतात. या कट्टर दशग्रंथी ब्राह्मणाच्या आयुष्यातील एक प्रसंग आवर्जून सांगावासा वाटतो. नेहमीप्रमाणे फेरी मारताना एकदा त्यांना आय.सी.यू. वॉर्डबाहेर एक बुरखाधारी मुस्लीम स्त्री हमसाहमशी रडताना दिसली. तिचा पती आत अत्यवस्थ होता. दुपारी १ चा सुमार. ती तिची नमाज पढण्याची वेळ. तिची ती कातर अवस्था पाहून कहाळेकरांनी चक्क तिच्याबरोबर आय.सी.यू.मध्ये नमाजपठण केलं. म्हणाले, ‘‘मी नमाज पढण्याने जर त्याला बरं वाटणार असेल तर मी अल्लाला शरण जायलाही तयार आहे.’’ दवा आणि दुवा यांनी आपलं काम चोख निभावलं आणि तो रुग्ण वाचला. त्याला जेव्हा घरी सोडलं तेव्हा कहाळेकर आजोबा रुग्णालयात येईपर्यंत ती दोघं वाट बघत थांबली होती. एक लहानगा तर बरं होऊन जाताना एवढंच म्हणाला, ‘‘डॉक्टर, मला एकच करायचंय. कहाळेकर आजोबांचा फक्त पापा घ्यायचाय..’’ ऐकताना डॉक्टरांचेही डोळे पाणावले.

आपलं साठीचं वय विसरून सेवा करणाऱ्या या सेवाव्रतींचं रुग्णाशी असलेलं भावनिक नातं आता एवढं दृढ झालंय की, आता ते रुग्णांच्या इच्छापूर्तीसाठी काहीही करायला तयार असतात. यात रुग्णाला छानशी गोष्ट सांगणं, कधी गाणं म्हणून दाखवणं, कधी त्याच्या आवडीचा पदार्थ करून आणणं, पाय दाबून देणं, स्त्री रुग्णांचे केस विंचरणं हे तर आलंच. पण इथं घडलेल्या काही गोष्टी तर तुमच्या-आमच्या कल्पनेपलीकडच्या!

त्यातील एक घटना अशी.. एकदा एक आजी आय.सी.यू.मध्ये दाखल झाल्या. आल्या त्याच इतक्या अत्यवस्थ की व्हेंटिलेटरवरच ठेवावं लागलं. त्यांचा प्राण गुंतला होता एकुलत्या एक नातीच्या लग्नात! लग्न ठरलेलं, पण आजीच्या अशा अवस्थेमुळे लांबणीवर पडलेलं. हे समजल्यावर त्या वॉर्डमध्ये काम करणाऱ्या सुधाताई कुलकर्णी व इतर सेवाव्रतींच्या मनात एक विलक्षण कल्पना आली. आजीच्या डोळ्यादेखत आय.सी.यू.मध्येच नातीचं लग्न लावायचं! डॉक्टरांनी ही कल्पना प्रथम उडवूनच लावली. पण इतर रुग्णांना कणभरही त्रास होऊ देणार नाही या हमीवर अखेर परवानगी मिळाली आणि चक्क वॉर्डात हे लग्न लागलं! सदावर्ते काकांनी पौरोहित्याची जबाबदारी घेतली. बारा बेड्सच्या त्या गोलाकार आय.सी.यू. मधोमध एक छोटंसं चौकोनी कुंड उभं राहिलं आणि सप्तपदी, लज्जाहोम, कन्यादान.. असा सगळा सोहळा फक्त आजीनेच नव्हे, तर इतर रुग्णांनीही पडदा बाजूला करून डोळे भरून पाहिला. त्यानंतर दोनच दिवसांनी आजीने डोळे मिटले. त्या वेळी नवरानवरीच नव्हे तर अख्खं हॉस्पिटल रडलं..
ch01

डॉ. हेडगेवार रुग्णालयात ६० ते ७० टक्के गरीब रुग्ण आसपासच्या ग्रामीण भागातून येतात. त्यांच्या जेवणाखाण्याची काहीच सोय नव्हती.  ही परिस्थिती राजकुमार खिंवसरा यांनी कोणी न बोलताच जाणली आणि स्वखर्चाने रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांच्या नाश्ता, जेवणाची व्यवस्था चालू केली. २०१२ पासून ते दररोज ३०० ते ५०० लोकांना तीन वेळा अन्न पुरवितात. तेही पोटभर. यासाठी लागणाऱ्या सामानाची खरेदी ते स्वत: करतात. रोजचा नाश्ता, आचाऱ्यांमार्फत त्यांच्या घरीच बनतो. त्यानंतर स्वत:च्या मोठय़ा व्हॅनमध्ये हे पदार्थ भरून ती गाडी स्वत: चालवत ते रुग्णालयात येतात आणि मग प्राजक्ता पाठक व मालती करंदीकर या सेवाव्रतींच्या मदतीने आणलेलं जेवण सर्वाना आपल्या हाताने वाढतात.

या सेवाव्रतींचा दर महिन्याला एक बौद्धिक वर्ग घेतला जातो. काही उणिवा असतील तर डॉक्टरांचे, व्यवस्थापनाचे प्रतिनिधी आदरपूर्वक सांगतात. रुग्णांची सोय, त्यांना बरं वाटणं हे अंतिम ध्येय. तिथं तडजोड नाही. प्रसूती विभागात काम करण्यासाठी महिला सेवाव्रतींना स्त्रीरोगतज्ज्ञाकडून प्रशिक्षण दिलं जातं. पहिलटकरणीला धीर देणं, बाळाची स्वच्छता, त्याला अंगावर कसं पाजायचं आदी गोष्टी सेवाव्रती खूप मायेने करतात. जे बोलण्यात चतुर असतात त्यांची मदत शस्त्रक्रियेच्या आधीच्या तयारीच्या वेळी कामी येते. डॉक्टर, नर्सेस रुग्णाला तयार करत असताना हे सेवाव्रती त्याला बोलण्यात गुंतवून ठेवतात. जेणेकरून त्या रुग्णाची मनस्थिती चांगली राहते. शिवाय बाहेर बसलेले रुग्णाचे नातलग व आतले शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर्स यांच्यातील संवादाचा सेतूही तेच असतात.

या सेवाव्रतींना जॅकेटसारखा एक विशिष्ट अ‍ॅप्रन दिलाय. त्यावर ठळक अक्षरात ‘सेवाव्रती’ असं लिहिलंय. त्यामुळे त्यांना सहजी ओळखून त्यांची मदत घेता येते. डॉ. आशीष बिडकर म्हणाले, आमचे सेवाव्रती वर्षांला नि:स्वार्थी सेवेचे जवळपास ५० हजार तास देतात. आमच्या रेडिओलॉजी विभागात तर रोजचे हजारभर रुग्ण येतात. इथले जोशी काका आले नाही तर आमचं काम होऊच शकत नाही.

सेवाव्रतींचं कौटुंबिक संमेलनही होतं. त्या वेळी फक्त त्यांच्या कुटुंबीयांनी बोलायचं असतं. ते अनुभव तर सर्वानाच थक्क करणारे. या बैठकीत सेवाव्रतींच्या लेकी-सुना आनंदाने मान्य करतात की आमचे आई-बाबा सेवाव्रती झाल्यापासून इतके बदललेत, टवटवीत झालेत की जणू त्यांचा पुनर्जन्मच झालाय असं वाटतं. सेवाव्रतींच्या जीवनातील आणखी एक हृद्य प्रसंग म्हणजे या अनुभवी ज्येष्ठांनी आपलं काम करत असतानाच रुग्णालयात अत्यंत चांगलं काम करणारे ५० कर्मचारी हेरले आणि या निष्ठावतांचा त्यांनीच सत्कार केला.

‘सेवाव्रती’ योजनेला मिळालेली राजमान्यता म्हणजे भारतातील व्यवस्थापनाचे शिक्षण देणाऱ्या सर्वात अग्रगण्य अशा अहमदाबाद येथील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट या संस्थेने केलेली वाखाणणी. एवढंच नव्हे तर त्यांनी ‘रुग्णालयाचे व्यवस्थापन’ या विभागात सेवाव्रती हा विषयही अंतर्भूत केलाय.

सेवाव्रतींची लगबग बघताना वाटत राहतं की, इतक्या उच्च कोटीच्या निरपेक्ष सेवेची प्रेरणा यांना मिळते तरी कुठून? यावर अनेकांनी आपापलं मत व्यक्त केलं. बाबूराव सदावर्ते म्हणाले, जेव्हा रुग्ण शस्त्रक्रियेच्या वेळी बाबूराव काका जवळ हवेतच असा हट्ट धरतात, तो विश्वासच माझं टॉनिक आहे.

सुधाताई कुलकर्णी यांचं म्हणणं असं की, या वयातही आम्ही कोणाच्या तरी उपयोगी पडू शकतो ही भावनाच आम्हाला ठणठणीत ठेवते आणि अधिक काम करण्यासाठी बळ देते. आपल्या बोलण्याच्या पृष्टय़र्थ त्यांनी स्तनाच्या कर्करोगातून बाहेर पडून पुन्हा नव्या जोमानं काम करणाऱ्या ‘सेवाव्रती’ शोभाताई तांदळेंचं उदाहरण सांगितलं.

‘सेवाव्रती’ झाल्यानंतर स्वत:मधील बदल सांगताना      सर्व सेवाव्रतींच्या बोलण्यातून एक गोष्ट पुन:पुन्हा समोर येत होती ती म्हणजे रुग्णांचा त्यांच्यावर बसलेला विश्वास. तोही इतक्या पराकोटीचा की, ते शस्त्रक्रियेला जाण्यापूर्वी आपले कित्येक तोळय़ाचे दागिने, पैसा-अडका नातेवाईकांकडे न देता ‘सेवाव्रतीं’कडे सोपवतात. अर्थात हा विश्वास काही एका रात्रीत येत नाही. अत्यंत ध्यासाने त्यांनी हा विश्वास कमावला आहे. याचबरोबर माधुरीताई आफळेंनी ‘सेवाव्रतीं’नी घ्यायची एक अत्यावश्यक खबरदारीही सांगितली. म्हणाल्या, ‘रुग्णावर प्रेम तर करायचं, पण त्यांच्यात अवाजवी गुंतायचं मात्र नाही. व्याधीवर फुंकर मारायची अन् नव्या जखमेकडे वळायचं..

हे कटाक्षाने पाळायलाच हवं’ हादेखील एक महत्त्वाचा संस्कार.

या सेवाव्रतींनी स्वत:च्या आयुष्यातली पोकळी तर भरलीच, पण अनेकांच्या दुखण्यावर, वेदनेवर फुंकर घातली. त्याचं हे पवित्र कार्य ऐकताना जणू मीच पावन होत होते, त्यांची ऊर्जा माझ्यातही परावर्तित होत होती. ल्ल

waglesampada@gmail.com

संपर्क- डॉ. आशीष बिडकर ९०११०१४५६१

संपदा वागळे – bkashish9@gmail.com